.
History इतिहास

विश्वासघात- 1


एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्या आयुष्यात आलेला सर्वात अपमानास्पद व लाजिरवाणा प्रसंग कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर निर्विवादपणे मी 1962 च्या युद्धात चीनने भारताचा केलेला सपशेल व दारूण पराभव हेच उत्तर देईन. माझी खात्री आहे की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठे असे सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा हेच उत्तर देतील. एखाद्या फुग्याला टाचणी लावावी तसे काहीसे चीनने आम्हा भारतियांच्या स्वाभिमानाला व अस्मितेला केले होते. आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्या प्रसंगाची आठवण जरी झाली तरी घसा थोडासा का होईना दाटून आल्याशिवाय रहात नाही. आपल्या गल्लीत राहणार्‍या एखाद्या दादाची किंवा गुंडाची जशी भिती आपल्या मनात असते त्याच प्रकारची एक दहशत चीनबद्दल सर्वांच्याच मनात बसली होती. मी तर त्या वेळी वयाची विशी सुद्धा न गाठलेला एक टीन एजर होतो. तरीही भितीचे हे सावट मलाही जाणवत होते हे चांगलेच आठवते.

पुढे पाच वर्षांनी म्हणजे 1967 मधे सिक्कीमचीन सीमेवरच्या नाथुला येथे परत एकदा लढाईला तोंड फुटले. या वेळेस भारतीय सैनिकांच्या मदतीला भारतीय तोफखाना तयार असल्याने चिनी सैनिकांना चांगलाच मार खावा लागला व त्यांनी आक्रमण केलेल्या भागातून पळ काढला. 1987 मधे अरुणाचल प्रदेशातल्या Sumdorong Chu Valley मधल्या वानडुंग येथे, भारतीय हद्दीत एक हेलिपॅड बांधण्याचा चिनी सैनिकांनी प्रयत्न केला. भारतीय सैन्याने या चिनी सैनिकांना गराडा घालून युद्ध करण्याची आपली तयारी दाखवून दिली. ती बघितल्यावर चिनी सैन्याने समझोता केला व ते आपल्या सरहद्दीच्या आत निघून गेले. या सारख्या काही समरप्रसंगांच्या बातम्यांनंतर, हळूहळू चीनबद्दल वाटणारी ही दहशत मनातून पार निघून गेली.

सर्व सामान्य भारतीयांच्या मनात ही दहशत बसायला सीमेवर खरोखर काय चालले आहे? याचे संपूर्ण अज्ञानही बरेच कारणीभूत होते. त्या काळात बातम्यांचा मुख्य स्त्रोत म्हणजे वर्तमानपत्रे हाच असल्याने त्यात जी काय बातमी येईल त्यावरूनच अंदाज बांधावा लागे. या पत्रांच्यात छापले जाणारे नकाशे तर वाचकाच्या मनात फक्त गोंधळच निर्माण करत असत. त्यातच आमच्याइतकीच अज्ञानी असलेली नेतेमंडळी, सतत करत असलेल्या आपल्या भाषणांनी, हा गोंधळ अजून वाढवत असत. आज इतक्या वर्षांनंतर, आंतरजालासारखे प्रभावी माध्यम हातात असल्याने, 1962मधली ही चीन भारत लढाई प्रत्यक्षात कशी लढली गेली व त्याचे परिणाम काय झाले? याचे एक विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न मी करतो आहे. अर्थात माझी माहिती आंतरजालावरूनच घेतलेली असल्याने त्यात चुका असण्याची शक्यता आहेच. परंतु दोन तीन संकेतस्थळांच्यावरून माहिती घेऊन त्याची तुलना केल्यानंतरच मी ती माहिती सत्य म्हणून मान्य केलेली असल्याने, अशा चुकांची व्याप्ती कमी असेल असे वाटते.


1962 मधे चीनने भारतावर केलेले आक्रमण, भारताच्या ईशान्य टोकाला असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या सीमेपासून ते थेट उत्तरेला असलेल्या काराकोरम खिंडीपर्यंत अनेक ठिकाणी केलेले होते. भारतचीन यांच्या मधल्या सीमा विवादामुळेच हे आक्रमण चीनने केले असा एक समज आहे. खरे खोटे फक्त चीनच्या राज्यकर्त्यांनाच ठाऊक असावे. परंतु हे जर कारण असले तर भारतचीन यांच्या मधली ही सीमा कधी व कोणी रेखांकित केली होती? या प्रश्नाचे उत्तर शोधणे क्रमप्राप्त आहे. हे उत्तर शोधण्यासाठी, आपल्याला 1880 सालापर्यंत मागे जायला हवे. त्या वर्षी तत्कालीन भारताचे इंग्रज राज्यकर्ते व चीन यांच्यात प्रथम एक तोंडी समझोता झाला होता. या समझोत्याप्रमाणे, काराकोरम खिंड हा भारत चीन सीमेवरचा एक बिंदू म्हणून प्रथम मानला गेला होता. या बिंदूंच्या उत्तरदक्षिण या दोन्ही बाजूंचे भाग, पुढे रेखांकित करण्यासाठी म्हणून सोडून देण्यात आले होते. या बिंदूच्या दक्षिणेला असलेला व अक्साईचीन या नावाने ओळखला जाणारा, 37250 वर्ग कि,मी (14380 वर्ग मैल) एवढ्या आकाराचा भू प्रदेश, खरे तर या सीमा विवादाचा मुख्य मुद्दा आहे असे प्रथमदर्शी तरी दिसते. 1895 मधे चीनने प्रथमच या अक्साईचीन प्रदेशावर आपला दावा सांगितला. चीनच्या शिंगियांग प्रांतातल्या काशगर या शहरात, ब्रिटिशांचा एक प्रतिनिधी ( British representative in Kashgar) जॉर्ज मकार्टनी (George Macartney) याचे या कालात कायम स्वरूपी वास्तव्य असे. या प्रतिनिधीकडे चीनने हा आपला दावा 1896 मधे अधिकृत रित्या सादर केला. मकार्टनीने चीनचा हा दावा, लंडनला लगेच रवाना करून टाकला. प्रथमत: ब्रिटिश सरकारची याबाबतची प्रतिक्रिया, “अक्साई चीनचा काही भाग चीन मधे व काही भाग भारतात आहे.” अशी झाली. परंतु ब्रिटिश सरकारच्या व्ह्युहात्मक योजकांनी (forward school of British strategist ) हे मत नंतर बदलले व अक्साई चीन हा भारताचाच भाग असल्याचे ठरवले.

1910 मधे शिमला येथे, भारत, चीन व तिबेट या तीन देशांची एक बैठक झाली. या बैठकीत भारत व तिबेट यांच्यामधली पार उत्तरेपासून ते ईशान्येपर्यंतची संपूर्ण सीमा एका काराराद्वारे मान्य करण्यात आली. चीनच्या प्रतिनिधीने या करारावर हस्ताक्षर केले हे खरे असले तरी चिनी सरकारचा अधिकृत शिक्का मात्र त्याने त्यावर उठवला नाही. या नंतर बिजिंग मधल्या सरकारने हा शिमला करार मान्य करण्याचेच नाकारले व विवादाला खरी सुरवात झाली. तिबेट हा देश त्या वेळी सार्वभौम म्हणून अस्तित्वात होता का नाही? हा या करारामागचा तांत्रिक मुद्दा आहे व त्यावरच हा करार वैध ठरतो की नाही हे खरे म्हणजे अवलंबून आहे.

हा करार करून ब्रिटिशांनी अक्साई चीन भूभाग, कश्मिरच्या सीमेच्या आत का आणला? याच्या मागचे कारण खरे म्हणजे अगदी निराळे आहे.


अक्साई चीन या भूभागाची व्याप्ती चीनमधली कुन लुन पर्वत श्रुंखला व लडाखच्या पूर्वेला असलेल्या काराकोरम पर्वत श्रुंखला यांच्या मधे असल्याने हा भाग भारताच्या ताब्यात असला तर तिबेटचे, बाह्य तिबेट व आतील तिबेट, असे दोन भाग स्वाभाविकपणेच होतात. यापैकी बाह्य तिबेटची सीमा अफगाणिस्तान व मध्य एशियाला जोडलेल्या आहेत तर आतील तिबेटच्या सीमा भारताला. त्या कालात ब्रिटिशांना खरी भिती रशियाची (The Great Game) वाटत असल्याने, रशियाचा प्रभाव असलेल्या कोणत्याही भागाच्या सीमा, भारताला लागून असता कामा नयेत असा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानुसार अक्साई चीन हा भारतीय प्रदेश ठरवून तिबेटची फाळणी ब्रिटिशांनी करून टाकली. चीनला हे कधीच मान्य झाले नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर, अर्थातच ब्रिटिशांच्या या सर्व करारांचे पालन करण्याचे उत्तरदायित्व भारत सरकारवर आले व भारत चीन सीमा विवादाला तोंड फुटले.

उत्तरेकडे असलेली लडाखतिबेट सीमा व ईशान्येला असलेली अरुणाचल प्रदेशतिबेट सीमा या दोन्ही ठिकाणी 1962 मधे चीनने आक्रमण केले. परंतु दोन्ही ठिकाणांची परिस्थिती संपूर्ण भिन्न भिन्न असल्याने त्यांचा एकत्रित विचार करता येईल असे मला वाटत नाही. त्यामुळे प्रथम आपण लडाख सीमेचा विचार करूया.

अक्साईचिनचा दुर्गम वैराण व वाळवटी प्रदेश

सियाचिन हिमनदाच्या साधारण आग्नेयेला काराकोरम खिंड आहे. ..पूर्व 200 ते इ..1400 या कालखंडात भारताचा मध्य एशिया व युरोप यांच्याशी असलेला व्यापार प्रामुख्याने या खिंडीतून होत असल्याने, त्या कालापासूनच या खिंडीला अनन्य साधारण महत्व होते. असे जरी असले तरी लडाखमधून या खिंडीपर्यंत पोचण्याचा मार्ग अतिशय दुर्गम अशा प्रदेशातून जात असल्याने अतिशय जिकिरीचा आहे यात शंकाच नाही. या खिंडीजवळ, दौलत बेग ओल्डी DBO हा भारतीय हद्दीत असलेला शेवटचा कॅम्प येतो. हा कॅम्प सुद्धा अतिशय जुना आहे. या खिंडीच्या दक्षिणेला असलेल्या चिप चॅप CHIP CHAP नदीचा भाग सोडला तर त्याच्या दक्षिणेला काराकोरम पर्वतराजीची मोठमोठी शिखरे आहेत. या पर्वतराजीमुळे लडाख व अक्साईचीन हे एकमेकापासून संपूर्णपणे अलग केले गेले आहेत. या पर्वतांच्या पूर्वेला असलेला अक्साईचीनचा भाग म्हणजे एक वैराण व दुर्गम असे वाळवंट आहे. या भागात कोणत्याही मोठ्या नद्या नाहीत. येथे झाडे, झुडपे उगवत नाहीत व अतिशय कडक असा हिवाळा या भागात अनुभवण्यास येतो. अत्यंत दुर्गम व वस्ती करण्यास पूर्णपणे निरुपयोगी अशा या भागासाठी सीमा विवाद निर्माण झाला हे खरे म्हणजे एक आश्चर्यच आहे. लडाखच्या सीमेवर असलेल्या काराकोरम पर्वतांच्या रांगाच्यातून, अक्साईचीन मधे प्रवेश मिळवण्यासाठी कोन्गका ला ही एकूलती एक खिंड आहे. अक्साईचीनच्या दक्षिणेला सीमेजवळ चुशुल ही गाव येते. चुशुल च्या दक्षिणेला डेमचोक हे सिंधू नदीच्या काठी असलेले गाव परत सीमेवर आहे. या गावाच्या दक्षिणेला असलेली सीमा रेखांकित केलेली असल्याने तिथे कोणताही विवाद नाही.


1950 च्या दशकात चिनी सैन्याने तिबेटवर आक्रमण करून तो देश ताब्यात घेतला. दलाई लामांनी 1959 मधे पळ काढला व भारतात आश्रय घेतला हा इतिहास सर्वांना ठाउकच आहे. या नंतर पश्चिम तिबेटचे एकाकीपण संपवण्यासाठी चिनी सरकारने शिंजियांग मधील येचेंग किंवा केरिया या गावापासून ते तिबेट मधील नगरी या गावापर्यंत रस्ता बांधण्याचे काम चालू केले. हा रस्ता अक्साई चीन मधून कुन लुन पर्वत श्रुंखलांच्या पायथ्याला लागून सरळ दक्षिणेकडे जातो.

भारताला जेंव्हा चीनच्या या रस्ता बांधणीच्या कामाची माहिती समजली तेंव्हा भारताने याबद्दल निषेध खलिते पाठवण्यास सुरवात केली. भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्यावर लोकसभेत या विषयावरून बरीच टीका झाली व भारतीय भूभागावर चीनने उघड उघड आक्रमण केलेले असताना सरकार गप्प कसे बसू शकते आहे असे प्रश्न विरोधक विचारू लागले. अखेरीस नेहरूंना लोकसभेत भारताने आता नवीन Forward Policy अंगिकारली आहे अशी घोषणा करावी लागली. या योजनेअंतर्गत, भारतीय सैनिक अगदी भारतचीन सीमेपर्यंत तैनात केले जातील असे सांगण्यात आले.

भारतातील या घटनांकडे अर्थातच चीनचे बारीक लक्ष होतेच. 1960 पर्यंत या भागात चीनचे फक्त 1 ब्रिगेड (3000 सैनिक) एवढेच सैन्य होते. 1960 ते 1962 या कालात चीनने ही सैनिक संख्या 1 डिव्हिजन (15000 सैनिक) पर्यंत वाढवली. तोफखाना व रणगाडे आणले, सीमेलगतच्या सर्व चौक्यांना रसद पुरवण्यासाठी रस्ते बांधले व एकूणच आपल्या सैन्याची स्थिती मजबूत केली.

याच कालात जवाहरलाल नेहरूंची एक आंतर्राष्ट्रीय मुत्सद्दी म्हणून ख्याती झाली होती. त्या वेळी अमेरिका व पाश्चिमात्य देश एका बाजूला व साम्यवादी देश दुसर्‍या बाजूला अशा 2 गटात जगाची विभागणी झाली होती. नेहरू व इतर दोन राष्ट्रप्रमुखांनी आपला अलिप्त गट स्थापन केला होता. त्याच प्रमाणे एशियामधे शांती व सलोखा निर्माण व्हावा म्हणून नेहरूंचे प्रयत्न चालू होते. चीनचे तत्कालीन पंतप्रधान श्री. चौएनलाय यांच्याबरोबर नेहरूंचे सलोख्याचे संबंध होते असे मानले जाई. या दोन्ही नेत्यांनी मिळून पंचशील या नावाची 5 तत्वे, एशियात शांतता नांदावी म्हणून सादर केली होती. “हिंदीचिनी भाईभाईम्हणून नवी घोषणाही या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे दिली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवरच, भारताच्या Forward Policy प्रमाणे ज्या नवीन चौक्या सीमेजवळ बसवल्या गेल्या होत्या त्यांच्या कुरापती, 1962 मधे चिनी सैनिकांनी काढायला सुरुवात केली. चौकी समोर मोठ्या संख्येने जमून दबाव आणणे. लाऊड स्पीकर वरून मागे जाण्यास सांगणे व धमक्या देणे वगैरे प्रकार सुरू झाले. भारताची सैनिक परिस्थिती त्या वेळी या भागात कशी होती व प्रत्यक्ष युद्धाला कसे तोंड फुटले ते आपण पुढे बघूया.

29 जुलै 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

15 thoughts on “विश्वासघात- 1

 1. एक अभ्यासपूर्ण लेख देण्यासाठी धन्यवाद

  Posted by प्रसिक | जुलै 30, 2010, 1:48 pm
 2. Good article…
  elaborate and informative!

  keep it up.

  Posted by Sudeep Mirza | जुलै 30, 2010, 1:58 pm
 3. classic article! very informative!
  Keep writing… on various topics…

  Posted by Aniruddha Vaidya | जुलै 30, 2010, 7:50 pm
 4. kaka khupach mahitipurna lekh aahe…
  majhi pidhi mhajane je hya udhachya weles navate tyanchyasathi namushki mhanaje aapan 1999 madhe Kandahar Viman apaharan prakarani naak ghasala te asa watata mala tari…nanatar mi Avinash Dharmadhikari yanche ya wishawar bhashan aikala tevha tar kharach aaplya wataghati (?) chi laaj watali…

  Posted by Aparna | जुलै 30, 2010, 8:13 pm
 5. One of the strategic mistakes, analysts say, that Nehru had to publish white papers of conversation between Nehru and Chau En Lai in Parliament which made this topic public. Had this been clandestine like actions against Naga leader AZ Phizo, some under table barter could have been managed as China also looked like inclined for the same. But, it was impossible when became national issue.

  Posted by Nikhil Sheth | जुलै 30, 2010, 9:33 pm
 6. अतिशय उत्कृष्ट लेखमाला सुरु केलीत त्याबद्दल अभिनंदन. विश्वासघात, संताप आणि अगतिकता यांचा परमोच्च बिंदू म्हणजे चीनचे आक्रमण. सध्या याच विषयावर वाचत होतो योगायोगाने. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.

  Posted by Nikhil Sheth | जुलै 30, 2010, 9:47 pm
 7. आपणाला अभिप्रेत असलेली भारत-चीन सीमा ही भारत-तिबेट सीमा होय

  Posted by मनोहर | जुलै 30, 2010, 10:44 pm
  • मनोहर

   29 एप्रिल 1954 या दिवशी भारत व चीन यामधे झालेल्या एका करारानुसार तिबेट हा चीनचा एक भाग असल्याचे भारत सरकारने मान्य केले होते. त्यामुळे 1962 मधल्या युद्धाच्या वेळी भारत-तिबेट सीमा न म्हणता भारत-चीन सीमा म्हणणे जास्त योग्य आहे असे मला वाटते.

   Posted by chandrashekhara | जुलै 31, 2010, 9:49 सकाळी
 8. तुमचा Blog नियमीत पणे वाचतो…. सगळे लेख अप्रतिम आहेत…
  आणि नेहमीप्रमाणेच एक अफलातून आभ्यासपूर्ण लेख….

  Posted by सत्यम्‌ दिघे | जुलै 31, 2010, 12:32 सकाळी
 9. Very informative.

  Great..

  Posted by ngadre | ऑगस्ट 1, 2010, 8:53 सकाळी
 10. very nice & informative

  Posted by dileep | ऑगस्ट 1, 2010, 11:50 pm
 11. very nice

  Posted by dileep | ऑगस्ट 1, 2010, 11:51 pm
 12. फारच छान व अभ्यासू माहिती आहे. माहितीबद्दल शतष: धन्यवाद.
  तुमचा पाकव्याप्त काश्मीर बद्दलचा लेख पण छान आहे…

  Posted by prashantdhumal | ऑगस्ट 2, 2010, 12:13 सकाळी
 13. आपण अभ्यास करून देत असलेली माहिती अत्यंत महत्वाची आहे. आमचे ज्ञान वाढवणारी आहे. धन्यवाद.
  मंगेश नाबर

  Posted by Mangesh Nabar | ऑक्टोबर 3, 2010, 8:07 सकाळी

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention विश्वासघात- 1 « अक्षरधूळ -- Topsy.com - जुलै 30, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: