.
History इतिहास

काराकोरम पास


1889 च्या उन्हाळ्यात, कश्मिर संस्थानाच्या दरबाराकडे एक अगदी विशेष असा विनंतीअर्ज सादर केला गेला. या अर्जाचे विशेषत्व असे होते की हा अर्ज करणारे अर्जदार, कश्मिर राज्याचे नागरिक सुद्धा नव्हते. हे अर्जदार, लडाखच्या पूर्वेला असलेल्या चिनी तुर्कीस्तान या प्रांतामधल्या शाहीदुल्ला गावाच्या आसपास राहणारे किरगिझ लोक होते. या लोकांची तक्रार अशी होती की या भागातून लडाखकडे जाणार्‍या कारवान काफल्यांच्यावर, कश्मिर संस्थानाच्या उत्तर भागातल्या हुंझा व नगर या विभागांमधले रहिवासी हल्ले करून लूटमार करत होते. या रहिवाशांनी चिनी सरकारकडे तक्रार करून काहीच उपयोग न झाल्याने ते कश्मिर संस्थानाने काहीतरी कारवाई करावी म्हणून विनंती करत होते. कश्मिर दरबारने हा अर्ज तत्कालीन इंग्रज सरकारकडे सोपवला. शिमल्या मधल्या इंग्रज सरकारचे परराष्ट्रमंत्री, मिस्टर मॉर्टिमर ड्यूरांड यांनी या प्रश्नाची चौकशी व योग्य कारवाई करण्याची जबाबदारी एका तरूण इंग्रज अधिकार्‍यावर सोपवली. या अधिकार्‍याचे नाव होते फ्रान्सिस यंगहजबंड.

3 ऑगस्ट 1889 ला फ्रान्सिस यंगहजबंड ने, 19 कश्मिरी ब बाल्टी सैनिक व तट्टांवर लादलेले आवश्यक सामान घेऊन लेह शहर सोडले व तो शाहीदुल्ला गावाच्या वाटेला लागला. अकरा बारा दिवसाच्या अतिशय कष्टकारक व खडतर अशा पायी केलेल्या प्रवासानंतर तो कश्मिर संस्थान व चिनी तुर्कस्तान यांच्या सीमेवर पोचला. सीमेवर असलेल्या खिंडीचे वर्णन फ्रान्सिस यंगहजबंडने मोठे बारकाईने व सुंदर केले आहे. तो म्हणतो की माझ्या कश्मिरमधल्या, डोळ्यांना अतिशय सुख देणार्‍या प्रवासानंतर, या खिंडीतील एकूणच दृष्य, कल्पनातीत अनुत्साही (Dull) वाटते आहे. ही खिंड 19000 फुटावर असल्याने येथे सगळ्यांनाच प्रचंड मानसिक नैराश्य (Depression) आले आहे. ऑगस्ट महिन्यामधे सुद्धा इथे तपमान इतके कमी आहे की रात्री आजूबाजूला वाहणारे छोटे छोटे ओहोळ गोठलेले दिसतात. मला या प्रवासाचा आत्यंतिक तिरस्कार वाटतो आहे. ”

फ्रान्सिस यंगहजबंड ज्या जागी उभा राहून हे वर्णन करत होता ती जागा म्हणजे भारत व चीन यांच्या सीमेवरची प्रसिद्ध काराकोरम खिंड होती. या इंग्रज अधिकार्‍याने त्याला दिलेली ही जबाबदारी उत्तम रितीने पार पाडली व त्यामुळे पुढच्या दोन वर्षातच तिबेटबरोबर झालेल्या इंग्रजांच्या लढाईमधे महत्वाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली वगैरे तपशील बाजूला ठेवून आपण परत काराकोरम खिंडीकडे वळूया.

मध्य एशिया मधून भारतीय उपखंडात प्रवेश करणे तितकेसे सोपे नाही. हिंदू कुश व काराकोरम या पर्वतांच्या अतिशय अवाढव्य अशा रांगा भारतीय उपखंड व मध्य एशिया यामधे एक नैसर्गिक अडथळा किंवा तटबंदी निर्माण करतात असे म्हणता येईल. मिस्टर सी.पी स्क्राईन हे इंग्रज अधिकारी 1920 मधे ब्रिटिश सरकारचे मध्य एशियामधले काऊन्सल जनरल या पदावर होते. ते या भागाबद्दल लिहितात. ” हिंदू कुश आणि काराकोरम पर्वतांच्या रांगानी उभी केलेली तटबंदी छेदणे हे फक्त 3 ठिकाणी शक्य आहे. यापैकी पाकिस्तान मधला चित्रर व गिलगिट या भागामधून (सध्या हा भाग पाकिस्तानने बळकवलेल्या कश्मिरमधे आहे.) जाणारे मार्ग अतिशय अरूंद व खडकाळ प्रदेशातून जात असल्याने हे मार्ग फक्त पायी चालणार्‍यांच्याच उपयोगाचेच आहेत. लेहहून काराकोरम खिंडीमार्फत यारकंडला जाणारा मार्गच फक्त ओझीवाहक जनावरे ओलांडू शकतात. याच कारणामुळे सर्व व्यापारी कारवान काफले याच मार्गाने ये जा करतात. “ (गिलगिट जवळच्या हुंजा भागालगतच्या खुंजेरेब खिंडीमधे चीन व पाकिस्तान यांनी आता एक मोटर वे बांधला आहे. )

काराकोरम खिंड, भारत व चीनचा शिंजियांग प्रांत यांच्या सीमेवर, विवादास्पद अक्साईचिन भागाच्या उत्तरेला, काराकोरम पर्वत रांगांच्यात आहे. 18176 फूट उंचीवर असलेली ही खिंड एखाद्या घोड्याच्या खोगिराच्या आकाराची असून 148 फूट रूंद आहे. जगातल्या कोणत्याही व्यापारी कारवान काफिल्यांच्या मार्गावरची सर्वात उंचावरची खिंड असे या खिंडीला म्हटले जाते. एवढ्या उंचीवर असूनही काराकोरम खिंडीमधे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी कधीच होत नाही. मात्र अतिशय झोंबरे वारे व हिम वादळे होत असतात. या खिंडीचा परिसर संपूर्णपणे उजाड व वैराण असून गवताची काडी सुद्धा आसमंतात दिसत नाही. फ्रान्सिस यंगहजबंड या खिंडीचे वर्णन करताना म्हणतो की भारत आणि चिनी तुर्किस्तान यांच्यामधल्या सीमेवर असलेल्या या खिंडीमधे, ती समुद्रसपाटीपासून एवढ्या उंचीवर असूनही, हिमवृष्टी अजिबात होत नाही हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. मी याचे फक्त एकच कारण देऊ शकतो. या पर्वत रांगा व समुद्र यांच्यामधे असणारे अतिविशाल पर्वत बहुदा हवेतील सर्व बाष्प खेचून घेत असले पाहिजेत. या शिवाय या परिसरात जे काही थोडे फार बर्फ पडते ते साठवून ठेवतील अशा खोल दर्‍याही नसल्याने येथे हिमनदही नाहीत. येथे असणार्‍या उथळ दर्‍यांच्यात होणारा थोडासा हिमवर्षाव, एखादे कीटण चढल्यासारखा जमिनीवर राहतो व ऊन पडले की वितळून जातो.”

काराकोरम पास भारतीय बाजूकडून

काराकोरम पास चिनी बाजूकडून

http://himalayancamping.com/modules.php?name=Content&pa=showpage&pid=226

काराकोरम पास

काराकोरम खिंडीतून जाणारा मार्ग, रेशीम मार्गावरच्या यारकंड व काशगर या शिंजियांगमधल्या शहरांना जोडत असल्याने, गेली 3000 वर्षे तरी या मार्गावरून मालवाहतूक होत होती. निरनिराळ्या प्रकारची लोकर, रेशीम, टफेटा, फेल्ट, चहा, मसाल्याचे पदार्थ, सैंधव, रत्ने, सोन्याची डस्ट, रशियातून येणारे कातडे यासारख्या असंख्य गोष्टींची या मार्गाने आयात निर्यात होत असे. या व्यापाराचे लेह हे प्रमुख केंद्र होते. कुलु, मनाली व श्रीनगर येथील व्यापारी आपला माल या मार्गाने पाठवत असत. कश्मिर दरबारने या मार्गावर अनेक ठिकाणी मालवाहू जनावरे भाड्याने मिळतील अशी व्यवस्था केली होती. तसेच दाणा व वैरण यांचीही सोय केलेली होती. या साठी कश्मिर दरबार या व्यापार्‍यांच्या कडून एक कर वसूल करत असे. 1846 मधे या मार्गाने 300 मण सुकी फळे निर्यात केली गेली होती तर 7400 मण लोकर आयात केली गेली होती.

काराकोरम खिंडीच्या दोन्ही बाजूंना असणार्‍या मार्गांच्या परिसरात, जमीन अस्मानाची तफावत होती. चीनच्या बाजूला जाऊ लागले की परिसराचा उजाडपणा कमी होऊ लागतो व जरा खालच्या उंचीवर असलेली सुगेट खिंड पार केली की नंतर लागणार्‍या काराकाश नदीच्या खोर्‍यात हिरवी गार वनश्री परत दिसू लागते. या मार्गावर शाहदुल्ला हे पहिले गाव लागते.

काराकोरम खिंडीच्या भारतीय बाजूला मात्र खाली उतरले तरी प्रदेशाचा उजाडपणा व वैराणपणा तसाच राहतो. खिंडीपासून 16 किलोमीटर अंतरावर पहिले भारतीय ठाणे लागते. या ठाण्याचे नाव दौलत बेग ओल्डी किंवा DBO असे आहे. या ठाण्याच्या साधारण 30 किलोमीटर दक्षिणेला डेपसांग पठार लागते. हे पठार अनेक किलोमीटर लांब व रुंद आहे. या पठाराच्या पूर्वेला सध्याची चिनी ताबा रेषा येते. हे पठार म्हणजे वैराणपणा व उजाडपणा याचा आदर्श म्हणता येईल. फ्रान्सिस यंगहजबंड या पठाराबद्दल लिहितो. ” ज़गाच्या सर्व भागात परमेश्वराने त्याज्य म्हणून ठरवलेला व ज्याचे कोणत्याही पद्धतीने वर्णन केले तरी एक अत्यंत भितीदायक भाग असेच म्हणता येईल असे हे पठार आहे. 17000 फूट उंचीवर असलेले, दगड धोंडे व खडी यांनी भरलेले हे पठार मोठे विस्तीर्ण आहे. या पठाराच्या सीमेवर सगळीकडे गोलसर आकाराच्या उजाड व वैराण टेकड्या दिसतात. हे सगळे दृष्य मनाला अतिशय अनुत्साही वाटते. या सगळ्या परिसरात बोचणारे थंड वारे सारखे वहात असतात. चालत असताना अनेक ओझीवाहक मृत जनावरांची हाडे तुम्हाला पायवाटेच्या कडेला सतत पडलेली दिसत राहतात. ओझी वाहण्याचे काम करत असताना अंगावरचा भार व येथली विरळ हवा हे सहन न झाल्याने मृत झालेल्या जनावरांची ही हाडे तुमच्या मनाला आलेल्या नैराश्यात भरच घालत राहतात.”

http://himalayancamping.com/modules.php?name=Content&pa=showpage&pid=226

डेपसांग पठार

काराकोरम खिंड व परिसर कारवान काफिल्यांना कोणत्याही ऋतुंमधे बंदच होत नसल्याने जवळ जवळ वर्षभर या मार्गाने मालाची वाहतुक होत असे. लेह पासून काराकोरम खिंडीपर्यंत पोचण्यासाठी चार निरनिराळे मार्ग किंवा ट्रेक असले तरी त्यातले दोनच जास्त करून वापरात होते. या पैकी हिवाळ्यात वापरात येणारा मार्ग हा लेहडिगर खिंडशोयोक नदीच्या पात्राला लागून थेट सासेर ब्रॅ न्गझाचॉन्ग कुमडेन ग्लेशियर बेसगपशन– DBO असा होता तर सर्वात जास्त वाहतुक असलेला उन्हाळी मार्ग लेहखार्डून्ग लाशोयोक नदीचे पात्रनुब्रा नदीचे खोरेसासोमासासेर खिंडसासेर ब्रॅन्गझाचॉन्गथॅशमुरगोबुर्टसाडेपसान्ग पठार– DBO असा जात असे.

या उन्हाळी मार्गावरचा सासेर खिंडीचा भाग अत्यंत दुर्गम आणि सतत बर्फाच्छादित असल्याने या भागातला प्रवास नेहमीच अत्यंत कष्टप्रद व धोकादायक समजला गेलेला आहे. मुंबईचे एक जाने माने गिर्यारोहक श्री. हरिश कपाडिया सासेर खिंडीतल्या आपल्या एका प्रवासाबद्दल लिहितात.” आम्ही सासेर खिंडीच्या दोन किलोमीटर अलीकडे आमचा कॅम्प ठोकला. ही खिंड पार करण्याच्या दिवशीचे हवामान खिंड पार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते. आकाश ढगाळ असले तर जमिनीवरचा बर्फ पुरेसा घट्ट होत नाही व माल वाहणार्‍या खेचरांचे व तट्टांचे खूर बर्फात खोल खोल जातात. ही खिंड पार करण्यासाठी मध्यरात्रीच निघावे लागते. आमच्या पहिल्या प्रयत्नात आमच्या जवळच्या खेचरांचे पाय बर्फात असेच खोल खोल जाऊ लागले. काही तट्टांना भार सहन न झाल्याने ती खाली बसू लागली तर काहींच्या पायावर रक्ताचे डाग दिसू लागले. या कारणांमुळे आम्हाला परत फिरावे लागले. असे 3 दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी आम्हाला सासेर खिंड पार करता आली. ” सासेर खिंडीतील हवामान सतत बदलत असते. हिमवादळे सुरू झाली की ही खिंड बंद होते व मार्गस्थांना स्वस्थ बसून रहावे लागते.

http://himalayancamping.com/modules.php?name=Content&pa=showpage&pid=226

सासेर ला

काराकोरम खिंडीचा मार्ग हा भारताच्या भूमीवर येण्याचा एकच असा मार्ग आहे ज्याच्यामार्फत कोणतेही परकीय आक्रमण कधीच झाले नाही. खैबर किंवा बोलन या खिंडींच्यातून जशी भारतावर सतत आक्रमणे होत राहिली तसे काराकोरम खिंडीमधे गेल्या 3000 वर्षात कधीच झाले नाही. मात्र 1962 मधे चीनने केलेले या भागातले सैनिकी आक्रमण हे या खिंडीच्या परिसरात झालेले एकमेव आक्रमण म्हणता येईल. वर उल्लेख केल्याप्रमाणे, कारवान काफिल्यांची लुटमार करण्याचे प्रकार 1890 पर्यंत अधून मधून होत असत. परंतु नंतर ते बंद झाले.

19/20 ऑक्टोबर 1962 च्या रात्री, दौलत बेग ओल्डी च्या (DBO) उत्तरेला असलेल्या चांदणी चौकीवर सुभेदार सोनम स्तोबदान व इतर 28 सैनिक होते. या चौकीवर 500 चिनी सैनिकांनी हल्ला केला. या चौकीवर असलेल्या सैनिकांपैकी फक्त एक जखमी सैनिक वाचला. सुभेदार सोनम यांना नंतर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. 17000 हजार फूट उंचीवर असलेल्या पारमोदक चौकीवर फक्त 5 जवान होते. हे सर्व जण मृत्युमुखी पडले. 18645 फूटावरच्या बिशन चौकीवर चिनी सैनिकांनी 45 मिनिटे बॉम्ब वर्षाव करून नंतर दोन हल्ले चढवले. परंतु हे दोन्ही हल्ले परतवले गेले. प्रत्यक्षात या सगळ्या चौक्या फक्त टेहेळणी करण्यासाठी होत्या व त्यांना युद्धप्रसंग आल्यास परत येण्यास सांगितलेले होते.

हे समरप्रसंग सोडले तर काराकोरम परिसरात युद्धे कधीच लढली गेली नाहीत किंवा सैनिक आले गेले नाहीत.

1962 मधल्या चिनी आक्रमणानंतर काराकोरम खिंडीतून होणारी वाहतूक पूर्ण थंडावली. या भागात तैनात असलेले सैनिक व स्थानिक लोक या शिवाय कोणालाच या भागात जाण्यास परवानगी देण्यात येत नसे. 2002 नंतर गिर्यारोहकांना या भागात ट्रेकिंग साठी परवानगी देण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे भारतीय सीमेवरच्या या महत्वाच्या स्थळापर्यंत आता निदान काही गिर्यारोहक तरी जाऊ शकत आहेत.

कारकोरम खिंडीच्या मार्गाने हजारो वर्षे माल वाहतुक करणार्‍या व ते करत असताना भार व विरळ हवा असह्य होऊन मरण पावणार्‍या जनावरांच्या हाडांनी बनवलेले एक स्मृतीचिन्ह या खिंडीत कोणीतरी उभारले आहे. त्या स्मृतीचिन्हाकडे बघताना प्रत्येकाच्या मनातल्या भावना निरनिराळ्या असतात. असे एका गिर्यारोहकाने लिहिले आहे. मला तर ते स्मृतीचिन्ह दुर्दम्य व कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करणार्‍या मानवी मनोवृत्तीचे द्योतक वाटते.

http://himalayancamping.com/modules.php?name=Content&pa=showpage&pid=226

काराकोरम पास स्मृतीचिन्ह

काराकोरम खिंडीचे पुढे काय होणार? असा प्रश्न काही लेखात मला विचारलेला दिसला. चीनने 1962 पासून घेतलेल्या पवित्र्यामुळे या भागातला स्थानिक व्यापार उदिम बंदच पडल्या सारखा झाला होता. त्यात आता थोडा फार फरक होताना दिसतो आहे. स्थानिक व्यापार चालू करण्यास भारत व चीनने 1992 पासून सुरवात केली आहे. हा व्यापार पुढे वाढत जाईलही. परंतु काराकोरम खिंड मार्गाचे महत्व या पेक्षा फार मोठे आहे. हा मार्ग भारतासाठी मध्य एशिया व रशिया यांच्यासाठीचा महामार्ग होऊ शकतो. काही वाचकांना ही कल्पना फार ओढून ताणून आणलेली वाटेल पण ती तशी नाही. शिंजियांग मधल्या काशगरला चिनी सरकारने मुक्त व्यापार भाग म्हणून मान्यता दिली आहे. काशगर पासून मध्य एशिया व रशिया कडे जाणारे उत्तम महामार्ग आता तयार झालेले आहेत. यारकंड व काशगर ही शिंजियांग मधली शहरे एकमेकाशी उत्तम रित्या जोडली गेलेली आहेत. भारताच्या बाजूला रोहतांग बोगद्याचे काम पूर्ण झाले की लेह भारताशी बारमाही रस्त्याने जोडले जाईल. लेहपासून सासेर खिंड असलेल्या पर्वताच्या पायथ्यापर्यंत ट्रक वाहतुक होऊ शकेल असा रस्ता उपलब्ध आहे. सासेर खिंड खाली जर बोगदा बांधला गेला तर काराकोरम खिंड पक्या रस्त्याने लेहशी जोडणे अशक्य नाही.

जगाचा इतिहास बघितला तर मोठमोठी साम्राज्ये पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळलेली दिसतात. सोव्हिएट रशिया हे याचे अगदी नजिकचे उदाहरण आहे. राजकीय सीमा या सतत बदलत राहतात. भौगोलिक सीमा कधीच बदलत नाहीत. कोणास ठाऊक? खरी खुरी भौगोलिक सीमा असल्याने, काराकोरम खिंड आपले पूर्वीचे महत्व एखाद वेळेस भविष्यात परत प्राप्त करेलही! परंतु हे फक्त भविष्यकाल सांगू शकतो.

8 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

14 thoughts on “काराकोरम पास

 1. नमस्कार !

  आपला लेख आवडला.

  माझे ३ ब्लॉगला भेट द्यायच्या निमंत्रणाचा स्विकार व्हावा.

  जयंत कुलकर्णी.

  Posted by जयंत | सप्टेंबर 8, 2010, 4:56 pm
  • Hi !

   I have noticed that you had removed the URLs from my comment. To be frank, it was just an invitation and not an effort to generate any traffic from this post. However I am extremely sorry if you have felt that I have not done the right thing. I did that because I did not know how to invite you to visit my Blogs. I am writing this here as I do not know where to write this to you off this platform.
   Warm Regards,
   Jayant Kulkarni

   Posted by जयंत | सप्टेंबर 8, 2010, 8:15 pm
   • Hi I have not removed any URL from your comment. As a policy I do not edit any comments on my blog posts. However I have a filter put on the comments received. This filter might have removed the URLs. You would notice that none of the comments on by blogs have any URL attached to them. BTW I have read all your blogs. You write very well and on relevant subjects. Keep it up. I hopw this would clarify things. Thanks for your mail.

    Posted by chandrashekhara | सप्टेंबर 9, 2010, 6:49 सकाळी
 2. व्वा काका!
  इतकी डिटेल्ड माहिती कशी आणि कुठून कुठून जमवलीत…

  हॅट्स ऑफ!

  Posted by आल्हाद alias Alhad | सप्टेंबर 8, 2010, 5:58 pm
 3. उत्कृष्ट माहितीपर लेख. आता तर बहुधा आपल्या ब्लॉगवरचे यासम विषयावरचे लेख गोळा केले तर विसाव्या शतकातला रजतरंगिणी ग्रंथ होण्यास हरकत नाही….

  Posted by Nikhil Sheth | सप्टेंबर 8, 2010, 7:53 pm
  • निखिल

   माझ्या ब्लॉग्सवरचे लेख एकत्र करून त्यांची ई-पुस्तके मी करतोच आहे. माझ्या ब्लॉगवरच्या उजव्या कॉलममधे अशा काही पुस्तकांचे URL तुम्हाला सापडतील. आता 2 नवीन पुस्तकांचे संकलन मी करतो आहे. तयार झाली की तुम्हाला बघायला मिळतीलच.

   Posted by chandrashekhara | सप्टेंबर 9, 2010, 7:39 सकाळी
 4. Surekh lekh!!

  Posted by sudeep mirza | सप्टेंबर 14, 2010, 5:43 pm
 5. just found this video, you might find it little informative

  Posted by Nikhil Sheth | नोव्हेंबर 21, 2010, 9:48 pm
 6. mi aaj pratham vachale good!

  Posted by nandkishor kapse mumbai | डिसेंबर 26, 2012, 7:29 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention काराकोरम पास « अक्षरधूळ -- Topsy.com - सप्टेंबर 8, 2010

 2. पिंगबॅक काराकोरम पास | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA. - सप्टेंबर 11, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: