.
ताज्या घडामोडी Current Affairs

चोगलाम्सार मधली काळरात्र


चोगलाम्सार ही खरे म्हणजे लडाखमधली तिबेटहून आलेल्या निर्वासितांची एक वसाहत आहे. लडाखची राजधानी लेह पासून हेमिस या गावाकडे जाताना अंदाजे 9 किलोमीटर वर ही निर्वासित वसाहत लागते. या निर्वासितांना जेंव्हा ही जागा सरकारने स्थायिक होण्यासाठी म्हणून दिली त्या वेळी सिंधू नदीच्या काठावर असलेला हा एक खडकाळ व वाळू, खडीने भरलेला असा भूभाग होता. तेथे पाण्याची सोय नव्हती किंवा विजेची. येथे येण्य़ाजाण्यासाठी कोणत्याही सोयी नव्हत्या. येथे स्थायिक झालेल्या निर्वासितांनी मात्र या प्रदेशाचे नंदनवन केले. तिबेटची संस्कृती व इतिहास यांची माहिती करून घेण्याचे एक महत्वाचे केंन्द्र, हे खेडेगाव आज या निर्वासितांच्या प्रयत्नाने झाले आहे. एक लहान मुलांसाठीच असलेले छोटी वसाहत, गालिचे विणण्याचे केंन्द्र ही आता येथे आहेत. जवळच Central Institute of Buddhist Studies ही संस्था आहे. या सगळ्या कार्यांना आवश्यक ती वीज निर्माण करणारे केंन्द्र येथेच जवळ आहे. थोडक्यात ही वसाहत स्वावलंबी अशीच आहे. 2007 मधे दलाई लामांनी या वसाहतीला भेट देऊन आपले आशीर्वाद दिले होते. त्या वेळी येथे खूप तिबेटी जमा झाले होते.


ही वसाहत स्थापन झाल्यानंतर या भागाचे नशीबच पालटले. हा सर्व भाग आता लडाख मधले महत्वाचे कृषी उत्पादन क्षेत्र बनला आहे. याच्या आजूबाजूला असलेली लाथो, गाया, मिरू सारखी खेडी आता महत्वाची कृषी उत्पादन क्षेत्रे बनली आहेत. हा सर्व परिसर आता हिरवागार बनला आहे. आर्मी सरप्लस मालाच्या विक्रीचे हे एक महत्वाचे केंद्रही आता बनले आहे.


अशा या चोगलाम्सार वर, 6 ऑगस्टच्या रात्री एक अस्मानी संकट अचानक कोसळले. एक तासात 250 मिलिमीटर किंवा 10 इंच वृष्टी झाली. पाऊस हा प्रकारच माहिती नसल्याने, येथील घरे मातीची व कच्या बांधणीची असतात. ती अक्षरश: पाण्यात विरघळली. शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर शेकडो लोक अजून बेपत्ता आहेत. लेहकडे जाणारा व मनालीकडे जाणारा असे दोन्ही रस्ते वाहून गेले. इमारती, घरे ही नष्ट झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. ढगफुटी हे या अकस्मात व अकल्पित पावसाचे कारण म्हणून देण्यात आले.

हा ढगफुटी काय प्रकार आहे? असे मला वाटल्याने मी त्याचा थोडा फार शोध घेण्याचा प्रयत्न केला.

हवामान शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे ढगफुटी अशी काही नैसर्गिक घटना किंवा घटनाक्रम नसतोच. ज्या वेळी कोणत्याही एखाद्या ठिकाणी तासामधे 1 इंच किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो तेंव्हा त्या पावसाला Cloudburst किंवा ढगफुटी म्हटले जाते. म्हणजेच अतिवृष्टीला दिलेले हे फक्त एक नाव आहे. ढगफुटी हे काही अतिवृष्टीचे कारण नाही. या अशा ढगफुट्यांच्या जागतिक विक्रमांची नोंद ठेवली गेलेली आहे. ती अशी.

Barot, Guadeloupe, 26 November 1970, 1 मिनिटात 1.5 इंच

Port Bells, Panama, 29 November 1911, 5 मिनिटात 2.43 इंच

Plumb Point, Jamaica, 12 May 1916, 15 मिनिटात 7.8 इंच

Curtea-de-Arges, Rumania, 7 July 1947, 20 मिनिटात 8.1 इंच

Guinea, Virginia, USA, 24 August 1906, 40 मिनिटात 9.25 इंच


चोगलाम्सार मधली ढगफुटी, या जागतिक उच्चांकाच्या पंक्तीत बसणारी दर्दैवाने नक्कीच आहे हे स्पष्ट आहे. या ढगफुट्या होतात तरी कशाने? वळवाचा पाऊस पाडणारे व मेघगर्ज़नेसह वादळवारे आणणारे ढ्ग आपण सर्वांनी बघितलेले आहेतच. या मेघांना cumulonimbus clouds असे नाव आहे. हे ढग आणि पुरेशी आर्द्रता असलेली उष्ण हवा ही ढगफुटीसाठी आवश्यक असतात. या परिस्थितीमधे या ढगांतून खूप मोठे पाण्याचे थेंब तयार होऊ शकतात. तसेच या प्रकारच्या ढगांचे दुसरे एक वैशिष्ट्य असते. या ढगांच्या खाली अतिशय जलद असे हवा वर उचलली जाणारे हवा प्रवाह updrafts असतात. या हवा प्रवाहांमुळे व त्या हवा प्रवाहांच्यात निर्माण होणार्‍या निर्वात पोकळ्यांच्यामुळे, हे मोठे पाण्याचे बिंदू हवेत तरंगत राहतात व इतस्तत: फेकले जातात. या क्रियेने हे थेंब एकमेकावर आदळून आणखी मोठे पाण्याचे थेंब तयार होतात. काही कालानंतर या वर जाणार्‍या हवा प्रवाहांची शक्ती क्षीण होत जाते आणि मग हे तयार, मोठे पाण्याचे थेंब, जबरदस्त म्हणजे 20 ते 50 मैल प्रति तास या वेगाने, जमिनीवर कोसळतात. ही सर्व प्रक्रिया जमिनीवरून बघितली तर एखादी कागदाची पिशवी ओली होऊन फाटावी तशी दिसते व या फाटलेल्या ढगातून पाणी अक्षरश: कोसळू लागते. या बदाबद पडणार्‍या पाण्याने, खाली जमिनीवर असलेली झाडे झुडपे झोडपली जातात. हे पाणी शोषण्याची तिथल्या जमिनीची क्षमता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीवर पडत असल्याने संपते व स्थानिक पाण्याचे लोंढे वाहू लागतात. यामुळे झाडे, पिके, छोटे प्राणी हे नष्ट होतातच पण या पाण्याने जवळपासच्या नद्यांना अचानक महापूर संभवतात.


खरे तर लडाखची हवा अत्यंत कोरडी म्हणून प्रसिद्ध आहे या हवेत आर्द्रता ही जवळ जवळ नसतेच. त्यामुळे लडाखमधे पाऊस सहसा पडतच नाही. डोंगरमाथ्यावरचे वाळवंट असे लडाखला म्हणले जाते. त्यामुळे पावसापासून संरक्षण ही संकल्पनाच लडाखमधे नाही. जागतिक भू ताप वृद्धी मुळे म्हणा किंवा या भागातल्या हिरवाईमुळे म्हणा, येथले हवामान आता पाऊस पडण्यास अनुकूल होत चालले आहे असे या विषयातल्या तज्ञांचे म्हणणे आहे. लडाख हा भारतातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याचा आकार 95000 वर्ग किलोमीटर एवढा विस्तीर्ण आहे. मग या एवढ्या मोठ्या जिल्ह्यामधे हे अस्मानी संकट चोगलाम्सार वरच का कोसळले असा प्रश्न आता सर्व जण विचारत आहेत. या भागाच्या भूगोलाकडे जर बघितले तर असे लक्षात येते की मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन घेतले जात असल्याने जो एक मोठा हरित पट्टा या भागात निर्माण झाला आहे त्या पट्ट्याचा चोगलाम्सार मध्य आहे. या हरित पट्ट्यामुळे हवेमधल्या आर्दतेत खूप वाढ झाली आहे. या शिवाय सिंधू नदीचे जवळच असलेले पात्र व दिवसाचे गरम हवामान यामुळे ढग निर्माण होण्याची नैसर्गिक प्रक्रिया येथे चालू झाली आहे. 1992-93 सालापासूनच या भागात पाऊस पडू लागला आहे व या वाळवंटात पडणार्‍य़ा पावसामुळे, पर्यावरणतज्ञांसमोर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहले आहे.

या भागातली घरे, बौद्ध मठ हे पावसातही संरक्षण मिळेल या विचाराने बांधलेलेच नाहीत. या बदलत्या हवामानात त्यांचा टिकाव लागणे कठिण आहे. हवाबदल होऊ नये म्हणून लडाखमधे घेतली जाणारी कृषी उत्पादने घेऊ नयेत असे जर कोणी म्हटले तर तो वेडेपणा ठरेल. त्यामुळे सिंधू नदी काठच्या या सर्व गावांची, वस्त्यांची पावसाला, पुराला तोंड देऊ शकेल अशी परत बांधणी करणे एवढेच शक्य दिसते. ते जोपर्यंत होत नाही तो पर्यंत आणखी काही चोगलाम्सार परत होणारच असे दिसते आहे.

9 ऑगस्ट 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “चोगलाम्सार मधली काळरात्र

  1. लेहमधील ढगफुटी ही पर्जन्यमानापेक्षा तेथे पावसाचे पाणी वाहून जाण्यास वाटा नसल्याने त्रासदायक ठरली असे मला वाटते.

    Posted by मनोहर | ऑगस्ट 12, 2010, 10:06 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention चोगलाम्सार मधली काळरात्र « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑगस्ट 9, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: