.
Health- आरोग्य

गलिच्छ स्वच्छतागृहांची संस्कृती


सिंगापूरच्या वर्तमानपत्रांच्यात, भारताबद्दलच्या बातम्याच आधी इतक्या तुरळक असतात की मुखपृष्ठावर भारताबद्दलची बातमी येणे हे जवळपास अशक्यच असते. एक प्रकारे ते साहजिक आहे कारण इथल्या लोकांना भारताने केलेली आर्थिक प्रगती सोडली तर बाकी फारसा काही रस भारतातल्या घडामोडींबद्दल असत नाही व ते स्वाभाविकच आहे. अशा परिस्थितीत गेले 3 दिवस वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर सतत भारताबद्दल मोठी बातमी छापून येते आहे म्हणजे या बातम्या सिंगापूरकरांना किती जिव्हाळ्याच्या वाटत असाव्यात याचे कल्पना करता येईल. परंतु दुर्दैवाने माझ्यासारख्या भारतीयाला या बातम्या वाचणे व त्याच्याबरोबर दिलेली छायाचित्रे बघणे हे मात्र अत्यंत अपमानास्पद व शरमेने मान खाली घालायला लावणारे वाटते आहे.

गेले 3 दिवस वर्तमानपत्रात येणार्‍या या बातम्या, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी दिल्लीला जे खेळाडू निवास बांधले आहे त्यासंबंधीच मुख्यत्वे आहेत. सिंगापूरचे 60/70 खेळाडू या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याने तिथे असलेल्या परिस्थितीबद्दल साहजिकच सिंगापूरकरांना रस आहे व म्हणूनच या बातम्या येत आहेत. पण या बातम्या सिंगापूरपुरमधल्या माध्यमांच्यापुरत्याच मर्यादित आहेत असे समजण्याचे कारण नाही. मागच्या अनेक आठवड्यांच्यानंतर, BBC ला कश्मिरमधल्या दगड फेक्या लोकांच्या बद्दलच फक्त बातमी न देता भारताला कमी लेखण्याची दुसरी एक संधी या स्वच्छतागृहांमुळे मिळाली आहे यात शंकाच नाही.

परदेशातून येणारे विमान भारतातल्या कोणत्याही विमानतळावर उतरले की अनेक प्रवासी स्वच्छतागृहात प्रथम जात असतात. या प्रवाशांना भारतात पहिला दणका कोणता बसत असेल तर इथल्या स्वच्छतागृहांचा. कळाहीन दिसणारी वॉश बेसिन व कमोड सारखी भांडी, प्लेटिंग गेलेले नादुरुस्त नळ, घनरूप किंवा द्रवरूप साबण ठेवण्याची अस्वच्छ पद्धत, पेपर टॉवेल्सची एकूण व्यवस्था व पचपचीत ओली असलेली पायाखालची जमीन हे सर्व बघितले की भारतात येण्याच्या कोठून फंदात पडलो? असे या प्रवाशाला वाटल्याशिवाय राहत नाही. भारतीय प्रवासी मात्र या प्रवाशांसारखेच नाखुष होत असले तरी हा भारत आहे येथे असेच चालायचे असे समजून ते पुढे जातात. सिंगापूरच्या विमानतळावर मी एक मोठी अनुकरणीय गोष्ट बघितली आहे. तिथल्या प्रत्येक स्वच्छतागृहाच्या बाहेर त्या स्वच्छतागृहाला जबाबदार असलेल्या व्यक्तीचा फोटो, माहिती व मोबाईल नंबर दिलेला मी पाहिला. बहुतेक ठिकाणी ही व्यक्ती त्या स्वच्छतागृहात सतत हजर असते व आपले स्वच्छतागृह स्वच्छ, चमकदार व वापरंण्यायोग्य कसे राहील व येणारे प्रवासी आनंदी कसे राहतील याची काळजी घेत असताना दिसते.

आपल्याकडच्या विमानतळावरच्या स्वच्छतागृहांची त्यातल्या त्यात बरी निगराणी होत असूनही त्यांची इतकी दयनीय अवस्था असते याचे मुख्य कारण म्हणजे स्वच्छतागृह स्वच्छ असले पाहिजे हे आपल्या संस्कृतीतच बहुदा नाही. घरातली खाजगी स्वच्छतागृहे सुद्धा इतकी घाणेरडी असतात तर कोणीच वाली नसलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे काय परिस्थितीत ठेवली जात असतील त्याची कल्पना सुद्धा करवत नाही.

मी लहान असताना माझे एक मामा मुंबईला गिरगावात चाळीत रहात असत. त्यांच्याकडे रहायला मला एक गोष्ट सोडली तर खूप आवडत असे व मजाही येत असे. तिथे रहाताना मला सर्वात किळस कसली येत असली तर तिथल्या स्वच्छतागृहांची. पाण्याचे नळ नसलेल्या त्या स्वच्छतागृहांची आठवण जरी झाली तरी अजून अंगावर काटा येतो. अर्थात त्याच्यापेक्षाही भयानक स्वच्छतागृहे मी बघितलेली आहेत. या स्वच्छतागृहात ठेवलेल्या टोपल्या, त्यांच्या आसपास फिरणारे डुकरांसारखे प्राणी व जमा झालेली घाण दुसर्‍या कोणीतरी व्यक्तीने येऊन घेऊन जाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी कल्पना सुद्धा करता येणार नाही इतक्या गलिच्छ आता वाटतात.

कदाचित 200 वर्षांपूर्वी जगभरची स्वच्छतागृहे याच दर्जाची असण्याची शक्यता आहे पण इतर देशात जसजशा सामाजिक सुधारणा होत गेल्या तसतशी स्वच्छतागृहे ही जास्त स्वच्छ व वापरण्यास जास्त सुलभ होत गेली. भारतात मात्र या बाबतीत समाजात इतकी उदासीनता होती व आहे की आपल्याकडच्या स्वच्छातागृहात फारशी सुधारणा कधी झालीच नाही. माझ्या लहानपणी आमच्या घरातील स्वच्छतागृहे त्या काळातील पद्धतीप्रमाणे घराच्या बाहेर असत. एक व्यक्ती येऊन ती स्वछतागृहे रोज फिनाईल वगैरे टाकून साफ करत असे. आता अशी कोणी माणसेही मिळत नाहीत त्यामुळे स्वच्छतागृहे सफाईचे काम मुख्यत्वे स्वावलंबानेच करावे लागते. तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुसंख्य घरांच्यातली स्वच्छतागृहे फारशी स्वच्छ नसतातच. मध्यंतरी मी उत्तर हिंदुस्थानातल्या खेडेगावांच्या बद्दल एक बातमी वाचली होती. या बातमी प्रमाणे या खेड्यांच्यातल्या ज्या घरांच्यात स्वच्छतागृहे नाहीत अशा घरात आपली मुलगी द्यायलाच कोणी तयार होत नाही. ही बातमी सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने जरी स्वागतार्ह असली तरी खेड्यांच्यातल्या घरांच्यात अजूनही स्वच्छतागृहे नाहीत हे विदारक सत्य आपल्या समोर या बातमीमुळे येतेच आहे.

घराच्या आत जेंव्हा स्वच्छतागृह बांधले जाते तेंव्हा त्यात जुन्या पद्धतीचे भारतीय पॅन या प्रकारचे शौच गृह अजुनही बांधली जाते. या प्रकारच्या शौचगृहात टाकावे लागणारे पाणी व एकूण व्यवस्था यामुळे ही शौचगृहे घराच्या आतल्या बाजूस बांधण्यास अगदी अयोग्य आहेत असे मला वाटते. घराच्या अंतर्गत असणार्‍या स्वच्छतागृहांच्यात, पाश्चात्य कमोड या प्रकारची भांडी स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने जास्त योग्य वाटतात. घरात स्वच्छतागृह बांधले तर जाते पण बहुसंख्य शहरांच्यात असलेल्या पाण्याच्या कमतरतेने ती स्वच्छ राखणेही कठिण जाते यात शंकाच नाही. कमी पाण्याचा वापर होऊन स्वच्छ राखता येतील अशी स्वच्छतागृहे भारतासाठी तयार केली जाण्याची खूप गरज आहे असे मला वाटते.

आपल्याकडची स्वच्छतागृहे स्वच्छ राहत नाहीत यासाठी निगराणी शिवाय आपल्या लोकांच्या बर्‍याचशा गलिच्छ सवईही कारणीभूत होतात असे मला वाटते. शौचगृहाचा वापर करताना सिगारेट ओढून राख व उरलेली सिगारेट तेथेच टाकणे, स्वच्छतागृहाच्या कोपर्‍यातच तंबाखूची पिंक टाकणे. पाण्याचा वापर करताना स्वच्छतागृहाची संपूर्ण जमीन ओली करणे या सारख्या आपल्या सवईंनी स्वच्छतागृहे घाणरेडी होतात व राहतात. आधी वापर केलेले स्वच्छतागृह जर पचपचीत ओले असले तर पुढच्या व्यक्तीला ते वापरणे किती किळसवाणे होत असेल त्याची कल्पनाच करणे बरे.

अर्थात राष्ट्रकुल स्पर्धेच्या खेळाडू निवासामधली स्वच्छतागृहे इतकी घाणेरडी असण्याचे कारण निराळेच आहे. 6 महिन्यांपूर्वी माझ्या पुण्यामधल्या घराच्या काही खोल्यांचे मी नूतनीकरण केले होते. त्यात स्वैपाकघरातील एकूण व्यवस्थाच मी बदलली. हे काम संपवून केंव्हा कामगार निघून गेले तेंव्हा ज्या परिस्थितीत ते स्वैपाकघर होते ते बघून मला अक्षरश: घाम फुटला होता. किचन सिंकमधे सिगरेटची थोटके, तंबाखूच्या पिंका, दगडमाती, गंजके स्क्रू व नट अशा अनेक गोष्टी सापडल्या. यामुळे सिंकमधे पाणी तुंबून रहात होते. या शिवाय बाकी स्वैपाकघरात कचरा, घाण यांचेच साम्राज्य होते. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या खेळाडू निवासाची ही अवस्था तिथे काम करणार्‍या कामगारांनी केली आहे यात शंकाच नाही. या कामगारांच्या आरोग्य विषयक सवई आदिमानवाच्या काळातल्या असल्याने हे घडले आहे.

काम पूर्ण होण्याच्या वेळी हे सगळे असेच असणार आहे याची खरे म्हणजे सर्व कंत्राटदारांना आणि व्यवस्थापन समितीला पूर्ण कल्पना असणार. तरीही वेळेत दुसरी माणसे नेमून ही वसतीगृहे स्वच्छ व चकचकीत दिसतील याची काळजी त्यांनी घेतली नाही हे त्यांचे फार मोठे अपयश आहे. या अपयशामुळे भारतात व परदेशात रहाणार्‍या प्रत्येक भारतीयाची मान लाजेने खाली गेली असणार आहे याबद्दल माझी खात्री आहे. एकदा हे खेळ संपले ही या अनागोंदी कारभाराबद्दल जबाबदार व्यक्तींना योग्य शासन मिळेल एवढीच आशा आपण करू शकतो.

24 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

9 thoughts on “गलिच्छ स्वच्छतागृहांची संस्कृती

 1. १०० टक्के सत्य.. लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या देशातली..

  बाय द वे इथे जोडलेले फोटो नक्की कुठल्या स्वच्छता गृहाचे आहेत? भारतातल्या चालो अवस्थेतल्या एअरपोर्टवर असे स्वच्छतागृह असेल हे पटणे कठीण जातेय..

  Posted by Nachiket | सप्टेंबर 24, 2010, 10:01 सकाळी
 2. नशीब त्यांनी मुंबई मधील पश्चिम रेलवे चे माटुंगा ते वांद्रे स्टेशन मधील रेलवे रुळा वरील उघड्या वरती सौचास बसलेल्यांचे फोटो दाखवले नाही

  Posted by सुनिल | सप्टेंबर 24, 2010, 10:21 सकाळी
 3. भारतात एस.टी. बस काय रेल्वेने कुठेही जा, या आणि अशा गलिच्छ “स्वच्छता” गृहांचा अनुभव सतत येत असतो. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आता राष्ट्रकुल सामन्यांच्या निमित्ताने पुनः एकदा ऐरणीवर आली आहे. कधी आम्ही भारतीय हा कलंक पुसून टाकणार ?
  मंगेश नाबर.

  Posted by Mangesh Nabar | सप्टेंबर 24, 2010, 1:03 pm
 4. Pan haa hee ek news making chaa prakaar vaatato. he photo ajoon operational na jhalelyaa under cosntruction kinva under final touch stage che aahet.

  at the time of delivery they cant be so bad.

  Of course this comment does not in anyway dilute the fact that there is filth in our cities beyond tolerance.

  Posted by Nachiket | सप्टेंबर 24, 2010, 3:49 pm
  • Nachiket,
   You have got it right….
   Please see this link also…
   Why only specific problematic areas ( building 12) is shown again and again on the news??
   Why Indian media, instead of covering up and showing the better area of the CWG is showing only filthy area??
   Its all media driven mess….
   Please check this link..

   Posted by महेंद्र | सप्टेंबर 27, 2010, 5:16 pm
 5. भारतीयांमधे जरा स्वच्छ्तेविषयी अनास्था च आहे. इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीत काम करणार्या अनेकांना फ्लश करायची सवय नसते. बाहेर मारे कितीही चकचकीत रहात असतील पण संडास वापरला की बाहेर पडायच्या आधी एकदा फ्लश करावे हे एवढ्या शिकलेल्या मुलिंना कळू नये? आपली घाण कोणीतरी हाऊसकिपींग वाल्या बाईनेच साफ केली पाहिजे असं त्यांना का वाटतं कोणास ठाऊक. ३-४ वर्षापूर्वी मी एक सर्वे वाचला होता त्यात युरोप मधे भारतीय प्रवासी सर्वात गलिच्छ असतात आणि स्वच्छतागृह खूप घाण करतात असे दिले होते.

  Posted by लीना पटवर्धन | सप्टेंबर 27, 2010, 7:31 pm
 6. चंद्रशेखर साहेब, कधी कधी स्वच्छतागृहाच्या स्वच्छते पेक्षा उपलब्धता देखील दिलासा देणारी असते. वैयक्तिक आयुष्यात स्वच्छतेला महत्व देणारे लोक सार्वजनिक जीवनात मात्र स्वच्छतेविषयी अनास्था बाळगतात याचे वैषम्य वाटते. स्वच्छतागृह ही एक चळवळ झाल्याशिवाय सामाजिक बदल होतील असे वाटत नाही. तुम्ही आम्ही यावर सातत्याने लिहिले पाहिजे, बोलले पाहिजे तरच विचारांचा प्रसार होईल.

  Posted by प्रकाश घाटपांडे | जुलै 18, 2013, 12:45 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: