.
अनुभव Experiences

धुराची चादर


आज सकाळी उठल्यावर सहज खिडकीतून बाहेर डोकावून बघितले. बाहेर बघितल्यावर डोळ्यांच्यावर विश्वासच बसेना. डोळे जोरजोरात चोळून परत बघितले. परंतु बाहेरचे दृष्य तेच होते. बाहेर खिडकीखाली दिसणारा काळाशार डांबरी रस्ता, चौकातले सिग्नल लाईट्स व पलीकडे दिसणारा कॅनॉल, त्याच्या काठचा माझा फिरायला जाण्याचा रस्ता व त्या रस्त्याच्या काठाने असणारे उंच उंच वृक्ष व जंगल हे सगळे रोजच्यासारखेच दिसत होते. पण या सर्व गोष्टींनी आज धुक्याची चादर पांघरल्यासारखी वाटत होती.

फोटो दुपारी 12 वाजतानाचा

पूर्वी पुण्याला दिवाळीच्या दिवसांच्यात असेच जबरदस्त धुके पडत असे. रस्त्यावरून चालत जाताना समोरून येणारी सायकल किंवा माणूसही दिसत नसे. टेकडीवरून बघितले तर सारे शहर धुक्याच्या एका दुलईखाली गुरफटून झोपल्यासारखेच दिसत असे. दिल्लीला हिवाळ्यात असेच धुके पडते. समोर दहा पंधरा फुटावर असलेले घर सुद्धा दिसत नाही. तसलाच प्रकार आज सकाळी येथे दिसत होता. पण सिंगापूरमधे पहाटेचे धुके वगैरे गोष्टींची, कल्पनेत किंवा स्वप्नात सुद्धा आठवण येणे शक्य नसल्याने समोर दिसणारा हा प्रकार पहाटेचे धुके वगैरे नक्कीच नाही आणि अंगाला जो गारवा जाणवतो आहे त्याचा बाहेरच्या हवेशी काही संबंध नसून तो समोरच्या भिंतीवर लावलेल्या एअर कंडिशनरमुळे जाणवतो आहे या वस्तुस्थितीची मनाला लगेच जाणीव झाली.

बाहेर दिसणारा प्रकार काय असावा बरे? असा विचार करतच सकाळची आन्हिके उरकली व फिरायला बाहेर पडलो. बाहेर चक्क उकडत होते पण रस्त्यावर मात्र धुक्यामुळे सिग्नल सुद्धा पण चटकन दिसत नव्हते. आज रस्त्यावर वर्दळ पण फार दिसली नाही. थोडी फार रोज येणारी मंडळी दिसली. एक दोन रोजचे मित्र भेटले. त्यांनी तर मागच्या वर्षी पुण्याला मंडळी H1N1 च्या सीझनमधे नाकाला जसा रुमाल बांधून फिरत असत तसा रुमाल बांधला होता. एक जण म्हणाला सुद्धा की “Oh! So much haze, difficult to breath la!” मला फारसा अर्थबोध झाला नाही पण मी हो ना या अर्थी मान मात्र डोलावली आणि पुढे निघालो. परत येताना मला हे एकदम जाणवू लागले की माझ्या नाकातून पाणी गळते आहे व घसा खवखवतो आहे. घरात शिरल्यावर मात्र बरे वाटले.

रोजचा पेपर उघडला व मुख्य पानावरची बातमी वाचल्यावर, बाहेर जो काही विचित्र प्रकार चालू होता त्याचा उलगडा झाला. सिंगापूरची मंडळी याला Haze म्हणत असली तरी प्रत्यक्षात हा तर धूर होता. म्हणजे सबंध शहरावर या धुराची चादर पसरली होती. आमचे घर तसे शहराच्या जरा बाहेरच म्हणावे लागेल. आजूबाजूला खूप झाडे आहेत. त्यामुळे आमच्या येथे म्हणे या हेझ चे प्रमाण कमी आहे. शहरात तर समोरच्या इमारतीही दिसू शकत नाहीत वगैरे वर्णन वाचले. प्रथम विश्वास बसला नाही पण फोटो बघितल्यावर बसला. आजच्या इतकी खराब गुणवत्तेची हवा 2006 सालानंतर बघितली नव्हती असेही या बातमीत म्हटले होते. हवा कितपत शुद्ध आहे यासाठी एक प्रदुषण मानक निर्देशांक (Pollution Standard Index ) PSI वापरला जातो. या निर्देशांकाप्रमाणे आजचा PSI 80 एवढा आहे. म्हणजे हवा चांगलीच दूषित आहे असे ही बातमी सांगते आहे.

 

PSI Value PSI Descriptor
0to 50 Good
51 – 100 Moderate
101 – 200 Unhealthy
201 – 300 Very unhealthy
Above300 Hazardous

पण हा सगळा प्रकार एकदम कसा सुरू झाला? आणि त्याचे कारण काय व यावर उपाय काय? हे कळेना. जरा वाचन केल्यावर लक्षात आले.

नकाशावर सिंगापूरच्या बेटाचे स्थान बघितले तर लगेच लक्षात येते की या बेटाच्या उत्तरेला अगदी जवळ मलेशियाचा भूभाग येतो तर पश्चिमेला थोड्या जास्त अंतरावर इंडोनेशिया मधले सुमात्रा हे सर्वात मोठे बेट लागते. या सुमात्रा बेटावरचे शेतकरी त्यांच्या शेतावर उगवलेले तण किंवा झाडे झुडपे काढून टाकण्यासाठी जून ते ऑक्टोबर या कालात शेतांच्यावर वणवे लावून देतात. हे वणवे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लावले जातात की या आगीपासून निघालेला धूर जर वार्‍याची दिशा बरोबर असली तर लीलयेने सिंगापूर व मलेशिया वर पसरतो. म्हणजे आज आम्हाला दिसणारा व सगळ्या सिंगापूरवर पसरलेला हा धूर इंडोनेशियावरून आला आहे व सगळीकडे पसरला आहे. माझी मनोवृत्ती पक्की भारतीय असल्याने ही हेझ इंम्पोर्टेड असल्याचे ऐकून मला जरा बरे वाटले ही गोष्ट अलाहिदा.

अगदी निरोगी माणसाला सुद्धा त्रास देणार्‍या या धुरामुळे ज्यांना आधीच श्वसनसंस्थेचे किंवा हृदयाचे विकार आहेत अशा मंडळींना हे एक जीवघेणे संकटच वाटते. आता दुसर्‍या देशातून येणार्‍या धुराचा सामना कसा करणार त्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी चोख असली पाहिजे असा आग्रह धरणारे इथले सरकार या बाबतीत इंडोनेशिया सरकारकडे निषेध व्यक्त करण्याशिवाय काहीच करू शकत नाही.

वैयक्तिक पातळीवर तरी आम्ही काय करू शकतो. नाही म्हणायला आज घराच्या खिडक्या उघडून बाहेरची मोकळी हवा जरा आत येऊ दे असे म्हणण्याची काही सोय राहिलेली नाही. आतलीच हवा बरी आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. आणि आता उद्या सकाळी हे धुराचे सावट असेच राहिले (3 दिवस तरी राहील असे म्हणतात) तर सकाळचे फिरणे अर्थातच बंद आणि नाईलाजाने जिममधे जाऊन ट्रेड मिलला भेट देणे हे ओघानेच आले.

21 ऑक्टोबर 2010

 

 


Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “धुराची चादर

  1. अरे इंपोर्टेड होगा तो फिनाईल भी पी लेगा 1

    Posted by मनोहर | ऑक्टोबर 21, 2010, 10:26 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention धुराची चादर « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑक्टोबर 21, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: