.
Musings-विचार

काळाची गरज


मागच्या रविवारी, पिझ्झा, पास्ता वगैरेसारखे इटलीचे खास म्हणता येतील असे खाद्यपदार्थ देणार्‍या एका उपहारगृहात गेलो होतो. उपहारगृह ठासून भरलेले होते. शाळांना सुट्टी असल्याने उपहारगृहात लहान मुले मुली भरपूर होती. आम्हाला मुष्किलीने बसायला जागा मिळाली. माझी नात(वय वर्षे 5) माझ्या शेजारीच बसली होती. आमच्या मागच्या बाजूला काही चिनी वंशाची (Ethenic Chinese) मुले, मुली बसली होती. त्यांच्या मॅन्डरिनमधे (माझा अंदाज, कारण मला काहीच समजत नव्हते) हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. मधेच माझी नात एकदम रागावलेली माझ्या लक्षात आली. तिने तिच्या आईला काहीतरी सांगितले व त्या मागच्या मुलांच्याकडे रागावून बघितले. त्या मुलांना काय मिळायचा तो संदेश मिळाला व ती क्षणभर गप्प झाली पण परत त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. आमचे जेवण झाल्यावर मी नातीला ती का रागावली होती? म्हणून हळूच विचारले. ती म्हणाली की त्या मुलांनी बोलताना काहीतरी अशिष्ट शब्द वापरला होता व माझ्या नातीच्या मॅन्डरिन टीचरने तिला हा शब्द वापरायचा नाही असे सांगितले होते. आम्हाला मॅन्डरिन येतच नसल्याने आम्हाला काहीच समजले नव्हते.

आता हा असा प्रसंग दुसर्‍या कोणत्याही भाषेच्या संबंधात येऊ शकतो. मी व्यवसाय करत असताना मुंबईच्या लॅमिंग्टन रोड वरच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमधून बरीच खरेदी करत असे. हा बहुतेक धंदा त्या वेळेला पारंपारिक गुजराथी व्यापार्‍यांच्याकडून सिंधी व्यापार्‍यांकडे गेला होता. या दुकानांच्यात गेल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत असे. माझ्याशी मराठी, हिंदीत बोलणारी मंडळी, भाव काय ठरवायचा? किंवा दुकानात माल नसला तर कोठून आणायचा यासंबंधी चर्चा त्यांच्या एका विशिष्ट सिंधी उपभाषेत करत. मला या भाषेतला ओ किंवा ठो कळत नसल्याने ते काय बोलत आहेत हे समजणे शक्यच होत नसे. त्यामुळे या मंडळींना मला भावात सहज बनवता येत असे. मी नंतर एक दुसरा मराठी व्यापारी शोधून काढला. त्याला ही भाषा येत असे. मी त्याच्या मार्फत माल घ्यायला सुरवात केली. त्याला 5% कमिशन देऊनही मला माल पूर्वीपेक्षा बराच स्वस्त मिळू लागला. समोरच्या माणसाची भाषा आपल्याला येत असली तर त्याच्या बरोबरचा व्यवहार कसा नेहमी जास्त फायदेशीर ठरतो याचे हे एक उदाहरण आहे.

आपल्याला आवडो किंवा नावडो, जागतिक परिस्थिती आता अशी होत चालली आहे की आपल्याला चीन बरोबर व्यापारी संबंध ठेवणे गरजेचेच नाही तर आवश्यकच होणार आहे. त्यातून हा देश आपला शेजारी पण आहे. आर्य चाणक्याने आपल्या अर्थशास्त्रात सांगूनच ठेवलेले आहे की कोणत्याही राज्याची शेजारी राज्ये मित्र तरी असतात किंवा शत्रू तरी. त्यांच्याबद्दल सतर्क राहणे हे प्रत्येक राज्याचे महत्वाचे कर्तव्य असते. चीन हा देश अतिशय जलद रित्या एक अत्यंत शक्तीमान असा देश बनतो आहे. अशा शक्तीमान देशांची संबंध ठेवणे फार कटकटीचे असते. या देशांची वागणूक उर्मटपणाच्या बाजूला सतत झुकत राहते. त्यातून चीनमधे एकाधिकारशाही आहे. वरिष्ठ नेतृत्वाने निर्णय घेतला की त्याला अडवणारे त्या देशात कोणीच नसते. नुकताच झालेला चीन व जपान यामधील वाद हे या उर्मटपणाचे उत्तम उदाहरण आहे. नाहीतर जपानसारख्या राष्ट्राला अशी वागणूक देण्यास कोणी धजावले असते का? आपल्याबरोबरचा चीनचा व्यापार 60 बिलियन पर्यंत आता पोचला आहे. चिनी उद्योजक भारतात कारखाने काढत आहेत आणि हे सगळे असले तरी मूळ सीमा विवाद अजून सुटलेलाच नाही व सुटेल असे वाटत नाही.

या सर्व गोष्टींमुळे चीन बरोबरची आपली इन्ट्रॅक्शन दिवसेंदिवस वाढतच जाणार आणि जास्त जास्त भारतीयांचा, जास्त जास्त चिनी लोकांशी संबंध येत जाणार हे स्पष्ट दिसते आहे. चीन एक विशाल देश आहे व तेथे शंभराच्या वर जरी भाषा बोलल्या जात असल्या तरी सर्व अधिकृत कामकाज फक्त मॅन्डरिन मधेच होते. हे एक प्रकारे आपल्याला फायदेशीर आहे. आपल्याकडच्या 14/15 भाषा शिकणे कोणालाच शक्य नाही. त्यामुळेच मॅन्डरिन शिकणे ही काळाची एक गरज आहे असे मी मानतो.

भारताचे सध्याचे शिक्षण मंत्री श्री. कपिल सिब्बल हे मोठे विलक्षण गृहस्थ आहेत. त्यांना एखादी गोष्ट पटली की ते ती लगेच करून टाकतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शालान्त परिक्षांच्यात गुण देण्याची पद्धत बदलून ग्रेड्स देण्याची पद्धत सुरू केली. मला तर त्यांनी केलेला हा बदल अतिशय स्वागतार्ह वाटला होता. हे सिब्बल साहेब मागच्या आठवड्यात तियानजिन येथे झालेल्या World Economic Forum ला उपस्थित राहण्यासाठी चीनला गेले होते. तेथे त्यांनी चीनचे शिक्षण मंत्री युआन गुइरेन यांची भेट घेतली. भारतातल्या Central Board of Secondary Education (CBSE) या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत अगदी प्राथमिक इयत्तांपासून मॅन्डरिन शिकवण्याची योजना श्री. कपिल सिब्बल यांच्या डोक्यात आहे. या योजनेत महत्वाची अडचण ही आहे की मॅन्डरिन शिकवण्यासाठी आवश्यक शिक्षकच भारतात उपलब्ध नाहीत. युरोपमधल्या फ्रेंच किंवा जर्मन भाषा आपल्याकडे शिकवल्या जातात. स्पॅनिश सुद्धा शिकवले जाते पण 120 कोटी लोक आणि ते सुद्धा आपले शेजारी, बोलतात ती भाषा आपल्या येथे शिकवली जात नाही ही सत्य परिस्थिती आहे.

श्री. सिब्बल यांनी चिनी शिक्षण मंत्र्याना अशी विनंति केली आहे की त्यांनी भारतातील शिक्षकांना ट्रेनिंग देऊ शकतील अशा चिनी भाषेच्या ट्रेनर्सना भारतात पाठवावे. त्यानंतर हे शिक्षक प्राथमिक शाळांच्यातील मुलांना मॅन्डरिन शिकवू शकतील. या शिवाय चिनी विद्यापीठे व भारतीय विद्यापीठे यांच्यामधले संबंध वाढवणे, फुलब्राईट स्कॉलरशिप सारख्या कार्यक्रमांच्या अंतर्गत एकमेकांच्या देशात अभ्यासक पाठवणे असेही कार्यक्रम राबवण्यावर या चर्चेत विचार झाला


श्री. सिब्बल यांची ही योजना उत्कृष्ट आहे यात शंकाच नाही. अतिशय लहान वयात जास्त भाषांचा परिचय करून देणे खूप सोपे जाते. माझ्या नातीच्या वर्गात इतर चिनी वंशाची मुले मुली आहेत. सिंगापूरमधले बहुतेक चिनी वंशीय होक्कियन ही भाषा बोलत असल्याने, मुलांनी मॅन्डरिन शिकावे असे त्यांनाही वाटत असते. त्यामुळे ही मुले व माझी नात मॅन्डरिनच्या अज्ञानाच्या बाबतीत समपातळीवरच असल्याने माझ्या नातीने जास्त पटकन थोडेफार मॅन्डरिन कौशल्य प्राप्त केले आहे याचे कौतुक साहजिकच मला वाटते. भारतातली जितकी मुले मॅन्डरिनचे ज्ञान पैदा करतील त्याच प्रमाणात आपले चीन बद्दलचे अज्ञान कमी होण्यास मदत होईल असे वाटते.

कपिल सिब्बल यांच्या योजनेवर अशी टीका होते आहे की चिनी लोक हिंदी शिकायला तयार नाहीत मग आम्ही मॅन्डरिन का शिकावी? हा मुद्दा मला तरी फारसा योग्य वाटत नाही. एकतर फक्त हिंदी शिकून काय उपयोग? भारतात 15 भाषा बोलल्या जातात. भारतात कॉमन भाषा तर इंग्रजीच आहे. त्यामुळे हिंदी शिकण्यास चिनी लोकाना प्रोत्साहन कसे मिळेल? इंग्रजीचे ज्ञान असले की भारताबद्दल ज्ञान करून घेणे पूर्ण शक्य आहे. आपल्याला मात्र हा विकल्प उपलब्धच नाही. आपल्याला मॅन्डरिनच शिकावे लागणार आहे. व जेवढ्या लवकर आपली नवीन पिढी ही भाषा आत्मसात करेल तेवढ्या लवकर आपले आपल्या या शेजारी राष्ट्राबद्दलचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल. जागतिकीकरणाच्या या युगात मॅन्डरिनचे ज्ञान हे एक न्यूनतम आवश्यक असे कौशल्य असणार आहे याची मला तरी खात्री वाटते.

30 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “काळाची गरज

 1. सर,

  तुमचा लेख वाचला …… श्री. कपिल सिब्बल हा खरेच आश्च्रर्यकारक माणुस आहे …. ते खरोखरच जर भाषा शिक्षणाच्या बाबतीत काही योग्य निर्णय घेणार असतील तर सारा भारत त्याचं निश्चितच स्वागत करेल (हो! काही कुपमंडूक व्रृतिंच्या व्यक्तींचा विचार सोडला तर, नाहीतरी त्यांच्या रक्तात प्रत्येक गोष्टीला धरून राजकारण करणेच भिनले आहे) …. देश पातळीवर जर भारताला या गोष्टींशी टक्कर द्यायची असेल तर हे अपरिहार्यच आहे यात काहीही शंका नाही …..

  सस्नेह ….

  अनिरुद्ध

  Posted by माझी ब्लॉग शाळा ! | ऑक्टोबर 1, 2010, 9:25 pm
 2. नमस्कार,

  बेसिक चायनीज mandarin शिकण्यासाठी Learnoutloud या संकेतस्थळावर languages या विभागात मोफत डाऊनलोड उपलब्ध आहे. इथे विविध भाषा शिकण्यासाठी, तसेच इतर अनेक महत्वपूर्ण विषयांवर फ्री ऑडीयो मिळू शकतात.

  आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
  अमृता

  Posted by आर्थिक स्वातंत्र्य | ऑक्टोबर 2, 2010, 4:21 pm
 3. Have a Good day sir,
  Really I am very glad to read this information and want to learn Mandarin Language. After this I can understand chines culture.

  Posted by K. D. Jadhav | ऑक्टोबर 7, 2010, 4:24 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention काळाची गरज « अक्षरधूळ -- Topsy.com - सप्टेंबर 30, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: