.
Musings-विचार

म्हातारपण म्हणजे नक्की काय?


प्रत्येक सजीवासाठी, म्हातारपण येणे हा सृष्टीचा एक अलिखित नियम आहे असे म्हटले तरी चालेल. जन्माला आलेल्याला मृत्यू जसा अटळ असतो तसेच अपमृत्यू न झाल्यास, त्याला येणारे म्हातारपण अटळच असते. पण म्हातारपण म्हणजे नक्की काय? हे मात्र अचूकपणे सांगणे कठिणच दिसते. नुकतेच या विषयातल्या दोन प्रयोग किंवा अभ्यासांचे निष्कर्ष माझ्या वाचनात आले. दोन्ही निष्कर्ष मोठे रोचक वाटले. किंबहुना ते अगदी निराळ्या व्यक्तींनी व संस्थांनी केलेले असले तरी ते एकमेकाला पूरकच आहेत असे वाटले.

यापैकी पहिला प्रयोग BBC चे मायकेल मॉसले यांनी नुकताच इंग्लंडमधे केला आहे. 1979 मधे हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधल्या मानसशास्त्राच्या प्रोफेसर एलन लॅन्जर यांनी केलेले मूळ प्रयोग व त्यावरून त्यांनी काढलेले निष्कर्ष हे परत एकदा तपासणे हा या मायकेल मॉसले यांच्या प्रयोगाचा उद्देश होता. एलन लॅन्जर यांच्या मूळ अभ्यासात त्यांनी दोन प्रयोग केले होते. यापैकी पहिला प्रयोग, अमेरिकेमधल्या न्यू इंग्लंड राज्यातल्या, आर्डेन हाऊन या अगदी परावलंबी अशा वृद्धांसाठी असलेल्या शुश्रुषागृहामधे त्यांनी 1976 मधे केला होता. हे शुश्रुषागृह 4 मजली होते व तेथे 360 वृद्ध राहू शकत होते. यापैकी दोन मजले लॅन्जरबाईंनी आपल्या प्रयोगासाठी निवडले होते. या दोन्ही मजल्यावरच्या वृद्धांच्या पलंगाजवळ, झाडाची एक छोटी कुंडी ठेवली गेली होती व त्यांना आठवड्याला एक चित्रपट दाखवला जाईल अशी सोय केली गेली. मात्र दुसर्‍या मजल्यावरच्या वृद्धांच्या जवळ असलेल्या कुंडीतल्या झाडाची निगराणी या शुश्रुषागृहाचे कर्मचारी करत होते व त्या मजल्यावरच्या प्रत्येक वृद्धाला चित्रपट कोणत्या दिवशी दाखवण्यात येईल तसेच कोणत्या दिवशी त्यांना भेट द्यायला नातेवाईक येऊ शकतील हे ही शुश्रुषागृहाचे कर्मचारीच सांगत होते. चौथ्या मजल्यावरच्या वृद्धांना मात्र झाडाची निगराणी स्वत: करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते व चित्रपट कोणत्या दिवशी बघायचा व नातलगांना कधी भेटायचे किंवा भेटायचे का नाहीच भेटायचे हेही ठरवण्याचे स्वातंत्र्य त्यांनाच दिलेले होते. 18 महिने हा प्रयोग चालू ठेवण्यात आला होता. या कालानंतर जेंव्हा लॅन्जरबाई या शुश्रुषागृहात परत गेल्या होत्या तेंव्हा त्यांना एक अतिशय आश्चर्यजनक निरिक्षण करता आले होते. मागच्या 18 महिन्यात दुसर्‍या मजल्यावरचे जेवढे वृद्ध मरण पावले होते त्याच्या निम्या संख्येनेच चौथ्या मजल्यावरचे वृद्ध मरण पावले होते. स्वतं:च्या आयुष्यावर इतक्या किरकोळ प्रमाणात सुद्धा नियंत्रण करता येऊ लागल्याबरोबर, या चौथ्या मजल्यावरच्या वृद्धांचा मृत्यू पुढे ढकलला गेला होता. 1979 मधे लॅन्जर बाईंनी आपला दुसरा प्रयोग केला होता. हा प्रयोग घड्याळाचे काटे मागे फिरवल्यानंतर या नावाने ओळखला जातो. या प्रयोगात वृद्ध पुरुषांच्या एका गटाला, 20 वर्षे मागे, म्हणजे 1959 मधे, ज्या प्रकारच्या घरांत, वातावरणात व परिस्थितीत हे लोक रहात असत त्याच परिस्थितीत परत एकदा 1 आठवडा रहाण्याची संधी मिळाली होती. या फक्त 1आठवड्यानंतर, लॅन्जर बाईंना या गटातल्या पुरुषांच्या, ऐकू येणे, स्मृती, चपळाई, भूक व एकूणच बरे वाटणे, यात लक्षणीय सुधारणा झालेली आढळून आली होती. या दोन प्रयोगांनंतर काढलेल्या निष्कर्षांतून, लॅन्जर बाईंनी असा सिद्धांत मांडला की समाज व संस्कृती, वृद्धांना जे छुपे संकेत देत असते त्याकडे दुर्लक्ष करायला शिकणे, ही वृद्धांची होत असलेली शारिरीक व मानसिक झीज भरून निघणे व त्यांचे आरोग्य उत्तम राहणे यासाठी असलेली जादूची कांडी आहे. वैद्यकशास्त्र वापरत असलेल्या क्रॉनिक, अक्यूट, रामबाण इलाज, रोगमुक्तता वगैरे शब्दांमुळे, ज्येष्ठ रुग्णाच्या वैयक्तिक श्रद्धेच्या आधारे त्याच्या शरीरात व मनात जी नैसर्गिक रोगनिर्मूलनाची प्रक्रिया (placebos) सुरू होऊ शकते ती सुरू न होता हा ज्येष्ठ रुग्ण आयुष्याकडे, “आता काय होणार?” अशा पराभूत मनोवृत्तीनेच बघू लागतो. कोणतीही व्यक्ती आपले विचार, भाषा, आशावाद व जीवनाकडे बघण्याची दृष्टी यात जरी थोडाफार बदल करू शकली तरी जास्त तरूण दिसणे, वजन कमी होणे, दृष्टी सुधारणे आणि मृत्यू पुढे ढकलणे जाणे यासारखे बदल लगेच दिसू लागतात.”

प्रोफेसर एलन लॅन्जर

लॅंजरबाईंचा हा सिद्धांत तपासण्यासाठी मायकेल मॉसलेने, 76 ते 88 या वयोगटातले 6 सुप्रसिद्ध स्त्री पुरुष निवडले व त्यांच्यासाठी 1970 या साली जशी घरे होती त्याप्रमाणे सर्व बाबतीत दिसणारे व आतील सर्व व्यवस्था तशीच असणारे घर, एक प्रयोगशाळा म्हणून निवडले. या सर्व मंडळींनी 1970 सालासारखे कपडे एक आठवडा घातले, स्वत:चे 1970 मधले शयन गृह होते त्याच सारख्या खोलीत त्यांनी निद्रा घेतली, 1970 मधलेच टीव्ही कार्यक्रम बघितले आणि बोलताना 1970 हाच काल वर्तमानकाल आहे असे गृहित धरण्याची काळजी घेतली.

या सर्व मंडळींना हे सांगण्यात आले होते की स्वत:च्या आयुष्यावरचे स्वत:चे नियंत्रण परत आणण्यासाठी, रोजच्या आयुष्यातली सर्व कामे, त्यांना त्यांच्या 1970 मधल्या आयुष्याप्रमाणेच स्वत: करावी लागतील. घरात शिरल्यावर हातातल्या बॅगा जिन्यावरून स्वत:च्या खोलीत त्यांच्याच त्यांना न्याव्या लागल्या. हे काम या मंडळींनी कित्येक वर्षात केले नव्हते. परंतु बसत, अडखळत या बॅगा या लोकांनी वर नेल्याच. या घराचे वैशिष्ट्य असे होते की यात पडण्याला, धडपडण्याला खूप संधी होत्या. काही ठिकाणी निसरडे होते, काही दारांना अणकुचीदार टोके होती. या प्रयोगाचे उद्दिष्ट मुळी ही मंडळी आपला आयुष्यातला आत्मविश्वास परत प्राप्त करू शकतील की नाही हे पाहणे हा होता. या गटात डिकी बर्ड हा क्रिकेटमधला सुप्रसिद्ध अंपायरही होता. त्याला त्याचे जुने कपडे घालून परत लॉर्ड्स च्या मैदानावर नेले गेले होते. आश्चर्य म्हणजे रोजच्या आयुष्यातली सर्व कामे या मंडळींनी 35 वर्षे आधी ती करत होती तशीच आठवडाभर कोणताही अपघात होऊ न देता केली.

BBC च्या प्रयोगातील श्रीमती लिझ स्मिथ

डिकी बर्ड

एका आठवड्यानंतर या लोकांच्यात प्रचंड बदल झालेला निरिक्षकांना आढळला. लिझ स्मिथ या व्हील चेअर घेणार्‍या व स्ट्रोक आलेल्या बाई, ज्या दोन काठ्या हातात घेतल्याशिवाय चालू शकत नव्हत्या, त्या 148 पावले फक्त 1 काठी घेऊन चालल्या. आठवड्याने या सर्व मंडळींना परत एकदा असंख्य शारिरीक व मानसशास्त्रीय चाचण्याना तोंड द्यावे लागले. या चांचण्यात स्मृती, बदलाला सामोरी जाण्याची मानसिकता, शारिरीक दम, दृष्टी आणि मूड सारख्या अनेक गोष्टी तपासल्या गेल्या. या चाचण्यांच्या निकालावरून असे दिसून आले की वैयक्तिक फरक असले तरी बहुतेक जणांची शारिरीक आणि मानसिक कुवत निदान 20 वर्षे तरी पूर्वीची झाली होती. थोडक्यात म्हणजे एलन लॅन्जर बाईंचा सिद्धांत नक्कीच योग्य वाटत होता.

मी वर निर्दिष्ट केलेला दुसरा अभ्यास, प्रसिद्ध केला आहे लंडन स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स या संस्थेने. BUPA या एका आरोग्यविमा उतरवणार्‍या कंपनीने तो पुरस्कृत केला आहे. Ipsos MORI या सर्वेक्षण करणार्‍या एका संस्थेमार्फत 12 देशातल्या 12262 व्यक्तींच्या मुलाखतीवर हा अभ्यास आधारित आहे. वृद्धांना घरातूनच आधार देण्याच्या पारंपारिक व्यवस्थेचा र्‍हास होत आहे व ज्येष्ठांच्या तरुणांवरच्या अवंलबित्वाचे गुणोत्तर (Dependancy Ratio) (म्हणजे एका ज्येष्ठ नागरिकामागे किती तरुण नागरिक आहेत याचे गुणोत्तर) हे कमी कमी होत चालले आहे हे या अभ्यासाचे निष्कर्ष काही मला फारसे नवीन किंवा आश्चर्यजनक वाटले नाहीत, कारण आपल्या आजूबाजूला जी सामाजिक परिस्थिती आहे त्यावरून हे स्पष्टच होते आहे. मला या सर्वेक्षणामधून सापडलेले दुसरे काही निष्कर्ष मात्र जास्त रोचक वाटत आहेत. यापैकी मला वाटलेला पहिला मह्त्वाचा निष्कर्ष म्हणजे या 12 देशातल्या, या सर्वेक्षणात सामील झालेल्या व 65 वर्षे पूर्ण झालेल्या, ज्येष्ठांपैकी, 72 टक्के ज्येष्ठ नागरिक, स्वत:ला म्हातारे मुळी समजतच नाहीत. परंतु देशांनुसार या टक्केवारीत बराच फरक जाणवतो आहे. सर्वात जास्त टक्केवारीने फ्रान्समधले ज्येष्ठ, स्वत:ला तरूण मानतात व 32% फ्रेंच ज्येष्ठांचे तर म्हणणे आहे की म्हातारपण 80 नंतरच येते. 65% चिनी ज्येष्ठ जरी स्वत:ला तरूण मानत असले तरी म्हातारपण 60 नंतरच येते असे त्यांना वाटते.

या अभ्यासाचा मला वाटलेला दुसरा किंवा सर्वात महत्वाचा निष्कर्ष हा भारतीयांच्या बद्दलचा आहे. हे सर्वेक्षण केलेल्या सर्व देशातल्या लोकांच्यात, भारतीय ज्येष्ठ हे म्हातारपणाबाबत सर्वात निष्काळजी आहेत. 70% भारतीयांनी म्हातारपणाला काहीही महत्व देण्याचेच नाकारले. हा अभ्यास, याची दोन कारणे देतो. एकतर सर्वेक्षण केलेल्या बहुसंख्य भारतीयांनी, म्हातारपणासाठी काहीना काही बचत करून ठेवली आहे व भारतामधल्या ज्येष्ठांचे अवलंबित्वाचे गुणोत्तर हे जगात सगळ्यात कमी म्हणजे 5 टक्क्याच्या आसपास आहे. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक ज्येष्ठामागे सर्वात जास्त तरूण भारतात आहेत व त्यामुळेच ही तरूण पिढी आपली काळजी घेईल असा आत्मविश्वास भारतीयांना वाटतो आहे.

मला प्रथमदर्शी, हे दोन्ही अभ्यास एकमेकाला विरोधाभासी आहेत असे वाटले. भारतासारख्या , अवलंबित्वाचे गुणोत्तर कमी असणार्‍या देशामधले ज्येष्ठ नागरिक, साहजिकपणे त्या देशातल्या तरूण पिढीवर जास्त अवलंबून असणार, म्हणजेच त्यांचे स्वत:च्या आयुष्यावरचे नियंत्रण कमी असणार आणि रोजच्या आयुष्यात कराव्या लागणार्‍या अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागत नसल्याने एलन लॅन्जर बाईंच्या सिद्धांताप्रमाणे त्यांचे मानसिक व शारिरीक आरोग्य हे अवलंबित्वाचे गुणोत्तर जास्त असणार्‍या युरोपियन किंवा जपानी ज्येष्ठांच्या पेक्षा खालच्या दर्जाचे असले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात मात्र 70 % भारतीय ज्येष्ठ, स्वत:ला तरुण तर समजतातच पण म्हातारपणाबाबतही निष्काळजी आहेत. त्यामुळे हा प्रथमदर्शी विरोधाभास, सत्य आहे असे म्हणणे कोणालाच शक्य होणार नाही. मग भारतीयांच्या बाबतीत असे काय विशेष आहे की ज्यामुळे एलन लॅन्जर बाईंचा सिद्धांत त्यांना लागू पडत नाही.

या प्रश्नाचे उत्तर मला वाटते, खरे म्हणजे सोपे आहे. भारतीय ज्येष्ठ नागरिक कदाचित रोजच्या आयुष्यात कराव्या लागणार्‍या गोष्टींसाठी तरूण पिढीवर किंवा नोकरांच्यावर अवलंबून असतीलही, पण भारतातल्या किंवा इतर विकसनशील देशांमधल्या सर्वसाधारण नागरिकांना, रोजचे जीवन जगण्यासाठीच जी आव्हाने पेलायला लागतात तीच आव्हाने ज्येष्ठांनाही पेलावी लागल्याने त्यांची शारिरीक व मानसिक क्षमता कमकुवत होऊच शकत नाही. पाणी, वीज यांच्यासारख्या सुविधांची अनुपलब्धतता, शहरातल्या अत्यंत गैरशिस्त वाहतुक व्यवस्थेला सतत तोंड द्यावे लागणे, कोणत्याही कार्यालयातल्या कामांसाठी होणारा शारिरीक व मानसिक त्रास या सगळ्यांमुळे भारतातले ज्येष्ठ, नेहमीच सतर्क व सर्व परिस्थितीत युद्ध करण्यासाठी नेहमीच तयार असतात. या सर्व गोष्टींसाठी, घरातली कामे करताना आवश्यक त्यापेक्षा बरीच जास्त शारिरीक व बौद्धिक कुवत लागत असल्याने त्यांची आयुष्याकडे बघण्याची वृत्ती तरूणांसारखीच किंवा लढाऊ असते व म्हणूनच एलन लॅन्जर बाईंचा सिद्धांत त्यांना फक्त लागूच पडतो एवढेच नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात ते घड्याळ्य़ाचे काटे सारखे मागे फिरवतच असतात. डिमेंशिया सारखा मेंदूचा आजार आपल्याला होईल अशी इतर देशातल्या लोकांना वाटणारी भिती भारतीयांना या लढाऊ वृत्तीमुळेच बहुदा जाणवत नसावी.

नव्या पिढीच्या या ज्येष्ठ भारतीयांच्यापैकीच मी एक असल्याने, मला हे जाणवते आहे की आमच्या पिढीच्या आयुष्याची गुणवत्ता, मी बघितलेल्या मागच्या दोन पिढ्यांच्यातील ज्येष्ठांच्या आयुष्याच्या गुणवत्तेपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. आमच्या पिढीतले ज्येष्ठ, आयुष्य जास्त मजेने, समाधानाने नक्कीच घालवत आहेत.

मला इतके दिवस ज्येष्ठांच्या आयुष्य गुणवत्तेत झालेल्या या सुधारणेचे कारण सापडत नव्हते. परंतु लॅन्जर बाईंच्या संशोधनाबद्दल वाचल्यावर, आपल्याकडची एक म्हण आठवली. ही म्हण आहे थांबला तो संपला.” लॅन्जर बाईंचे संशोधन हेच तर सांगत आहे. आयुष्यातली आव्हाने स्वीकारण्याचे ज्या दिवशी तुम्ही थांबवाल त्या क्षणी तुम्हीही थांबाल.

लॅन्जर बाईंनी, ज्येष्ठांसाठी आपल्या पुस्तकाच्या शेवटी एक संदेश दिला आहे. त्या म्हणतात की ज्येष्ठत्व प्राप्त झाले की इतर सर्वांची मदत मिळवणे खूप सोपे असते. परंतु ही मदत प्रत्यक्षात तुम्हाला तुमच्या मृत्यूकडेच नेत असते. “( “It’s too easy to have everybody take care of us. But you can be helped to death”)

मला वाटते की लॅन्जरबाईंनी अतिशय योग्य सल्ला ज्येष्ठांना दिला आहे. याबत दुमत असण्याचे काही कारणच नाही.

21 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

7 thoughts on “म्हातारपण म्हणजे नक्की काय?

 1. पटतंय. तुम्ही छान लिहिता.

  तुमच्या पोस्टस् अभ्यासपूर्ण, वाचनीय आणि वाचून विचार करण्यासारख्या असतात.

  मला पुन्हा विचार करायला लावल्याबद्द्ल धन्यवाद. मी तुमची फॅन आहे तुमचे सगळे लेख अजुन वाचुन झालेले नाहीत. पण विश्वासघात सिरीज खास आवडली…

  — प्रिया.

  Posted by Priya | सप्टेंबर 21, 2010, 5:50 pm
 2. पहिल्या प्रयोगातल्या दुसऱ्या मजल्यावरच्या वृद्धांच्या मृत्यूंना काही अंशी का होईना लॅन्जरबाईंचा प्रयोग कारणीभूत आहे असं नाही वाटत तुम्हाला? आपला निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी किंवा शोध लावण्यासाठी त्यांनी दुसऱ्या मजल्यावरच्या जीवांचा हकनाक बळी दिला असं मला तरी वाटतं.

  Posted by हेरंब | सप्टेंबर 22, 2010, 1:34 सकाळी
  • हेरंब

   दुसर्‍या मजल्यावरच्या वृद्धांच्या मृत्यूला लॅ न्जरबाईंचा प्रयोग कारणीभूत होता असे म्हणता येणार नाही. त्या मजल्यावरचे जे वृद्ध कालवश झाले ते त्यांच्या येथे झाडांच्या कुंड्या ठेवल्या नसत्या किंवा चित्रपट दाखवले नसते तरी त्याच संख्येने कालवश झाले असते. फरक चौथ्या मजल्यावरच्या वृद्धांमधे पडला. दुसर्‍या मजल्यावरचे वृद्ध हे या प्रयोगासाठी असलेली बेस लाईन होती.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 22, 2010, 6:45 सकाळी
 3. now we can certainly have +ve attitude towards our life.
  can call ourselves as young

  Posted by ashok patwardhan | सप्टेंबर 22, 2010, 1:00 pm
 4. मला इतके दिवस ज्येष्ठांच्या आयुष्य गुणवत्तेत झालेल्या या सुधारणेचे कारण सापडत नव्हते. परंतु लॅन्जर बाईंच्या संशोधनाबद्दल वाचल्यावर, आपल्याकडची एक म्हण आठवली. ही म्हण आहे “थांबला तो संपला.” लॅन्जर बाईंचे संशोधन हेच तर सांगत आहे. आयुष्यातली आव्हाने स्वीकारण्याचे ज्या दिवशी तुम्ही थांबवाल त्या क्षणी तुम्हीही थांबाल.

  Posted by pandit kamble | सप्टेंबर 25, 2010, 12:07 pm
 5. mala ha lekh khup avadala. kharetar rikama vel ani apan konala nakose zalo ahot kinva ata apla upyogch nahi ani ata sampl sar mhananare vrudhdh mala ajubajula far kami distat. te velchya veli tharleli kame par padtat. athvanine aushade golya ghetat. velelach jevtat zoptat ani tharavik pramanat pan ata ji chalishichya aspaschi pidhi ahe tich mhante ahe ki ata hot nahi baba kai. zal ki. ajun kt dhadpadaych ata retirementche vedh laglet baba. aso. lekh chan ahe mala avadala. samsya mala vatate navavrudhanchi + ahe.

  Posted by vaishali kulkarni | ऑक्टोबर 1, 2010, 11:43 सकाळी

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention म्हातारपण म्हणजे नक्की काय? « अक्षरधूळ -- Topsy.com - सप्टेंबर 21, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: