.
History इतिहास

विलक्षण साम्य


..पूर्व 484 ते 425 या कालात हीरोडोटस (Herodotus) या नावाचा एक ग्रीक इतिहासकार होऊन गेला. या इतिहासकाराने इराण मधल्या अखिमिनेद (achaemenid) राजांचा इतिहास लिहून ठेवला आहे. या काळात इराणमधेही भारताप्रमाणेच अनेक छोटी छोटी राज्ये पसरलेली होती. पर्शिया हे या छोट्या राज्यांपैकीच एक होते. या पर्शियाच्या राजघराण्यातील राजांना अखिमिनेद हे नाव, नंतरच्या एका राजाच्या नावामुळे दिले गेले आहे. ..पूर्व 557-530 या कालात या पर्शियन राजघराण्यात पहिला कौरुश (Cyrus) हा राजा होऊन गेला. या राजाने आजूबाजूच्या छोट्या राजांना तर मांडलिक बनवलेच पण या शिवाय त्याने भारतामधील गांधार( पाकिस्तानमधला खैबर खिंडीच्या आसपासचा भाग, आपण अफगाणिस्तानाला गांधार का म्हणतो ते मला तरी समजलेले नाही. अफगाणिस्तानचे त्या काळातले नाव बॅक्ट्रिया असे होते.) पासून ते सध्याच्या इराक मधल्या बॅबिलॉन पर्यंत आपल्या राज्याची सीमा वाढवली होती. चंद्रगुप्त मौर्य या राजाने जसे आपले साम्राज्य भारतात निर्माण केले तसेच काहिसे या पर्शियन राजाने इराणमधे केले होते. त्यामुळेच कौरुश राजाला पहिला खराखुरा सम्राट असेही संबोधले जाते.

कौरुश राजाच्या शिलालेखाचे व चित्राचे इ.स. 1818 मधे रॉबर्ट पोर्टर या चित्रकाराने काढलेले चित्र

हीरोडोटसने या पहिल्या कौरुश राजाचा इतिहास, आपल्या पुस्तकात दिलेला आहे. या कौरुश राजाच्या जन्मकथेचे, हीरोडोटसने केलेले वर्णन माझ्या नुकतेच वाचनात आले. ही दंतकथा व आपल्याकडच्या एका लोकनायकाच्या जन्माची दंतकथा यातील विलक्षण साम्य मला अतिशय रोचक वाटले. प्रथम आपण ही हीरोडोटसने सांगितलेली दंतकथा बघूया.

अस्त्यगेशAstyages) हा मेदेस (Medes) या अशाच एका छोट्या राज्याचा राजा. हे राज्य पर्शियाच्या साधारण वायव्येला होते. या अस्त्यगेश राजाला मंदाने(Mandane) या नावाची एक मुलगी होती. एका रात्री अस्त्यगेश राजाला एक स्वप्न पडले ज्यात त्याची मुलगी मंदाने हिच्या शरीरापासून प्रचंड प्रमाणात जल निर्माण होऊन त्यात त्याचे संपूर्ण राज्य वाहून गेलेले त्याने पाहिले. राजज्योतिषांनी या स्वप्नाचा अर्थ, मंदानेला जो मुलगा होईल तो तुझे राज्य हिसकावून घेणार आहे असा अस्त्यगेश राजाला सांगितला. यामुळे सचिंत होऊन त्याने मंदानेचा विवाह, कनिष्ठ दर्जाचा समजला जाणारा पर्शियाचा राजा कंबौश (Cambyses )याच्याशी लावून दिला. विवाहानंतर एका वर्षाने मंदाने गरोदर असताना, अस्त्यगेश राजाला परत एक स्वप्न पडले. या स्वप्नात त्याला मंदानेच्या गर्भाशयातून एक वेल निर्माण होऊन ती वेल अस्त्यगेशचे राज्य व सर्व एशिया खंड यावर पसरलेली दिसली. राजज्योतिषांनी या स्वप्नाचा अर्थ परत एकदा मंदानेचा मुलगा तुझे राज्य नष्ट करेल असे सांगितल्याने, अस्त्यगेश राजाने आपला एक विश्वासू सरदार सर्पगश (Harpagus) याच्यावर, मंदानेच्या होणार्‍या मुलाला जन्मताच मारून टाकण्याची जबाबदारी सोपवली. व हे करता यावे म्हणून मंदानेला माहेरी बोलावून घेतले.

काही काळाने मंदाने प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. तिच्या आक्रोशाला न जुमानता सर्पगशने ते जन्मजात बालक हिसकावून घेतले व वध करण्यासमयी घालत असत ती वस्त्रे त्याच्या अंगावर चढवली. हे केल्यावर त्याचे हृदय द्रवले व त्या बालकाचा वध करणे त्याला काही जमले नाही. त्यामुळे हे काम त्याने शाही गुरांची काळजी घेणारा मुख्य गुराखी मित्रदत (Mitradates) याच्याकडे सोपवले. मित्रदत ते बालक घेऊन आपल्या घरी गेला. योगायोगाने त्या वेळी मित्रदतची बायको क्यौनो(Kyno) ही गर्भवती होती. मित्रदत घरी पोचला तेंव्हा क्यौनो नुकतीच प्रसूत झाली होती व तिचे बालक मृत स्थितीत जन्मले होते. अतिशय दुखा:त असलेल्या क्यौनोने मित्रदतला मंदानेचे बालक आपल्याला देऊन मृत बालकाचा देह अस्त्यगेश राजाला परत देण्याची विनंती केली व मित्रदतने ती मान्य करून त्याप्रमाणे मृत बालकाचा देह राजाला परत केला. अस्त्यगेश राजा काळजीमुक्त झाला खरा परंतु त्याचा नातू मित्रदतच्या घरी वाढतो आहे याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती. मित्रदतने मंदानेच्या मुलाचे नाव कौरुश असे ठेवले.

12 / 15 वर्षानी कौरूश मोठा झाल्यावर खरी गोष्ट अस्त्यगेश राजाला समजली व आपल्या आज्ञेचे पालन न केल्याबद्दल त्याने सर्पगशच्या त्याच वयाच्या मुलालाच मारून टाकले व कौरुशला त्याच्या खर्‍या आईवडीलांकडे पाठवून दिले. कौरुश पर्शियाच्या गादीवर आल्यानंतर अस्त्यगेश राजाचा सूड घेण्याच्या इर्षेने पेटलेल्या सर्पगशच्या मदतीने त्याने अस्त्यगेश राजालाच पदच्युत केले.

या गोष्टीत अस्त्यगेशच्या ऐवजी कंस, मंदानेच्या ऐवजी देवकी, मुलीच्या ऐवजी बहिण, मित्रदतच्या ऐवजी नंद आणि क्यौनो च्या ऐवजी यशोदा ही नावे घातली आणि इतर काही बारीक सारीक बदल केले तर ही गोष्ट भारतीय होईल की नाही? आता ही दंतकथा भारतातून पर्शिया मधे गेली का पर्शिया मधून भारतात आली का दुसर्‍याच कोणत्या तरी दंतकथेवरून दोन्ही कथा रचल्या गेल्या हे सांगणे अशक्यप्रायच असल्याने दोन्ही गोष्टींमधले विलक्षण साम्य मोठे रोचक आहे एवढेच आपण म्हणू शकतो.

कौरुश व त्याच्या वंशातील इतर अखिमिनेद राजे हे अग्नीपूजक होते. अव्हेस्ता हा त्यांचा धर्मग्रंथ व झरत्रुष्ट हा त्यांचा प्रेषित होता व असुर माझदा या देवाची ते भक्ती करत असत. अव्हेस्ता आणि ऋग्वेद याच्यातील साम्यस्थळे बहुतेकांना ज्ञात आहेतच. त्यामुळेच या दंतकथेचे कृष्ण जन्माच्या दंतकथेशी असलेले विलक्षण साम्य मला खूप रोचक वाटले एवढे मात्र खरे.

13 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “विलक्षण साम्य

 1. very interesting historical story identical to a story of KRISHNA..

  j dileep

  Posted by j dileep | सप्टेंबर 14, 2010, 12:26 सकाळी
 2. नमस्कार.

  कृष्ण कथेत आकाशवाणी होऊन कंसवधाचे भवितव्य वर्तवले गेले होते, जे कंसाखेरीज इतरांनीही ऐकले होते. कंसाने देवकीच्या मुलांना मारण्यासाठी कोणत्याही सरदाराची मदत घेतली नव्हती. जेव्हा वासुदेव नंदाच्या घरी कृष्णाला घेऊन गेला, तेव्हा यशोदेची मुलगी मृत नव्हती, जिवंत होती.

  तसंच कृष्णाच्या कथेमध्ये कंसाचा वध कृष्णाने सूडापोटी केलेला नाही. ते पूर्वनियोजित होते.

  आपले लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. तसाच हाही आहे. मात्र वरील मुद्दे बारीक सारीक बदल म्हणून मोजण्यासारखे नसल्याने प्रतिसाद देत आहे.

  Posted by Yogini Nene | जून 21, 2011, 11:32 सकाळी
  • योगिनी-

   भारतातील कृष्णकथा व अखिमिनेद राजांची कथा या मधील साम्य दाखवणे एवढाच माझा हा लेख लिहिण्यामागचा हेतू आहे. या दोन्ही कथात फरक हे आहेतच. ते तुम्ही दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद

   Posted by chandrashekhara | जून 21, 2011, 2:48 pm
 3. खरच खुप सुन्दर कथा। ..चांगल्या कर्माची चांगली फळे

  Posted by kishor | जानेवारी 12, 2016, 10:43 सकाळी

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention विलक्षण साम्य « अक्षरधूळ -- Topsy.com - सप्टेंबर 13, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: