.
Musings-विचार

ज्येष्ठत्वाची वाटचाल, माझी आणि देशाची सुद्धा!


भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षे आधी म्हणजे दुसर्‍या महायुद्धाच्या काळात माझा जन्म झालेला असल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी थोडी फार तरी समज मला आली होती असे म्हणायला हरकत नाही. स्वातंत्र्य मिळाले तेंव्हाचे काहीच मला आठवत नसले तरी गांधीहत्येच्या नंतरची अस्वस्थता मी अनुभवलेली आहे. आमच्या घराच्या पुढच्या अंगणात माझ्या आजोबांनी महात्माजींची एक मोठी तसवीर हार घालून एका खुर्चीवर पुढचे दहा, पंधरा दिवस ठेवलेली मला चांगलीच स्मरते. त्या वेळेस पुण्यात दंगा होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत होती. परंतु पुण्याचे तत्कालीन कमिशनर श्री. .गो. बर्वे यांनी सदर्न कमांडच्या चिलखती गाड्या मागवून घेऊन त्या पुण्यात तैनात केल्या व पुण्यातली परिस्थिती चिघळू दिली नाही असे घरातले मोठे लोक म्हणत असत व ते बहुदा सत्य असावे.

स्वतंत्र भारताची गेल्या 63 वर्षाची वाटचाल त्यामुळेच मला तशी जवळून अनुभवता आली आहे. देशाचे राजकीय तत्वज्ञान काय असावे हे ठरवण्यासाठी या देशाला फक्त 3 वर्षे पुरली, पण आर्थिक तत्वज्ञान काय असावे हे ठरवायला मात्र पन्नास वर्षे लागली. या अनिश्चिततेमुळे माझ्या पिढीचे व त्यामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले. हे कदाचित सरकार मान्य करणार नाही पण माझ्या दृष्टीने तरी ते सत्यच आहे. गेली काही वर्षे, प्रत्येक वर्षात काही महिने तरी भारताबाहेर राहण्याचा योग मला येतो आहे. या वास्तव्यात जेंव्हा मी दुसर्‍या देशांच्या एखाद्या नागरिकाला, मी भारतीय आहे म्हणून माझी ओळख करून देतो तेंव्हा भारतीय व डोक्याची हुशारी हे समीकरण त्यांच्या मनात पक्के ठसलेले आहे हे लगेच जाणवते. भारतीय लोक काही आताच एकदम डोक्याने हुशार झाले आहेत असे नाही. माझ्याही पिढीत अशीच अनेक हुशार मंडळी होतीच. पण त्या वेळी भारत म्हणजे भविष्य नसलेला एक देश असेच सर्वमान्य मत होते.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी सरकारे आली त्यांना सोव्हिएट रशियाच्या नियोजनबद्ध प्रगतीच्या कल्पनेने अक्षरश: चकवा पडल्यासारखे झाले. खाजगी उद्योगधंदे म्हणजे त्याज्य गोष्ट व सरकारी उद्योगधंदे म्हणजे उज्ज्वल भवितव्य ही कल्पना सरकारच्या डोक्यात इतकी पक्की बसली होती की खाजगी क्षेत्रात काहीही करू म्हटले तरी परवाना घेतल्याशिवाय काही करू दिले जाणार नाही हे सरकारने जनतेला सांगून टाकले. परिणामी भारतीयांच्या व्यवसाय करण्याच्या नैसर्गिक उर्मीलाच खीळ घातली गेली.

एवढे असले तरी आठ दहा वर्षे नोकरी केल्यावर आपण धंद्यात पडावे असे माझ्या मनाने घेतले व मी स्वत:चा धंदा सुरू केला. शॉप्स ऍन्ड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, फॅक्टरीज ऍक्ट, सेल्स टॅक्स, एम्प्लॉयी स्टेट इ शूअरन्स, प्रॉव्हिडन्ट फंड, प्रोफेशनल टॅक्स ऍक्ट, एक्साईज ऍक्ट, इम्पोर्ट लायसेन्स, स्मॉल स्केल इंडस्ट्री रजिस्ट्रेशन नावाच्या अनेक अक्रारविक्राळ राक्षसांची माझी याच काळात ओळख होऊ लागली. आपण कितीही सचोटीने धंदा करावयाचा ठरवला असला तरी या राक्षसांची परवानगी घेतल्याशिवाय हात सुद्धा हलवणे शक्य नाही हे लक्षात आले व यांच्या परवानग्या मिळणे हात ओले केल्याशिवाय शक्य नसते हे चिरायू सत्यही मला उमजले. मी मूळ मध्यम वर्गातून आलेला असल्याने गाठीशी पैसे असणे शक्यच नव्हते. त्यामुळे धंदा करायला भांडवल मिळवणे यासाठी सरकारी बॅन्कांचे पाय धरणे ओघानेच आले. आता कदाचित विश्वास बसणार नाही पण 21 % व्याजाने कर्ज काढून आम्ही धंदा करत असू. आम्ही व्यावसायिक, कष्ट करून बॅन्कांच्या फायद्यासाठी काम करत आहोत असेच मला कधी कधी वाटायचे.

सरकारी परवान्यांच्या बाबतीतला एक मनोरंजक अनुभव माझ्या स्मरणात आहे. एक इलेक्ट्रॉनिक उपकरण बनवण्याचा परवाना मिळवण्यासाठी मी दिल्लीला अर्ज केला होता. माझ्या अर्जात मी ज्यांची किंमत वर्षाला 1,80000 रुपये होईल अशी 100 उपकरणे बनवण्यासाठी परवाना मी मागितला होता. या उत्पादनासाठी, मला वर्षाला 36000 रुपयांचा आयात माल लागणार होता. प्रत्यक्षात दिल्लीहून जो परवाना माझ्या हातात आला तो 1,.80000 उपकरणे बनवण्याचा होता. त्यासाठी 64800000 रुपये किंमतीची आयात मला करता येईल असे सांगण्यात आले. ही स्पष्टपणे टाईप करण्यातली चूक असल्याने, मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही व पुढे कामाला सुरवात केली. काही दिवसांनी माझ्या हातात आयात परवानाही आला. अर्थात एवढ्या मोठ्या रकमेच्या आयात परवान्याची मला काही आवश्यकताच नसल्याने मी फक्त मला हवी तेवढाच माल आयात केला.

काही दिवसांनी प्रथम राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून मला सतत विचारणा होऊ लागली की मी एवढ्या मोठ्या संख्येने उत्पादन करण्याचा परवाना का घेतला आहे? मी त्यांना लेखी कळवले की मला फक्त 100 उपकरणे बनवायची आहेत. एवढा मोठ्या संख्येचा परवाना मला का देण्यात आला आहे हे मला माहीत नाही. काही दिवसांनी दिल्लीहून काही अधिकारी माझ्या कारखान्यात आले व त्यांनीही तीच विचारणा केली. या शुल्लक चुकीला एवढे मोठे स्वरूप का प्राप्त झाले आहे ते मला उमजत नव्हते. नंतर मला असे कळले की एका मोठ्या उद्योगधंद्याने हेच उत्पादन बनवण्यासाठी अर्ज केला होता व मला 1,80000 उपकरणे बनवण्याचा परवाना दिल्याने दुसर्‍या कोणास परवाना मिळणे शक्य नव्हते. त्या उद्योगाचा दबाव आल्याने दिल्लीतील अधिकारी मंडळी जागी झाली होती व मी माझ्या हातातील परवान्याचा अयोग्य उपयोग करीन अशी भिती त्यांना वाटत होती.

निरनिराळे परवाने, तिमाही, सहामाही आणि वार्षिक अहवाल या सारख्या नोकरशाही उपायांनी या काळातल्या उद्योजकांचे पाय सरकारने एवढे बांधून टाकले होते की हजारामधला एखादाच उद्योगधंदा यशस्वी होऊ शकत होता. आणि उद्योग करून जर फायदा झालाच तर 97.5 टक्क्यांपर्यतचा अशक्य आयकर त्या काळात होता. म्हणजे काळा पैसा मिळवण्यास केवढे प्रोत्साहन सरकार देत होते ते लक्षात येईल. या सगळ्या अडचणींना तोंड देत, आमच्यासारखे बरेच जण, आपले धंदे चालवत होते परंतु एकंदरीत भविष्य काही फारसे उज्ज्वल वाटत नव्हते.

1990 च्या आसपास, जेंव्हा जवळचे सोने गहाण ठेवण्याची भारत सरकारवर वेळ आली तेंव्हा कोठेतरी काहीतरी चुकते आहे याची जाणीव या देशातील सरकारला झाली. पुढचा इतिहास सर्वांना ज्ञात असल्याने त्याची पुनरावृत्ती करण्यात काही हंशील नाही. गेल्या 10 वर्षात देशाने नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु माझ्या पिढीचे जे अपरंपार नुकसान सरकारने आपल्या चुकीच्या आणि अडाणीपणाच्या धोरणांनी केले आहे त्याची भरपाई होणे कधीच शक्य नाही.

आता नवीन उद्योग धंदे करणारे तरूण जेंव्हा मी बघतो तेंव्हा त्यांना उपलब्ध होत असलेल्या संधींचा ते फायदा घेऊन स्वत:चा व देशाचा अमाप फायदा करून देत आहेत हे बघायला आनंद होतो व छानही वाटते. पण आपल्या तरूणपणाच्या काळात आपल्याला अशा सोई, संधी मिळाल्या असत्या तर आपण कितीतरी जास्त प्रगती केली असती याचे वैषम्यही वाटल्यावाचून रहात नाही.

योग्य धोरणे स्वीकारल्याबरोबर देशाची वाटचाल तर योग्य दिशेने होऊ लागली. भारत जगातील तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आमच्या बरोबर धंदा वाढवा म्हणून भारताला भेट देत आहेत. देशाची वाटचाल कशी चालू आहे याचे आकडे कालच्याच वर्तमानपत्रात बघितले. आकडे मोठे बोलके आहेत.

परंतु माझी पिढी आणि स्वतंत्र भारत या दोघांनीही एकत्र चालू केलेल्या या वाटचालीत आमच्या पिढीने मात्र चुकीच्या सरकारी धोरणांशी लढण्यातच आपले सर्व आयुष्य खर्च केले आहे ही खंत माझ्या मनात राहणारच आहे.

15 ऑगस्ट 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “ज्येष्ठत्वाची वाटचाल, माझी आणि देशाची सुद्धा!

 1. Resp. Sir,
  I am Agree with your openinyan thanks!

  Posted by Balraj Gawande | ऑगस्ट 15, 2010, 4:32 pm
 2. बापरे.. इतकी मोठी चूक??
  आश्चर्यच वाटलं.
  महागाई वाढ्ली की देशाची कशी काय उन्नती होऊ शकते हे गौडबंगाल कधीच माझ्या लक्षात आलं नाही. लेख खूपच छान झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.

  Posted by महेंद्र | ऑगस्ट 15, 2010, 7:40 pm
 3. तुमच्या पिढीचे व पर्यायाने देशाचे खरंच खूप नुकसान झाले.आंधळी नोकरशाही व मुजोर राजकारणी यांचे एकत्र परिणाम.
  तुमची उद्दिग्नता मी समजू शकतो..जेंव्हा आपण धडाडीने एखाद्यात उद्योगांत शिरू इच्छीतो व धंदा सोडून इतर गोष्टीतच जर वेळ व मेहनत वाया जायला लागली तर काय होवू शकते हे मी चांगले अनुभवले आहे….पण त्यामानाने आम्ही खूप म्हणजे खूपच नशीबवान…आम्हाला रेशनची रांग नाही, शिक्षनाची वानवा नाही. अन्नधान्य, वाहतूक, संपर्काची साधने मुबलक…हे सर्व तुमच्या पिढ्यांना मिळाले असते तर आज आपला देश किमान १०० वर्षे तरी पुढे गेला असता.

  Posted by झम्प्या झपाटलेला | ऑगस्ट 15, 2010, 10:33 pm
 4. नोकरशाहीशी पंगा घेणे इंदिरा गांधींशिवाय कोणालाच शक्य नसल्याने हा वेळ लागला. जनता पक्षाच्या माध्यमांतून घड्याळाचे काटे मागे फिरविण्याचे नोकरशाहीचे प्रयत्न सोने गहाण ठेवले जाण्याला कारण आहेत.

  Posted by मनोहर | ऑगस्ट 15, 2010, 11:08 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention ज्येष्ठत्वाची वाटचाल, माझी आणि देशाची सुद्धा! « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑगस्ट 15, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: