.
Musings-विचार

थेउरचे थेर!


चार पाच दिवसांपूर्वी, सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांवर, काहीतरी प्रचंड सनसनाटी बातमी असावी अशा अविर्भावाने, एक बातमी सतत दाखवली जात होती. ती बातमी सादर करण्याची पद्धत, वृत्त निवेदिकेचे हात वारे यावरून काहीतरी अफलातून घडले आहे असे दिसत होते. त्यामुळे मी मुद्दाम ती बातमी लक्ष देऊन ऐकली. पुण्याच्या जवळ थेऊर नावाचे एक गाव आहे. या गावात थोरले माधवराव पेशवे यांची समाधी असल्याने तसे ते प्रसिद्धच आहे. तर या थेउर गावातल्या एका मोठ्या फार्म हाऊस मधे पार्टी केली म्हणून पुण्याच्या एका कॉलेज मधल्या युवकयुवतींना पोलिसांनी अट्क केली होती. मुलींनी खूप तोकडे कपडे घातले होते. त्या नाचत होत्या वगैरे, वगैरे. बातमी तशी संताप व उद्वेगजनक होती यात शंकाच नाही. कॉलेजमधे शिक्षण घेण्याचे सोडून ही पोरेपोरी हे उद्योग करायला थेऊरला कशाला गेली होती? अलीकडे कॉलेजमधे जाणार्‍या मुलांच्या जवळ एवढे पैसे कोठून येतात? यांना चांगली शिक्षा व्हायला पाहिजे वगैरे विचार मनात येऊन गेले. नंतर जरा बारकाईने बातमी ऐकली व बघितली.

ही मुले मुली, एकतर कॉलेजमधे शिकणारी असली तरी पदव्युत्तर एम.बी.. करणारी होती. म्हणजेच ही मुले मुली नसून सज्ञान युवकयुवती होते. ही माहिती कळल्यावर या बातमीतला दमच गेला. एकवीस, बावीस वर्षांच्या मुलांनी पार्टी करायची नाही तर काय आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी करायची का? मग पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई का केली? दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात सगळी डिटेल्स नीट वाचली व मग वाटले की पोलिसांची ही कारवाई म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचे उद्योग दिसत होते.

काही वर्षांपूर्वी सिंहगड जवळ अशाच एका पार्टीवर पोलिसांनी छापा घालून अमाप प्रसिद्धी मिळवली होती. तो छापा घालणार्‍या पोलिस अधिक्षकाच्या मुलाखती, टी.व्ही. , वर्तमानपत्रे यात झळकल्या होत्या. परंतु ती पार्टी निराळ्या प्रकारची होती. अफू. चरस, गांजा वगैरेसारख्या मादक व आरोग्यास विघातक अशा पदार्थाचे सेवन त्या पार्टीत चालू होते. त्या पार्टीमधे चालू असलेले प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर व अनैतिक होते यात शंकाच नव्हती. म्हणूनच सर्व लोकांनी, हे असले उद्योग बंद पाडल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले होते.

थेऊरच्या एका फार्म हाऊसमधे धांगडधिंगा चालू आहे अशी खबर आल्यावर, सिंहगडच्या पोलिसांना प्रसिद्धी मिळाली तशी आपल्यालाही मिळेल, असे बहुदा थेऊरच्या ग्रामीण विभागाच्या पोलिसांना व अधिक्षकांना वाटले असावे व त्यांनी ताबडतोब छापा घालण्याचे ठरवले असावे. तिथे गेल्यावर खरा प्रकार काय आहे? हे अर्थातच त्यांना समजले असणार. परंतु या युवकयुवतींना थोडी दरडावणी, थोडी समजूत घालून ती पार्टी पोलिसांनी सुनियंत्रित केली असती तर जास्त योग्य ठरले असते.

आता या युवकयुवतींनी गुन्हे तरी काय केले असावेत? एक तर त्यांच्या पार्टीत मोठमोठ्याने गाणी बजावणी चालू असल्याने शांततेचा भंग झाला होता. दीड एक महिन्यापूर्वी माझ्या घराजवळ 3 तास प्रचंड आवाज करणारी एक मिरवणूक व त्या समोर काही टारगट टाळकी यांचा धसका भरणारा नाच कार्यक्रम श्रवण करण्याचे महाभाग्य मला लाभले होते. त्या वेळी चार वेळा पोलिस कंट्रोल रूमला (100 नंबर) दूरध्वनी करून सुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याची आठवण माझ्या मनात अजूनही ताजी असल्याने, पोलिसांना शांततेच्या भंगाचे सोयर सुतक किती असते याची मला पूर्ण कल्पना आहे. कदाचित माझ्या घरासमोर झालेला तो शांतता भंग कोणत्यातरी बड्या असामीच्या सहकारी मंडळींनी केला असल्याने तो क्षमेस पात्र ठरला असावा व या थेऊरच्या मंडळीत कोणीच बड्यांचे राजपुत्र किंवा राजकन्या नसल्याने त्यांचा दंगा अक्षम्य असावा. अर्थात माझ्या घराजवळच्या शांतताभंगाकडे पोलिसांनी केलेले दुर्लक्ष हे काही थेऊरच्या या प्रकाराचे जस्टीफिकेशन होऊ शकत नाही. शांतताभंग कोठीही झाला तरी तो निंद्यच आहे. परंतु या ठिकाणी पोलिसांनी फक्त या मंडळींना सांगून समजावून आवाज कमी करायला लावला असता तरी चालले असते.

आता या पार्टीमधे काय चालले होते? फ्रेन्डशिप डे ची ही पार्टी असल्यामुळे नाच गाणी आणि थोड्या फार प्रमाणात मदिरा सेवन तेथे चालू होते. म्हणजे आजकाल पुण्यामधे लब्धप्रतिष्ठित समाजातल्या पार्ट्यांमधे जे चालू असते तेच चालू होते. मी टी.व्ही. वर जी दृष्ये बघितली त्यात बहुतेक मुलींनी स्कर्ट किंवा फ्रॉक घातलेले मी बघितले. हे दोन्ही ड्रेस कमीत कमी पन्नास वर्षे तरी पुण्यातल्या प्रतिष्ठित समाजातल्या मुली सर्रास वापरतात. टी.व्ही. वाहिन्यांच्यावर जे कार्यक्रम चालू असतात त्यातल्या मुलींच्या अंगावर तर असे कपडे नेहमीच दिसतात. पोलिसांनी असेही शोधून काढले की या युवकयुवतींच्याकडे मद्यप्राशन करण्याचे परवाने नसल्याने त्यांनी गुन्हे केले आहेत. आता तांत्रिक दृष्ट्या हा गुन्हा आहे हे मला पूर्ण मान्य आहे. परंतु आज पुण्यात जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे छोट्या, मोठ्या सर्व पार्ट्यांमधे मदिरा ही ठेवलेलीच असते. या एकूण सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब अशा युवकयुवतींच्या पार्ट्यांच्यामधे पडणे साहजिकच आहे.

या पार्टीत सहभाग घेतलेले बहुतक युवकयुवती, पुण्याच्या बाहेरून शिक्षणासाठी आलेले आहेत हे ही लक्षात घेतले पाहिजे. त्यांना येथले कायदेकानू काय आहेत? याची माहिती कितपत होती? हे पोलिसांनी बघितले होते का? या पार्टीचे आयोजन ज्या काही मुलांनी केले होते त्या मुलांनी महाराष्ट्रात मदिरा प्राशन करण्यासाठी परवाना लागतो याची कल्पना बाकीच्या मुलांना दिली होती का? वगैरे गोष्टींची शहानिशा पोलिसांनी करावयास पाहिजे होती.

थेऊरच्या या एकूण पार्टी प्रकाराला माझा पाठिंबा आहे असा कोणी अर्थ काढू बघेल तर मात्र तो चुकीचा ठरेल. फ्रेन्डशिप डे च्या या पार्टीची माहिती या युवकयुवतींच्या कॉलेज अधिकार्‍यांना आधी देऊन त्यांची परवानगी घेऊनच ही पार्टी आयोजित करणे आवश्यक होते. तसेच पार्टीमधे मदिरा उपलब्ध करण्याचा प्रकारही योग्य म्हणता येणार नाही. विशीबावीशी मधल्या या तरूण तरूणींचा आयुष्याबद्दलचा उत्साहच एवढा ओसंडून वाहत असतो की त्यांना मदिरा प्राशनाची गरजच काय आहे? तसेच ही पार्टी पुण्यामधेच कोठेतरी आयोजित केली गेली असती तर या मुला मुलींना समाजकंटकांपासून उपद्रव होण्याची भिती फारशी राहिली नसती.

असो! झाले ते झाले. आता या प्रकरणातून धडा घेऊन कॉलेजच्या अधिकार्‍यांनी योग्य ते नियम ठरवून द्यावेत म्हणजे असे प्रकार परत होणार नाहीत. तसेच पोलिस अधिकार्‍यांनी या मुला मुलींना समज देऊन सोडून द्यावे व या प्रकरणावर पडदा टाकावा हेच उत्तम ठरेल.

6 ऑगस्ट 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

9 thoughts on “थेउरचे थेर!

 1. ही सगळी मुलं एमबीए ची आहेत, म्हणजे समाजाचे जबाबदार नागरीक, त्यामुळे त्यांची वागणूक नियमाला धरून असायला हवी होती . जर ते तसे वागले नाहीत, तर त्यांच्यावर केलेली कारवाई अयोग्य कशी काय म्हणता येईल? उ;लट पोलिसांनी केलेल्या कारवाईचे मी समर्थनच करतो.

  अशी वागणूक जर आपल्या मुलींनी, सुनांनी किंवा बायकोने केली असती , म्हणजे अशा प्रकारे एंजॉय केलेले जर आपल्याला चालेल का? अर्थात नाही… मग जी गोष्ट आपल्या घरच्या लोकांनी केलेली चूकीची असते, तीच गोष्ट इतरांनी केल्यावर योग्य होऊच शकत नाही. असो..

  Posted by महेंद्र | ऑगस्ट 6, 2010, 6:21 pm
  • महे न्द्र
   आपले म्हणणे जरी बरोबर असले तरी आपले स्वत:चे विचार आपण दुसर्‍यावर लादू शकत नाही हे ही तेवढेच खरे आहे. पोलिसांनी केलेली कारवाई माझ्या मते फार टोकाची आहे. या मुलांना नुसती समज देणे जरूरीचे होते असे मला वाटते.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 6, 2010, 8:31 pm
 2. Ya vishayavar khoop post ali ahet. Hot topic ahe. Aniket ani Mahendraji yani already changle vichar mandle ahet.

  Mala tumchi post sarvaat yogy ani balanced vatali.

  Me Mahendrajinchya blog var asheech pratikriya dili ahe.

  Posted by ngadre | ऑगस्ट 6, 2010, 7:33 pm
 3. माझ पण हेच मत आहे. आम्ही पण तरुण आहोत आणि खूप एन्जोय करतो पार्ट्या करतो, फिरायला जातो, पण सगळ एका चौकटीत असत आणि असाव, पण असे शे-पाचशे मुल मुली एकत्र येऊन जो काही धिंगाणा करत होते त्याचे आम्ही तरुण मंडळी देखील समर्थन करणनाही. अशा गोंधळात अनैतिक प्रसंग ओढवणे सहज शक्य आहे. नाही का?

  Posted by prashant thakur | ऑगस्ट 6, 2010, 7:37 pm
 4. मस्त, माझेही असेच काहीसे विचार मी इथे मांडलेले आहेत

  http://manatale.wordpress.com/2010/08/05/%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%8a%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%82-%e0%a4%95/

  तुमची परवानगी गृहीत धरुन तुमच्या पोस्टची लिंक माझ्या पोस्टच्या प्रतिक्रियेमध्ये टाकतो.

  मला वाटते लोकांनी खरंच स्वतःची मत दुसर्‍यावर लादणं आणि उठसुठ उपदेश करणे सोडावे, आजच्या पिढीला त्यांच्या वयापेक्षाही जास्तीचे ज्ञान आहे

  Posted by अनिकेत | ऑगस्ट 7, 2010, 11:46 सकाळी
  • अनिकेत

   माझ्या पोस्टची लिंक तुमच्या ब्लॉगच्या प्प्रतिक्रियांमधे जरूर टाकावी. अशा विषयांवर जेवढे विचारमंथन होईल तेवढे चांगलेच आहे.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 7, 2010, 12:49 pm
 5. अगदी योग्य आहे. तुमच्या सोबत जो प्रकार घडला तो खरंच खूप वाईट होता. आता या विषयावर अधिक चर्चा करण्यात मला तरी काही फायदा वाटत नाही. जे घडले ते चुकीचे होते. आणि त्याची शिक्षा ज्यांनी ती पार्टी केली त्यांनी भोगली आहे. बाकी तुमचे लेख नेहमीच माहितीपूर्ण आणि विचारांना खाद्य असतात. तुमच्या मताशी मी सहमत आहे.

  Posted by हेमंत आठल्ये | ऑगस्ट 9, 2010, 9:42 pm
 6. आपण थेवूरच्या घटनेबद्दल आपले मत या लेखाद्वारे मांडले, मी या घटनेचे समर्थन कर णार नाही, पाश्च्यात्य संस्कारांचे अनुकरण करुन आजची तरुण पिढी खरच बिघडत चालली आहे, पुण्यातील वारंवार घडणा-या अशा घटनांनी पुणे बदनाम होत आहे आता पुणेकरंनी पुढाकार घेवुन अशा वागण्याला विरोध केला पाहीजे, आपल्या घरासमोर घडलेला धिंगाणा त्रासदायदच होता, मलाही अशा त्रासाला अनेकवेळा सामोरे जावे लागलेले आहे. तरुणांनी मदीराप्राशन करावे, परंतु कळत नकळत पुढे हीच मुले मादक पदार्थांच्या आहारी जातात, त्यमुळे अशा वागण्याला विरोध केलाच पाहीजे. amol deshmukh

  Posted by aamya | ऑगस्ट 10, 2010, 7:38 pm
 7. थेवूरची घटना समर्थनीय असुच शकत नाही, या पार्टीत सामील असणा-या सर्व युवक-युवतींवर संबधीत महाविद्यालयांनी योग्य ती कारवाई केलीच पाहीजे, तरच पुण्यातील वारंवार घडणा-या अशा घटना थांबतील. … Ad.Shivaji Nimbalkar

  Posted by aamya | ऑगस्ट 10, 2010, 7:54 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: