.
History इतिहास

पळा पळा कोण पुढे पळे तो! -2


भारताच्या ईशान्येला असलेली तिबेट बरोबरची सीमा ही एक नैसर्गिक भौगोलिक सीमा असल्याने ती ओलांडणे हे फक्त या सीमेवर असलेल्या पर्वत शिखरांच्या रांगांच्या मधे मधे असलेल्या काही खिंडीतून किंवा ही सीमा ओलांडून वाहणार्‍या तीन किंवा चार नद्यांच्या खोर्‍यांमधून व नदी पात्राला लागून असलेल्या पायवाटांनीच फक्त शक्य आहे. या अशा नैसर्गिक संरक्षणामुळे व 1959 साला पर्यंत या सीमेबद्दल कोणताच विवाद तिबेट व भारत यांच्यामधे नसल्याने या सीमेचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारला काही विशेष पावले उचलण्याची कधीच गरज भासली नाही. त्यामुळे NEFA मधे सीमेवर असलेल्या खिंडींच्याजवळ व नदी पात्रांजवळ थोडीफार सैनिक ठाणी उभारणे याच्या शिवाय कोणतीच हालचाल कधी केली गेली नाही. यातली जी ठाणी अगदी सीमेजवळ होती त्यांना रसद पुरवण्याचा कोणताच मार्ग रस्तेच नसल्याने उपलब्ध नसल्याने, या ठाण्यांना विमानातून सर्व आवश्यक गोष्टी पॅरॅशूटच्या सहाय्याने टाकून पुरवल्या जात असत. या सर्व ठाण्यांच्यावर आसाम रायफल्स या पोलिस तुकडीचे सैनिक तैनात असत. 1959सालच्या ऑगस्ट महिन्यात, चिनी सैनिकांनी NEFA मधल्या सुबानसिरी विभागातल्या लोंन्गजू या भारतीय ठाण्याजवळ प्रथम आक्रमण केले. 200 ते 300 चिनी सैनिकांच्या एका दलाने या ठाण्यावर तैनात असलेल्या आसाम रायफल्स या तुकडीच्या भारतीय सैनिक़ावर हला चढवला. दोन दिवसाच्या लढाई नंतर या सैनिकांना हे ठाणे सोडून मागे यावे लागले. या घटनेनंतर ऑक्टोबर मधे कोन्गका खिंडीतील घटना घडली व नोव्हेंबर 1962 मधे चीनने आपण मॅकमोहन रेषा मानतच नसल्याचे जाहीर करून टाकले. लोन्गजू ठाण्यावरचा ऑगस्टमधला चिनी हल्ला हा एक प्रकारे पुढे होणार्‍या चिनी आक्रमणाची नांदीच होती असेच म्हणावे लागते.

चिनी सैनिकांचा एकूण इरादा बघता 1959 मधेच NEFA सीमेवरची ठाणी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या सैनिकांना रसद पुरवता यावी म्हणून रस्ते किंवा पायवाटा बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. हे सगळे निर्णय होऊन त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईपर्यंत 1962 सालचा उन्हाळा उजाडला. 20 जुलै 1962 पर्यंत NEFA मधे 34 नवी सैनिकी ठाणी मॅकमोहन रेषेच्या शक्य तेवढ्या जवळ उभारली गेली होती. या ठाण्यांच्या पैकी धोला ठाणे म्हणून ओळखले जाणारे एक ठाणे नामका चू या एका छोट्या नदीच्या दक्षिण काठावर उभारले गेले या ठाण्यावर 1 Sikh या भारतीय सैन्याच्या तुकडीचे एक अधिकारी कॅप्टन महावीर प्रसाद हे अधिकारी होते. ही ठाणी स्थापन केली गेली खरी परंतु त्या ठाण्यांपर्यंत रसद पुरवण्यासाठी रस्ते किंवा ट्रॅक्स मात्र बांधले गेले नाहीत. त्यामुळे बहुतेक ठाण्यांना विमानानेच रसद पोचवावी लागत होती. तसेच प्रत्यक्ष युद्ध प्रसंगी यातल्या बहुतेक ठाण्यांना एकमेकाचा आधारही मिळू शकत नव्हता. ऑक्टोबर 1962 पर्यंत पंतप्रधान नेहरू व संरक्षण मंत्री यांचे ठाम मत होते की चीन मोठ्या प्रमाणात युद्ध करण्यास उतरणार नाही व फक्त किरकोळ घूसखोरी करत राहील. अशा घूसखोरीला या ठाण्यांमुळे आळा घालणे शक्य होते.

नामका चू ची लढाई

मॅकमोहन रेषा बहुतांशी जरी पर्वत शिखरांच्यावरून जात असली तरी भूतानभारतचीन यांच्या सीमेच्या ट्राय जंक्शन पॉइंट च्या पूर्वेला ही रेषा कशी जाते या संबंधी भारत व चीन यांच्या मधे मतभेद होते. या ट्राय जंक्शन पॉइंट च्या थोड्या उत्तरेला असलेल्या थागला रिज वरून ही रेषा बम ला खिंडीकडे जाते असे भारताचे म्हणणे होते तर ही रेषा थाग ला रिजच्या दक्षिणेला असलेल्या त्सांगधार रिज वरून बम ला कडे जाते असे चीनचे म्हणणे होते. 1959 मधे थागला रिजच्या पूर्वेला असलेल्या न्यामजांग चू नदीच्या पात्राजवळ खिंजेमाने येथे एक ठाणे भारताने उभारले होते. या ठाण्यावर 1959 मधेच चिनी सैन्याने हल्ला करून या सैनिकांना मागे रेटले होते. चिनी सैनिक मागे गेल्यावर भारताचे सैनिक परत या ठाण्यावर गेले होते. 1962 च्या ऑगस्टसप्टेंबर मधेच चीनने आपले सैनिक थांगला रिज भागात आणले होते. त्यांचे अंदाजे 400 सैनिक या भागात असल्याचे भारतीय सेनेच्या लगेच लक्षात आले. या थागला रिजच्या दक्षिण भागातल्या पायथ्यापाशीच वर निर्दिष्ट केलेली नामका चू ही मुख्यत्वे पावसाळी नदी व त्या नदीच्या दक्षिण किनार्‍यावर धोला ठाणे होते. थागला रिजवर चिनी सैनिक तैनात केल्याचे वृत्त दिल्लीला संरक्षण मंत्रालयाकडे पोचल्यानंतर संरक्षण मंत्र्यांबरोबर झालेल्या एका बैठकीत या सैनिकांना तेथून हुसकून लावण्याचे आदेश जनरल थापर यांना देण्यात आले. जनरल थापर यांना प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना असल्याने त्यांनी या आदेशाला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु पंतप्रधान नेहरूंच्यावर असलेल्या देशातील एकूण तणावामुळे हा आदेश पाळला गेला पाहिजे असे थापर यांना सांगण्यात आले. Neville Maxwell हा इतिहासकार आपल्या India’s China War या पुस्तकात म्हणतो की या वेळी जर या निर्णयाच्या विरोधात जनरल थापर यांनी राजीनामा दिला असता तर कदाचित 1962चे चीनभारत युद्ध झालेच नसते, नामका चू येथील लढाईला म्हणूनच अतिशय महत्व आहे. नामका चू मधल्या लढाईत त्या वेळच्या काही वरिष्ठ भारतीय सेनाधिकार्‍यांनी घेतलेले चुकीचे निर्णय, सैनिकांची जुनाट शस्त्रसामुग्री, गरम कपड्यांचा अभाव, सेनेला रसद पुरवण्यात आलेल्या अडचणी, सेनेचे व सैनिकांचे गैर व्यवस्थापन व अपरिपक्व राजकीय नेतृत्व या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून भारतीय सेनेला अनावश्यक असा मोठा पराभव पत्करावा लागला. अनेक शूर सैनिक व अधिकारी निष्कारण प्राणास मुकले व अतिशय चुकीच्या रणांगणावर आवश्यकता नसताना केलेल्या या लढाईमुळे, चिनी सैनिंकाना NEFA चे प्रवेश द्वार खुले झाले असे खेदाने म्हणावेसे वाटते.

सप्टेंबर 1962 च्या अखेरपर्यंत या भागात किरकोळ चकमकीचे प्रकार फक्त घडत राहिले. या नंतर दिल्लीहून आलेल्या आदेशाप्रमाणे, थागला रिज वरून चिनी सैनिकांना हुसकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय सेना या चिंचोळ्या खिंडीत उतरली. या सेनेजवळ पुरेसे उबदार कपडे नव्हते. दारूगोळा अतिशय सीमित स्वरूपात होता, उखळी तोफांची तुकडी आली होती पण त्यांच्याजवळ दारूगोळाच नव्हता. तोफा तर नव्हत्याच व भौगोलिक परिस्थितीमुळे विमानाने रसद पुरवणे कठिण जात होते. ही सगळी परिस्थिती लक्षात आल्यावर मेजर जनरल उमराव सिंग या सेनाधिकार्‍याने भारतीय सेनेच्या या मोहिमेबद्दल आपल्या वरिष्ठांशी सतत नाराजी व्यक्त करणे सुरू केले. याचा परिणाम एवढाच झाला की उमराव सिंग यांना बदलून मेजर जनरल कौल या वशिल्याचे तट्टू असलेल्या अधिकार्‍याकडे नामका चू मोहिमेची सूत्रे दिली गेली व सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कनिष्ठ अधिकार्‍याला पंतप्रधानांशी Official Channel च्या मार्फत न जाता सरळ सल्ला मसलत करण्याची परवानगी देण्यात आली. एक प्रकारे जनरल थापर यांनी या मोहिमेमधून आपले अंगच काढून घेतले असे म्हणता येईल.. पुढच्या 15 दिवसात अंदाजे 2500 भारतीय सैनिक या भागात जमा केले गेले. या सेनाधिकार्‍याने आपल्या अनुनभवामुळे या युद्धाचा जो आरखडा बनवला तो व सैनिकांना या ठिकाणी आणताना जे गैरव्यवस्थापन व गोंधळ झाला त्याचे उत्तम वर्णन या दुव्यावर बघता येईल. एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय सेना थागला रिज भागात उतरली होती की चिनी सैनिकांना हे एक मोठे धोक्याचे चिन्ह वाटू लागले व यामुळे 20 ऑक्टोबर 1962 पर्यंत 30000 चिनी सैनिक येथे पाठवले गेले. थागला भागातल्या या अत्यंत अरूंद अशा नामका चू दरीमधे, एवढ्या संख्येने सैनिक आणण्याने आपण त्याना मृत्यूच्या सापळ्यातच ढकलले आहे ही जाणीव मेजर जनरल कौल यांना झाली पण आता फार उशीर झाला होता. चिनी सैनिकांनी 21 ऑक्टोबरला नामका चू नदी पार केली व त्यांनी नदीच्या दक्षिण किनार्‍यावर असलेली सर्व भारतीय ठाणी त्याच दिवशी सहज सर केली. 23 ऑक्टोबरला बिजिंग सरकारने चिनी सैन्याला मॅकमोहन रेषा ओलांडण्याची परवानगी दिली व युद्ध करणे अशक्य आहे हे लक्षात आल्याने भारतीय सैन्याने माघार घेण्यास सुरवात केली. पुढच्या 5 दिवसात भारतीय सेनेचा धुव्वा उडाला व चिनी सैन्याने भारतीय सेनेला, लंम्पू Lumpu या मॅकमोहन रेषेच्या 10 मैल आत असलेल्या स्थानापर्यंत मागे ढकलले.

नामका चू च्या लढाईत 2 Rajputs या सैनिक दलाचे 513 पैकी 282 सैनिक मारले गेले व 171 युद्धकैदी केले गेले. Gurakhas या सैनिक तुकडीचे 80 सैनिक मारले गेले व 90 पकडले गेले. 7the Brigade चे 493 सैनिक या लढाईत मारले गेले. भारतीय सैनिक अर्थातच या प्रतिकूल परिस्थितीतही अतुलनीय शौर्याने लढले व त्यामुळे चिनी सैन्याचीही प्रचंड मनुष्यहानी या लढाईत झाली. भारतीय सैनिकांनी या लढाईत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधे दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल तब्बल 15 वीर आणि महावीर चक्रे नंतर प्रदान केली गेली. या पदकांच्या संख्येवरून भारतीय सैनिक किती शौर्याने व धैर्याने लढले असतील याची सहज कल्पना करता येते. नामका चू च्या लढाईचे एक स्मारक लम्पू गावाजवळ उभारले गेले होते पण या ठिकाणच्या हवामानाने या स्मारकाची दैन्यावस्था झाली व शेवटी 1999 मधे 40 फूट उंच असे स्मारक तावान्ग शहरात उभारले गेले आहे.

मेजर जनरल कौल यांच्या डोक्यातून उतरलेल्या युद्धाच्या आराखड्यात, भारतीय सैन्याला मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेला एवढ्या मागेपर्यंत माघार घ्यावी लागली तर मागच्या बाजूस एक मजबूत संरक्षक फळी असणे आवश्यक आहे या गोष्टीचा बहुदा विचारच केला गेला नव्हता. इतक्या घाईने हे भारतीय सैन्य थागला रिज भागाकडे पाठवले गेले होते की मागच्या बाजूस राखीव सैन्य वगैरे काहीच ठेवले गेले नव्हते.

थागला रिज जवळच्या भारतीय सैन्याचा संपूर्ण बोजवारा उडाल्याने चढाई करणारे चिनी सैन्य व तावांग शहर यांच्या मधे आता भारताची कोणतीही संरक्षक सैनिक फळीच उरली नव्हती.

4 ऑक्टोबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: