.
Musings-विचार

वैद्यकीय सेवा का व्यावहारिक उलाढाल?अलीकडे भारतात सगळीकडे टोलेजंग इस्पितळे उभी राहत आहेत वगैरे बातम्या मी नेहमी वाचत असतो. या इस्पितळांतून दिली जाणारी पंचतारांकित सेवा, आधुनिक चिकित्सा यंत्रे, नवीनतम चिकित्सा पद्धती यांनाही खूप प्रसिद्धी मिळते आहे. ही सेवा परदेशी इस्पितळांपेक्षा खूपच स्वस्त पडत असल्याने परदेशी नागरिक स्वत:ची चिकित्सा किंवा स्वत:वर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी कसे भारतात येत आहेत याचीही वर्णने बर्‍याच वेळा वाचनात येतात. पुण्यामधे सुद्धा आता नवी मोठी इस्पितळे सुरू झाली आहेत. त्यांच्याकडे अगदी आधुनिक चिकित्सा यंत्रे व प्रणाली उपस्थित आहेत हे ही सत्यच आहे. गेल्या दोन पाच वर्षात नातेवाईक किंवा मित्र यांना भेटण्यासाठी म्हणून या नव्या इस्पितळात काही वेळा जावे लागले आहे. त्यावेळी, आता रुग्णांना मिळणार्‍या सेवेच्या दर्जात खूपच सुधारणा झाली आहे अशी छाप मनावर पडल्यावाचून रहात नाही.

माझा एक मित्र मध्यंतरी एका दुर्धर रोगाने बरीच वर्षे आजारी होता. तो व त्याचे कुटुंब गेली तीस चाळीस वर्षे एका समवयस्क डॉक्टरना आपले कौटुंबिक डॉक्टर(Family Physician ) म्हणून मानत होते या डॉक्टरांवर कोणा एका गुन्हेगाराने हल्ला केला व त्या हल्ल्यात या डॉक्टरांना आपला प्राण दुर्दैवाने गमवावा लागला. माझा मित्र व त्याचे कुटुंबीय यांना गेली अनेक दशके, वैद्यकीय सल्ला व सेवा देणारे हे डॉक्टर अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने, माझ्या मित्राला आता आपल्याला औषध योजना कोण करणार असा प्रश्न पडला. अलीकडे विशेष चिकित्सा तज्ञ (Specialists) अक्षरश: गल्लोगल्ली दिसतात. परंतु सर्वसाधारण वैद्यकीय सेवा देऊ शकेल असा डॉक्टर नव्याने मिळवणे महाकर्मकठीण झाले आहे. तरीही माझ्या मित्राला असा सर्वसाधारण चिकित्सा करणारा डॉक्टर नशिबाने सापडला व तो त्याची ट्रीटमेंट घेऊ लागला. मागचे वर्षभर या नवीन डॉक्टरांची औषध योजना माझ्या मित्राला चालू होती. दोन महिन्यांपूर्वी माझ्या मित्राची तब्येत अचानक बिघडली, म्हणजे आजाराने गंभीर रूपच धारण केले. या नवीन डॉक्टर महोदयांना फोन करून पाचारण केल्यावर त्यांनी रोग्याला आपल्या दवाखान्यात आणण्यास सांगितले. रोगी दवाखान्यात येण्याच्या अवस्थेत नाही हे सांगितल्यावर सुद्धा डॉक्टर महोदयांनी घरी येण्यास नकार दिला व रूग्णवाहिका बोलावून रोग्याला इस्पितळात घेऊन जाण्यास सांगितले.

जो रुग्ण नियमितपणे आपल्याकडून उपचार करून घेतो आहे असा रुग्ण गंभीर, परिस्थितीत असला तरी सुद्धा त्याच्या घरी भेट (Home Visit) देण्यास नकार देणे हे त्या डॉक्टरने त्याच्या पेशंटशी केलेले अतिशय क्रूर वर्तन आहे असे मला वाटते. परंतु पुण्यामधे आजकाल हीच सर्वसाधारण प्रथा आहे असे दिसते. मी परदेशात तसा काही काल व्यतीत केलेला असल्याने, परदेशात ही प्रथा आहे हे मला माहीत होते. परंतु भारतात सुद्धा हीच प्रथा एवढ्या लवकर रूढ होईल याची मला कल्पना नव्हती. Home Visit न करण्याची प्रथा आपल्याकडच्या डॉक्टरांनी परदेशातून पटकन उचलली आहे पण परदेशामधे नुसता फोन केला की दोन किंवा तीन मिनिटात सर्व प्रकारचे प्रथमोपचार करू शकतील असे प्रशिक्षित रुग्णसेवक व सुसज्ज रुग्णवाहिका तुमच्या दारासमोर हजर होतात त्याचे काय? पुण्यात फोन केल्यावर अर्धा तास ते एक तासानंतर् रुग्णवाहिका तुमच्याकडे उगवते. या रुग्णवाहिकेबरोबर कोणीही प्रशिक्षित सेवक किंवा उपचार साधने नसतात. एकच रुग्णवाहिका, आजारी रुग्ण व मृत देह यांना घेऊन नेण्यासाठी वापरली जाते. सोईस्कर गोष्टी परदेशातून उचलायच्या पण त्या बरोबर तेथे असलेल्या सुविधा आपल्याकडे आहेत का नाहीत याकडे मात्र डोळेझाक करायची ही एकूणच पद्धत डॉक्टरांच्या व्यवसायाला, ज्याला एक आदरणीय व्यवसाय असे संबोधले जाते, अशोभनीय आहे यात शंकाच नाही.

मी लहान असताना किंवा अगदी पंधरा वीस वर्षांपूर्वीपर्यंत कौटुंबिक डॉक्टर ही प्रथा आपल्याकडे रूढ होती. या डॉक्टरना घरातील सर्वांच्या तब्येतीचे बारकावे माहीत होते. त्यामुळे जरा काही कमी जास्ती झाले की लगेच योग्य ते उपचार होत असत. आजार गंभीर वाटला तर हे कौटुंबिक डॉक्टर इस्पितळात आणण्याचा सल्ला देऊन स्वस्थ बसत नसत. ते स्वत: जातीने हजर राहून उपचार योग्य दिशेने चालू आहेत हे बघत असत. या पद्धतीमुळे, घरातल्या सर्वांनाच हे डॉक्टर म्हणजे एक विश्वासू कुटुंबीय मित्र वाटत असत. आता या नव्या रूढीत, डॉक्टर व पेशंट यांच्यातला विश्वासाचा हा बंध नष्ट होऊन डॉक्टरांकडे जाऊन घेतलेल्या सल्याला, फक्त एक व्यावसायिक व्यवहार एवढाच अर्थ उरला आहे.

कोणताही व्यवसायाला असे स्वरूप एकदा आले की त्यातला जिव्हाळा संपतो. समोर पेशंट आला की त्याला तपासणे व काय चाचण्या पाहिजेत त्या करावयास सांगणे व नंतर औषध योजना करणे एवढेच सरळ सोपे स्वरूप या व्यवहाराला आले आहे. आधीच्या कालातील डॉक्टर, पेशंटला नुसते बघून किंवा तपासून त्याचे निदान करत असत. आता रक्त, लघवी वगैरे चाचण्यांशिवाय पान सुद्धा हलत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे डॉक्टर आता कोणताही धोका पत्करण्यास तयार नसतात आणि समोरचा पेशंट फक्त एक गिर्‍हाईक असते. एकदा त्याला तपासून औषध योजना सांगितली की डॉक्टरला त्या पेशंट संबंधी काहीच उत्तरदायित्व नसते.

या नवीन उपचार पद्धतीमुळे आपल्याला बरे वाटत नसले तर कोणत्या डॉक्टरकडे जायचे का इस्पितळात जायचे हे ठरवण्याची जबाबदारी स्वत: पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक यांच्यावर येते. अशा वेळी जर डॉक्टरकडे जाण्यास पेशंटला उशीर झाला आणि पुढे काही दुष्परिणाम झाले तर डॉक्टर हात झटकून टाकू शकतो. असे होऊ नये म्हणून ताक सुद्धा फुंकून प्यावे असेच सर्वसाधारण लोकांना वाटले तर त्यात आश्चर्य करण्याजोगे काहीच नाही.

अलीकडे बरेच डॉक्टर काही विशेष उपचार पद्धती आचरणात आणण्यासाठी विशिष्ट यंत्र सामुग्री विकत घेतात. अशा यंत्रसामुग्रीच्या किंमती कोटी रुपयांपर्यंत सुद्धा असतात. मग हे पैसे वसूल करण्यासाठी एखाद्या रोग्याला, त्या उपचार पद्धतीची आवश्यकता नसली तरी ती घ्यावी यासाठी डॉक्टर आग्रही बनत जातात. हृदयाची बायपास शल्यक्रिया किंवा ऍन्जिओग्राफी किंवा ऍन्जिओप्लास्टी या सारख्या चिकित्सा आवश्यक नसताना सुद्धा केल्या जाऊ लागल्या आहेत. मग आपल्या दवाखान्याकडे पेशंट्स आकृष्ट व्हावे म्हणून आपल्याकडे असलेल्या यंत्रसामुग्रीच्या जाहिराती सुद्धा काही इस्पितळे करताना दिसतात त्यात नवल कसले?

वैद्यकीय चिकित्सा करून घेताना येणार्‍या या नवीन रूढीला तोंड कसे द्यायचे? हे बहुदा सामान्य माणसांना समजतच नाही. त्यातून ही चिकित्सा पद्धत अनुसरायची तर त्यासाठी जो खर्च येतो तो पेलण्याची ऐपत फार थोड्या लोकांच्याकडे असते. मग चिकित्सा शक्य तितकी टाळणे, किंवा मित्रांना विचारून किंवा पुस्तके किंवा आंतरजालावरून माहिती मिळवून स्वत: औषध योजना करणे वगैरे प्रकार बरेच जण करू लागतात. परदेशात असलेल्या सार्वजनिक इस्पितळांच्यातील सेवेचा दर्जा अतिशय उच्च असल्याने तेथे जाऊन उपचार करून घेण्यात कोणालाच काहीच अडचण येत नाही. भारतात मात्र खाजगी डॉक्टरांचे दर परवडत नाहीत व सार्वजनिक इस्पितळातील एकूणच गैरव्यवस्था, अस्वच्छता व उदासीनता पाहून तेथे जाणेही नकोसे वाटते. या कात्रीत सापडलेल्या सामान्य माणसाला योग्य ते उपचार कसे व कोठे करून घ्यायचे हे न कळल्यामुळे हा एक यक्ष प्रश्नच बनत चालला आहे.

23 ऑगस्ट 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “वैद्यकीय सेवा का व्यावहारिक उलाढाल?

 1. उत्तम लेख नुकतीच आई वय ८० बाथरुम मधे पडली होती. फॆक्चर नव्हते हे आम्हीच ठरवले. डॊक्टर घरी येत नाहीत हे माहित होते. सुदैवाने संकुलात डॊ गानु होते ते आले. आता ठीक आहे.
  तब्बेतीकड लक्ष द्याव म्हणजे काय समजेनासे झालय.

  Posted by Prakash Ghatpande | ऑगस्ट 23, 2010, 5:08 pm
 2. Sir, Please write one article on pune real estate senario. How builders R cheating people. You can review pune real estate chatting on net. Educate us on this in marathi.

  sanju

  Posted by sanju | ऑगस्ट 23, 2010, 9:40 pm
 3. tumcha lekh khup aavadla , ithe avdla ha shabd yogya nahi,
  pann tyala paryay suchla nahi ,
  aso ithe tumhi agadi samanya mansachi yvatha mandli aahe,
  aho sir he tar kahich nahi ,tumhala jar yanchi aankhi uladhal mahiti karayachi asel tar kontya hi M.R. (Medical Representative) la vichra ,
  kahi kahi thikani tar company che M.R. saral doctoranna offer detat ki, tumhi aamche product prescribe kara aamhi tumhala ……………… kitchen items……………….TO……………….(switzerland trip with family) ,A.C. , four wheeler paryant hanchi majal jate…….
  i ask to doctors who do not follows their duty ,HICH KA TUMCHI PRATIDNYA, HACH KA TUMCHA SEVA DHARMA ?

  Posted by dhammavir | ऑगस्ट 24, 2010, 8:48 pm
 4. आपल्या या लेखावर प्रतिक्रिया लिहावी असा विचार मनात असतांना नुकताच ‘अंतर्नाद’ या प्रतिष्ठित मासिकाचा “आरोग्य आणि समाज” हा विशेषांक हाती आला. त्यातील लेख आपल्या विचारांशी मिळतेजुळते आहेत. विशेषतः श्री. सर्वोत्तम ठाकूर यांचा लेख म्हणजे डॉक्टरी जगात काय चालते याचा पंचनामा आहे. आपण या मासिकात लेखन करावे अशी विनंती आहे. अधिक संपर्कासाठी आपला इ-मेल आय.डी. मला कळवावा.
  मंगेश नाबर

  Posted by Mangesh Nabar | ऑगस्ट 30, 2010, 8:14 सकाळी

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention वैद्यकीय सेवा का व्यावहारिक उलाढाल? « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑगस्ट 24, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: