.
ताज्या घडामोडी Current Affairs

उदंड जाहले पाणी, सर्वनाश करावया!


अलीकडे दर पावसाळ्यात, पुण्यामधे एक नवीनच प्रश्न उभा राहतो आहे. थोडा जोरात पाऊस एखाद्या दिवशी जरी पडला तरी सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. काही काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या तळमजल्यावरील वाहनतळांमधे तर कंबरेपर्यंतसुद्धा पाणी साचते. पूर्वी सुद्धा पुण्याला याच पद्धतीने पाऊस पडायचा. मधून मधून खूप जोरात पडायचा. पण तेंव्हा पाणी पटकन नदीकडे वाहून जायचे. पुण्याच्या पश्चिम भागात वेताळ टेकडी व आजूबाजूच्या टेकड्यांच्या रांगा आहेत. या टेकड्यांच्यावर पडलेले पावसाचे पाणी, असंख्य ओढे व नाले नदीकडे घेऊन जात. या ओढ्यांना प्रचंड पूर येत असे. काही वेळेला तर या ओढ्यांमधे, माणसे मोटरगाड्या सुद्धा पाण्याच्या जोराने वाहून जात असत. मात्र मागच्या पंधरा वीस वर्षापासून पुण्यात प्रचंड प्रमाणात गृहसंकुले बांधली जाऊ लागली आहेत. उपलब्ध जमीन मर्यादित असल्याने, बांधकाम व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या संगनमताने हे ओढे बुजवून त्यावरच आपली गृहसंकुले बर्‍याच ठिकाणी उभारली आहेत. या ठिकाणी मूलत: नैसर्गिक रित्याच खोलगट भाग असल्याने येथे ओढे निर्माण झाले असणार हे एखादा लहान मुलगा सुद्धा सांगू शकेल. हे ओढे बुजविले गेल्याने या खोलगट भागाकडे येणारे पावसाचे पाणी थोडेच थांबवता येणार आहे. ते पाणी तेथेच येणार आणि आतापर्यंत ज्या ओढ्यातून हे येणारे पाणी नदीकडे वाहून नेले जात असे तो ओढाच अस्तित्वात नसल्याने रस्त्यावरून वाहत येणारे हे पाणी मग गृहसंकुलांच्या तळमजल्यावर साठत राहते. त्याचा निचरा होतच नाही.

पुण्याचे हे उदाहरण मी अशासाठी दिले की पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला किंवा तो वाहू दिलाच नाही तर काय होते हे या उदाहरणावरून उत्तम रित्या सांगता येते. पाण्याचा प्रवाह, मग तो एखाद्या लहान मुलाने त्याच्या खेळातल्या झारीने जमीनीवर ओतलेले पाणी असो किंवा जगातील सर्वात मोठ्या नद्यांच्यापैकी असलेली सिंधू नदी असो, एकाच पद्धतीने वाहतो. फरक असतो फक्त व्याप्तीचा. लहान मुलाच्या हातात असलेल्या झारीमधून ओतले गेलेले व जमीनीवर वाहणारे पाणी जर अडवले तर जसे वाट फुटेल तिकडे जाईल किंवा साचू लागेल तसेच पुण्याच्या पावसाळ्यात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा प्रवाह वागतो व अगदी त्याच पद्धतीने पाकिस्तानमधे वाहणार्‍या सिंधू नदीचा प्रवाह वागत आहे. पुण्यामधे काही गृहसंकुलातल्या लोकांना थोडेफार दिवस याचा त्रास सहन करावा लागतो तर सिंधू नदीच्या या प्रवाहाला आलेल्या पुरामुळे 45 लाख लोक विस्थापित झाले आहेत. पाकिस्तानचा 20 % टक्के मुलुख जलमय झाला आहे आणि 1600 च्या आसपास लोक मृत्युमुखी पडले आहेत. या पुराचे भविष्यकाळात काय काय दुष्परिणाम पाकिस्तानी लोकांना भोगायला लागणार आहेत हे सध्या सांगणेही कठिण आहे.

पाकिस्तानमधल्या या पुराची व्याप्ती तरी किती आहे? हे आपण प्रथम बघूया.

1 ऑगस्ट 2009 मधले उपग्रह छायाचित्र

1 ऑगस्ट 2010 मधले उपग्रह छायाचित्र

सिंधू नदी, तिबेटमधे कैलाश पर्वताजवळच्या एका हिमनदामधून उगम पावते असे मानले जाते. या नदीला नगरी या तिबेटमधल्या शहराजवळ सेंगे खाबाब ही नदी येऊन मिळते. ही सेंगे खाबाब नदीच खरी सिंधू आहे असे तिबेटी लोक मानतात. ही सिंधू नदी डेमचोक गावाजवळ भारतीय सीमेत शिरते व तेथून लेह शहराच्या जवळून वाहत जाते. लेहच्या पुढे कश्मिरमधे सिंधू नदीला शोयोक व गिलगिट या नद्या येऊन मिळतात. पाकिस्तानच्या भूभागात शिरल्यावर सिंधू नदीला काबूल नदी येऊन मिळते. पंजाबमधे या नदीला, झेलम, चिनाब, रावी व सतलज या नद्यांचे पाणी पूर्वेकडून तर झोब नदीचे पाणी पश्चिमेकडून येऊन मिळते. या नंतर ही नदी सिंध प्रांतात शिरते व शेवटी कराचीच्या जवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. या वर्णनावरून हे सहज लक्षात येईल की केवढा विस्तीर्ण भूप्रदेश या नद्यांच्या खोर्‍यांनी व्यापलेला आहे. या वर्षीच्या जुलै महिन्याच्या अखेरीस, भारतीय उपखंडावर, उशिराने का होईना, मॉन्सूनचा पाऊस कोसळला. अत्यल्प पाऊस पडणार्‍या भागांच्यात सुद्धा या वर्षी पावसाचे प्रमाण बरेच अधिक होते. पाकिस्तानच्या वायव्य, मध्य व दक्षिण भागात गेल्या 80 वर्षात असा पाऊस पडला नव्हता असे हवामानतज्ञांचे म्हणणे आहे. या पावसामुळे या भागातील सर्व नद्यांना प्रचंड पूर आले व हे पाणी नद्यांच्या पात्रांबाहेर येऊन आजूबाजूच्या प्रदेशात पसरले. अनेक गावे संपूर्णपणे जलमय झाली व त्यांचा जगाशी असलेला संपर्क तुटला. 1600 व्यक्ती मरण पावल्या असून एकूण 45 लाख लोक तरी विस्थापित झाले आहेत. 1.4 मिलियन एकर शेती नष्ट झाली आहे तर 10000पेक्षा जास्त गुरेढोरे मृत पावली आहेत. सर्वात जास्त हानी झालेल्या पंजाब व पख्तूनख्वा या प्रांतांच्यात 2,63000 घरे कमीजास्त किंवा पूर्णपणे हानीग्रस्त झाली आहेत.

ऑगस्टचा तिसरा आठवडा उजाडला तरीही या पुराचे पसरलेले पाणी अजून ओसरलेले नाही. त्यामुळे भविष्यात या भागात रोगराई, कुपोषण यासारख्या समस्या थैमान घालणार आहेत हे सांगायला कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही.

कितीही जास्त प्रमाणात पाऊस पडला असला तरी ज्या पद्धतीने व ज्या प्रमाणात एकूण हानी झाली आहे ती बघता, हे प्रकरण साध्या पुराचे नाही असे तज्ञ मंडळी आता मानू लागली आहेत. या लेखाच्या सुरवातीला, मी पावसाळ्यात पुण्यामधे साचलेल्या पाण्याचे जे उदाहरण दिले होते तसा काहीसा प्रकार पाकिस्तानमधे घडला असावा असे आता मानले जाऊ लागले आहे. पाकिस्तानमधला हा भयंकर पूर नैसर्गिक आपत्तीपेक्षा अनेक दशकांमधल्या अतिशय चुकीच्या अशा नद्यांच्या पाणी व्यवस्थापनामुळे आला आहे असे दिसते. पाकिस्तानची बहुसंख्य जनता ज्या भागात राहते तो भाग संपूर्णपणे सपाट आहे. या भागाला नद्यांच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून अनेक बांध, धरणे व कालवे यांचे एक मोठे जाळेच या भागात उभारलेले आहे. या जाळ्याची तुलना अमेरिकेमधे मिसिसिपी नदीवर बांधलेल्या बांधांशीच फक्त करता येईल.

हे बांध, धरणे आणि कालवे यांचे जाळे बांधण्यास ब्रिटिशांच्या कालातच खरे म्हणजे सुरवात झाली होती. 1947 मधे पकिस्तानची निर्मिती झाल्यावर हे कालव्यांचे जाळे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले. याचा एकूण परिणाम आता असा झालेला आहे की हिमालय पर्वतराजीपासून वाहत येणारे पाणी अरबी समुद्राला जाऊन न मिळता छोट्या छोट्या तुकड्यांच्यात व प्रमाणात असंख्य ठिकाणी व पूर्व पश्चिम दिशांना, शेतीसाठी वापरता यावे म्हणून वळवण्यात आले आहे. या पाणी व्यवस्थापनामुळे जरी धान्य उत्पादनात आश्चर्यजनक वाढ झालेली असली तरी नदीचा नैसर्गिक प्रवाह, कृत्रिम रित्या थांबवण्यात व वळवण्यात आला आहे हे निश्चित आहे. नदीचे पात्र या पद्धतीने वळवण्याचा एक दुष्परिणाम असा झाला आहे की या वर्षी पडलेल्या पावसासारखा पाऊस जेंव्हा पडतो तेंव्हा मूळ सिंधू नदीचे खोरे नैसर्गिक रित्या वाढलेले पाणी समुद्राकडे वाहून नेण्यास जसे पूर्वी समर्थ होते तसे आता हे नवीन व कृत्रिम रित्या बनवलेले नदीकाठचे कालव्यांचे जाळे समर्थ नाही. पाकिस्तानच्या वन विभागात पूर्वी काम करणारे एक अधिकारी व आता International Union for the Conservation of Nature (IUCN) या संस्थेत वनतज्ञ म्हणून काम करणारे ताहिर कुरेशी म्हणतात की सिंधू नदी व काठावरचे कालवे यांची मिळून बनलेली जल व्यवस्थापन प्रणाली जगातली सर्वात मोठी असली व त्यामुळे पाकिस्तानच्या धान्य उत्पादनात क्रांतीकारक वाढ झालेली आहे, हे जरी सत्य असले तरी या प्रणालीचे दुष्परिणाम आता चांगलेच जाणवू लागले आहेत.

एखाद्या माणसाने आपल्याला आरामदायी आयुष्य़ जगता यावे म्हणून आपला आत्मा विकून टाकावा यासारखेच सिंधू नदीच्या पाण्याचे हे व्यवस्थापन आहे असे एक भूगोलतज्ञ म्हणून लंडनच्या किंग्ज कॉलेजमधे काम करणारे दनिश मुस्तफा यांचे म्हणणे आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वी दरवर्षी सिंधू नदीला उन्हाळात नियंत्रण करता येईल असा पूर फक्त येत असे. आता मानवी हावरेपणाने नदीचे खोरेच बदलून टाकले आहे. आता पूर सहसा येतच नाही. पण जेंव्हा येतो तेंव्हा तो दणकाच देऊन जातो. नदीच्या दोन्ही काठांना पूर्वीपासून मैलोगणती पसरलेला पाणथळ प्रदेश होता. या भागात पूर्वी पुराचे पाणी पसरत असे परंतु तेथे वस्ती किंवा शेती काहीच नसल्याने या भागात पुराचे पाणी पसरले तरी काहीच हानी होत नसे. आता हा भाग शेती करण्यासाठी वापरला जाऊ लागला आहे. व इथली जमीन अतिशय सुपिक असल्याने येथे जमीन मिळवण्यासाठी लोक अहमहमिकेने प्रयत्न करत असतात. या वर्षीच्या पुराने या लोकांची सर्वात जास्त हानी झाली आहे.

आंतर्राष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्थेच्या लाहोर शाखेमधे काम करणारे ( International Water Management Institute (IWMI)) असद सरवार कुरेशी म्हणतात की सिंधू नदीच्या खोर्‍याला पूर्वस्थितीत आणण्याची नितांत गरज आहे. या सर्व ठिकाणी नद्यांच्या पात्रात प्रचंड गाळ साचला आहे. या गाळामुळे नद्यांची जलवाहक क्षमता खूपच कमी झाली आहे. पुराचे पाणी आसपासच्या प्रदेशात पसरण्याचे हे ही एक प्रमुख कारण आहे.

या समस्येवर कायम उपाय काय? असा प्रश्न साहजिकच समोर उभा राहतो. या तिन्ही तज्ञांनी सुचवलेले उपाय असे आहेत.

 • नद्यांना नियमितपणे पूर येऊ देणे आवश्यक आहे. यामुळे मोठा पूर येईल तेंव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल.
 • निदान काही ठिकाणी तरी नदीकाठचा पाणथळ प्रदेश परत पूर्वीसारखा ठेवणे आवश्यक आहे यामुळे पूर आला की काही ठिकाणी तरी नदीचे पात्र रुंदावू शकेल.
 • नदीचे बांध काही ठिकाणीच ठेवावे व त्यांची व्यवस्था योग्य प्रकारे व्हावी.
 • नदीकाठी झाडे लावणे अतिशय महत्वाचे आहे. या झाडांच्यामुळे जमीन घट्ट धरून राहते व पुराचा परिणाम कमी त्रासदायक होतो. मागच्या काही दशकात नदी काठची झाडे नष्ट करण्यात आलेली आहेत.

परंतु हे सगळे होईल का यासंबंधी हे तज्ञ एकूण निराशावादीच आहेत. हे सगळे होणे गरजेचे असले तरी हे एवढे मोठे बदल आहेत की ते करण्याची क्षमता पाकिस्तानी शासनात असेल असे त्यांना वाटत नाही.

सिंधू नदीला आलेल्या पुराचे खरे कारण हे मानवनिर्मित आहे हे बघितल्यावर भारतासाठी सुद्धा हा एक धोक्याचा इशारा आहे हे लक्षात येते. याच प्रकारचा पूर राजस्थान किंवा इंदिरा कालव्यामधून राजस्थानमधे पसरू शकतो. किंवा अगदी जवळचे उदाहरण घ्यायचे तर पुण्याजवळच्या मुठा नदीचे पात्र आता त्यात अतिक्रमणे करून अत्यंत अरूंद केले आहे. समजा जून जुलै मधे अतिवृष्टी झाली व पुण्याजवळची सर्व धरणे भरली तर पुढच्या महिन्यांच्यात होणार्‍या पावसाचे पाणी वाहून जाताना नदीकाठची दौंड इंदापूर पर्यंत प्रचंड हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीच्या पात्राची नैसर्गिक रुंदी व खोली यांचे जतन करणे किती महत्वाचे आहे हेच पाकिस्तानच्या पुराने सर्व जगाला सांगितले आहे.

20 ऑगस्ट 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “उदंड जाहले पाणी, सर्वनाश करावया!

 1. डॉ. राजेद्र पचौरी या इसमाला हाताशी धरून गंगा-कावेरी प्रकल्पाला नाट लावण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले असावेत म्हणून प्रचाराच्या या मार्गाचा विचार होत असावा. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचे हे अपयश असावे. नाहीतर त्याच परिसरांत उगम पावणाऱ्या गंगा-यमुनेला पूर कसे आले नाहीत ?

  Posted by मनोहर | ऑगस्ट 21, 2010, 4:50 pm
 2. So true!!!

  -Abhi

  Posted by abhijeet | ऑगस्ट 22, 2010, 5:04 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention उदंड जाहले पाणी, सर्वनाश करावया! « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑगस्ट 20, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: