.
अनुभव Experiences, Travel-पर्यटन

सिंगापूरमधला शेतमळा


सिंगापूर हे नाव जरी उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या उंच उंच इमारती, त्यांच्यामधले आखीव रेखीव व चकचकीत रस्ते, मोठमोठ्या काचांच्या भिंती असलेले भव्य शॉपिंग मॉल्स, फॅशन, कपडे आणि एकूणच शिस्तप्रियता व स्वच्छता. सिंगापूरच्या या अशा प्रतिमेत,. शेतमळा, माती, वेडेवाकडे वाढलेले गवत, चिखल वगैरे शब्द बसतच नाहीत. त्यामुळे आज एका शेतमळ्यावर जाऊन तिथेच शेतावर जेवण करूया! असा बेत जेंव्हा घरात ठरला तेंव्हा एकतर माझा त्यावर विश्वास बसेना व असे वाटत राहिले की मुंबईला वरळी सी फेस जवळ आणि नेहरू प्लॅनेटोरियमच्या समोर ज्या मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत त्यांच्या मागच्या बाजूला व्हिलेजनावाचे एक फॅशनेबल रेस्टॉरंट आहे त्यातलाच काहीतरी प्रकार असेल. या व्हिलेज खाद्यगृहात एक बैलगाडी, पंधरा वीस रंगवलेले मातीचे रांजण आणून ठेवलेले आहेत व खेडेगावाचा देखावा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या असल्या प्रयत्नांना स्यूड्स( Pseuds ) म्हणून मी सोडून देतो. त्यातलाच काहीतरी हा सिंगापुरी प्रकार असावा असे मनात ठेवूनच मी गाडीत बसलो.

घराच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर पावसाला सुरवात झाली. आता सिंगापुरला पुण्यासारखा पाऊस फार क्वचितच पडतो. एकदा पाऊस पडायला लागला की तो धुवांधारच असतो. गाडी चालवणे सुद्धा मुश्किल होते. आता या असल्या पावसात शेतमळ्यावर जाऊन चिखलस्नान करणे कोणालाच पसंत पडणार नाही हे उघड होते त्यामुळे हा शेतमळा म्हणजे काहीतरी स्यूड प्रकारचे रेस्टॉरंट असावे असा माझा पूर्वग्रह पक्काच झाला. परंतु नेहमीचा चाकोरीतला रस्ता सोडून जेंव्हा आमची गाडी निराळ्याच रस्त्याला लागली तेंव्हा लक्षात आले की हे प्रकरण काहीतरी निराळेच आहे. सिंगापूरच्या वायव्य कोपर्‍यातल्या भागाला क्रांजीअसे नाव आहे. या क्रांजीमधे पाण्याचा एक मोठा जलाशय आहे. हा जलाशय ओलांडून आमची गाडी एका रस्त्याला लागली आणि पुण्याजवळ असलेल्या सिंहगड रत्यावरून पानशेत कडे जाणार्‍या रस्त्याची मला आठवण झाली. तिथे पावसाळ्यात दिसते तशीच हिरवीगार वनश्री व त्यातून मधून मधून डोकावणार्‍या छोट्याछोट्या इमारती इथेही दिसत होत्या. त्यामुळे हा परिसर मनाला खूपच लोभसवाणा नक्कीच दिसत होता. या रस्त्याने पुढे गेल्यावर एका मोकळ्या जागेत चाळीस पन्नास गाड्या पार्क केलेल्या दिसल्या. तिथेच आमची गाडी थांबली व आम्ही उतरलो. समोर झाडाच्या खोडांच्या तुकडे व ढलप्या यावर हिरव्या रंगाने काहीतरी लिहिलेले दिसले. जवळ जाऊन वाचले तर नाव तरी मोठे रोचक वाटले.

बॉलीवूड व्हेजीज हे या शेतमळ्याचे नाव होते. नाव तर गंमतीदार वाटले पण पॉयझन आयव्ही हे काय प्रकरण होते त्याचा उलगडा होईना. पॉयझन आयव्ही ही मुलगी, मूळ बॅटमन या कार्टून फिल्ममधली एक व्यक्तीरेखा. झाडे, वनस्पतींचे ज्ञान असलेली व त्यांचा उपयोग करून इतरांना त्रास देणारी एक दुष्ट बाई. मग लक्षात आले हे नाव या शेतमळ्यातल्या रेस्टॉरंटचे होते. हा शेतमळा व हे रेस्टॉरंट श्रीमती आयव्ही सिंगलिम या बाईंचे असल्याने त्यांनी आपले नाव व ही कार्टून व्यक्तीरेखा यांचा गंमतीदार मिलाफ करून रेस्टॉरंटला हे नाव दिले. या आयव्ही बाईंचे वडील रजपूत, गोरखपूरचे रहिवासी. घरची मोठी शेती. त्यामुळे बाईंना शेती करण्याची आवड असावी. या आयव्ही बाई व त्यांचे पती श्री. लिम (सिंगापूर मधल्या NTUC या एका मोठ्या सरकारी कंपनीचे सेवानिवृत्त मुख्य) यांनी खरे तर ऑस्ट्रेलियाला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ही शेतजमीन विक्रीसाठी असल्याची जाहिरात त्यांनी बघितली. सिंगापूरमधे अजून शेतजमिनी आहेत यावर प्रथम त्यांचा विश्वास बसेना. परंतु प्रत्यक्ष जागा बघितल्यावर त्यांना ती खूपच आवडली. सिंगापूरमधे कृषीउत्पादने व पशु पक्षी पालन या संबंधीचे नियम अतिशय जाचक आहेत. त्या नियमाच्या चौकटीत राहून व प्रसंगी भांडण करून या पती पत्नींनी ही 10 एकरांची शेत जमीन विकसित केली आहे. या बाई सिंगापूर नेटबॉल असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. त्या स्वत:ला एक साधासुधा शेतकरीयोद्धा समजतात. सिंगापूर मधल्या जाचक नियमांच्या विरूद्ध प्रसंगी भांडण करून व तुरुंगात जाऊन त्यांनी नियम बदलून घेतले आहेत.

लिम पती पत्नींनी त्यांच्या या शेतमळ्यावर विविध प्रकारची फळझाडे लावली आहेत व अनेक भाज्यांची पिके ते घेतात. केळ्याच्या अनेक व विविध जाती त्यांनी लावल्या आहेत. त्यांच्या या शेतमळ्याचा घेतलेला एक सैरसपाटा.

ब्रेडफ्रूट

जावा कॉफीचे झाड

बॉलीवूड व्हिला

एवढे फिरल्यावर भूक लागणे साहजिकच होते त्यामुळे पॉयझन आयव्हीकडे साहजिकच पावले वळली. मेन्यू कार्ड बघितल्यावर हे प्रकरण निराळेच आहे याची खात्रीच पटली. मेन्यूवर एक चिकन करी सोडली तर नेहमीचे कोणतेच पदार्थ दिसेनात. मग विचारपूस करून ब्राऊन राईस, मोरिन्गा टेम्पुरा ( आपण पालकच्या पानांची भजी करतो तत्सम प्रकार) , रताळ्यांच्या व कॅन्गकॉन्ग या पालेभाजीच्या पानांच्या भाज्या, चिकन करी, पपई सॅलड व फ्राईज यांची भीतभीतच ऑर्डर दिली. पदार्थ आल्यावर लक्षात आले की सगळेच पदार्थ खूपच चविष्ट होते. तोंडात विरघळणार्‍या पालेभाजा मी पहिल्यांदाच चाखून बघत होतो. जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून फणसाचा व केळ्याचा केक, आंबा व कोरफडीचा गर यांचे पुडिंग व आईसक्रीम असा चॉईस होता. रेस्टॉरंटमधे जेवत असताना आयव्ही बाईंचे दर्शन झाले. कुठे काय कमी पडते आहे त्याकडे बाईंचे व श्री. लिम यांचे जातीने लक्ष दिसले. आम्ही भारतीय आहोत हे बघितल्याबरोबर आपले वडील भारतीय होते हे येऊन मुद्दाम आम्हाला सांगायला बाई विसरल्या नाहीत.

जेवण झाल्यावर परत गाडीत बसलो व घराकडे निघालो. मनात मात्र सिंगापूरमधल्या कॉन्क्रीट जंगलामध्ये एक खराखुरा शेतमळा .प्रत्यक्षात दिसल्याचे आश्चर्य तर होतेच पण या शिवाय एका उल्लेखनीय व्यक्तीला भेटल्याचेही समाधान होते.

11 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “सिंगापूरमधला शेतमळा

  1. excellent trip of farm fare

    Posted by ashok patwardhan | सप्टेंबर 14, 2010, 3:33 pm
  2. PHARCH CHAAN AAHE

    Posted by SEEMA | मार्च 4, 2012, 11:18 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: