.
Musings-विचार

गोरिला माकडे, रुढी आणि परंपरा


माझ्या एका मित्राने दोन दिवसांपूर्वी, मेलने मला एक मोठी रोचक गोष्ट पाठवली आहे. ही गोष्ट आहे एका पिंजर्‍यात रहाणार्‍या आठ गोरिला माकडांची. या पिंजर्‍यात मध्यभागी एक शिडी ठेवलेली आहे. या शिडीवर चढले की थेट पिंजर्‍याच्या छतापर्यंत हात पोचू शकतो. या छतावर एक केळे टांगलेले आहे. कोणत्याही गोरिला माकडाने शिडीवर चढण्याचे कष्ट घेतले की त्याला एक केळे मिळू शकते. या सर्व गोरिलांना याची इतकी सवय झालेली आहे की केळे हवे असले की ती शिडीवर चढतात व एक केळे मिळवतात. एक दिवस त्यांच्यापैकी एक गोरिला माकड शिडीवर चढले व केळे पकडण्यासाठी त्याने हात वर केला. केळे हाताला लागण्याऐवजी त्याच्यावर अचानक थंड पाण्याचा मारा एका पाईपमधून सुरू झाला. घाबरून ते माकड खाली उतरले. जरा वेळाने त्याने पुन्हा प्रयत्न केला परंतु पुन्हा एकदा त्याला थंड पाण्याचा मारा सहन करावा लागला. अशाच पद्धतीने त्या आठ पैकी प्रत्येक माकडाला हा थंड पाण्याचा मारा शिडीवर चढले रे चढले की सहन करावा लागू लागला व केळे मिळणे अशक्यच झाले. बरेच दिवस हा प्रकार चालू राहिला व शेवटी शेवटी कोणत्याही माकडाने शिडीवर चढण्याचा नुसता प्रयत्न जरी केला तरी इतर सात माकडेच त्याला खाली ओढून तसे करण्यापासून परावृत्त करू लागली.

असेच काही दिवस गेले. आता या मूळ आठ माकडांपैकी एकाला बाहेर काढण्यात आले व त्याच्या जागी एक नवीनच गोरिला माकड आणले गेले. या नवीन माकडाला ते छताला टांगलेले केळे दिसले व त्याने शिडीकडे झेप घेतली. त्या बरोबर उरलेल्या सात जुन्या माकडांनी त्याच्याकडे झेप घेऊन त्या माकडाला आपल्या पूर्व अनुभवानुसार शिडीवर चढूच दिले नाही. काही दिवसांनी आणखी एक जुने माकड पिंजर्‍याबाहेर गेले व एक नवे माकड आत आले. त्या माकडालाही उरलेल्या सहा जुन्या माकडांच्या पूर्व अनुभवाप्रमाणे शिडीवर चढू दिले गेले नाही. या प्रमाणे हळू हळू सात जुनी माकडे बदलली गेली व त्यांच्या जागी नवी सात माकडे आली. या सात नव्या माकडांना उरलेल्या आठव्या माकडाच्या पूर्व अनुभवामुळे शिडीवर चढणे नंतर किती त्रासदायक होते याची माहिती असल्याने म्हणा किंवा इतर काही कारणांनी शिडीवर कधीच चढता आले नाही. काही दिवसांनी आठवेही जुने माकड पिंजर्‍याबाहेर गेले व एक नवीन आत आले. आता शिडीवर चढल्यावर काय होते याचा पूर्व अनुभव असलेले कोणतेही माकड पिंजर्‍यात उरले नाही. तरीही कोणत्याही गोरिलाने शिडीवर चढण्याचा प्रयत्न जरी केला तरी बाकीचा माकडे त्याला मागे खेचत व शिडीवर चढू देत नसत.

या पद्धतीने हळू हळू ही आठ नवीन माकडेही पिंजर्‍याबाहेर गेली व त्यांच्या जागी आणखी नवीन माकडे आली. आता या सर्वात नवीन माकडांनी पहिल्या गटापैकी व शिडीवर चढल्यानंतर काय होते याचा अनुभव घेतलेल्या मूळ आठ माकडांचे तोंड कधीही बघितलेले सुद्धा नसताना त्यांनी शिडीवर कोणत्याही माकडाला चढू न देण्याची आपली परंपरा तशीच चालू ठेवली. कोणतेही माकड शिडीवर चढू लागले की इतर माकडे त्याच्यावर हल्ला करून त्याला शिडीवर चढू देत नसत. शिडीवर चढल्यावर काय त्रास होतो? किंवा त्याचा काय परिणाम होतो? हे या पैकी कोणत्याही माकडाला माहिती नसताना, शिडीवर चढायचे नाही ही त्या माकडांच्या गटाची एक रूढीच बनली.

रुढी किंवा परंपरा कशा सुरू होतात याचे या माकडांच्या गोष्टीइतके दुसरे कोणतेही समर्पक उदाहरण सापडणार नाही. गोष्ट जरी माकडांची असली तरी प्रत्यक्षात आपण पाळत असलेल्या रुढी व परंपरा या अशाच चालू ठेवल्या जातात. वटसावित्री या सणाच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरे गुंडाळणे, दसर्‍याला अवजारांची पूजा करणे, या रुढींना सद्य कालात काहीही अर्थ नसला तरी त्या आपण का चालू ठेवतो? अगदी देवांच्या पूजेची उदाहरणे घ्या. काही घरांच्यात गणपती बसवत नाहीत कारण तो म्हणे लाभत नाही. कशावरून लाभत नाही? याला उत्तर नसल्यामुळे विषाची परिक्षा कोण घेतो? असे म्हटले की झाले. वीस पंचवीस वर्षांपूर्वी एक संतोषीमाता किंवा अशा काहीतरी नावाचा एक चित्रपट आला होता. त्यानंतर ही संतोषीमाता एकदम पॉप्युलर झाली व तिचे व्रत सुरू झाले. आता एकदा रुढी सुरू झाली की पुढच्या पिढ्या आहेतच ती परंपरा सांभाळायला. काही काही रुढी तर तर्कसंगतीच्या पलीकडच्या असतात. ऋषिपंचमीला बैलाचे कष्ट न घेता पिकवलेल्या भाज्या म्हणे खायच्या. का? तर रुढी आहे. आता या अशा भाज्या कोण पिकवतो? कशावरून त्या पिकवताना बैलाचे कष्ट कारणीभूत झालेले नाहीत? हे कसे समजायचे? अलीकडे नाहीतरी सगळे शेतकरी ट्रॅक्टरच वापरू लागले आहेत. त्यामुळे सर्वच भाज्या ऋषिपंचमीच्या का नाहीत?

सगळ्यात विनोदी प्रकार हा उपासाच्या पथ्याचा असतो. आषाढी, कार्तिकी एकादशा व महाशिवरात्र किंवा कोणत्या तरी देवाचा म्हणून लोक उपास करतात. या उपासाला जे अन्न चालते त्यात साबुदाणा व बटाटा चालतो. वास्तविक हे दोन्ही पदार्थ पोर्तुगीज लोकांनी भारतात आणले. गोर्‍या फिरंगी व ख्रिस्ती लोकांनी आणलेले पदार्थ हे या उपवासी मंडळींना कसे चालतात? कोथिंबीर चालते पण धने नाहीत. या उपवासी पदार्थांच्या घटकांच्याकडे बघितले तर स्टार्च व स्निग्ध पदार्थ याशिवाय यात दुसरे काहीही नसते आणि पचनास हे सर्व पदार्थ अतिशय जड असतात. पण असले प्रश्न विचारायचे नाहीत कारण रुढी आहे.

आता या रुढी प्रकरणाला एक नवाच रंग देण्यात येतो. या रुढी व परंपरा म्हणजेच आपली संस्कृती असल्याचा शोध काही लोकांनी लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे लावणी व तमाशा असे नवीन समीकरण बनत चालले आहे. माझ्या लहानपणी जर मी लावणी ऐकायची आहे किंवा तमाशा बघायचा आहे असे वडीलधार्‍यांना सांगितले असते तर मला बेदम चोप मिळाला असता यात शंकाच नाही. आज सात आठ वर्षाच्या मुली सुद्धा टीव्हीवर लावणी नृत्य पेश करताना दिसतात व त्याचे कौतुक होताना दिसते. महाराष्ट्राची संस्कृती, लावणी, तमाशा नाही, गोंधळ नाही व वासुदेवही नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे देशासाठी स्वत:चे आयुष्य ओवाळून टाकणार्‍या शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांची. समाजासाठी स्वार्थत्याग करून आपले आयुष्य समाजसेवेत घालवणार्‍या अण्णासाहेब कर्वे, आगरकर किंवा ज्योतिबा फुले यांचे आयुष्य ही .महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची परंपरा आहे सर्व मोह व पाश सोडून आषाढाच्या पाऊसपाण्याची पर्वा न करता केलेली पंढरपूरची वारी. परंतु वारकर्‍यांच्या किंवा या लोकोत्तर पुरुषांच्या आयुष्याच्या अनुकरणाच्या रुढी किंवा परंपरा होत नाहीत. आमची संस्कृती आता इतक्या स्वस्त व खालच्या दर्जाची होत चालली आहे की मला ती माझी संस्कृती आहे हे म्हणून घेण्याची सुद्धा काही दिवसांनी बहुदा लाज वाटू लागेल. ही संस्कृती दोन पिढ्याही टिकणे शक्य नाही.

अशिक्षित समाजात रुढी किंवा परंपरा चालू राहिल्या तर नवल वाटण्यासारखे नाही. पण चांगले सुशिक्षित लोकही जेंव्हा या निरर्थक रुढी व परंपरा झोंबाळताना दिसतात तेंव्हा मनाला क्लेश झाल्याशिवाय रहात नाही हे मात्र नक्की.

26 जुलै 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “गोरिला माकडे, रुढी आणि परंपरा

 1. Perfect example.
  We are the same type of monkeys in bulk.

  No one dares to challenge whats told by elders..

  Posted by ngadre | जुलै 26, 2010, 6:09 pm
 2. परंपरा टाकाऊ ठरविणे हे परंपरा आंधळेपणाने स्वीकारण्याइतकेच मूर्खपणाचे आहे. सर्वसाधारणपणे स्वतंत्र विचार करण्यापेक्षा तयार विचार आपल्या नावावर खपविण्याकडे अधिक कल असतो.

  Posted by मनोहर | जुलै 26, 2010, 10:11 pm
 3. halu halu sagal badalat jaat asate. agadi paramapara suddha !
  NY-USA

  Posted by purushottam kulkarni | जुलै 29, 2010, 7:25 pm
 4. माकडांची रुपक कथा आवडली. बहुसंख्य माणसांना लागु व्हावी.

  Nile

  Posted by Nile | ऑगस्ट 1, 2010, 10:50 सकाळी

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention गोरिला माकडे, रुढी आणि परंपरा « अक्षरधूळ -- Topsy.com - जुलै 26, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: