.
Science

चवीने खाणार त्याला आंतरजाल देणार!


कॉलेजात शिकत असताना मला भेळ खूप आवडायची. माझ्या कॉलेजच्या रस्त्यावर, एरंडवणा पार्क म्हणून एक पार्क लागत असे. आता या पार्कचे नाव कमला नेहरू उद्यान असे ठेवण्यात आले आहे. रस्त्यांना, चौकांना, उद्यानांना असलेली जुनी प्रचलित नावे बदलून नवी नावे ठेवण्यात आपल्याकडच्या राजकारण्यांचा कोणी हात धरणार नाही हे मात्र खरे. तर या एरंडवणा पार्कच्या जवळच्या रस्त्यावर, भेळेच्या 8,10 गाड्या नेहमी उभ्या असत. संध्याकाळच्या वेळी या रस्त्याने जाण्याचा योग आला की नुकताच कापलेला कांदा, चिंचगुळाचे पाणी व कोथिंबीर यांचा वास असा काही नाकात घुसत असे की मनाला कितीही आवर घातला तरी सायकल कधी भेळेच्या गाडीच्या शेजारी उभी होई ते कळतच नसे. त्या काळात भेळ आतासारखी बोल आणि प्लेटमधे मिळत नसे. वर्तमानपत्राच्या चतकोर कागदावर भेळ वाढून तो कागद तुमच्या हातात देण्यात येई. असा भेळ वाढलेला कागद समोर आला की जरा चिंचगुळाचे पाणी टाका म्हणून गाडीवाल्याला फर्माईश होत असे व नंतर त्या भेळेबरोबर देण्यात आलेला जाडसर पुठ्याच्या एक तुकडा चमचा म्हणून वापरून त्या भेळेचा आस्वाद घेता घेता कधी ती संपत असे ते कळायचेही नाही. असाच प्रकार भज्यांची गाडी, बटाटेवड्यांची गाडी ही दिसली तरी व्हायचा हे ही तितकेच खरे. त्या काळात प्रदुषण वगैरे बागुलबुवा नसत अणि उठसूट हा फ्ल्यू तो डेन्ग्यू किंवा चिकुणगुन्या होण्याची भिती नसे. आजार किंवा रोग कसे सरळ सोट असत. मलेरिया, टायफॉइड वगैरे. असल्या बाहेर खाण्याने काही होत नसे.

वय लहान होते तोपर्यंत हे सगळे ठीक होते. नंतर हे असले खाण्याचे उद्योग सतत केले तर एक दिवस पॅन्टचे बटण लागत नाही हे लक्षात येऊ लागले. असले बाहेर खाणे बरे नव्हे वगैरे विचार मनात येऊ लागले. पण भेळेची गाडी दिसली आणि तो चिरपरिचित सुगंध दरवळला की भेळ मारूया किंवा या हवेत भजी पाहिजेतच असे मनात येतच राहिले. भेळ, भजी किंवा आता आधुनिक हॅम्बुर्गर किंवा फ्रेंच फ्राईज यांच्या स्टॉल्सजवळ आल्यावर पोट भरलेले असताना सुद्धा भूक लागल्याची भावना का होते? किंवा भूक म्हणजे तरी काय? व ती शरिरातला कोणता अवयव उद्दीपित करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया या विद्यापीठातील दोन संशोधक Richard Thompson and Larry Swanson हे करत आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या संशोधनात त्यांना काही अतिशय रोचक अशा गोष्टी समजल्या आहेत.

आपले वजन वाढले आहे हे समजल्यावर आपल्याला मनावर एवढे साधे नियंत्रण आपल्याला ठेवता येत नाही या बद्दल राग आपल्याला सर्वांनाच येतो. परंतू तोंडात काहीतरी टाकावेसे वाटणे किंवा भूक लागणे व रोजची आहार घेण्याची पद्धत या क्रिया आपल्या मेंदूमधे हार्ड वायर केलेल्या असतात. त्यामुळे प्रत्यक्ष अन्नाचा वास न येता नुसते घड्याळ्याचे ठोके ऐकूनही भूक लागली असण्याची भावना होऊ शकते. या शिवाय शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे यासारख्या शारिरीक प्रक्रियांनी सुद्धा भूक लागू शकते. आणि यात जर आपण 5,6 तासात काही खाल्लेले नसले तर भुकेने अर्धमेले झाल्यासारखेही वाटू लागते.

भूक लागण्याची कारणे जरी समजली तरी भज्यांची गाडी बघितल्यावर तोंडाला पाणी सुटणे, किंवा अमुक गोष्ट जास्त आवडणे व तमुक गोष्ट न आवडणे अशा गोष्टी कोण ठरवते? काहींना गोड तर काहींना चटकदार जेवण का आवडते? मानसिक तणाव आल्यावर जास्त खावेसे का वाटते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या मेंदूमधे चालू असलेल्या पेशींमधील दळणवळणात आहेत हे जरी माहिती असले तरी हे कसे घडते हे शोधण्याचा प्रयत्न हे दोन शास्त्रज्ञ करत आहेत.

गेली 150 वर्षे तरी, मेंदूची अंतर्गत व्यवस्थापन व्यवस्था ही एखाद्या सैनिक दलाच्या व्यवस्थापन प्रणाली सारखी असते असेच न्यूरोशास्त्रज्ञ (neuroscientists) मानत आलेले आहेत. या पद्धतीत सर्व हुकूम वरून खाली दिले जातात. त्याच प्रमाणे मेंदूतील निओकॉर्टेक्स (neocortex) हे भाग सेनाधिकार्‍यांसारखे वागून. सर्व निर्णय घेणे व हुकूम सोडणे ही कामे करतात तर बाकीचे मेंदूतील भाग हुकूम कार्यवाहीत आणण्याचे काम करतात अशी समजूत होती. परंतु भूक लागली किंवा भज्यांची गाडी दिसली किंवा मानसिक तणाव आला की भूक उद्दीपित होण्याच्या प्रक्रियेचा खुलासा ही वरून खाली व्यवस्थापन प्रणाली मानल्यास करता येत नाही हे लक्षात आल्याने या दोन शास्त्रज्ञांनी मेंदूच्या व्यवस्थापन व्यवस्थेबद्दलच संशोधन करण्यास सुरवात केली. प्रथम त्यांच्या हे लक्षात आले की कोणते अन्न माणसाला सर्वात चविष्ट लागते ते मेंदू मधला nucleus accumbens किंवा NA हा भाग ठरवतो.

आपल्या मेंदूमधे “hedonic hot spot” नावाच्या काही जागा असतात. या जागा उद्दीपित झाल्या की गोड किंवा मधु पदार्थांच्या सेवनाने जसे छान वाटते तसेच माणसाला वाटू लागते. थॉमसन व स्वॅन्सन या शास्त्रज्ञांनी, उंदरांच्या मेंदूंच्या अशा hedonic hot spot मधे काही मागोवा घेता येतील अशी रसायने (tracer chemicals ) टोचली. या रसायनांचा मागोवा घेताना त्यांच्या असे लक्षात आले की या जागांच्यापासून निघालेले मज्जा संदेश nerve impulses, nucleus accumbens कडे तर जातातच पण या शिवाय ते भूक, तणाव व मानसिक थकवा यांच्यावर मेंदूंचे जे भाग नियंत्रण ठेवतात त्यांच्याकडेही जातात. या रोचक निरिक्षणानंतर या दोन शास्त्रज्ञांनी भूक या संवेदनेच्या संदर्भात मेंदूमधले मज्जा संदेश nerve impulses कसा व कोठे प्रवास करतात याचा एक विद्युत आराखडाच तयार केला आहे.

या आराखड्यावरून असे लक्षात आले आहे की भुकेच्या संदर्भात आपला मेंदू, वरून खाली ही व्यवस्थापन प्रणाली पाळतच नाही. या संवेदनेच्या बाबतीत मेंदूची व्यवस्थापन प्रणाली खूपशी आंतरजालासारखी आहे. मेंदूचे अनेक भाग एकमेकाशी वरून आदेश येण्याची वाट न बघता एकमेकाशी सरळ संपर्क साधत असतात. आंतरजालामधे जसे कोणतेही दोन सर्व्हर्स एकमेकाशी संपर्क साधतात तसेच. या ब्यवस्थापन प्रणालीमुळे भूक, ती लागण्याची कारणे, मानसिक तणावाशी असलेले त्याचे नाते हे सगळे स्पष्ट होण्यास मदत झाली आहे.

दुसर्‍याचे लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करणे, उद्दीपित होणे, झोपेचे चक्र किंवा वागण्याचे मूड्स या मेंदूच्या प्रक्रिया सुद्धा या आंतरजालासारख्या दळणवळणाच्या प्रणालीमुळे घडत असल्या पाहिजेत असे या शास्त्रज्ञांचे असेही म्हणणे आहे.

समोर चिवड्याचा डबा दिसला की काय करणार? मेंदूचे आंतरजाल बनले आहे त्यामुळे गोंधळ होणारच! असे मानून एक तरी चिवड्याची फक्की मारायला आता हरकत नाही. आंतरजाल म्हणजे गोंधळ असणारच!

12 ऑगस्ट 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “चवीने खाणार त्याला आंतरजाल देणार!

 1. 🙂 मस्त लिहिलाय. माझा आवडीचा विषय.. 🙂

  Posted by महेंद्र | ऑगस्ट 12, 2010, 6:39 pm
 2. भुकेची भावना हा सवयीमुळे होणारा प्रतिक्षिप्त प्रतिसाद आहे असे काही आहारतज्ञांचे म्हणणे आहे.

  Posted by मनोहर | ऑगस्ट 13, 2010, 10:59 pm
 3. atishay sundar .kharacha chavine khanar tyala aantarjal denaar ! Tumacha likhan mala khup avadat. tasech hehi avadala.

  Posted by purushottam | ऑगस्ट 14, 2010, 6:59 सकाळी
 4. chhan! aavadale.

  Posted by purushottam | ऑगस्ट 14, 2010, 7:03 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: