.
Travel-पर्यटन

मलाका स्पाइस- 1


मलेशियाच्या प्रसिद्ध असलेल्या मुख्य एक्सप्रेस वे वर पोचायला आम्हाला सकाळचे 11 वाजले आहेत. मलेशिया हा देश उत्तर दक्षिण असाच लांबवर पसरलेला आहे. त्या मानाने देशाची पूर्वपश्चिम रूंदी कमीच आहे. त्यामुळे देशातला हा मुख्य एक्सप्रेस वे, अगदी देशाच्या दक्षिण टोकापासून म्हणजे जोहर बारूपासून निघतो व उत्तरेला 772 किलोमीटर अंतरावर, पार थायलंडच्या सीजवळ, असलेल्या बुकिट कायू हितम पर्यंत जातो. या आधी मी या रस्त्याने जेंव्हा प्रवास केला होता. त्या वेळी मुंबई पुणे एक्सप्रेस वे संपूर्णपणे तयार झालेला नव्हता. कदाचित त्यामुळे त्या वेळेला मला हा रस्ता फारच प्रशस्त व रूंद वाटला होता. सहा पदरी पुणेमुंबई एक्सप्रेस वे च्या सध्याच्या अनुभवामुळे, मला मलेशियामधल्या माझ्या स्मरणातल्या त्या रस्त्यापेक्षा, आज समोर उलगडणारा चौपदरी रस्ता, जरा अरूंद व कमी वाहतुकीचा वाटतो आहे हे नक्की.

सिंगापूर्मलेशिया आंतर्राष्ट्रीय सीमा ओलांडायला आम्हाला 10 मिनिटे सुद्धा लागली नाहीत. गाडीतून बाहेर उतरायला सुद्धा लागत नाही. सिंगापूरच्या हद्दीत असलेल्या एका काउंटर खिडकीजवळ गाडी थांबवायची, पासपोर्ट आत द्यायचे. आतला माणूस काय करतो ते माहीत नाही, बहुदा डोकी मोजत असावा. त्याने पासपोर्ट परत दिले की नोमॅन्स लॅन्ड मधे असलेला एक पूल पार करायचा व मलेशियाच्या हद्दीत पोचायचे. तिथे एका काउंटरच्या खिडकी शेजारी गाडी उभी करायची. पासपोर्ट आत द्यायचे. परत घ्यायचे व नंतर पलीकडे असलेल्या दोन कस्टम्स अधिकार्‍यांच्या शेजारी गाडी उभी करायची. आम्हाला तर इथे गाडी फक्त हळू करायला लागली. कस्टम अधिकार्‍यांनी हात हलवून पुढे जा म्हणून खूण केल्याने, आम्ही लगेचच निघालो. सिंगापूरमधल्या वस्तुंच्या किंमती मलेशियापेक्षा बर्‍याच जास्त असल्याने, कोणी काही बरोबर नेणे शक्यच नाही हा सोपा हिशोब या मागे असावा.

मलेशियामधला हा एक्सप्रेस वे जरी थोडा अरूंद असला तरी रस्त्यावर टोल भरणे मात्र अगदी सोपे आहे. नाक्यावर गाडी थांबवायची व हातातले टच ऍन्ड गो कार्ड, तेथे असलेल्या एका यंत्राला दाखवायचे एवढेच करावे लागते. त्यामुळे कारकूनाला पैसे द्या मग पावती घ्या वगैरे काहीच उपद्व्याप करावे लागत नाहीत. 2 सेकंदात काम होते व समोरचे बॅरिकेड उघडते. वेग मर्यादा पण तासाला 110 किलोमीटर एवढी आहे. पण दुचाकी वाहनांना या रस्त्यावरून प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे जरा काळजीपूर्वकच गाडी चालवावी लागते. अर्थात इथल्या चालकांचा एकूण कल नियम पाळण्याकडे असल्याने, फारशी अडचण कोठेच येत नाही. रस्त्याच्या कडेला असलेले गवत व्यवस्थित कापलेले दिसत होते. काही ठिकाणी यांत्रिक अवजाराने मंडळी गवत कापतानाही दिसली. एकूणच रस्त्याची देखभाल व निगराणी उत्तम दर्जाची आहे यात शंकाच नाही. सिंगापूरच्या मानाने रस्त्यांच्या कडांना दिसणारे दृष्य जास्त नैसर्गिक वाटले. सिंगापूरमधे रस्त्यांच्या बाजूला असलेली झाडे, झुडपे, हिरवळ पण देशाच्या शिस्तप्रिय व नीटनेटक्या स्वभावाप्रमाणेच वाढताना असल्यासारखी वाटतात. इथे मात्र ती मानवी शिस्त, नियम यांचे पालन न करता ती निसर्गाच्या नियमांचे पालन करत वाढत असलेली झाडे झुडपेच वाटत होती. असे जरी असले तरी पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नजर पोचेल तिथपर्यंत दिसणारी व शेकडो मैल पसरलेली पाम ची झाडे मात्र माझ्या मनाला खटकत राहिली. या झाडांपासून पाम ऑइल मिळते. ती शेतकर्‍यांना उत्पन्न देतात वगैरे सगळे अर्थशास्त्र ठीक आहे. पण एकाच प्रकारची झाडे आसमंतात वाढू दिल्याने जीववैविध्याचे काय होत असेल? असे मला वाटत राहिले.

दोन तासाच्या सुखकर प्रवासानंतर आम्हाला अपेक्षित असलेले आयर केरोह एक्झिट 1 किलोमीटरवर असल्याची पाटी आम्हाला समोर दिसते आहे व एक्सप्रेस वे सोडण्यासाठी आम्ही गाडी बाजूला घेतो न घेतो तेवढ्यात एक्झिटचे वळण समोर येते आहे. परत एकदा टोल नाक्याची क्षणभरची विश्रांती घेतल्यावर, आम्ही एखाद्या मध्यम आकाराच्या शहराच्या परिसरात आपण आलो आहोत याच्या खुणा सभोवती दिसू लागल्या आहेत.

दहा बारा वर्षापूर्वी पुण्याच्या कोरेगाव पार्क भागात मलाका स्पाइसनावाचे एक उपहार गृह मी प्रथम बघितले होते. तेथे चार सहा वेळा जाऊन रुचकर थाई पदार्थांचा समाचार मी घेतला होता. त्या वेळेपासूनच मलाका हे नाव का कोण जाणे माझ्या डोक्यामधे जाऊन बसले होते. नंतर मलाकाच्या सामुद्रधुनी बद्दलची बरीच माहिती वाचनात आली होती. व मलाकाची ट्रिप कधीतरी करायचीच असे मी ठरवले होते. इतक्या वर्षांनी का होईना हा योग आज आला होता.

सांगली, मिरज या सारख्या गांवाच्यात शिरताना जसे रस्ते, चौक किंवा वाहनांची गर्दी दिसते तसेच काहीतरी दृष्य समोर दिसत होते. एक फरक मात्र जरूर जाणवला. लोक वाहतुकीची शिस्त मनापासून पाळत होते. सिग्नल लाइटला उजव्या लेनमधे उभे राहून डावीकडे वळणे किंवा डाव्या लेनमधे उभे राहून उजव्या बाजूस वळू नयेअसा फलक लावलेला असताना सगळ्या वाहनांच्या समोरून गर्रकन वळण घेणे असले प्रकार करताना कोणी वाहन चालक दिसले नाहीत. सर्व दुचाकी चालक प्रामाणिकपणे हेल्मेट परिधान केलेले दिसत होते. पुण्याच्या दुचाकी चालकांना येणार्‍या गंभीर अडचणी त्यांना आलेल्या दिसत नव्हत्या. पंधरा वीस मिनिटे त्या वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढून आमच्या हॉटेलवर पोचण्यात आम्ही अखेरीस यशस्वी झालो आहोत. समोर हॉटेलची 25 मजली भव्य इमारत दिसते आहे. आत शिरल्यावर प्रथम एक भव्य लॉबी डोळ्यासमोर येते. दोन भली थोरली झुंबरे, त्यात लखलखणारे दिवे व जागोजागी लावलेले आरसे त्यामुळे प्रथम दर्शन तरी मनावर ठसा उपटवणारे आहे.

मग गाडीतून सामान बाहेर काढणे, हॉटेल मधले चेक इन वगैरे सोपस्कार पार पाडून 17 व्या मजल्यावरच्या आमच्या खोलीत आम्ही पोचलो. समोरच्या खिडकीवरचा पडदा बाजूला सारल्यावर, समोर मलाका शहराचे एक मोठे लोभसवाणे चित्र उभे राहिले. वळणे घेऊन वहात असलेली व भरपूर पाणी असलेली मलाका नदी, नदीच्या काठावर जागोजागी लावलेले व वार्‍यावर फडफडणारे मलेशियाचे ध्वज, नदीच्या वळणांच्या आड, लाल लाल छपरांची छोटी छोटी घरे दिसत आहेत. येथे पाऊस बर्‍यापैकी पडत असावा कारण सगळीकडे स्वच्छ वाटत होते. आपल्याकडच्या गावांच्यात दिसणारा धुळीचा मागमूसही इथे दिसत तरी नाही. पण दक्षिण मध्य एशिया मधल्या सर्वच गावांची ती खासियतच म्हणावी लागते.

मलाका नदी

नदीकाठचे एक छोटे घर

नदीकाठावरून दिसणारे दृष्य

पोटात कावळे कोकलत आहेत याची जाणीव झाल्याने, आता दुसरीकडे कोठे शोधत बसायचे? म्हणून पावले आपसुकच हॉटेलमधल्या एका रेस्टॉरंटकडे वळली. सर्व प्रथम, भरभक्कम पेटपूजा केल्यानंतरच मनातले विचार परत मलाकाकडे वळले.

भारताच्या पूर्वेला, मिझोरामच्या दक्षिणेकडॆ, एक मोठा भूभाग, द्वीपकल्पाच्या स्वरूपात पार सिंगापूर् पर्यंत जातो. या भूभागावर मियानमार व थायलंड हे दोन देश उत्तरेला आहेत तर दक्षिणेकडे मलेशिया व सिंगापूर हे देश येतात. या द्वीपकल्पाच्या पश्चिम किनार्‍यावर, सिंगापूरपासून साधारण उत्तरेला 200 किलोमीटरवर व हे राज्य व त्याची राजधानी असलेले मलाका शहर हे आहे. या शहराला लागून असलेला समुद्र, मलाकाची सामुद्रधुनी म्हणून ओळखला जातो. या सामुद्रधुनीच्या पलीकडे म्हणजे पश्चिमेला, इंडोनेशियामधले सुमात्रा बेट लागते. सुमात्रा आणि मलेशिया यांच्या मधल्या या सामुद्रधुनीचा आकार एखाद्या नरसाळ्या सारखा आहे. मलाकाच्या जवळ पास ही सामुद्रधुनी फक्त 1.7 मैल एवढीच रूंद आहे. या चिंचोळ्या सामुद्रधुनीमधून वर्षाला 50000 मालवाहू जहाजे प्रवास करतात. दीड कोटी बॅरल तेलाची वाहतुक या सामुद्रधुनीमधून प्रत्येक दिवशी होत असते. चीनला लागणारे 70% तेल या सामुद्रधुनीतून आयात होते. असे म्हणतात की हा मार्ग जर काही कारणांनी बंद झाला तर जगातल्या निम्या मालवाहू जहाजांना त्यांचा प्रवासमार्ग बदलण्याची वेळ येईल.


मलाकाचे स्थानमाहात्म्य केवढे मोठे आहे हे यावरून लगेच दिसून येते. अर्थात आम्ही काही मलाकाच्या सामुद्रधुनीतून होणार्‍या व्यापाराचा अभ्यास करायला आलो नसल्यामुळे मी हे सगळे विचार बाजूला सारले व मलाका शहराची चक्कर मारायला बाहेर पडलो.

1 नोव्हेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention मलाका स्पाइस- 1 « अक्षरधूळ -- Topsy.com - नोव्हेंबर 1, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: