.
History इतिहास

पळा पळा कोण पुढे पळे तो!- 4


अरुणाचल प्रदेश किंवा NEFA च्या कामेंग विभागातली 12 ऑक्टोबरला सुरू झालेली लढाई चिनी सैन्याने 19 नोव्हेंबरला बोमडी ला सर केल्यावर थंडावली. या कालखंडात NEFA च्या इतर विभागांच्यात भारतीय व चिनी सैन्याच्या चकमकी चालूच होत्या. NEFA च्या अगदी पूर्वेच्या भागात लोहित नदीचे खोरे आहे, हे खोरे आणि आजूबाजूचा भाग, लोहित या विभागात येतो. लोहित नदीच्या खोर्‍यातून तिबेटवरून अरूणाचल प्रदेशात प्रवेश मिळवणे हे तुलनात्मक दृष्टीने सुलभ आहे असे म्हणता येते. त्यामुळे लोहित नदीच्या परिसरात भारतीय सैन्याची ठाणी आधीपासूनच होती. लोहित नदीच्या पूर्वेला मियानमार- चीन-भारत यांच्या सीमांचा ट्राय जंक्शन पॉइंट येतो. या बिंदूजवळ असलेले वॉलॉन्ग हे खेडेगाव व दक्षिणेला लोहित नदीच्या खोर्‍यात असलेले किबिथू हे गाव या दोन ठिकाणी भारतीय लष्कराची महत्वाची ठाणी होती. आसाममधून किबिथू ला ट्रक्स जाऊ शकतील असा रस्ता नव्हता त्यामुळे या सर्व भागातील सैन्याला विमानाद्वारेच रसद पोचवली जात असे.

वॉलॉन्ग मधले युद्ध आणि तावान्ग भागातले युद्ध यांचे वर्णन वाचताना एक फरक नक्की जाणवतो. या भागातले युद्ध आधी ठरवलेल्या आराखड्याप्रमाणे लढले गेले. भारतीय सैन्याची ठाणी एकमेकाला सपोर्ट देऊ शकतील अशी असल्याने वॉलॉन्गचे युद्ध चिनी सैन्याला चांगलेच जड गेले होते. भारताची जी मनुष्यहानी या युद्धात झाली त्याच्या निदान 5 पट तरी चिनी सैनिक या युद्धात मारले गेले. 18 ते 25 ऑक्टोबर या काळात 1 डिव्हिजन (15000 व्यक्ती) एवढ्या संख्येच्या चिनी सैन्याने या भागात मोर्चे बांधून असलेल्या 6th Kumaon या सैनिक तुकडीच्या ठांण्यांच्यावर वारंवार हल्ले केले. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी एक तसूभरही जागा चिनी सैन्याला दिली नाही व सतत उलटे हल्ले चिनी प्रदेशावर चालू ठेवले.

25 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालखंडात युद्धभूमी तशी शांत होती मात्र तावान्ग मधल्या गोंधळाप्रमाणेच थोडाफार गोंधळ येथेही घातला गेला. नवीन सैनिक आणले गेले. परंतु त्यांनी मोर्चे बांधण्याच्या आधीच त्यांना हलवले गेले. एकूण सैनिक संख्या 300 च्या आसपासच असल्याने हा गोंधळ मर्यादित राहिला. 13 नोव्हेंबर नंतर चिनी सैन्याने फार मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले. प्रथम भारतीय सैनिकांनी त्यांना परत एकदा थोपवले परंतु जेंव्हा 4000 चिनी सैनिकांनी या ठाण्यांच्यावर हल्ले चढवले तेंव्हा मात्र भारतीय सैनिकांना माघार घ्यावी लागली. अनेक सैनिक ठाण्यांच्यावर माघार घेण्याचा आदेश पोचलाच नाही. हे सैनिक शेवटपर्यंत लढत तरी राहिले किंवा पकडले गेले. या युद्धात दाखवलेल्या शौर्याबद्दल शिपाई केवल सिंग याला महावीर चक्र (मरणोत्तर) व इतर 10 सैनिक व अधिकार्‍यांना वीर चक्रे देण्यात आली. 16 नोव्हेंबरला या भागातील सैनिकांना माघार घेण्यास सांगण्यात आले व लोहित नदीचे खोरे चिनी सैन्याने सर केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आधी फक्त 2 दिवस भारतीय सैन्याने चिनी भागात प्रतिहल्ला चढवला होता. वॉलॉन्गचे युद्ध भारतीय सैनिक अतिशय उत्तम रित्या लढले यात शंकाच नाही.

लोहित विभागाप्रमाणेच सुबानसिरी विभागातील लोंगजू येथे चिनी सैनिकांनी ऑगस्ट 1962 पासूनच आक्रमक धोरण स्वीकारले होते. या विभागात तैनात असलेल्या भारतीय सैन्याला सतत उलट सुलट आदेश देण्यात आले. चिनी सैनिक समोर जमा होत आहेत असे बघितल्यावर बहुतेक ठिकाणी भारतीय सैनिकांनी आदेशांप्रमाणे ठाणी खाली केली व नंतर परत त्यात मोर्चे बांधले. 21 नोव्हेंबरपर्यंत चिनी सैन्याने सरहद्दीजवळच्या बहुतेक ठाण्यांच्यावर युद्ध न करताच ताबा मिळवला होता.

सियांग विभागातल्या मेन्चुका या गावापर्यंत चिनी सैनिक आत घुसले होते. या विभागात मात्र बर्‍याच चकमकी घडल्या अखेरीस भारतीय सैन्याने मेन्चुका तसेच ट्यूटिन्ग या दोन्ही गावामधून मधून माघार घेतली होती.

21 नोव्हेंबरला चिनी सैन्याने युद्धबंदी जाहीर केली त्यावेळी NEFA मधल्या बहुतेक विभागांच्यात चिनी सैन्य कमी जास्त प्रमाणात घुसलेले होते. कोणत्याही पद्धतीने विचार केला तरी भारतीय सैन्याचा या युद्धात संपूर्ण पराभव झाला होता हे सत्य नाकारणे कठिण जाते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चिनी सरकारने आपले सैन्य आपण प्रत्यक्ष ताबा रेषेच्या 20 किलोमीटर मागे नेत असल्याचे एकतर्फीच जाहीर केले व हे युद्धपर्व संपले.

चीन व भारत यांच्यामधल्या या महिनाभराच्या युद्धाचे अतिशय दूरगामी परिणाम भारतावर झाले यात शंकाच नाही. भारतीय जनमानसासाठी हे युद्ध म्हणजे फक्त एक दुख:द आश्चर्याचा धक्का होता असे वर्णन करणे म्हणजे एखाद्या भयानक अनुभवाबद्दल, विशेष काही घडले नाही असे सांगण्यासारखे होईल. चीन व भारत यांच्यामधे 2000 वर्षे तरी सलोख्याचे संबंध होते हा सरकारी प्रचार किती खोटा व बेगडी होता हे भारतीयांच्या लक्षात आले. चीनमधली कम्युनिस्ट राजवट किती युद्धखोर आहे व भारताला चीनबद्दल नेहमीच सतर्कता बाळगणे किती गरजेचे आहे हे ही भारतीयांच्या लक्षात आले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या साठी तर हा एक प्रचंड मोठा विश्वासघात होता. त्यांच्यावर पडलेल्या या आघातातून ते पुढे बाहेर आलेच नाहीत व 1964 मधेच त्यांचे निधन झाले.

या युद्धातून अनेक चांगल्या गोष्टीही भारतासाठी बाहेर आल्या. सर्वात प्रमुख म्हणजे पंचशील, निशस्त्रीकरण किंवा Non Alignment सारख्या भ्रामक विचारांतून देशाची सुटका झाली. भारतीय सेनादलांच्या आधुनिकीकरणाची अत्यंत आवश्यक अशी प्रक्रिया सुरू झाली. Real Politic म्हणजे काय ते देशाला खरे समजले.

चीन या युद्धात का उतरला या विषयी अनेक सिद्धांत देश व परदेशातल्या तज्ञांनी मांडले आहेत. यात भारताला धडा शिकवणे या पासून ते या कालातल्या चीनमधल्या अंतर्गत कलहापर्यंत अनेक कारणे दिली जात आहेत. परंतु चीन दावा करत असलेला लडाखमधला भू प्रदेश त्याच्या स्वत:च्याच ताब्यात असताना, एवढे मोठे युद्ध करून त्यात हजारो सैनिकांची जीवितहानी होऊ द्यायची व नंतर परत सैन्य मागे घ्यायचे या सगळ्या मागची तर्कसंगती लावणे मोठे कठिण काम आहे. या बाबतीतला एक नवीन विचार नुकताच माझ्या वाचनात आला.

अमेरिकेतील Texas Christian University च्या Naval War College मधले Center for Naval Warfare studies चे Associate Professor मिस्टर ब्रूस ए. एलमन यांनी लिहिलेले Modern Chinese Warfare 1795-1989, हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. या पुस्तकात या लेखकाने एक निराळाच विचार मांडला आहे.

एलमन् यांच्या मताप्रमाणे 1951 मधल्या कोरियातल्या युद्धानंतर (या युद्धात रशिया व चीन हे एकमेकाना सहाय्य करत होते.) चीन व रशिया यांच्यामधले मतभेद वाढू लागले. साम्यवादी देशांचे नेतृत्व कोणी करायचे या बद्दल हा वाद होता. 1962 मधले भारताबरोबरचे युद्ध, 1969 मधले रशिया बरोबरचे युद्ध व 1979 मधले व्हिएटनामबरोबरचे युद्ध या तिन्ही युद्धात रशिया बरोबर राजकीय डावपेच जिंकणे हेच समान सूत्र आहे. भारत व व्हिएटनाम ही दोन्ही रशियाची मित्र राष्ट्रे असल्याने, रशिया हा किती कुचकामी मित्र आहे हे चिनी नेतृत्वाला या दोन्ही देशांना दाखवून द्यायचे होते. भारताबरोबरचे युद्ध चीनने जिंकले परंतु व्हिएटनाम बरोबरच्या युद्धात चीनला चांगलाच मार खावा लागला होता.

विन्स्टन चर्चिल यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. “कोणत्याही देशाला कायमचे शत्रू किंवा कायमचे मित्र कधीच नसतात. त्या देशाला फक्त कायमचे स्वहित असते.” (“A nation has no permanent enemies and no permanent friends, only permanent interests.” ) चीन बरोबरच्या 1962च्या युद्धामुळे भारताला ही गोष्ट चांगलीच उमजली.

9 ऑक्टोबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “पळा पळा कोण पुढे पळे तो!- 4

  1. Good One!

    Posted by Jayesh Pathak | ऑक्टोबर 25, 2010, 11:16 सकाळी

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention पळा पळा कोण पुढे पळे तो!- 4 « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑक्टोबर 9, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: