.
History इतिहास

बामियानचे बुद्ध


.. 632 मधे शुआन झांग (ह्युहेनत्सेंग, Xuan Zang) हा चिनी बौद्ध भिख्खू, मूळ बौद्ध धर्मग्रंथाच्या शोधात, अपरंपार हाल अपेष्टा सहन करत, चीनहून पायी चालत भारतात आला होता व त्याने नालंदा शहरातल्या बुद्ध विहारात, आपले अध्ययन पूर्ण केले होते हा इतिहास आपण सर्वजण जाणतो. परंतु त्याने लिहून ठेवलेले प्रवासवर्णन हे त्या काळातल्या व प्रदेशातल्या राजकीय, धार्मिक व सामाजिक परिस्थिती बद्दलचे आपल्या हातात असलेले एकमेव गाईडबूक आहे हे बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही. शुआन झांग भारतात अफगाणिस्तान मार्गे आला होता. स्वत: बौद्ध असल्याने,अफगाणिस्तानमधल्या एका विशिष्ट भागातून प्रवास करणे, तो अत्यंत महत्वाचे समजत होता. तो भाग म्हणजे बाल्ख राज्याच्या दक्षिणेला असलेला व हिंदुकुश पर्वतांच्या रांगांच्या मधे वसलेला, बामियान हा प्रदेश होता. या बामियान मधे असलेल्या भव्य व विशाल बुद्ध मूर्तींचे दर्शन घेणे त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. बामियान मधल्या आपल्या वास्तव्याबद्दल व तिथल्या बुद्ध मूर्तींबद्दल त्याने बारकाईने लिहून ठेवलेले आहे.

पृथ्वीवर स्वर्ग कुठे असला तर तो बामियान मधेच आहे असे एका प्रवाशाने लिहून ठेवलेले आहे. दूरवर उत्तरेला व दक्षिणेला असलेली बर्फाच्छादित हिमशिखरे, त्याच्यापेक्षा जवळ पण सर्व बाजूंनी वेढा दिलेल्या किरमिजी रंगाच्या व उभे कडे तुटलेल्या पर्वतरांगा व त्याच्या बरोबर मधे समुद्रसपाटीपासून निदान 8000 फूट तरी उंचीवर असलेले व हिरवेगार दिसणारे नदीचे खोरे असे बामियानचे वर्णन करता येईल. या खोर्‍यात वाहणारी नदी, तिच्या बाजूला दिसणारी शेते व मधून मधून एखाद्या खेळात मांडावे तसे डोकावणारे मातीचे किल्ले, यामुळे हा प्रदेश अतिशय निसर्ग रमणीय दिसतो. या परिसरात आले की बाकीच्या जगापासून एक अलिप्तपणा मनात येऊ लागतो. कदाचित यामुळेच बौद्ध भिख्खू या प्रदेशाकडे प्रथम आकर्षित झाले असावेत.

बामियान या जगातले नसावेच असे जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात हा भाग पूर्वी एक अत्यंत महत्वाचे असे व्यापारी ठाणे होते. चीन किंवा मध्य एशियातून, भारतात किंवा पश्चिमेकडे जाणारा जवळपास प्रत्येक व्यापारी तांडा किंवा आक्रमक, बामियान मधूनच पुढे गेलेला आहे. यामुळे या भागात सुबत्ता, श्रीमंती याचबरोबर आक्रमणे व लढाया सतत होत राहिलेली आहेत. या भागात सगळीकडे दिसणारे भग्न मातीचे किल्ले व अवशेष या लढाया व आक्रमणे यांची सतत आठवण करून देतात.

.. नंतरच्या पहिल्या शतकात, बामियान प्रदेशाच्या उत्तरेला असलेल्या बाल्ख राज्यात, कुशाण टोळ्यांची सत्ता होती. हे टोळीवाले या कालात बाल्खमधून बाहेर पडले व थोड्याच दशकांच्यात त्यांनी पश्चिमेला कास्पियन समुद्रापासून ते पूर्वेला गांधार मधल्या पेशावर पर्यंत आपली सत्ता स्थापन केली. कुशाण राजांची सत्ता पुढची 300 वर्षे तरी टिकल्याने या सर्व प्रदेशात स्थिरता आली. कुशाण राजांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे साहजिकच बौद्ध धर्माला या सर्व प्रदेशात मोठे प्रोत्साहन मिळाले . कुशाणांच्या कालातच बौद्ध धर्माचा सर्वत्र प्रसार व प्रचार झाला पाहिजे असे मानणारा महायान पंथ स्थापन झाला व धर्मप्रसारासाठी बौद्ध भिख्खू मोठ्या संख्येने बाहेर पडले. यापैकी काही बौद्ध भिख्खू, बामियान मधे दाखल झाले व बामियान मधला रमणीय निसर्ग व जाणवणारा अलिप्तपणा यामुळे बौद्ध विहार स्थापन करण्यासाठी ही जागा त्यांना अतिशय योग्य वाटली. हळू हळू बामियान मधली बौद्ध भिख्खू संख्या वाढत गेली व बौद्ध धर्मियांसाठी हे एक महत्वाचे केंद्र बनले. बामियान जवळच्या उभ्या तुटलेल्या कड्यांच्यामधे बुद्ध मूर्ती कोरण्याचे काम यानंतरच्या कालातच केले गेले.

बामियानचे बुद्ध कधी कोरले गेले असावेत याबद्दल संशोधकात एकमत नव्हते. परंतु आता कार्बन डेटिंगच्या नवीन संशोधनाप्रमाणे, हा काल लहान बुद्ध मूर्तीसाठी इ..507 तर मोठ्या बुद्धासाठी इ..554 असा येतो.

शुआन झांग च्या वर्णनाप्रमाणे बामियान मधे दोन मोठ्या उभ्या असलेल्या बुद्ध मूर्ती व शयन करणार्‍या बुद्धाची 1000 फूट लांब अशा तीन मूर्ती होत्या. मात्र या तिसर्‍या मूर्तीचा नंतरच्या इतिहासात कोठे उल्लेख येत नाही. डाव्या बाजूला असलेली लहान बुद्ध मूर्ती 114 फूट उंच होती तर उजव्या बाजूची मोठी मूर्ती 165 उंच होती. मात्र आपल्याकडच्या लेण्यांप्रमाणे या मूर्ती दगडातून संपूर्ण कोरून काढलेल्या नव्हत्या. त्यांचे आकार साधारणपणे दगडात कोरलेले होते. व यावर माती, कडबा ब घोड्यांचे केस हे एकत्र दळून बनवलेल्या एका मिश्रणाचा गिलावा मूर्तीवर करून त्यानंतर सबंध मूर्ती रंगवलेल्या होत्या. अफगाणिस्तानच्या कोरड्या हवेमुळे हा गिलावा शतकानुशतके टिकून राहिला होता. मोठी बुद्ध मूर्ती लाल भडक रंगात रंगवलेली होती तर लहान मूर्ती अनेक रंगात रंगवलेली होती. शुआन झांग च्या वर्णनात मात्र सोनेरी रंगाचा उल्लेख आहे. मूर्तींच्या अंगावर जी वस्त्रे दाखवलेली होती त्यावर ग्रीक पोषाख पद्धतीची झाक होती. तज्ञांच्या मताप्रमाणे, या मूर्तींच्या शिल्पावर गांधार, ग्रीक व इराणी शिल्पकलेचा प्रभाव झालेला स्पष्टपणे जाणवत असे. या मूर्ती, दगडामधे कोरलेल्या ज्या गाभार्‍यात उभ्या होत्या त्यांच्या दोन्ही बाजूंना असंख्य गुफा खोदलेल्या होत्या. यातल्या अनेक गुफांच्यात आपल्याकडच्या अजंठा गुफांसारखी सुंदर चित्रे रंगवलेली होती. या सर्व सजावटीमुळे एकूण देखावा व बुद्ध मूर्तींची भव्यता आणखीनच खुलून दिसत असे.

बामियान च्या सुबत्तेला व तिथल्या बौद्ध विहारांना पहिली दृष्ट लागली ती. .. 1272 मधे झालेल्या चेंगिझखानच्या आक्रमणामधे. प्रथम त्याने आपल्या नातवाला एक छोटे सैन्य घेऊन या भागात पाठवले. शहरझोहक या ठिकाणी झालेल्या लढाईत, चेंगिझखानचा नातू बाण लागून मृत्युमुखी पडला. यामुळे प्रचंड क्रोधित होऊन या ठिकाणी रहात असलेला कोणीही मानव किंवा प्राणी जिवंत ठेवला जाऊ नये अशी आज्ञा चेंगिझखानने आपल्या सैन्याला दिली. चेंगिझखानच्या सैन्याने जो विध्वंस बामियानमधे केला त्याला तोड नसेल. आज दिसणारे अनेक भग्न अवशेष त्या कालामधलेच आहेत. चेंगिझखानच्या हल्ल्यात बुद्ध मूर्ती मात्र बचावल्या.

15व्या शतकात अफगाणिस्तानचा त्या वेळचा अमिर बाबुर याला बामियानचे सृष्टिसौंदर्य अतिशय आवडले व त्याने या भागाला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु आता रेशीम मार्गाने होणारा व्यापार मंदावत चालला होता व त्यामुळे बामियान तसे दुर्लक्षितच रहात गेले. यानंतर औरंगजेब दिलीच्या तख्तावर असताना त्याने या बुद्ध मूर्ती विद्रूप करण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु चेहरे विद्रूप करण्याशिवाय त्याच्या सैनिकांना दुसरे फारसे साध्य झाले नाही. यानंतर 18व्या व एकोणिसाव्या शतकात पाश्चात्य जगात पुराण वस्तू जमा करण्याची एक फॅशनच आली. बामियान मधे जागोजाग सापडणार्‍या पुरातन वस्तू या अशा लोकांच्या दलालांसाठी आयतेच सावज बनल्या व या भागातून या पुराण वस्तूंचा मोठा अवैध व्यापार सुरू झाला.

मार्च 2001 मधे या सर्व विध्वंसकांचे पितामह शोभेल अशा तालिबान राजवटीने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. 1998 सालापासूनच, तालिबानी विध्वंसक, बामियानच्या बुद्धांचा विध्वंस करण्याच्या मागे होते. या वर्षात त्यांनी ग्रेनेड्सचा मारा करून लहान बुद्ध मूर्तीचा वरचा भाग तोडून टाकला होता. मूर्तींचे कोनाडे ज्या कड्यामधे खोदलेले होते त्या कड्यावरच्या गुफांच्यात बॉम्ब टाकून त्यातील बुद्ध मूर्ती नष्ट करण्याचे कार्य ते मोठ्या उत्साहाने करत होते. जगभरच्या इतिहासप्रेमींकडून अफगाणिस्तान मधल्या तालिबान राजवटीवर, या काळात, या बुद्ध मूर्ती जतन करून, मानवाच्या पृथ्वीवरच्या इतिहासाचा एक महत्वाचा ठेवा नष्ट न करण्याबाबत हजारोनी विनंत्या केल्या गेल्या. याचा काही उपयोग झाला नाही व फेब्रुवारी 2001 मधे अफगाणिस्तानचा तालिबान प्रमुख मुल्ला उमर याने बामियान बुद्ध मूर्ती नष्ट करण्याचे आदेश दिले. मार्च 2001 मधे तालिबान्यांनी या दोन्ही मूर्तींच्या पायाजवळ शक्तीशाली सुरुंग लावले व दोन्ही मूर्ती दगडमाती होऊन खाली कोसळल्या.

2003 मधे संयुक्त राष्ट्रसंघाने बामियानचे भग्नावशेष हे जागतिक संस्कृती परंपरा दर्शक ठिकाण असल्याचे घोषित केले. व यानंतर हे भग्नावशेष टिकवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मूर्ती तर नष्ट झालेल्याच आहेत पण मूर्तींचे कोनाडे तरी टिकवावे असा प्रयत्न सध्या सुरू आहे. बामियान चे सांस्कृतिक महत्व लक्षात घेता या ठिकाणी भविष्यात अनेक पर्यटक येऊ शकतात हे लक्षात आल्याने या भग्नावशेषांचे जतन करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहेत. या मूर्ती कोसळल्यावर खाली पडलेले दगड वापरून परत मूर्ती उभ्या करता येतील का असाही विचार चालू आहे.

..632 मधे केलेल्या शुआन झांग च्या वर्णनाप्रमाणे, बामियान मधे या दोन उभ्या मूर्तींशिवाय एक शयन करणारी 1000 फूट लांब अशी बुद्ध मूर्ती अस्तित्वात होती. परंतु नंतर त्याचा कधीच काही ठावा ठिकाणा लागला नाही. शुआन झांगचे प्रवासवर्णन त्याच्या अचुकतेबद्दल प्रसिद्ध असल्याने, त्याने केलेल्या वर्णनाप्रमाणे, तिसरी बुद्ध मूर्ती अस्तित्वात कधी ना कधी असलीच पाहिजे असे अनेक इतिहास संशोधकांना वाटते. बामियान मधल्या पुराणवस्तू उत्खनन व जतन करण्यासाठी जपान व अफगाणिस्तान यांचा एक संयुक्त गट, गेली चार/पाच वर्षे, बामियान मधे कार्यरत आहे. 2008 सालच्या सप्टेंबर मधे, या गटातील एक पुराणवस्तू संशोधक, अन्वर खान फैझ याला नष्ट केलेल्या बुद्ध मूर्तीच्या कोनाड्याखाली शयन करणार्‍या एका बुद्ध मूर्तीचे अवशेष आढळून आले. त्याने लगेच ही गोष्ट आपल्या गटाचे प्रमुख झमरइलाई तारझी यांच्या निदर्शनास आणली. जास्त प्रमाणात उत्खनन केल्यावर ही मूर्ती 62 फूट लांब असल्याचे आढळून आले. त्यामुळे शुआन झांगच्या वर्णनातली ही मूर्ती असू शकत नाही. श्री तारझी यांना, नुकत्याच केलेल्या उत्खननात एक बौद्ध मठ व एका राजप्रासादाची भिंत सापडली आहे. त्यामुळे आणखी उत्खनन केल्यावर कदाचित निदान या 1000 फूट लांब शयन करणार्‍या बुद्ध मूर्तीचा पाया तरी सापडेल असा विश्वास वाटतो आहे.

हा पाया सापडला तर बामियानची व पर्यायाने सर्व सुसंस्कृत मानव जातीची, बुद्ध मूर्ती नष्ट केल्या गेल्याने कधीही भरून न येऊ शकणारी जी हानी झाली आहे त्याची काही अंशाने तरी भरपाई झाल्यासारखे होईल असे मला वाटते.

27 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “बामियानचे बुद्ध

 1. KAI MILALE HO BUDH MURTI NAST KARUN,JYA PRAMANE AFGANISTHAN NE HE GALICHA KRUTYA KELE AHE YACH PRAMANE TETHIL LOKANA BOMB TAKUN MARAVE.

  Posted by ASHOK | जुलै 11, 2012, 3:34 pm
  • Ashok

   I think that you are taking rather an extremest view. What have poor Afghan people done? The Buddha statues were destroyed by Taliban, who are known for their religious fanaticism. You should show some restraint before making a judgement.

   Posted by chandrashekhara | जुलै 12, 2012, 8:31 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: