.
Travel-पर्यटन

मलाका स्पाइस – 3


.. 1511 मधे पोर्तुगीज आरमाराने हल्ला करून मलाका बंदर आपल्या ताब्यात घेतले होते. या आधी 200 वर्षांहून अधिक काल मलाका बंदर हे मलेशियन द्वीपकल्पामधे असलेल्या एका सुलतानी राज्याची राजधानी होते. .. 1400 मधे परमेश्वर या सिंगापूरच्या हिंदू राजाने त्याची सिंगापूर मधून हकालपट्टी झाल्यामुळे मलाकामधे आपल्या राज्याच्या राजधानीची स्थापना केली. त्या वेळी मलाकाची बहुसंख्य प्रजा हिंदू धर्मीय होती. 1409 मधे एका मुस्लिम राजकन्येशी विवाह करण्यासाठी परमेश्वर मुसलमान झाला व त्याने इस्कंदर शहा असे नाव धारण केले. या नंतर मलाकाच्या नागरिकांनीही इस्लाम धर्म स्वीकारला. इस्कंदर शहाच्या वंशजांनी 1511 पर्यंत मलाकाचे साम्राज्य प्रस्थापित करून तेथे राज्य केले. पोर्तुगीजांकडून पराभव झाल्यावर मलाकाचा सुलतान प्रथम बिनतान येथे पळाला व नंतर समुद्रापलीकडे असलेल्या सुमात्रा बेटावर गेला.

मलाकाचा किल्ला

मलाकाच्या युरोपियन राज्यकर्त्यांना मलाकाचे पूर्व वैभव व महत्व काही परत प्राप्त करून देता आले नाही. मलाका बंदरातून होणारा व्यापार वगैरे सर्व हळू हळू कमी होत गेला. ब्रिटिशांनी डच लोकांकडून मलाकाचा ताबा मिळवल्यावर एका नामधारी सुलतानाला त्यांनी जोहरचा सुलतान म्हणून राज्यावर बसवले व मलाया मधल्या टिन या धातूच्या खाणी, रबराचे मळे या सगळ्यामधे काम करणारे चिनी मजूर व स्थानिक मलै लोक यांच्यातील झगडे मिटवणे वगैरे कामे त्याच्याकडे दिली.

मलाकाच्या सुलतानांचा पारंपारिक महाल, पोर्टो डी सॅनटिआगो या पोर्तुगीज गढीच्या जवळच होता. हा महाल, पोर्तुगीजांनी मलाकाचा ताबा घेतल्यावर, नष्ट करून टाकला होता. 1984 मधे मलाका राज्य सरकारने, आपल्या पारंपारिक वारशाचे जतन करण्यासाठी जुन्या कागदपत्रांवरून, हुबेहुब जुन्या महालासारखा असलेला, लाकडी महाल परत बांधून त्यात या सुलतानी अंमलामधल्या वस्तूंचे संग्रहालय बनवले आहे.

हा सुलतानाचा महाल किंवा पॅलेस बघण्यासाठी मी आता चाललो आहे. मलाका शासनाने आपला पारंपारिक वारसा टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न बघून मला परत एकदा पुण्याची आठवण होते आहे. शनिवार वाडा परत बांधून त्यात संग्रहालय बनवणे वगैरे तर दूरच राहिले. पण जे काय ऐतिहासिक वाडे शिल्लक आहेत त्याचे सुद्धा जतन केले जात नाही हे खरोखरच अतिशय दुर्दैवी धोरण आहे.

मलाया मधल्या खेडेगावांना काम्पॉन्ग किंवा काम्पून्ग असे म्हणतात. या खेडेगावातील घरांची बांधणी मोठी वैशिष्ट्यपूर्ण असते. जमिनीत मोठे लाकडी वासे खोल पुरून त्यावर जमिनीपासून 5 किंवा 6 फुटावर आडवे वासे ठोकले किंवा बांधले जातात. या आडव्या वाशांच्यावर मग घर बांधले जाते. घराच्या खालून सहजपणे कोणालाही चालणे शक्य असते. मलाकाच्या सुलतान पॅलेसची रचना अशी अनेक घरे एकमेकाला जोडल्यावर जसे एक लांब घर तयार होईल तशीच आहे. मात्र या पॅलेसला मध्यभागी जिना आहे व त्यावर दुसरा मजला चढवलेला आहे. पॅलेसमधे शिरण्यासाठी सुद्धा पायर्‍या चढूनच जावे लागते. सबंध लाकडी बांधणी असलेला हा महाल, मला मोठा वैशिष्ट्यपूर्ण आणि इथल्या हवामानाला सुखकारक असाच वाटतो आहे.

सुलतानाचा महाल

शयन गृह

कषाय पेय पात्र


शाही दागिने

या पॅलेसमधल्या संग्रहालयात, त्या काळचे कपडे, दागिने, चिनी मातीच्या वस्तू, चांदीची भांडी यांचा एक सुरेख संग्रह आहे. सुलतानाच्या राजवटीत निरनिराळ्या देशांचे व्यापारी मलाकामधे स्थायिक झाले होते. या सर्वांचे आपली आपली वैशिष्ट्ये दाखवणारे कपडे परिधान केलेले पुतळे व त्या देशाचे व्यापारी कोणत्या मालाचा व्यापार करत असत हे ही दाखवलेले आहे. संग्रहालय बघता बघता आपल्याला जबरदस्त भूक लागली आहे हे लक्षात आल्याने मी पाय आवरता घेतो आहे.

शाही नौका

व्यवस्थित पेटपूजा व थोडी विश्रांती घेतल्यावर आता पलीकडच्या बाजूला असलेल्या दर्यावर्दी वस्तूंचे संग्रहालय बघायला मी चाललो आहे. मलाकाच्या बंदराजवळ बुडलेली एक पोर्तुगीज युद्धनौका फ्लोर डी ला मार‘ ( Flor de La Mar) या युद्धनौकेच्या आराखड्यानुसार ही संपूर्ण लाकडी नौका 1990 मधे बांधली गेली व त्यात हे संग्रहालय बनवले गेले आहे. पुण्यातल्या आमच्या बोट क्लब मधल्या भोजन गृहामधे असलेल्या किंवा मुंबईच्या यॉट क्लबमधे ठेवलेल्या दर्यावर्दी वस्तू मी अनेक वेळा बघितलेल्या असल्याने बहुदा या संग्रहालयातील वस्तूंचे फारसे अप्रूप मला काही वाटलेले नाही. मात्र लाकडी बोट मात्र बघण्यासारखी आहे हे नक्की. इथल्या अनेक संग्रहालयांमधे मला या बंदरात पूर्वी येणारी मालवाहू जहाजे किंवा युद्धनौका यांची अनेक मॉडेल्स दिसत आहेत. त्यांची अनेक छायाचित्रे मी काढतो आहे. या चित्रांचे संकलन करावे असे मनात आहे.

दर्यावर्दी संग्रहालय

या बोटीच्या अगदी जवळच एक पूल ओलांडला की एक छोटासा रस्ता लागतो. हा रस्ता हे मलाकाचे अगदी खास आकर्षण आहे असे म्हटले तरी चालेल. मलाकाला आलेला प्रत्येक पर्यटक बाकी कोठेही जावो अगर ना जावो, या रस्त्याला भेट ही देतोच. या रस्त्याचे नाव आहे जोन्कर स्ट्रीट. लांबवरून पुण्यातली बोहरी आळी किंवा मुंबईच्या लुहार चॉळ सारखा दिसणारा हा रस्ता जवळ गेले की अनेक जुन्या ऍंन्टिक्स वस्तू, बारक्या सारक्या भेट वस्तू यांच्या छोट्या छोट्या दुकानांनी भरलेला एक खजिनाच आहे हे लक्षात येते आहे. नुसते नयनसुख घेत तास दोन तास येथे फिरत राहिले तरी कोणाचीच काहीच आडकाठी नसते. तरूण वर्गाला इथले दुसरे आकर्षण म्हणजे या रस्त्याची रात्री 7 नंतर होणारी खाऊ गल्ली. दक्षिण मध्य एशिया मधल्या पाककृतींचे ज्यांना प्रेम आहे अशा लोकांना हा रस्ता म्हणजे एक सततची मेजवानीच असते. मी अर्थातच तास भर तरी येथे घालवतोच आहे व कितीही मनोनिग्रह केलेला असला तरी काही ना काही अनावश्यक व निरर्थक वस्तू खरेदी करतोच आहे. अर्थात पर्यटन करताना अनावश्यक व निरुपयोगी खरेदी तर झालीच पाहिजे. त्याशिवाय पर्यटनाची मजा काय राहिली?

मलाया मधल्या टिन धातूंच्या खाणीमधे काम करण्यासाठी चिनी मजूर 1928 सालापासून मोठ्या प्रमाणात मलायात येऊ लागले. हे आलेले मजूर नंतर साहजिकपणे येथेच स्थायिक झाले. या लोकांनी आपली संस्कृती आपल्याबरोबरच येथे आणली. इतक्या वर्षांच्या कालानंतर इथली मूळ मलै संस्कृती व बाहेरून आलेली चिनी संस्कृती यांचा मिलाफ होऊन मलेशिया मधल्या सध्याच्या चिनी वंशाच्या लोकांची एक खास अशी संस्कृती बनली आहे. या चिनी वंशाच्या लोकांना बाबानोन्या किंवा नोन्याबाबा या नावांनी मलाकामधे संबोधले जाते. बाबानोन्यांनी आपल्या खास संस्कृती बरोबरच आपली खाद्य परंपराही विकसित केली आहे. या लोकांच्या विशेष खाद्यपदार्थांना नोन्या खाद्यपदार्थ म्हटले जाते. मलाकामधे असे नोन्या खाद्य पदार्थ खवैय्यांना खाऊ घालण्यासाठी विशेष उपहारगृहे आहेत. अशाच प्रकारच्या एका ओले सायानया नावाच्या एका उपहारगृहात रात्रीचे भोजन करण्यासाठी आता आम्ही चाललो आहोत.

नोन्या उपहारगृह ( दिवाळी साठी खास सुशोभन केलेले आहे.)

हे उपहारगृह, लहान मुलांसह आलेली चिनी कुटुंबे, काही गोरी मंडळी व आमच्या सारखे काही एशियन अशा संमिश्र गर्दीने खचाखच भरलेले आहे. आपल्याकडच्या उडप्यांच्या खाद्यगृहात जशा फटाफट ऑर्डर्स घेणे, अन्न पदार्थ टेबलावर मांडणे हे सुपर हाय स्पीडने होत राहतात तसलाच काहीसा प्रकार येथे दिसतो आहे. नोन्या फूड निराळे असले तरी जेवणाचा मूळ आधार नूडल्स, भात, चिकन व प्रॉन्स हाच आहे. एकूण पदार्थ रोचक व चविष्ट वाटत आहेत. जेवण झाल्यावर आम्ही मलाकाची एक खासियत डिश म्हणजे चेंडोल हे डेझर्ट मागवतो. राजमा बियांच्या पिठापासून बनवलेल्या नूडल्स, पाम सिरप व गोठवलेले नारळाचे दूध यापासून हा पदार्थ बनवला जातो.

मलाका शहरात येणार्‍या पर्यटकांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्याचे इथल्या सरकारने खूपच मनावर घेतलेले असावे. मलाका नदीवर रिव्हर क्रूझ च्या आकर्षणाबरोबरच या नदीच्या काठाने आता एक मोनोरेल सुरू केली आहे. अम्युझमेंट पार्क, बटरफ्लाय पार्क या सारखी आकर्षणे पण आहेतच. एकंदरीत सर्व कुटुंबाला मजेत 2/4 दिवस घालवता यावेत असे एक पर्यटन स्थळ येथे बनवले जाते आहे. मलाकाला येण्यामधे पर्यटकांना खास रुची वाटते कारण या सर्व सुविधांची किंमत मलेशियन रिंगिट मधे असल्याने ती सिंगापूरच्या मानाने खूपच कमी किंवा स्वस्त आहे. येथे दिसलेल्या सर्व पर्यटकांमधे जपानी पर्यटक मोठ्या संख्येने येताना दिसतात. बस भरभरून जपानी पर्यटकांचे गट कुआला लुंपूर वरून येत असताना दिसत आहेत.

ट्रायशॉ

रिव्हर क्रूझ

मोनो रेल

पर्यटन स्थळ कितीही सुखद असले, रोचक असले तरी जाण्याचा दिवस अगदी पटकन उगवतो. आताच आलो आहोत असे वाटत असताना परतीची वेळ आली आहे व घरचे वेध लागू लागले आहेत. निघण्याच्या आधी आमच्या हॉटेलमधे हाय टी मिळू शकेल असे समजल्यामुळे भूक नसतानाही आम्ही पदार्थांचा समाचार घेत आहोत. आता चेक आउट करून निघायचेच बाकी आहे.

रोजचे सगळे नियम, कायदे कानू तोडण्यासाठी तर पर्यटनाला जायचे असते. नाहीतर घरीच का बसू नये? मलाका सोडले तरी इथल्या आठवणी आमच्या मनात कायमच राहणार आहेत.

3 नोव्हेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention मलाका स्पाइस – 3 « अक्षरधूळ -- Topsy.com - नोव्हेंबर 4, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: