.
History इतिहास

बाल्खच्या सोन्याची गोष्ट


अफगाणिस्तान हे नुसते नाव जरी कोणी उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो एक वालुकामय, वैराण आणि उजाड प्रदेश, त्यामधे असलेले धुळीचे रस्ते व सततच्या युद्धामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या पडक्या मोडक्या इमारती व मधून मधून AK47 रायफली धारक अफगाण. परंतु याच अफगाणिस्तानच्या एका भागात, अतिशय सुपीक भूमी असलेले, एक अत्यंत श्रीमंत व सुबत्ता असलेले राज्य, हजार वर्षे तरी अस्तित्वात होते असे सांगितले तर त्यावर फार थोड्या लोकांचा विश्वास बसेल याबद्दल मला तरी शंका वाटत नाही. या देशाचे नाव होते बाल्ख (Bactria) व हे राज्य हिंदुकुश पर्वत व पामिर पर्वत यांच्या बेचक्यामधल्या प्रदेशात प्रस्थापित होते. सध्याचा अफगाणिस्तानाचा नकाशा बघितला तर उत्तरेला असलेली अमु दर्या नदी ही अफगाणिस्तानची उत्तर सीमा आहे. ही अमु दर्या नदी बाल्ख राज्याच्या साधारण मध्यभागातून वहात होती व त्यामुळे सध्याच्या अफगाणिस्तानाचा कोंडूझ शहराजवळचा भाग, ताजिकिस्तान, उझबेकीस्तान व तुर्कमेनिस्तान या देशांमधला काही भाग मिळून हे राज्य बनलेले होते.

प्राचीन कालापासून बाल्ख राज्य हे इराणी साम्राज्याचाच एक भाग होते. अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर इ..पूर्व 330 मधे हे राज्य अलेक्झांडरच्या साम्राज्याचा एक भाग बनले. ..पूर्व 327 मधे अलेक्झांडरने बाल्ख मधलीच एक राजकन्या रोशन (Roxana) हिच्याशी विवाह केला. अलेक्झांडरच्या इ..पूर्व 323 मधे झालेल्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या 5 सेनापतींनी वाटून घेतले पण हे सेनानी व उत्तरेकडून येत राहणारे टोळीवाले यांच्यामधल्या सततच्या लढायांमुळे बाल्ख राज्य हे एका राजाच्या ताब्यातून दुसर्‍या राजाच्या ताब्यात जात राहिले. ..पूर्व 127 मधे कुशाण टोळ्या उत्तरेकडून आल्या व त्यांनी शक टोळ्यांचा पराभव करून बाल्खचा ताबा घेतला. यानंतर पुढची शंभर वर्षे तरी या टोळ्या बाल्खमधेच स्थिरावल्या. त्यानंतर कुशाण भारतात शिरले व कनिष्क हा त्यांचा राजा उत्तर भारताचा सम्राट बनला वगैरे इतिहास आपल्याला ज्ञात आहेच. बाल्ख मधे स्थिरावलेल्या कुशाण टोळ्यांनी या भागात एक मोठे साम्राज्य उभे केले. बाल्खचा भू प्रदेश अतिशय सुपीक तर होताच या शिवाय मूळची इराणी संस्कृती व या शिवाय ग्रीक संस्कृतीबरोबर आलेला 300 वर्षाचा घनिष्ठ संबंध यामुळे येथील जीवन सर्वच दृष्टीने सुसंस्कृत, कलांना वाव देणारे व सुबत्तापूर्ण असेच होते.

1978 मधे एक रशियन उत्खनन शास्त्रज्ञ Viktor Sarianidi. व त्याचे सहकारी, बाल्खमधल्या शबरघान शहराच्या उत्तरेला उत्खनन करत होते. बाल्खच्या भूभागात ब्रॉन्झ युगापासून मानवी वस्ती असल्याने येथे त्या कालीन काही पुरातन अवशेष सापडतील अशी त्यांची कल्पना होती. अफगाणिस्तानच्या पुरातत्व संस्थेचे संचालक नादर रसोली(Nader Rasoli) हे ही या संशोधकांच्या गटाचे सदस्य होते. ते सांगतात की या भागात असणार्‍या Tillya Tepe या ठिकाणी बाल्ख राज्याची शाही दफनभूमी होती व येथे अनेक राजकन्या व योद्धे यांचे दफन केले गेले होते अशी आख्यायिका असल्याने आम्ही या भागात शोध घेण्यास सुरवात केली. या शोधात अचानकपणे आम्हाला सात दफन उंचवटे दिसले. स्थानिक लोकांच्या आख्यायिकेप्रमाणे ही दफनभूमी 2000 वर्षे तरी जुनी होती व त्याला हे लोक सुवर्णाची टेकडी (Golden Hill) असेच म्हणत होते. ”

Viktor Sarianidi. व त्याचे सहकारी यांनी या ठिकाणी उत्खनन सुरू केले. यापैकी सहा दफन उंचवट्यांच्याखाली त्यांना सहा मानवी सांगाडे तर सापडलेच पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळे मानवी सांगाडे दफन केलेल्या जागा, सोन्याची आभूषणे, नाणी किंवा मूर्ती यांनी ठासून भरलेल्या होत्या. ही सर्व संपत्ती, या मृत व्यक्तींचा परलोकवास सुखाचा व्हावा या साठी त्यांच्याबरोबरच पुरण्यात आलेली होती. या वस्तूंच्यामधे स्त्रियांच्या अंगावर बांगड्या, कर्णफुले, हार हे तर होतेच. या शिवाय अतिशय सुरेख कारागिरीचे मुगुट होते. हे मुगुट घडी करून ठेवता येतील असे बनवले असल्याने, ही स्त्री जागोजागी फिरणार्‍या टोळीवाल्यांपैकी होती हे सिद्ध होत होते. एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाताना हा मुगुट घडी करून घोड्याच्या खोगिरामधे ठेवता येईल असाच बनवलेला होता. एका योद्ध्याच्या दफंनभूमीमधे सोन्याचा पट्टा, बुटाची सोन्याची बकले आणि सोन्याची मूठ असलेला खंजीर सापडला. या सर्व सांगाड्यांच्या अंगावर जी वस्त्रे होती त्यावर सोन्याच्या जरीने व रत्नांनी भरतकाम केलेले होते. सगळे मिळून एकूण 21000 वस्तू या उत्खननशास्त्रींना Tillya Tepe मधे सापडल्या. या संपत्तीच्या किंमतीचा अंदाज करणे सुद्धा अशक्यच होते.

ही संपत्ती स्वत:जवळ बाळगण्यामागचा धोका लक्षात आल्याने, Viktor Sarianidi. व त्याचे सहकारी घाईघाईने काबूलला परत आले व हा खजिना त्यांनी राष्ट्रीय संग्रहालयाच्या स्वाधीन केला व सुटकेचा निश्वास टाकला. या नंतर एका वर्षभरात सोव्हिएट रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले व राहिलेल्या सातव्या दफनभूमीचे उत्खनन करणे राहूनच गेले. 2003 सालानंतर अफगाण संशोधक त्या ठिकाणी परत गेलेले असता सातव्या दफनभूमीमधे काहीच नसल्याचे त्यांना आढळून आले. म्हणजेच तेथील संपत्ती कोणीतरी लुटून नेली होती.

सोव्हिएट रशियाच्या सैन्याबरोबर अफगाणी लोकांच्या चकमकी सुरू झाल्यानंतर हा खजिना सुरक्षित रहावा या हेतूने संग्रहालयाच्या अधिकार्‍यांनी हा खजिना 1985 साली राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या दुसर्‍या एका संग्रहालयात हलवला. काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्य उमर खान मसूदी हे म्हणतात की आणखी काही वर्षांनी हा खजिना काबूलच्या मध्यवर्तीच्या बॅन्केच्या व्हॉल्टमधे हलवण्यात आला. या बॅन्केची रोख रक्कम, परकीय चलन व सोने हे ज्या व्हॉल्ट्स मधे ठेवलेले असे त्याचा व्यवहार बघणारे अधिकारी, अमरुद्दिन अस्करझाई हे गृहस्थ होते. त्यामुळे या व्हॉल्ट्सच्या सर्व किल्या याच गृहस्थांच्याकडे असत.

1990 मधे तालिबान राजवट अफगाणिस्तानामधे आल्यानंतर त्यांनी अफगाणी संस्कृती व इतिहास यांच्या सर्व खुणा नष्ट करण्याचा सपाटाच लावला. श्री. मसूदी म्हणतात की राष्ट्रीय संग्रहालयाच्या संग्रहापैकी 70% , किंमत न करता येण्याजोग्या वस्तू, लुटल्या गेल्या. त्या बहुदा पाकिस्तान मार्गाने परदेशात विकल्या गेल्या असाव्या. मात्र बाल्खचे सोने बॅन्केत हलवल्यामुळे व त्याचा ठावा ठिकाणा ज्या थोड्या लोकांना फक्त माहीत होता त्यांनी तोंड बंद ठेवल्यामुळे, ते सोने सुरक्षित राहिले.

ग्रीक रती

काबूलमधे लढाई सुरू झाल्यावर सुद्धा श्री. अस्करझाई यांनी आपली जबाबदारी कधीच टाळली नाही. बॅ न्केच्या व्हॉल्टमधे जाणार्‍या प्रत्येकाचे नाव त्यांनी अचूकपणे आपल्या रजिस्टरमधे नोंद करून ठेवले आहे. 2001 मधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर तालिबानी मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ बॅन्केमधे शिरले व त्यांनी अस्करझाईंना व्हॉल्ट उघडण्यास सांगितले. आत चांदी व सोन्याच्या विटा व परकीय चलन ठेवलेले त्यांना आढळले. त्या व्हॉल्टच्या पलीकडे असलेल्या एका दरवाजामागे काय आहे अशी त्यांनी पृच्छा केल्यावर तिथे जुनी चिनी मातीची काही भांडी आहेत असे श्री. अस्करझाई यांनी सांगितले. आत असलेल्या गोष्टींची पहाणी करून हे शिष्टमंडळ परत गेले. त्या वेळी का कोण जाणे श्री अस्करझाई यांना भविष्याबद्दल काळजी वाटू लागली व त्यांनी व्हॉल्टच्या कुलुपाची किल्ली अतिशय जोरात फिरवून ती कुलपातच मोडून टाकली व व्हॉल्ट सील करून टाकला.

अमेरिकन सैनिक काबूल मधे शिरणार अशी चिन्हे दिसत असताना, तालीबानी परत बॅकेत आले व त्यांनी व्हॉल्ट उघडण्यास सांगितला. पण आता श्री. अस्करझाई व्हॉल्ट उघडूच शकत नव्हते. हवेत गोळीबार करत तालिबानी निघून गेले. जाताना बाजूच्या एका व्हॉल्टमधे ठेवलेले 45 लाख डॉलर्स मात्र त्यांनी चोरले.

यानंतर श्री अक्सरझाई यांना तुरूंगात टाकण्यात आले व बरीच मारहाणही करण्यात आली. साडेतीन महिन्यांनंतर नव्या सरकारला मध्यवर्ती बॅन्केतून रोख रक्कम इशू करू शकेल असा कोणी अधिकारीच कामावर नसल्याचे लक्षात आले. शोध घेतल्यावर श्री. अक्सरझाई, त्यांना एका तुरूंगात बंदी असलेले आढळले. त्यांना परत कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले. यानंतर श्री. अक्सरझाईंनी व्हॉल्टचे दार दुरुस्त करून घेतले व नव्या सरकारला रोख रक्कम व परकीय चलन परत मिळू शकली. मात्र बाल्खचे सोने सुरक्षित आहे एवढेच सर्व अधिकारी सांगत राहिले.

2004 मधे अफगाण सरकारने या सोन्याचे काबूल संग्रहालयाकडे हस्तांतरण करण्यात यावे अशी एक अधिसूचना जाहीर केली व हे करण्यासाठी अफगाण सरकारचे प्रतिनिधी व आंतर्राष्ट्रीय संशोधक (ज्यात हे सोने मूळ ज्यांनी शोधून काढले त्या Viktor Sarianidi.यांचाही समावेश होता. ) यांची एक समिती स्थापन केली. एप्रिल 2004 मधे या समितीसमोर श्री अक्सरझाई यांनी व्हॉल्टचे दार उघडले. मागच्या बाजूस असलेले दुसरे आतील दार एका ब्लो टॉर्चच्या सहाय्याने फोडून काढले. श्री मसूदी सांगतात की या नंतर दारामागच्या खोलीत अनेक मोडक्या खोक्यांच्यातून सुरक्षित ठेवलेले बाल्खचे सोने बाहेर काढण्यात आले.

व्हॉल्टचा दरवाजा फोडताना

काबूल संग्रहालयाच्या मालकीच्या या संग्रहापैकी काही वस्तूंचे नंतर पॅरिस मधे प्रदर्शन करण्यात आले. या वस्तूंचे जतन केल्याबद्दल श्री मसूदी यांना 25000 यूरोचे पारितोषिकही हॉलंडमधे मिळाले.

पॅरिसमध्ल्या प्रदर्शनात

ही संपत्ती जतन करणारे श्री. अक्सरझाई मात्र प्रसिद्धीझोतात कधीच आले नाहीत. 59 वर्षाच्या या बॅन्क अधिकार्‍याला अशी सारखी भिती वाटत होती की बाख्तरचे हे सोने तालीबानींच्या हातात न पडू देण्यामागे आपण कारणीभूत होतो ही गोष्ट तालिबानीना समजली तर ते आपल्यावर सूड उगवतील. बॅन्केच्या एका कोपर्‍यात श्री. अक्सरझाई आपले काम करतच राहिले. श्री. मसूदी यांना सर्व प्रसिद्धी मिळाली आहे याचे वैषम्य त्यांना जरूर वाटत असावे कारण श्री. मसूदींना प्रसिद्धी मिळाली पण सोने मी सांभाळले असे ते काहीशा रोषानेच सांगतात. श्री. मसूदी यांना श्री. अक्सरझाई यांना वाटत असलेल्या वैषम्याची बहुदा जाणीव असावी कारण ते श्री. अक्सरझाई यांची माध्यमांच्याकडे स्तुतीसुमने गात असतात.

श्री अक्सरझाई

एक खराखुरा अफगाणी हीरो

श्री. अक्सरझाई यांच्यावर झालेला अन्याय अखेरीस मागच्या वर्षी दूर करण्यात आला. मध्यवर्ती बॅन्केचे प्रमुख अब्दुल कादिर फिद्रत यांनी श्री अक्सरझाई यांचे नाव राष्ट्राध्यक्षांच्याकडे सन्मानासाठी पाठवले व श्री. अक्सरझाई यांना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष श्री. हमिद करझाई यांच्या हस्ते पदक व पारितोषिक देण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला.

श्री. अक्सरझाई यांनी देशाच्या मालकीच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी तालिबानींसमोर जे अतुलनीय धैर्य दाखवले ते बघून सर्व अफगाणींची मान नक्कीच उंचावली असेल यात शंकाच नाही.

16 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “बाल्खच्या सोन्याची गोष्ट

  1. Tumache sarvach blog vaachaniya astat.

    Posted by Abhay Bhave | सप्टेंबर 17, 2010, 1:01 pm
  2. I read this article entirely. Its amazing story. I felt sad for those fanatic illiterate Talibanis who didnt believe in preserving their rich cultural heritage. Thanks for sharing.

    Posted by Abhijit V. Chaore | सप्टेंबर 22, 2010, 12:32 pm
  3. उत्कृष्ट लेख! अक्सरझाई ह्यांना सलाम!

    Posted by धम्मकलाडू | ऑक्टोबर 18, 2010, 6:21 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention बाख्तरच्या सोन्याची गोष्ट « अक्षरधूळ -- Topsy.com - सप्टेंबर 17, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: