.
Musings-विचार

हा माझा मार्ग एकला!


आपले वय जसजसे वाढत जाते ना, तसतसे काहीतरी नवीन नवीनच प्रश्न आपल्या समोर येऊन उभे रहायला लागतात. या प्रश्नांची, अडचणींची आपल्याला माहितीच नसते असे काही नसते. आपल्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या कोणी ना कोणी व्यक्तीने मागे, आपण तरूण असताना, या प्रश्नांचा सामना केलेलाच असतो. परंतु परदु:ख शीतल असते असे म्हणतात. त्यामुळे कदाचित असा काही प्रश्न आपल्या स्वत:च्याच आयुष्यात येऊन पुढे उभा राहील असे आपल्याला कधी गांभीर्याने वाटतच नाही. परंतु ज्येष्ठपणाची उपाधी एकदा चिकटली की त्या बरोबरच या असल्या प्रश्नांचा सामना करणे भागच पडते, मग तुमची इच्छा असो वा नसो. आणि शंभर टक्के लोकांनी, हे असे काही आपल्या आयुष्यात सुद्धा होऊ शकते या शक्यतेचा विचार केलेलाच नसल्याने, त्यांच्यासमोर या प्रश्नांना उत्तरेच नसतात.

यातल्या काही प्रश्नांना वैद्यकीय उत्तरे असतात. आयुष्यभर उत्तम व उत्कृष्ट दृष्टी लाभलेल्या व्यक्तीला एकदम लांबचा व जवळचा असे चष्मे लावावे लागतात. हे असे चष्मे लावणे, जवळ बाळगणे याचा प्रथम अतिशय त्रास होऊ शकतो परंतु नंतर सवय होते. दात पडल्यामुळे कवळी लावायला लागणे हा सुद्धा या प्रकारातलाच प्रश्न आहे. याच्यापेक्षा वरच्या दर्जाचे प्रश्न म्हणजे मोतीबिंदू, पाठदुखी किंवा गुडघ्याचा सांधा झिजणे, या सर्व व्याधींना सुदैवाने आता वैद्यकीय उपाय उपलब्ध असल्याने शस्त्रक्रियेच्या सहाय्याने दृष्टी किंवा हालचाल पूर्ववत करणे शक्य होते. माझ्या परिचित एक महिला, वय वर्षे 76, यांना गुढघ्याची हाडे झिजल्याने धड चालताही येत नव्हते. त्यांनी परवा शस्त्रक्रिया करून घेतली. परवा मला त्या कोठेतरी भेटल्या. एखाद्या तरूणीसारखे तुरुतुरु चालताना त्यांना बघून, आम्हाला अगदी गंमत वाटली होती. परंतु मी ज्या प्रश्नांबद्दल येथे लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे, ते काही हे असले वैद्यकीय उत्तर असलेले प्रश्न खासच नाहीत कारण त्या प्रश्नांना वैद्यकीय काय? किंवा दुसरे कोणते काय? उत्तरच नाही.

मराठी मध्यमवर्गीय किंवा आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांच्यात, मागच्या पिढीमधे सामान्यपणे आढळणारी कुटुंबरचना, आता संपूर्णपणे बदलत चालली आहे. मागच्या पिढीत मुले कमावती झाली, आयुष्यात त्यांचे बस्तान बसले तरी मुलाचे आईवडील व मुलाचे कुटुंब हे साधारणपणे एकत्रच रहात असत. मुलगा नोकरी धंद्याच्या निमित्ताने परगावात गेला तर त्याचे आईवडील त्याच्या बरोबरच जात. आता एकतर एक किंवा दोनच मुले असतात. बहुतेक आईवडीलांना एक जरी मुलगा असला तरी फक्त मुलीच किंवा मुलेच असणारे आईवडीलही बरेच असतात. त्यांच्या दृष्टीने त्यांची मुलगीच हीच त्यांचे दुखले खुपले बघणारी असते. या सगळ्या ओढाताणीत मुलाचे कुटुंब व आईवडील यांचे एकत्र राहणे कमी कमी प्रमाणात दिसू लागले आहे. परिणामी मुलाचे त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब आणि मुले दूर गेल्याने उरलेले आईवडीलांचे दोन माणसांचे कुटुंब अशी दोन कुटुंबे अशी कुटुंब रचना अगदी कॉमन झाली आहे. या नवीन कुटुंब रचनेमुळे, मुलगा असो किंवा मुलगी आणि ती मुले एक असोत वा दोन, सर्वच कुटुंबात एक समानता येताना दिसते आहे. थोडक्यात म्हणजे मुले मार्गी लागली की आईवडील असे दोघांचेच ज्येष्ठ कुटुंब आता दिसू लागले आहे. मुले जवळ नसल्याने रोजचे प्रश्न साहजिकच त्यांचे त्यांनाच सोडवावे लागत आहेत.

मागच्या वर्षभरात, माझ्या नात्यातील, ओळखीतील, दोन व्यक्तींच्या अशा कुटुंबातील एका व्यक्तीला, काळाने पडद्याआड नेल्याने, उरलेल्या दुसर्‍या व्यक्तीसमोर जे प्रश्नचिन्ह उभे राहते आहे ते मी बघतो आहे. बदलत्या काळातल्या या नवीन निर्माण होत असलेल्या प्रश्नाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हा प्रश्न थोड्या फार प्रमाणात तरी बाजूला सरकवता किंवा टाकता येणे त्या व्यक्तीला शक्य आहे का? असा विचार माझ्या मनात येतो आहे. मागच्या पिढीपर्यंत असा प्रसंग आयुष्यात आला तरी ती व्यक्ती, मुले, नातवंडे वगैरे मंडळी कुटुंबात असल्याने, अशा प्रसंगांना सामोरे जाण्यास जास्त सक्षम होती असे मला वाटते. ही परिस्थिती आता बदलली आहे हे निश्चित.

मागे राहिलेल्या व्यक्तीसमोर दोन प्रकारचे प्रश्न उभे राहतात. ही व्यक्ती स्त्री असली तर यातल्या पहिल्या प्रकारचे प्रश्न, आर्थिक नियोजन , कर भरणे, जंगम मालमत्तेची व्यवस्था बघणे वगैरे सारखे असू शकतात. आयुष्यात त्या स्त्रीने जर हे काही कधी बघितलेलेच नसले तर तिला पुष्कळ अडचणी येऊ शकतात. परंतु योग्य सल्लागार, नातलग यांचा सल्ला घेऊन हे प्रश्न सोडवणे तुलनेने सोपे आहे असे मला वाटते. या उलट मागे राहिलेली व्यक्ती पुरुष असली तर घरातली व्यवस्था, खरेदी, जेवण खाण बनवणे वगैरे अडचणींना तोंड द्यावे लागते. या सर्व अडचणींवरही मात करणे त्रासदायक असले तरी अशक्य नसते. मागे राहिलेल्या व्यक्तीला सर्वात भेडसावणारा प्रश्न, निराळ्याच प्रकारचा असतो. हा प्रश्न, मागे राहिलेली व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष, दोघांना तसाच भेडसावतो किंवा घाबरवतो. आपल्या आयुष्यात निर्माण झालेल्या भावनिक पोकळीला तोंड देत उरलेले आयुष्य़ एकट्याने कसे काढायचे? हाच तो प्रश्न असतो.

रबिंन्द्रनाथ टागोरांची एक प्रसिद्ध कविता आहे एकला चालो रेम्हणून. या कवितेत एकट्यानेच मार्ग क्रमावा लागणार असणार्‍या कोण्या एका व्यक्तीला, मानसिक धैर्य देण्याचा, कवी प्रयत्न करत आहेत. परंतु एखाद्या ध्येयाचा पाठपुरावा करणार्‍या व्यक्तीला, एकांडी वाटचाल करताना रबिंद्रनाथांची कविता कदाचित बळ देऊ शकेल पण आयुष्याच्या उत्तरार्धात जोडीदार सोडून गेल्याने आलेल्या एकटेपणाला, ही कविता कितपत मानसिक बळ देऊ शकेल या बाबत मला शंकाच आहे.

स्त्रिया या पुरुषांपेक्षा मानसिक व शारिरिक या दोन्ही अंगांनी जास्त कणखर असतात असे म्हणतात. त्यामुळेच अशा एकट्या पडलेल्या व्यक्तींच्यात स्त्रियांचे प्रमाण बरेच जास्त दिसते. पण स्त्री असो किंवा पुरुष, हा भयाण एकटेपणा तितक्याच प्रकर्षाने जाणवतो. मानसिक रित्या या प्रश्नाचा सामना करण्याची कुवत आपल्यात नाही हे दोघांनाही लगेच उमगते. पण काहीतरी मार्ग तर काढावाच लागतो. काही स्त्रिया मुलीच्या संसारात लांबून का होईना, भावनिक रित्या अडकत जातात. मुलीचे सांसारिक प्रश्न सोडवणे हे त्यांच्या आयुष्याचे मुख्य लक्ष बनते. पण एक किंवा दोन मुलगेच असले तर त्याच्या संसारात फक्त एका मर्यादेपर्यंतच स्त्रियांना रूची घेता येते. त्या पेक्षा जास्त ढवळाढवळ त्यांच्या सुनेला आवडत नाही. फक्त मुले असलेल्या स्त्रियांना एकटेपणा जास्त जाणवतो तो यामुळेच.

माझ्या ओळखीतल्या एका स्नेह्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. पण ते या कारणामुळेच मुलाबरोबर न राहता मुलीकडे राहतात. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही. बरेच पुरुष व काही स्त्रिया सुद्धा मग मद्यप्राशनासारख्या अतिरेकी उपायांचा पाठपुरावा करताना दिसतात. खूप जण काहीतरी काम, छंद करण्याचा प्रयत्न करतात. काहीजण संगणक शिकतात. काही तरी कामात दिवस बरा जातो. मात्र संध्याकाळ आणि रात्र खायला उठते असाच अनुभव सर्वांचा असतो.

बदलता काल नवे प्रश्न घेऊन येत असतो. नव्या कालातला हा नवा प्रश्न कसा सोडवायचा हे प्रत्येक व्यक्तीलाच ठरवायचे आहे. त्याचे गांभीर्य ओळखून अशा व्यक्तीला शक्य तो सर्व आधार समाजातील इतर ज्येष्ठ नागरिकांनीच देणे आवश्यक आहे. किंबहुना काळाची ती गरजच आहे.

रबिन्द्रनाथांची ती अमर कविता येथे देण्याचा मोह आवरत नाही. देवनागरी मधे लिहिलेली कविता मला कुठे मिळालीच नाही त्यामुळे रोमन अक्षरात व स्वत: रबिन्द्रनाथांनी केलेले कवितेचे इंग्रजी भाषांतर यावरच समाधान मानले पाहिजे.

Ekala chalo re

jadi tor daak shune keu naa aashe tabe ekla chalo re

tabe ekla chalo, ekla chalo, ekla chalo, ekala chalo re

jadi keu kathaa naa kaya, ore ore o abhaagaa,

jadi sabaai thaake mukha phiraaye sabaai kare bhaya

tabe paraana khule o tui mukha phute tora manera kathaa, ekalaa balo re

jadi sabaai phire jaaya, ore ore o abhaagaa,

jadi gahana pathe jaabaara kaale keu phire naa chaaya

tabe pathera kaantaa o tui raktamaakhaa charanatale ekalaa dalo re

jadi aalo naa dhare, ore ore o abhaagaa,

jadi jhara-baadale aandhaara raate duyaara deya ghare

tabe bajraanale aapana bukera paanjara jbaaliye niye ekalaa jbalo re


If they answer not to thy call walk alone,

If they are afraid and cower mutely facing the wall,

O thou of evil luck,

open thy mind and speak out alone.

If they turn away, and desert you when crossing the wilderness,

O thou of evil luck,

trample the thorns under thy tread,

and along the blood-lined track travel alone.

If they do not hold up the light when the night is troubled with storm,

O thou of evil luck,

with the thunder flame of pain ignite thy own heart

and let it burn alone.

2 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “हा माझा मार्ग एकला!

 1. लेख आवडला.

  देवनागरीत ही कविता मिळवण्यासाठी एक युक्ती केली.
  विकि च्या पानावर बंगाली लिपित ही कविता आहे. त्या पानाचे http://uni.medhas.org येथे जाउन लिप्यंतर ( transliterate) केले .

  जदि तोर डाक शुने केउ ना आशे, तबे एकला चलो रे। (डाक – हाक, केउ – कोणी)
  एकला चलो, एकला चलो, एकला चलो, एकला चलो रे॥

  जदि केउ कथा ना कय़, ओरे ओरे ओ अभागा,
  जदि सबाइ थाके मुख फिराय़े सबाइ करे भय़— (सबाइ – सर्व )
  तबे परान खुले
  ओ तुइ मुख फुटे तोर मनेर कथा एकला बलो रे॥ (मनेर – मनातली )

  जदि सबाइ फिरे जाय़, ओरे ओरे ओ अभागा,
  जदि गहन पथे जाबार काले केउ फिरे ना चाय़—
  तबे पथेर काँटा
  ओ तुइ रक्तमाखा चरणतले एकला दलो रे॥

  जदि आलो ना धरे, ओरे ओरे ओ अभागा,
  जदि झड़-बादले आँधार राते दुय़ार देय़ घरे—
  तबे बज्रानले
  आपन बुकेर पाँजर ज्बालिय़े निय़े एकला ज्बलो रे॥

  Posted by sanjay | सप्टेंबर 2, 2010, 7:40 pm
 2. या एकाकीपणावर एकमेव उपाय म्हणजे स्वतःच्या सोबतीची सवय करणे. आपला जीवनहेतू नष्ट होईल या भीतीने आपण एकटेपणा टाळत असतो.

  Posted by मनोहर | सप्टेंबर 4, 2010, 10:34 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention हा माझा मार्ग एकला! « अक्षरधूळ -- Topsy.com - सप्टेंबर 2, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: