.
Travel-पर्यटन

मलाका स्पाइस – 2


मलाका शहरातून फिरताना पहिल्यांदा काय जाणवत असेल तर रस्त्यावरची सर्व वाहने फक्त एकाच दिशेला जाताना दिसतात. जुन्या मलाका शहरातले एक दोन प्रमुख रस्ते सोडले तर बाकीचे जवळ जवळ सर्व रस्ते वन वे रस्ते आहेत. मलाका शहराला वन वे शहर असे म्हटले तरी चालण्यासारखे आहे. या वाहतुकीच्या व्यवस्थेमुळे जुन्या शहरातल्या अगदी अरूंद रस्त्यांवर सुद्धा वाहतूक मुरंबा कोठेही जाणवत नाही. आणि मुख्य म्हणजे सायकल रिक्शावाले सोडले तर बाकी सर्व चालक अगदी प्रामाणिकपणे वाहतूक नियमांचे पालन करताना दिसतात. पुण्याला ही पद्धत अवलंबली तर वाहतुकीचा प्रश्न खूपच प्रमाणात सुटेल असे मला वाटले, पण जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन कॉलेज रस्ता यावर वन वे वाहतूक व्यवस्था करण्यासाठी पुण्यातल्या पोलिसांना जो अथक प्रयत्न करावा लागला तो बघता, सबंध शहरात असे करायला किती त्रास पडेल? याची कल्पनाही करवत नाही.

मलाका वन वे सिटी

मलाका शहरात फेरफटका मारताना हे ही सतत जाणवत राहिले की या शहराचा इतिहास आणि भूगोल यांचे मोठे बेमालूम मिश्रण सध्याच्या आधुनिक शहरात झालेले आहे. तसे बघायला गेले तर हे शहर तसे आहे छोटेखानीच. सात किंवा आठ लाख लोकसंख्या असलेले हे शहर, 1970 सालच्या पुण्याच्या आकाराचे असावे असे मला वाटले. या शहराचा जो मूळ जुना भाग आहे तो म्हणजे मलाका बंदराजवळचा भाग. या शहराचा गेल्या पाचशे किंवा सहाशे वर्षांचा इतिहास आणि भूगोल हा या बंदराजवळच्या एका छोट्याशा भागात एकवटलेला आहे. मुंबईला इंग्रजांनी जसा एक फोर्ट किंवा कोट बांधला होता तसाच एक कोट इथेही होता व बघण्यासारख्या सर्व ऐतिहासिक वास्तू या कोटाच्या आतच असल्याने सर्व गोष्टी पायी बघणे शक्य होते.

मलाका शहराचे स्थानमाहात्म्य आपण आधी बघितलेच आहे. यामुळेच बहुदा मलाका बंदरात अरब, भारतीय, मलै व चिनी व्यापारी मोठ्या प्रमाणात तळ टाकून असत. जावा कडचे मसाल्याचे पदार्थ, चिनी रेशीम, मीठ, खनिजे, अत्तरे, सोने, चिनी मातीच्या वस्तू आणि मदिरा यासारख्या अनेक वस्तूंचा व्यापार या बंदरातून शतकानुशतके होत राहिलेला आहे. ..1450 पासून हा भाग मलाकाच्या सुलतानाच्या अधिपत्याखाली होता. .. 1511 मधे पोर्तुगीजांनी या बंदरावर हला चढवला व सुलतानाकडून हा भाग ताब्यात घेऊन त्याची वसाहत बनवली. मलाकावर प्रभुत्व मिळाल्यामुळे या सर्व भागातल्या व्यापारावर पोर्तुगीजांचे नियंत्रण बसले. इतर युरोपियन राष्ट्रांना हे सहन होण्यासारखे नव्हते त्यामुळे 1641 मधे पोर्तुगीज व डच आरमार यांच्यातल्या लढाईत डच आरमाराने विजय मिळवला व मलाका डच लोकांची वसाहत बनले. इतक्या महत्वाच्या बंदराचे स्वामित्व डच लोकांकडे असावे हे इंग्रजांना सहन झाले नाही व त्यांचे आरमार व डच यांच्यात या भागाचे स्वामित्व मिळवण्यासाठी झगडे होत राहिले. अखेरीस 1824 मधे इंग्रजांनी सुमात्रा बेटावरचा एक भूभाग मलाकाच्या बदल्यात डच लोकांना दिला व मलाकावर आपला ताबा मिळवला.

300 वर्षाच्या कालखंडात प्रथम पोर्तुगीज, नंतर डच व शेवटी इंग्रज मालकीची ही वसाहत राहिल्याने या वसाहतींच्या खाणाखुणा मलाकाच्या जुन्या भागात जागोजागी दिसतात. इतिहासाची आवड असणार्‍या कोणालाही मलाका शहराच्या जुन्या भागाचा फेरफटका हा एखाद्या सोन्याच्या खाणीसारखा वाटतो. UNESCO या आंतर्राष्ट्रीय संस्थेने मलाका शहराला 2008 मधे जागतिक ऐतिहासिक वारसा स्थान ( World Heritage Site) म्हणून घोषित केले आहे. मलेशियाच्या शासनाने पर्यटनाला चालना देण्यासाठी या भागात अनेक विकासकामे हातात घेतली आहेत. मलाका मधे घालवलेली सुट्टी त्यामुळेच पर्यटकांसाठी एक अतिशय सुखद अनुभव बनत चालला आहे.

स्टॅडथीज

टाऊन सेंटर

मलाका मधे पर्यटकाना रोचक वाटतील अशा सगळ्या जागा टाऊन सेंटरच्या आसपासच असल्याने साहजिकच मी माझा फेरफटका इथल्या टाऊन सेंटर पासून चालू करतो आहे. हा टाऊन सेंटर म्हणजे एक लालभडक रंगाची जुनी इमारत व त्याच्या शेजारी असलेला घड्याळाचा टॉवर आहे. ही इमारत येथे स्टॅडथीज(Stadthuys) म्हणून ओळखली जाते. मलाकाच्या डच शासनाने ही इमारत 1650 मधे गव्हर्नरच्या निवासस्थानासाठी म्हणून बांधली होती. या इमारतीच्या शेजारीच 1753 मधे बांधलेले एक चर्च आहे. लाल रंगाच्या या जुन्या इमारतींची देखभाल उत्तम केली गेली असल्याने हा टाऊन सेंटर दिसतो मात्र आहे मोठा छान. या इमारतीत आता एक संग्रहालय आहे. संग्रहालयात डच व इंग्रज शासनाशी संबंधित अनेक वस्तू मांडून ठेवलेल्या आहेत. तलवारी, फर्निचर, बंदुका, पिस्तुले, तोफ गोळे, बंदुकीच्या गोळ्या, चिनी मातीची भांडी, जुने प्लॅन्स व जुने गाव कसे होते त्याची मॉडेल्स अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. पुणे इतिहासाच्या बाबतीत याच्या शतपटीने तरी समृद्ध आहे. परंतु राजा केळकर संग्रहालय सोडले तर असे कोणतेही संग्रहालय पुण्यात नाही. साधा शनिवार वाडा कसा दिसत होता हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. आमच्या इतिहासाचा आम्हालाच अभिमान नाही तर तो आम्ही इतरांना काय सांगणार? असे मनात वाटत राहिले हे मात्र खरे. या स्टॅडथीजच्या चौकात मलाकाचे खास आकर्षण उभे आहे. या एक प्रकारच्या सायकल रिक्षांना येथे ट्रायशॉ म्हणतात. या रिक्शांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवासी बसण्याची गाडी सायकलच्या मागे न बसवता सायकलच्या बाजूला साइड कार सारखी जोडलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना समोरचे दृष्य़ छान बघता येते. या ट्रायशॉ प्लॅस्तिकच्या फुलांच्या माळा, दिवे यानी सजवलेल्या असतात. रात्री बसले तर आपली वरात चालली आहे असाच भास होतो. आमच्या साठी चालकाने खास त्याच्या म्युझिक सिस्टीमवर मेहबूबा! मेहबूबा! हे गाणे लावले आहे. रात्री स्टॅडथीज जरूर बघण्यासारखे असते प्रकाशझोतात त्या इमारतीचा लाल रंग मोठा खुलून दिसतो.

तोफा आणि तोफगोळे

डच पिस्तूल

डच तटाचा एक भाग व त्याच्या वरच्या तोफा

मलाकाच्या कोटाभोवती एक दगडी भिंतीचा तट होता. या भिंतीवर तोफा व सैनिक सतत तैनात केलेले असत. या तटाचा नदीकाठचा एक छोटासा भाग अजून जपून ठेवण्यात आलेला आहे. यावर तोफा ही मांडून ठेवलेल्या आहेत. स्टॅडथीजच्या मागच्या बाजूला एक टेकडी आहे. या टेकडीवर एक भग्न चर्च आहे हे चर्च एका पोर्तुगीज कॅप्टनने इ.. 1521 मधे बांधले होते. टेकडी चढून मी चर्चपाशी पोचलो व चर्चचे भग्नावशेष बघितले.

मलाका सामुद्रधुनी, बाटलीचा अरूंद गळा

खरे सांगायचे तर ते अवशेष बघण्यात मला काही तितकीशी रुची नाही मला त्या टेकडीवरून बघायची आहे मलाकाची सामुद्रधुनी. हिंदी महासागरातून साउथ चायना सी मधे प्रवेश करण्याचे व एखाद्या बाटलीच्या अरूंद गळ्यासारखे असलेले एकुलते एक प्रवेश द्वार. या सामुद्रधुनीची रुंदी काही किलोमीटरच या ठिकाणी आहे. या टेकडीवरून क्षितिजावर दिसणार्‍या समुद्रावर जहाजांची रांगच्या रांग दिसते आहे. येथून किती जहाजे ये जा करतात त्याचेच ते निदर्शक आहे. या टेकडीच्या पश्चिम बाजूला एक अतिशय जुने प्रवेश द्वार आहे. त्याचे नाव आहे पोर्टा डी सॅनटिआगो (Porta d’ santiago). .. 1511 मधे मलाका ताब्यात घेतल्यावर पोर्तुगीज ऍडमिरल आल्फान्सो डी अल्बुकर्क याने हे प्रवेशद्वार व याच्या मागे असलेली एक गढी बांधून घेतली होती. 1824 नंतरच्या ब्रिटिश राजवटीत ही गढी इंग्रजांनी पाडून टाकली मात्र वॉरन हेस्टिंग्जच्या आदेशावरून हे प्रवेश द्वार वाचवण्यात आले आहे. मात्र हा अवशेष इतका छान रित्या जपून ठेवला आहे त्याचे मला कौतुकच वाटते आहे. आपल्या देशावरच्या पारतंत्र्याच्या खुणा नष्ट करा वगैरे वेडगळ विचार इथल्या शासनाच्या मनात तरी आलेले नाही हे मला खरच बरे वाटते आहे. इतिहास हा इतिहास असतो. तो चांगला किंवा वाईट नसतो. तो जपून ठेवला तरच आपले त्या वेळी काय चुकले हे कळू शकते. सर्व गोष्टी नष्टच करून टाकल्या तर इतिहासापासून शिकणार तरी काय? मग होते फक्त इतिहासाची पुनरावृत्ती.

पोर्टा डी सॅनटिआगो

मी शाळेत असताना पुण्यातल्या लकडी पुलावरून रोज चालत जात असे. या पुलावरून नदी पात्रात एक दगडी चौथरा मला रोज दिसत असे. हा कसला चौथरा आहे असे कुतूहल मला नेहमी वाटायचे. 1961 मधल्या पुरात हा चौथरा वाहून गेला व त्याचे दगड जवळपास पडलेले सापडले. नंतर एकदा प्रसिद्ध इतिहासकार निनाद बेडेकर यांनी नारायणराव पेशव्यांचे छिन्न विच्छिन्न कलेवर येथे पोत्यात भरून आणून या चौथर्‍यावर त्या कलेवराला अग्नी दिला होता अशी माहिती दिली. पुण्यातल्या कोणालाही हा चौथरा परत बांधून तेथे या अल्पजीवी पेशव्याचे स्मारक उभारावे असे वाटले नाही. इतिहास जपण्याची आमची वृत्तीच नाही असेच म्हणावे लागते.

मलाकाच्या या टाऊन सेंटरच्या आसपास 15 तरी संग्रहालये आहेत. अगदी स्टॅम्प्स, पतंग यांपासून इतिहासातील गोष्टींपर्यंत सर्व गोष्टींची संग्रहालये आहेत. मला सगळी संग्रहालये बघणे शक्यच नव्हते. त्यामुळे स्टॅडथीज मधल्या संग्रहालयानंतर सुलतान पॅलेस व त्या मधले संग्रहालय बघण्याचे ठरवले.

2 नोव्हेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

7 thoughts on “मलाका स्पाइस – 2

 1. वाचतोय.. येऊ द्या अजून…

  Posted by आल्हाद alias Alhad | नोव्हेंबर 2, 2010, 9:31 pm
 2. dear shekhar,
  mast comments, sunder fotos aani itihasabaddalcghi aapli anashtha
  mastch lekh

  Posted by ashok patwardhan | नोव्हेंबर 3, 2010, 12:41 pm
 3. “इतिहास हा इतिहास असतो. तो चांगला किंवा वाईट नसतो. तो जपून ठेवला तरच आपले त्या वेळी काय चुकले हे कळू शकते. सर्व गोष्टी नष्टच करून टाकल्या तर इतिहासापासून शिकणार तरी काय? मग होते फक्त इतिहासाची पुनरावृत्ती.” Sahee! Classic! Va!

  Posted by Abhijit | नोव्हेंबर 3, 2011, 1:29 pm
 4. chan baghat asalya sarkhe lihita.

  Posted by Samita | नोव्हेंबर 30, 2012, 8:29 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention मलाका स्पाइस – 2 « अक्षरधूळ -- Topsy.com - नोव्हेंबर 2, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: