.
Environment-पर्यावरण

अदृष्य होणारी नदी


या मे महिन्यात मी कूर्गला गेलो होतो. त्या वेळी, कावेरी नदीच्या उगमस्थानाला भेट देण्यासाठी जात असताना भागमंडलेश्वर या देवस्थानाजवळ कावेरी नदीचा त्रिवेणी संगम आहे असे समजल्यामुळे तो बघण्यासाठी तेथे थांबलो होतो. नदी पात्राजवळ प्रत्यक्ष जाऊन बघितल्यावर, फक्त दोन नद्यांची पात्रे एकमेकात मिळताना दिसली. तिथल्याच एका माणसाला विचारल्यावर या दोन नद्या म्हणजे कावेरी व कणिका असल्याचे समजले. मग दोन नद्यांचा संगम त्रिवेणी कसा असू शकेल अशी शंका आल्याने तिथल्याच एका दुकानदाराला माझी शंका विचारली. त्याच्या मताने तिसरी नदी म्हणजे सुज्योती ही नदी असून ती गुप्त असल्याने दिसू शकत नाही. नदीची ही गुप्तता हा काय प्रकार आहे? हे मला आतापर्यंत तरी कधीच सुधरलेले नाही.

अलाहाबाद जवळ पण असाच एक प्रसिद्ध त्रिवेणी संगम आहे, गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांचा. प्रत्यक्षात बघितले तर दोनच नद्या दिसतात, गंगा आणि यमुना. येथेही तिसरी, म्हणजे सरस्वती नदी ही गुप्तच आहे म्हणे! ही सरस्वती नदी म्हणजे तर अतिप्राचीन भारताच्या इतिहासाच्या आणि वैदिक संस्कृतिच्या अभ्यासकांचा मानबिंदू असलेली नदी. जी नदी कोठे होती? किंवा ती गुप्त कशाने झाली? याचा काहीही ठाव ठिकाणा लागलेला नसताना, आर्य संस्कृती सरस्वती नदीच्या काठी कशी बहरली होती याचे पोवाडे बरीच मंडळी गाताना आढळतात. मला मात्र एक मूलभूत प्रश्न इतके दिवस पडलेला होता. नद्या गुप्त कशा होऊ शकतात? त्या फार तर मार्ग बदलू शकतील परंतु भौगोलिक परिस्थिती बदललेली नसताना, कोणतीही नदी गायब कशी होणे शक्य आहे? नद्या निर्माण तरी कशा होतात? उंच डोंगरांवर पडलेले पावसाचे पाणी, अनेक छोट्या प्रवाहांच्यामधून खाली वाहत जाते. ते एकमेकाला मिळून एक मोठा प्रवाह बनतो. त्याला आपण नदी म्हणतो. या डोंगराचे शिखर पुरेसे उंच असले किंवा हा डोंगर उच्च अक्षांशांवर असला तर त्याच्या शिखरमाथ्याजवळ बर्फ पडलेले असते. उन्हाळ्यात हे वितळते व नद्यांना परत पाणी येते. त्यामुळे पाऊस किंवा बर्फ वृष्टी या दोन क्रिया जोपर्यंत अबाधित चालू आहेत तोपर्यंत नदी गुप्त कशी होऊ शकेल हे मला न समजलेले एक कोडे होते.

मात्र माझ्या मनातल्या या कोड्याचे उत्तर मला या वर्षी भारताच्या उत्तर सीमेवरच्या (1947 मधे पाकिस्तानने बळकवलेला असल्याने, सध्या त्या देशाच्या ताब्यात असलेल्या) हुंजा या भागात घडलेल्या एका नैसर्गिक उलथापालथीमुळे मिळाले आहे. लेह शहराच्या साधारण उत्तरेला हुंजा हा भाग येतो. अतिशय निसर्ग रम्य व रमणीय असा हा भाग असून हुंजा या नावाचीच नदी येथे वाहते. ही नदी पुढे गिलगिट नदीला मिळते व गिलगिट नदी नंतर सिंधू नदीला मिळते. या नदीच्या खोर्‍यातच हा भाग असल्याने साहजिकच हिरवागार असतो. येथे परदेशी प्रवाशांचीही खूप वर्दळ असते. ही हुंजा नदी या वर्षीच्या जानेवरी महिन्यात एकदम गुप्त झाली. गिलगिट नदीला येऊन मिळणारे या नदीचे पाणी एकदम कमी कमी होऊन त्याचा प्रवाह एकदम आटलाच. भारताकडून बळकावलेल्या या भागातून, पाकिस्तान सरकारने, चीनकडे जाणारा, काराकोरम हायवे म्हणून एक रस्ता बांधलेला आहे. हा रस्ता या हुंजा नदीच्या किनार्‍या किनार्‍याने जातो. हुंजा भागातच या रस्त्यावर सात पूल बांधलेले आहेत.

मागच्या वर्षाच्या अखेरीस या भागात मोठे धरणीकंपाचे धक्के बसले होते. या धक्यांमुळे इथले डोंगर व कडे यांना मोठमोठ्या चिरा व भेगा पडल्याचे आढळून आले होते. या वर्षीचा 4 जानेवारी हा दिवस या भागातील अट्टाआबाद व ऐनाआबाद या दोन खेडेगावांसाठी मोठा दुर्दैवी ठरला. या दिवशी या दोन्ही गावांच्यावर मोठमोठ्या दरडी एकदम कोसळल्या व दोन्ही गावांची नामोनिशाणीही उरली नाही. 20 गावकरी मृत झाले तर अनेक जण जखमी झाले. शेकड्यांनी इतर लोक बेघर झाले. इतकेच नाही तर या घटनेचे दुष्परिणाम नंतरच्या कालात हजारोंच्या संख्येने इतर लोकांना भोगावे लागत आहेत. या दरडी कोसळल्या त्या सरळ हुंजा नदीच्या पात्रावर. या दरडींच्यातले दगड. गोटे आणि मुरुम हा सगळा राडारोडा, नदीच्या पात्रातच पडला व त्यामुळे हुंजा नदीचा प्रवाहच बंद झाला. गिलगिट आणि इतर भागातल्या लोकांसाठी हुंजा नदी गुप्तच झाली.

परंतु हुंजा नदीच्या उगम स्थानाजवळच्या डोंगर शिखरांवरून खाली येणारे नद्या नाले तर वहात राहिलेच. हे सगळे पाणी हुंजा नदीच्या पात्रात, पुढे जाण्यास मार्ग नसल्याने, साठू लागले व अट्टाआबाद येथे एक नैसर्गिक असा मोठा जलाशय निर्माण होऊ लागला. या जलाशयाचे पाणी जसजसे वाढू लागले तसतसा काराकोरम रस्त्याच्या 25 किलोमीटर लांबीचा भाग व सात पूल पाण्याखाली बुडले. हा काल हिवाळ्याचा असल्याने हुंझा नदीकडे येणारे बहुतेक नदीनाले गोठलेले होते त्यामुळे फारसे पाणी सुरवातीला या जलाशयात आले नाही. परंतु उन्हाळ्याची चाहूल लागताच जलाशयामधल्या पाण्याची पातळी हळू हळू वाढू लागली. मे महिन्यापर्यंत हा जलाशय 17 किलोमीटर लांब व 353 फूट खोल झाला. फकिरबाद, मायून, हुसेनाबाद व खान ही खेडेगावांना जलसमाधी मिळाली व अनेक खेडेगावांचा संपर्क तुटल्याने त्यांना बोटीमार्फत आवश्यक त्या गोष्टी पुरवाव्या लागू लागल्या.

हुंजा नदी अशी गुप्त झाली खरी परंतु ती तशीच राहणे गिलगिट भागातल्या लोकांसाठी अतिशय धोकादायक आहे याची पाकिस्तान सरकारच्या लक्षात आले. हा नैसर्गिक बांध जर पाण्याच्या दाबाने फुटला तर नदीच्या खालच्या अंगाला असलेल्या असंख्य गावाना जलसमाधी मिळेल याची जाणीव झाल्याने पाकिस्तान सरकारने आपल्या मायबाप चिनी सरकारला बोलावणे धाडले. चिनी व पाकिस्तानी तंत्रज्ञांनी हा बांध फोडण्याचा जानेवारीपासून प्रयत्न चालू केला असला तरी नदीत पडलेला हा राडारोडा अंदाजे 196000 घन मीटर एवढा असल्याने मार्च महिन्यापर्यंत त्यांना फारसे यश मिळाले नाही. हुंजा नदी गुप्तच राहिली.

मे महिन्यापर्यंत या नदीवर निर्माण झालेल्या नैसर्गिक बांधामधून पाण्यासाठी एक पाट काढण्यात पाकिस्तानी तंत्रज्ञाना यश मिळाले प्रथम हा पाठ 15 मीट्रर खोल होता नंतर तो 39 मीटर खोल करण्यात आला. हुंजा नदीच्या खालच्या पात्रात थोडेफार पाणी परत दिसू लागले. उन्हाळ्यामुळे पर्वत कड्यांवर असलेले हिमनद वितळू लागले आहेत. व त्यामुळे अट्टाआबाद जलाशया मधे पाणी झपाट्याने येऊ लागले आहे.

जुलै 22 ला पाटातून 17000 क्यूसेक्स एवढे पाणी वाहू लागले आहे. आता हा बांध फुटला तर कमालीची गंभीर परिस्थिती निर्माण होईल हे लक्षात आल्याने पाकिस्तानी सरकार चीनला पूर्णपणे शरण गेले आहे. हा प्रश्न सोडवण्याची त्यांनी चीनला अधिकृत विनंती केली आहे.

आधुनिक कालात मानवाजवळ असणारे तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री यामुळे गुप्त झालेल्या हुंजा नदीचा प्रवाह परत चालू होईलही. परंतु पूर्वीच्या काली नद्या गुप्त कशा होत असत याच्या एका कारणाचे प्रात्यक्षिकच निसर्गाने आपल्याला दाखवून दिले आहे हे मानलेच पाहिजे.

सरस्वती नदी गुप्त कशी असू शकेल हा प्रश्न मी परत कोणाला कधी विचारीन असे मला तरी वाटत नाही.

7 ऑगस्ट 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “अदृष्य होणारी नदी

 1. सुंदर माहिती! आपले सर्वच लेख माहितीपूर्ण असतात.

  Posted by निरंजन | ऑगस्ट 7, 2010, 5:06 pm
 2. सरस्वती नदी गुप्त होण्यावर भूगर्भतज्ञानी यापूर्वीच संशोधन केले आहे. त्या माहितीसाठी हुंझा नदी गुप्त होण्याची वाट बघणे आवश्यक नव्हते.

  Posted by मनोहर | ऑगस्ट 7, 2010, 10:29 pm
  • मनोहर

   सरस्वती नदी संबंधीच्य संशोधनाबद्दल मीही वाचलेले आहे. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की या ब्लॉगवरचे माझे लेखन म्हणजे काही एखादा शास्त्रीय प्रबंध नसतो. लेख लिहिताना फक्त शास्त्रीय निरिक्षणांचेच किंवा घडामोडींचेच वर्णन केले तर तो लेख नीरस हो ऊन वाचनीय रहात नाही असे मला वाटते. या साठी काही पथ्ये पाळावी लागतात. या पथ्यांमधे वैयक्तिक अनुभव किंवा सर्वांना ज्ञात असलेल्या गोष्टींशी मूळ विषयाचा संबंध जोडला तर लेखन जास्त रोचक होते असे मला वाटते. आपल्याला तसे वाटत नसल्याचे आपल्या प्रतिसादावरून दिसते. We agree to differ, एवढेच म्हणता येईल.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 8, 2010, 8:42 सकाळी
 3. आपण दिलेली ही माहिती अत्यंत उपयुक्त आणि सरस्वती नदीच्या गुप्त होण्याच्या तर्काला किंवा संशोधनाला पुष्टी देणारी आहे. असेच लिहित रहा. धन्यवाद.

  Posted by Mangesh Nabar | ऑगस्ट 9, 2010, 11:36 सकाळी
 4. ही माहिती खुपच उपुक्त आहे

  Posted by girish | ऑगस्ट 18, 2010, 1:11 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention अदृष्य होणारी नदी « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑगस्ट 7, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: