.
History इतिहास

विश्वासघात- 3


1959 च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या पूर्व लडाख सीमेवरच्या चिनी सैन्याची परिस्थिती इतकी मजबूत झाली होती की त्यांच्यासमोर भारतीय सीमारक्षक पोलिसांचा निभाव लागणे अशक्यच होते. कोन्गका खिंडीमधल्या दुर्घटनेनंतर, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सीमा रक्षणाची जबाबदारी भारतीय सैनिक दलांकडे सोपवण्याचा निर्णय घ्यावाच लागला. या निर्णयाप्रमाणे 1 नोव्हेंबर 1962 रोजी CRPF ची दले लडाख मधून हलवण्यात आली व त्या जागी सैनिक दलाच्या तुकड्या येऊ लागल्या. नेहरूंच्या या निर्णयाचे स्वागत चीनने लडाख मधे भारतीय सैनिक आले तर चीन इशान्येला मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेला उतरेल. ” अशा धमकीने केले.

पूर्व लडाखमधे जी प्रत्यक्ष परिस्थिती होती ती, “आहे ते संभाळले तरी खूप झाले!” असे वाटण्याजागीच होती. अक्साईचिन चा भाग कागदावर जरी भारताचा भूभाग म्हणून दाखवलेला असला तरी या भूभागाकडे जाणारे सर्व रस्ते चिनी सैनिकांनी आपली मजबूत ठाणी स्थापन करून पूर्णपणे अड्वलेले होते. उत्तरेला, चिपचॅप नदीच्या जवळचा भाग व कोन्गका खिंडीजवळचा भाग हे तर पूर्णपणे चीनच्या ताब्यात होतेच. या शिवाय चुशुल गावाच्या पूर्वेला असलेल्या युला खिंडीपासून स्पॅनगुर गॅप आणि पॅनगुर सरोवराच्या परिसरात चिनी ठाणी स्थापित झालेली होती. या ठाण्यांमुळे चुशुल जवळची विमाने उतरण्याची धावपट्टी चिनी सैन्य कधीही काबीज करू शकेल अशी परिस्थिती होती. त्या शिवाय चुशुल ला लेहहून रसद पुरवण्याचा डुन्गटी-. त्साका खिंडीतून येणारा मार्ग सुद्धा चिनी सैन्याच्या नजरेखाली आला होता. चिनी सैन्य चुशुल ची रसद कधीही तोडू शकण्याच्या परिस्थितीत होते. थोडक्यात सांगायचे तर भारतीय सैन्याला अक्साईचिन भागाकडे जाता येणे आता अशक्यच होते. अक्साईचिन भूभाग भारताच्या ताब्यातून केंव्हाच गेला होता. दिल्लीच्या राजकारणी मंडळींनी कॅप्टन नाथ व सूरी यांच्या 1952 मधल्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम होता.

ही सर्व परिस्थिती बघता भारतीय पायदळाच्या Western Command ने कमीत कमी 1 डिव्हिजनची (15000 सैनिक) मागणी सैनिक मुख्यालयाकडे केली होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना 1 ब्रिगेड ( 3000 सैनिक) एवढेच सैन्य लडाखच्या रक्षणासाठी देण्यात आले होते. यातले बहुतेक सैनिक एवढ्या उंचीवर आणि बर्फाच्छादित प्रदेशात लढण्यासाठी सरावलेले नव्हते. त्या शिवाय या सैनिकांच्या कडे या उंचीवर आवश्यक अशा कपड्यांची सुद्धा पाहिजे तेवढी उपलब्धता नव्हती. चिनी सैन्याचे लडाख मधले उद्योग आतापर्यंत नेहरूंच्या आदेशांप्रमाणे भारतीय जनतेपासून गुप्त ठेवण्यात आले होते ते आता सर्व लोकांना समजले असल्याने भारताने काहीतरी प्रत्यक्ष कृती करावी असा दाब नेहरूंच्यावर येऊ लागला. त्यामुळे 1959 च्या अखेरीस नेहरूंनी आपली Forward Policy घोषित केली. या योजनेप्रमाणे भारतीय सैन्याने सध्याच्या स्थानांच्या पुढे जाऊन नवीन चौक्या बसवाव्यात असे आदेश त्यांना देण्यात आले.

लडाख मधली प्रत्यक्ष परिस्थिती सैनिक दृष्टीने इतकी निराशाजनक होती की जिथे चिनी सैनिक नव्हते तिथे जाऊन चौक्या बसवणे एवढेच करणे तिथल्या भारतीय सैन्याला शक्य होते. पुढच्या वर्षभरात अशी 17 ठाणी भारतीय सैनिकांनी उभारली. या पैकी बहुतेक ठाणी अशा स्थानांच्यावर होती की त्यांचे संरक्षण करण्यासाठी रसद पुरवण्याचे खात्रीलायक मार्ग, वेळ पडल्यास तोफखाना किंवा रणगाड्यांचा सपोर्ट यापैकी काहीही देणे शक्य झाले नसते. कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या आक्रमणाला तोंड देण्यास या चौक्या सैनिक दृष्टीने समर्थ नव्हत्याच. त्यामुळे 1962 मधल्या लढाईच्या वेळी त्यांचा संपूर्ण पाडाव झाला यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. उत्तरेला दौलत बेग ओल्डी पासून ते दक्षिणेला डेमचोक पर्यंत अशी 17 ठाणी भारतीय सैन्याने उभारली. चुशुल गवाचे संरक्षण करता यावे यासाठी या गावाच्या परिसरात युला खिंड, पॅनगॉन्ग सरोवराच्या उत्तर किनार्‍यावर असलेली सिरिजॅप खिंड,गुरन्ग टेकडी, मागर टेकडी व रेझान्ग खिंड या सारखी ठाणी प्रस्थापित करण्यात आली. या सर्व ठाण्यांचा लगेच एवढाच फायदा झाला की या भागातली चिनी सैनिकांची धिटाई व मनमानी कमी झाली व थोडाफार तरी वचक निर्माण झाला. बरेच समीक्षक 1962 मधल्या युद्धाला, ही Forward Policy हे प्रमुख कारण मानतात. ते काही अंशी खरेही आहे. परंतु जर भारतीय सैन्य 1960 मधे पुढे गेलेच नसते तर चिनी सैनिकांच्या सतत जास्त जास्त भाग बळकवण्याच्या वृत्तीला काहीच अटकाव बसला नसता हे ही तेवढेच खरे आहे. 1962 मधे युद्धसदृष्य परिस्थिती जसजशी तयार होऊ लागली तसतशा आणखी काही सेना तुकड्या लडाख मधे दाखल झाल्या. या तुकड्यांच्यात तोफखान्याच्या 2 तुकड्या व रणगाड्यांची एक तुकडी यांचाही समावेश होता.

1962 च्या मे महिन्यात एक JCO ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर व 14 इतर सैनिक संभाळत असलेल्या एका चौकीसमोर 200 चिनी सैनिक हल्ला करण्याच्या तयारीने 120 यार्डावर जमा झाले. या अधिकार्‍याने मनाचा तोल न जाऊ देता तो गप्प राहिला. काही वेळाने चिनी सैनिक निघून गेले. 10 जुलैला झालेल्या अशाच एका घटनेत. एका गुरखा सैनिक सांभाळत असलेल्या चौकीसमोर 350 चिनी सैनिक 200 यार्डावर जमा झाले. लाऊडस्पीकर्स वरून त्यांनी गुरखा सैनिकांना त्यांनी भारतासाठी न लढण्याचा प्रचार केला. या ठाण्यावर असलेला सुभेदार जंग बहादूर याने गुरखाली मधूनच चिनी सैनिकांना शेलक्या शिव्या हासडल्यावर चिनी सैनिक निघून गेले. या प्रकारच्या घटनांनी युद्ध अटळ आहे हे लडाख मधल्या सैनिकांच्या पूर्ण लक्षात आले.

19/20 ऑक्टोबरच्या रात्री चिनी सैनिकांनी पहिले हल्ले चढवले. अपर शोयोक नदीला गालवन नावाची एक नदी सासेर ब्रॅन्गसा या कॅम्पच्या जवळ मिळते. या गालवन नदीजवळ असलेल्या चौक्यांजवळ हे हल्ले चढवले गेले. या चौकीवर दिवसभर तोफगोळ्यांचा मारा केल्यावर ही चौकी त्यांना सर करता आली. सुभेदार जंग बहादूर थापा या हल्ल्यात मरण पावले. दौलत बेग ओल्डी च्या उत्तरेला असलेल्या चांदणी चौकीवर सुभेदार सोनम स्तोबदान व इतर 28 सैनिक होते. या चौकीवर 500 चिनी सैनिकांनी हल्ला केला. या चौकीवर असलेल्या सैनिकांपैकी फक्त एक जखमी सैनिक वाचला. सुभेदार सोनम यांना नंतर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. 17000 हजार फूट उंचीवर असलेल्या पारमोदक चौकीवर फक्त 5 जवान होते. हे सर्व जण मृत्युमुखी पडले. 18645 फूटावरच्या बिशन चौकीवर चिनी सैनिकांनी 45 मिनिटे बॉम्ब वर्षाव करून नंतर दोन हल्ले चढवले. परंतु हे दोन्ही हल्ले परतवले गेले. प्रत्यक्षात या सगळ्या चौक्या फक्त टेहेळणी करण्यासाठी होत्या व त्यांना युद्धप्रसंग आल्यास परत येण्यास सांगितलेले होते. गालवन नदीच्या उत्तरेला असलेल्या सीमेवरची बहुतेक ठाणी चिनी सैनिकांनी याच दिवशी सर केली होती.

या भागातल्या चौक्यांच्यावर पहिले चिनी हल्ले चढवले गेले.

21 ऑक्टोबरला चिनी सैनिकांनी पॅन्गगॉन्ग सरोवराच्या उत्तर किनार्‍यावर असलेल्या सिरिजॅप ठाण्यांच्यावर हल्ला चढवला. दोन अडीच तास तोफांचा मारा या चौकीवर केल्यावर त्या चौकीच्या दिशेने चिनी रणगाडे पुढे सरकले . सिरिजॅप चौकीतल्या सैनिकांजवळ रणगाडा विरोधी कोणतीच हत्यारे नव्हती. मेजर धनसिंह थापा हे या चौकीचे नेतृत्व करत होते. ते व त्यांच्या हाताखालचे गुरखा सैनिक मग खुकरी व बायोनेट सरसावून बाहेर पडले. शंभराच्यावर चिनी सैनिकांना कंठस्नान घातल्यानंतरच हे सैनिक मृत्युमुखी पडले. मेजर थापा यातून वाचले. त्यांना नंतर परम वीर चक्र देण्यात आले. सिरिजॅप चौकी पडल्यावर युला खिंडीतील चौकीला मदत पुरवणे अशक्य असल्याने त्यातल्या सैनिकांना मागे बोलावले गेले. आता चुशुलच्या उत्तरेला असलेल्या सर्व चौक्या चिनी सैनिकांनी सर केल्या होत्या.


27 ऑक्टोबरला चिनी सैनिकांनी दक्षिणेला असलेल्या डेमचोक गावाजवळच्या चॅन्ग खिंड व जारा खिंड यामधल्या चौक्यांवर हल्ले चढवले. चॅन्ग खिंदीत नेतृत्व करत असलेला जमादार इशे थुन्डुप हा मारला गेला पण त्याने आपल्या सैनिकांचे प्राण वाचवले. त्याला महा वीर चक्र देण्यात आले. जारा खिंडीतील सैनिक रात्री निसटू शकले. या दोन्ही खिंडीतील ठाणी पडल्याने डेमचोक व डेमचेले ही दोन्ही गावे चिनी हातात पडली होती व या खिंडीच्यातून चिनी प्रदेशात प्रतिहल्ला करण्याचे मार्ग चिनी सैनिकांनी बंद केले होते. आता फक्त चुशुल आणि त्याच्या जवळच्या चौक्याच चिनी सैनिक आणि लेह यांच्या मधे होत्या.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लेह मधले कमांडर ब्रिगेडियर रैना यांनी 25 पौंडी हॉवित्झर तोफा व AMX Light Tanks चुशुल विमातळावर उतरवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. व हे रणगाडे व तोफा पुढच्या 2/3 दिवसात चुशुल ला उतरवले गेले. हे रणगाडे विमानाने आणणे हे भारतीय विमानदला साठी एक मोठे आव्हान होते. ते त्यांनी यशस्वी रित्या पार पाडले. रणगाडे व तोफा चुशुलच्या संरक्षणासाठी आल्याने चुशुलच्या सैन्याला जो एक मोठा कमीपणा जाणवत होता तो भरून निघाला. या शिवाय आणखी सेना तुकड्या चुशुल मधे दाखल झाल्या. चुशुलचे संरक्षण करण्याची भारतीय सैन्याने शक्य तेवढी तयारी केली. चुशुलला रसद पुरवणारा डुन्ग्टीत्साका खिंडीतला रस्ता चिनी सैन्याच्या ताब्यात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन चुशुलला पोचणारा दुसरा रस्ता इंजिनीअर्स कडून तयार करून घेण्यात आला.

चुशुल वरचा हल्ला शेवटी 18 नोव्हेंबर 1962 ला सकाळी सुरू झाला. प्रथम स्पॅन्गुर गॅप, रेझान्ग खिंड, गुरन्ग टेकडी, मागर टेकडी व त्याच्या मागे असलेला त्साका खिंडीतला रस्ता व विमानतळ यांच्यावर अतिशय भेदक असा मारा चिनी तोफखाना व उखळी तोफा यांनी चालू केला. परंतु हा मारा तितकासा प्रभावी ठरू शकला नाही. चिनी तोफखाना इतका धीट झाला होता की त्यांच्या स्पॅन्गुर गॅप मधल्या चौक्यांच्या पुढे येऊन त्यांनी विमानतळावर मारा करण्याचा प्रयत्न चालू केला. मागर टेकडीवरच्या तोफांनी या मार्‍याला चांगलेच प्रत्युत्तर दिले व काही तोफा जागेवर नष्ट झाल्याने तोफखान्याने मागे पळ काढला व या नंतर विमानतळावर तोफगोळे परत कधी पडले नाहीत.


बंकर्सचे मार्कर दिसत आहेत तेथे 120 मीटर अंतरात भारतीय सैनिक सज्ज होते. दोन्ही बाजूंच्या चढांच्यावरून हजारो चिनी सैनिकांच्या लाटा येत राहिल्या. मेजर शैतान सिंह व त्यांचे सैनिक यांनी शेवटचा माणूस व शेवटची गोळी संपेपर्यंत येथून न भूतो न भविष्यति असा लढा देऊन एक हजारावर चिनी सैनिकांना यमसदनी पाठवले.


तोफखान्याच्या अग्नी वर्षावानंतर चिनी पायदळ प्रथम रेझान्ग खिंडीच्या दिशेने पुढे सरकले. रेझान्ग खिंडीमधे मेजर शैतान सिंह यांच्या नेतृत्वाखाली 118 सैनिक खंदकांच्यात युद्धासाठी तयार होते. या जागेच्या आणि भारतीय तोफखान्याच्या मधे एक टेकडी येत असल्याने त्यांना तोफखान्याचा सपोर्ट मिळणे शक्य नव्हते. चिनी सैन्याने ही या खिंडीवर ताबा मिळवण्यासाठी अक्षरश: हजारो चिनी सैनिकांना हल्यावर पाठवले होते. चिनी सैन्याचे लाटा तंत्र या ठिकाणी प्रथम भारतीय सैनिकांना अनुभवता आले. मशीन गन च्या सहाय्याने शेकडो सैनिकांना यमसदनी पाठवल्यावर सुद्धा चिनी सैनिकांच्या लाटा या जागेकडे येतच राहिल्या. अतुल्य शौर्य व धैर्य यांच्या पाठिंब्यावर या 118 सैनिकांनी जी लढाई केली त्याची तुलना फार कमी लढायांशी होऊ शकते. मला तर या लढाईचे वर्णन वाचल्यावर पावन खिंड व बाजी प्रभु देशपांडे यांचीच आठवण झाली. अखेरीस शेवटचा सैनिक व शेवटची गोळी संपल्यावर ही खिंड पडली. या नंतर एक हजारावर चिनी सैनिकांची प्रेते या डोंगर उतारावर पडलेली होती. या हल्याचे समग्र वर्णन या दुव्यावर वाचता येईल. ही चौकी पडली तेंव्हा 118 पैकी 109 सैनिक मृत्युमुखी पडले होते. 5 कैद झाले होते तर 4 वाचले होते. मेजर शैतान सिंह यांना परम वीर चक्र तर इतर 5 जणांना वीर चक्र प्रदान करण्यात आले. ही चौकी पडली तरी युद्ध जिंकणारे चिनी सैनिक या चौकीचा ताबा न घेताच परत गेले. 1962 चा हिवाळा संपल्यावर एका गुराख्याला, रेझान्ग खिंडीत मेजर शैतान सिंह व त्यांचे अनेक सहकारी यांचे देह हातात (दारूगोळा नसलेली) शस्त्रात्रे असलेल्या स्थितीत सापडले. शेवटच्या गोळीपर्यंत हे शूर वीर लढत राहिले होते याचे हे एक भयावह चिन्ह होते. हे सर्व देह खिंडीतून खाली आणून त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले व त्या ठिकाणी आता एक स्मारक उभारण्यात आले आहे.

रेझान्ग खिंडीतील लढाईवर हकीगत नावाचा एक उत्कृष्ट चित्रपट निघाला होता. या चित्रपटाची सीडी मिळाल्यास तो जरूर बघण्यासारखा आहे असे मला वाटते.

मेजर शैतान सिंह PVC(मरणोत्तर)                                                                      चुशुल लढाई स्मारक


गुरंग टेकडीवरची चिनी चढाई या भागात झाली.

रेझान्ग ला ची लढाई चालू असतानाच गुरंग टेकडीवरच्या ब्लॅक टॉप चौकीवर हल्ला सुरू झाला. या ठिकाणी भारतीय तोफखान्याची मदत या चौकीतील जवानांना मिळत असल्याने ते जास्त प्रभावीपणे हल्याला तोंड देऊ शकत होते. चिनी सैन्याच्या लाटांचे दोन हल्ले परतवल्यावर अखेरीस हातघाईचे युद्ध झाले व गुरंग टेकडी पडली. ही टेकडी पडल्यावर चुशुल वर हल्ला करण्याचा मार्ग चिनी सैनिकांना मोकळा झाला. 140 भारतीय सैनिक या हल्यात मारले गेले असले तरी चीनची हानी जबरदस्त होती. त्यांचे हजारावर सैनिक मृत्युमुखी पडले होते. भारतीय तोफखाना व रणगाडे यांच्या प्रभावी वापरामुळे चुशुल विमानतळ मात्र वाचला होता.

चीनची या पुढची योजना काय आहे याचा अंदाज येत नसल्याने, ब्रिगेडियर रैना यांनी इतर चौक्यावरील सैनिकांना मागे बोलावले व चुशुल च्या रक्षणासाठी नवीन जागा सैन्याने घेतल्या. परंतु नंतर काही घडलेच नाही. 21 नोव्हेंबरला चीनने युद्धबंदी जाहीर केली व चिनी सेना त्यांच्या 21 नोव्हेंबरच्या स्थानांच्या 20 किलोमीटर मागे निघून गेल्या. चिनी सेनांनी असे का केले याच्याबद्दल अनेक अंदाज बांधले गेले आहेत. परंतु आधीच्या युद्धात झालेली अपरिमित हानी व युद्धाचा हेतू पूर्ण होणे ही दोन कारणे या मागे असावीत असे मला वाटते. लडाख मधल्या भारतीय पथकांनी मात्र त्यांचे कार्य उत्कृष्टपणे पार पाडले यात शंकाच नाही. कित्येक पटीने जास्त शक्तीमान अशा शत्रूचा त्यांनी जो मुकाबला केला त्याला तोड नाही असेच मला वाटते.

या युद्धात भारताने काय कमावले व गमावले याचे हिशोब गेली 60 वर्षे चालू आहेत. लडाख पुरते बोलायचे तर 1959 मधे भारतीय पोलिस ज्या स्थानांवर होते ती सर्व स्थाने भारताताच्या ताब्यातच राहिली. भारताने गमावली ती Forward Policy साठी घेतलेली स्थाने. परंतु माझ्या दृष्टीने भारताला झालेला सर्वात मोठा फायदा म्हणजे अलिप्ततावाद, पंचशील या सारख्या स्वप्नील व भ्रामक कल्पनांच्या जाळ्यातून भारतीय सरकार बाहेर आले व जगातील Real Politik काय असते याची जाणीव या राष्ट्राला झाली. स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिली 14 वर्षे सैन्य दलांकडे दुर्लक्ष करण्याची जी अक्षम्य चूक सरकारने केली होती ती मान्य करून सैन्य दलांना परत आवश्यक ते महत्व प्राप्त झाले. याचा फायदा पुढच्या कालात लगेचच दिसू लागला.

चीनने हल्ला केल्यावर जवाहरलाल नेहरूंनी त्याचे वर्णन, मित्राने केलेला विश्वासघात असे केले होते. चीनने भारताचा विश्वासघात केला होता या बद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण इतर कोणी सुद्धा भारतीयांचा विश्वासघात केला का? याचा विचार होणे जरूरीचे आहे. भारतीय सैन्यातले जवान व अधिकारी यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून त्यांच्यावरचा भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवला हे ही सत्यच आहे. परंतु या सैनिकांना आवश्यक ते कपडे, शस्त्रात्रे व दारूगोळा का मिळाला नाही? याला जबाबदार असलेले सरकारमधले लोक, चीन वर अंधविश्वास टाकून ज्यांनी देशाची अपिरिमित हानी केली ते राजकारणी व 1952 मधे कॅप्टन नाथ व सूरी यांचा अहवालावर काहीही न कृती करून अक्साईचिन भारताच्या ताब्यातून ज्यांनी जाऊ दिला ते वरिष्ठ सरकारी अधिकारी व राजकारणी यांनी देशातील जनतेचा विश्वासघात केला किंवा नाही हे वाचकांनी ठरवायचे आहे.


या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनशी मैत्रीचे संबंध का ठेवावेत? असा प्रश्न काही लोक विचारतात. मला असे वाटते की 50 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भूगोल नेहमीच बदलत असतो. त्यामुळे जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या महासत्तेशी भारताने मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे हे क्रमप्राप्त भारताच्या हिताचेच आहे. माओ याचे एक प्रसिद्ध वाक्य आहे ” Power grows from the barrel of the gun.” म्हणून चीनशी मैत्रीपूर्ण संबंध राखताना सैनिकी दृष्टीने शक्तीशाली राहूनच ही मैत्री राखली पाहिजे. सध्या साऊथ चायना समुद्रात चीनचे जे दबाव तंत्र चालू आहे ते बघता भारताची सैनिक शक्ती जगातील अव्वल काही राष्ट्रांच्या तोडीची असली तरच चीन बरोबरचे संबंध मैत्रीपूर्ण राहतील हे नक्की.

2 ऑगस्ट 2010

संदर्भ1

संदर्भ2

संदर्भ3

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “विश्वासघात- 3

 1. A very good article on 1962 war. I like your way to write the blog using many pictures and maps that always helps readers to get the exact thing.

  I wish you all the best and hope that we will read on many topics in future.

  Thanks
  CPK

  Posted by chaitany kulkarni | ऑगस्ट 3, 2010, 6:18 pm
 2. खरच खुप चांगली माहिती. पण अजुनही आपण पुर्णपणे समर्थ आणि alert नाही, हे दुर्दैव.

  सध्या अमेरिका द. कोरियात उतरली आहे, पण यात अमेरिकेचा काय फायदा (उदा. आखातातलं तेल) ? चिनवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का ? याला आधीच चीनने विरोध दर्शवला आहे…

  Posted by विजय देशमुख | ऑगस्ट 4, 2010, 7:50 सकाळी
 3. हा विश्र्वासघात असल्याचे भासविले जात असले तरी हा विश्र्वासघात नव्हे पंचशील लादण्यामुळे प्रश्र्न सुटला या भ्रमात नेतृत्व राहिले हे या युद्धाचे कारण आहे.

  Posted by मनोहर | ऑगस्ट 7, 2010, 4:13 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention विश्वासघात- 3 « अक्षरधूळ -- Topsy.com - ऑगस्ट 3, 2010

 2. पिंगबॅक विश्वासघात- 3 | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA. - ऑगस्ट 4, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: