.
अनुभव Experiences

धन्य ते गायनी कळा!


परवा बर्‍याच दिवसांनंतर सिंगापूरच्या मेट्रोने प्रवास करण्याचा योग आला. या आधी माझ्या सिंगापूर मधल्या वास्तव्यात इथल्या मेट्रोने प्रवास पुष्कळ होत असे. अलीकडे मात्र असा योग क्वचितच येतो. इथल्या LTA किंवा लॅन्ड ट्रॅन्सपोर्ट ऍथोरिटी ने मागच्या वर्षी Circle Line म्हणून एक नवीन रेल्वे मार्ग सुरू केला आहे. या मार्गाने प्रवास करून मी बिशान या स्टेशनवर उतरलो व पुढच्या जुरॉन्ग ईस्ट कडे जाणार्‍या मेट्रो गाडीची वाट पहात प्लॅटफॉर्मवर उभा राहिलो. 4/5 मिनिटे गेल्यावर अचानक माझ्या डोक्यावर असलेल्या ध्वनीक्षेपकामधून गाण्याचे मंजुळ सूर कानावर येऊ लागले. प्रथम वाटले की पलीकडे बसवलेल्या टी.व्ही. मॉनिटरमधूनच कुठल्यातरी जाहिरातीचे जिंगल (Jingle) ऐकू येते आहे. म्हणून टी.व्ही. मॉनिटरकडे बघितले पण तेथे तर दुसराच काहीतरी कार्यक्रम चालू होता. मग जरा लक्षपूर्वक ते गाणे ऐकू लागलो. त्या गाण्यातले शब्द होते

” Train is coming!—-Train is coming!—Train is coming.!”

म्हणजे अगदी स्पष्ट मराठीत सांगायचे तर

” गाडी आली आली!— गाडी आली आली!— गाडी आली आली!”

म्हणजे फलाटावर गाडी येत असल्याची ही संगीतमय अधिकृत घोषणा होती. मला हसू आवरेना. आजूबाजूच्या प्रवाशांना बहुतेक रोजचीच सवय असल्याने त्यांना काहीच वाटलेले दिसले नाही. गाडी आली. त्यात शिरलो. इथल्या मेट्रोचे दरवाजे आपोआप बंद होत असतात. तसे होण्याआधी ध्वनीक्षेपकांवरून घोषणा होते. पण ही घोषणा मात्र नेहमीप्रमाणेच गद्यात झाली. मला वाटले की स्टेशनवरची घोषणा हा काहीतरी खास बदल दिसतो आहे. व इतर घोषणा पूर्वीसारख्याच 4 भाषांच्यात (इंग्रजी, मॅ न्डरिन, मलै व तमिळ) व गद्यातून दिल्या जातील. पण माझे हे निदान साफ चुकले होते.

सकाळची वेळ असल्याने जुरॉन्ग ईस्ट कडे जाणार्‍या माझ्या गाडीत माणसे तशी तुरळकच होती. त्यामुळे लगेचच बसायला जागा मिळाली. समोरच एक छोटा टी.व्ही मॉनिटर होता. याच्यावर बहुदा जाहीराती नाहीतर ” संशयास्पद माणसे किंवा वस्तू दिसल्या तर लगेच अधिकार्‍यांना माहिती द्या. अशा वस्तूंना हात लावू नका त्यात बॉम्ब असू शकतो. ” वगैरे प्रबोधनपर संदेश दिले जातात. पण या मॉनिटरवर अचानक 3 सिंगापुरी सुंदर्‍या अवतीर्ण झाल्या व त्यांनी चक्क गायला व नाचायला सुरवात केली. गाण्याचे शब्द काहीसे असे होते..

“It’s easy to love your ride! Queue to get on! Move it inside!——– “ वगैरे वगैरे.

मराठीत सांगायचे तर हे गाणे होते

” तुमचा प्रवास तुम्हाला आवडेल आवडेल! रांगेत जर तुम्ही उभे राहिलात तर तर ! आत आल्यावर पुढे सरकलात तर तर!—-“

या सिंगापुरी सुंदर्‍यांना डिम सम डॉलीज (Dim Sum Dollies) असे नाव आहे असेही नवीन ज्ञान मला झाले.

हा प्रवास करण्याच्या आदल्या दिवशीच, मी टी.व्ही.वर एक मजेदार बातमी बघितली होती. फिलिपाईन्स देशामधे एक बजेट विमानसेवा आहे सेबू पॅसिफिक एअरलाईन्स (Cebu Pacific Airlines) म्हणून. ज्या वाचकांनी विमानप्रवास केलेला आहे त्यांना माहिती असेल की प्रत्येक उड्डाणाच्या आधी, विमानातील हवाईसुंदर्‍या, संकट कालाच्या वेळी, सुरक्षितता नियम, ऑक्सिजन मास्क व लाईफ़ जॅकेट यांचा योग्य वापर कसा करावा याचे एक प्रात्यक्षिक देत असतात. या सेबू एअरलाईनच्या हवाई सुंदर्‍यांनी आता हे प्रात्यक्षिक संगीताच्या तालावर नाचत देण्यास सुरवात केली आहे.

सेबू विमान कंपनी आणि सिंगापूरच्या MRT मधली ही नाच गाणी काही माझ्या डोक्यातून लगेच जाईनात. उद्या समजा भारतात पण हा प्रकार आणायचा ठरवला तर आपल्याला काय अनुभवता येईल असा विचार माझ्या डोक्यात घोळू लागला. पहिल्यांदा डोळ्यासमोर आले मुंबईचे चर्चगेट स्टेशन. आता इथल्या सगळ्या घोषणा, जाड चष्मा लावलेल्या व शतकी भार असलेल्या मध्यमवयीन महिला करतात. म्हणजे त्यांना सुट्टी देणे भाग आले. आता या जागी, वर्णी फक्त कथ्थक नाचणार्‍या शर्वरीताई किंवा कॉमेडी एक्सप्रेस मधे लाडिक नाच करणार्‍या अमृताताईंचीच लागणार. बर! त्यांच्या तोडी आपला आवाज घालण्यासाठी तरी पुष्कळ मंडळी आहेत. जिंगल क्वीन विभावरीताई किंवा आरती ताई आहेतच. आता या घोषणा कशा करता येतील?

पुढची गाडी हो! हो! जाणार की विरारला!

ती नाहीच उभी 12 नंबरच्या फलाटाला!

ती तर आहे उभी 11 च नंबरला! हो ! हो!

या सारख्या जिंगल्स मधून देता येतील. म्हणजे 12 नंबरवर उभ्या असलेल्या पॅसेंजरांचा वैताग कमी नाही होणार का? किंवा आपल्या बेष्ट सेवेच्या बसमधे शिरलात की

ही बस तर जाणार अंधेरीला! अंधेरीला!

तुम्हाला कुटे जायाचे ? दादर की वरळीला?

पोस्टमन किंवा कुरियर तुमच्या दारात आला की रामदास कामतांसारख्या खड्या आवाजात तो नांदी म्हणू शकतो.

मी घेऊन आलो टपाल तुमचे!

सही करून ताब्यात घ्यायचे!

लायसन दाखवायला नाही विसरायचे!

असे ध्वनीमुद्रण तो त्याच्या मोबाईल फोनवरून ऐकवू शकेल. म्हणजे घराची बेल, वीज गेल्यामुळे चालू नसली तरी अडचण नाही.

आपल्या एअर इंडियाला पण असा हवाई सुंदर्‍यांचा नाच बसवायला हरकत नाही. परंतु विमानात असलेले दोन खुर्च्यांमधले अंतर व एअर इंडियाच्या हवाई सुंदर्‍यांची शरीरयष्टी याचे प्रमाण व्यस्त असल्याने फक्त चेहर्‍यानेच अभिनय करणे जास्त योग्य ठरेल.

अशा जिंगल्स आपल्याला अनेक ठिकाणी तयार करून वापरता येतील. यात अनेक फायदे आहेत. असे म्हणतात की सिंगापूर सरकारने या जिंगल्स करण्यासाठी काही मिलियन डॉलर खर्च केले आहेत. मग आपल्याकडे तर केवढी प्रचंड आर्थिक उलाढाल होऊ शकते. गायन, वादन. नर्तन सगळ्या कलांना मोठी उर्जितावस्था आल्यासारखे होईल. फक्त जाहिराती आणि टीव्ही मालिका यांच्याच जिंगल्स बनवून कंटाळलेल्या आपल्या कलाकारांना एक नवीन क्षेत्र खुले होईल.

मुख्य म्हणजे सिंगापूरच्या डिम सम डॉलीज किंवा सेबू एअरलाईनच्या हवाईसुंदर्‍यांना टेंभा मिरवता येणार नाही. आमच्या एअर इंडियाच्या सुंदर्‍यांनी आपल्या चेहर्‍यानी केलेला अभिनय किंवा कथ्थक व भरतनाट्यम करत केलेल्या रेल्वे स्टेशन वरच्या घोषणा कितीतरी जास्त छान होतील की नाही?

विचार करा!

11 ऑक्टोबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “धन्य ते गायनी कळा!

  1. khup sunder lihile, jast karun bhartatil jingles tunes vachun hasayala ale!!!!!!

    Posted by SANGEETA | ऑक्टोबर 11, 2010, 5:20 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention धन्य ते गायनी कळा! « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑक्टोबर 11, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: