.
अनुभव Experiences

एक आगळावेगळा नृत्याविष्कार


एस्प्लनेड भागाजवळचा समुद्र किनारा हा सिंगापूरमधल्या सांस्कृतिक घडामोडींचा किंवा जगताचा गाभा आहे असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरू नये. या समुद्र किनार्‍यालगत, दोन फणस शेजारी शेजारी ठेवले तर जसे दिसतील तशी दिसणारी एक इमारत आहे. या इमारतीत दोन तीन सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण अशी प्रेक्षागृहे आहेत. या शिवाय प्रदर्शन दालने, पुस्तकालय सारख्या इतर सर्व सुविधा आहेतच. जगभरचे नामवंत कलाकार या एस्प्लनेड थिएटर्स मधे आपली हजेरी लावून जातात. भरत नाट्यम पासून बॅले पर्यंत, आशा भोसले यांच्या बॉलीवूड जलशा पासून हिंदुस्थानी, कर्नाटक शास्त्रीय गायकांपर्यंत सर्वांचे कार्यक्रम येथे होत असतात. चिनी ऑपेरा, पाश्चात्य संगीताचे फिलहॉर्मानिक ऑर्केस्ट्रा, चित्रपट महोत्सव यासारखे कसले ना कसले कलामहोत्सव येथे चालूच असतात. बर्लिन फिलहॉर्मानिक ऑर्केस्टाचे काही कार्यक्रम आता येथे आयोजित केलेले आहेत. तिकिटांचे दर 350, 650, 750 डॉलर्स एवढे आहेत तरीही सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत.

मला मात्र या सर्व प्रेक्षागृहांपेक्षा, समुद्र किनार्‍याला लागून असलेले एक छोटेखानी पण खुले प्रेक्षागृह सर्वात आवडते. या प्रेक्षागृहात ते खुले असले तरी पाऊसपाणी लागणार नाही याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. बसण्यासाठी फरशा घातलेले मोठे अर्धवर्तुळाकार ओटे केलेले आहेत. समोर जवळच रंगमंच आहे. त्याला पडदा वगैरे काही नाही. सर्व मामला खुला असतो. असे जरी असले तरी रंगमंचावर अगदी आधुनिक तंत्रज्ञानाची प्रकाश व ध्वनी योजना केलेली आहे. कधीही यावे व कोठेही बसावे. समोर जे काय चालले आहे ते बघावे किंवा न आवडल्यास उठून चालू लागावे असा येथे खुल्लम खुल्ला मामला आहे. नवोदित कलाकार येथे आपली कला पेश करतात. नवे कला प्रकार किंवा Art Forms, नाच , संगीत जलसे, काही ना काही येथे चालू असते. रविवारच्या संध्याकाळी येथे बहुदा बर्‍यापैकी कार्यक्रम असतात. सवड असली की आम्ही रविवारी या ओपन थिएटरला भेट पुष्कळदा देतो. काहीतरी नवीन बघायला मिळते. प्रत्येक वेळी आवडते असे नाही पण ते नवीन असते एवढे मात्र नक्की.

या रविवारी असेच झाले. ग्रूप डान्सचा किंवा समूह नृत्याचा एक नवीनच प्रकार बघायला मिळाला. या नाचाबरोबर जी गाणी म्हटली जात होती ती मलै भाषेत असल्याने मला एक शब्दही कळत नव्हता. परंतु नर्तकांच्या हालचाली, बरोबरचे संगीत व ताल या सर्व गोष्टी मनाला भुरळ घालणार्‍या होत्या. माझ्या सारख्याच बहुतेक प्रेक्षकांना, गाण्यातले शब्द समजत नसावे. पण काहीच अडले नाही. पाउण तासाचा तो अविष्कार सर्व प्रेक्षकांनी आवडीने बघितला. तालाबरोबर ठेका धरला व टाळ्यांच्या कडकडाटाने कलाकारांना मनापासून दादही दिली.

रान्दाई(Randai) हा समुह नृत्यप्रकार मूळचा इंडोनेशिया देशामधल्या सुमात्रा बेटावरच्या मिनांगकाबाऊ(Minangkabau) लोकांच्या लोककलेचा एक अविष्कार आहे. हा नाच, नर्तक वर्तुळाकार उभे राहून नाचतात. या नाचाचे एक गंमतीदार वैशिष्ट्य म्हणजे सर्व नर्तक (स्त्री व पुरुष) हे विशिष्ट प्रकारच्या काळ्या रंगाच्या सुरवारी घालतात. या सुरवारींचे दोन पाय एका मोठ्या आकाराच्या कापडाने एकत्र शिवलेले असतात. त्यामुळे या सुरवारी घातलेले नर्तक धोतर किंवा लुंगी नेसले आहेत असा भास होतो. या सुरवारींना गॅलेम्बॉन्ग (Galembong) असे नाव आहे. या सुरवारींच्यावर अंगात बाजु मेलायु(Baju Melayu) हा एक कफनासारखा दिसणारा प्रकार, कंबरेला सॅम्पिन (Sampin) हे घट्ट बांधलेले वस्त्र व डोक्याला तंजक(Tanjak) नावाचे वस्त्र बांधलेले असते.

रान्दाई नृत्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बरोबरच्या गाण्याची आणि संगीताची ओळ संपली की सर्व नर्तक एकदम स्तब्ध होतात व आपले हात सुरवारीच्या दोन पायामधल्या वस्त्रावर टाळी मारल्यासारखे आपटून एक ताल निर्माण करतात. या तालावरच या नाचाचा ठेका असतो. वस्त्रावर हात मारल्याचा एक विशेष असा नाद येतो व हा नाद या नाचात सर्वात महत्वाचा मानला जातो. हा नाद करण्यासाठी नर्तक दोन तर्‍हांनी स्तब्ध उभे राहतात. पहिल्या प्रकारात ते पाय फाकवून उभे राहतात व दोन्ही हात पुढे वाकून ताणलेल्या वस्त्रावर मारतात. दुसर्‍या प्रकारात. नर्तक नर्तिका एका पाय जमिनीवर व दुसरा पाय मधले वस्त्र ताणले जाईल अशा प्रकारे हवेत आडवा घेऊन स्तब्ध होतात व टाळी वाजवल्यासारखे दोन्ही बाजूंनी वस्त्रावर हात आपटतात. या दोन्ही प्रकारात निर्माण होणारा ध्वनी हाच या नृत्यप्रकाराचा ताल असतो. हा दुसरा स्तब्ध होण्याचा प्रकार मात्र चांगलाच अवघड असावा.

मूळ नाचाला, फ्ल्यूट व ढोलक ही वाद्ये वाजवली जात परंतु त्याची जागा कालच्या अविष्कारात सर्व आधुनिक वाद्यांनी घेतलेली दिसली. तसेच गाणी काही पारंपारिक आणि मिनांगकाबाउ कथा व परंपरा सांगणारी वाटली नाहीत. ती बहुदा सध्याची लोकप्रिय मलै गाणी असावीत असा माझा अंदाज आहे. मात्र एकूण नृत्य अविष्कार चांगलाच अंगमेहनतीचा व कष्टाचा होता असे नर्तकांच्या चेहर्‍यावरच्या अविर्भावांवरून तरी निदान वाटत होते.

ही मिनांगकाबाऊ मंडळी मुसलमान धर्म पाळत असली तरी त्यांच्यात मातृसत्ताक समाजपद्धती आहे. त्यामुळे सर्व मालमत्ता आई कडून मुली कडे जात असते.

पाउण तासाच्या या अविष्कारात बर्‍याच निरनिराळ्या नृत्यमुद्रा(Poses) या कलाकारांनी दाखवल्या. आणि अनेक वेळा हे नाचणारे कलाकार आमच्यापासून अगदी काही फुटांच्यावर नाचत असल्याने ते प्रेक्षकांच्यातच नाचत आहेत असा भास काही वेळेला होत होता.

कार्यक्रम संपल्यावर मोठे प्रसन्न वाटले. कोणताही कला अविष्कार प्रेक्षकांना भावला असल्याची हीच खरी पोच असते.

25 ऑक्टोबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention एक आगळावेगळा नृत्याविष्कार « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑक्टोबर 26, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: