.
History इतिहास

सियाचिन


भारतामधले जम्मू आणि कश्मिर हे राज्य, ते भारतात सामील झाल्यापासूनच, सतत वादाच्या भोवर्‍यात सापडलेले आहे. पूर्वेकडे चीन, उत्तरेकडे अफगाणिस्तान, पश्चिमेला पाकिस्तान अशा आंतर्राष्ट्रीय सीमा असणारे हे राज्य, भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या आधीच, नवनिर्माण पाकिस्तानच्या सेनेने टोळीवाल्यांच्या नावाखाली केलेल्या आक्रमणाला बळी पडले होते. या नंतर हे राज्य, भारतीय संघराज्यात सामील झाले व साहजिकच भारतीय सेनेला या पाकिस्तानी आक्रमकांशी सामना करणे भाग पडले. या युद्धात कश्मिर खोर्‍याचा बहुतेक भाग भारतीय सैन्याने परत जिंकून घेतला व पाकिस्तानी सैन्याला पिछाडीवर जाण्यास भाग पाडले. तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यानंतर हा प्रश्न संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती कडे सोपवला. आतापर्यंत पाकिस्तानने लादलेली निष्कारण 3 युद्धे लढून शेवटी भारतीय व पाकिस्तानी सेना ही युद्धबंदी होण्याच्या वेळी जिथे होत्या त्या स्थानांवरच गेली साठ वर्षे आहेत.

1971च्या बांगलादेश युद्धानंतर भारत व पाकिस्तान यात शिमला करार झाला व या युद्धबंदी रेषेला प्रत्यक्ष ताबा रेषाअसे नाव देऊन तिला औपचारिक दर्जा देण्यात आला. ही प्रत्यक्ष ताबा रेषाभारतपाकिस्तान सीमा रेषेला समांतर अशी दक्षिणेकडून उत्तरेकडे कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन गावापर्यंत जाते व नंतर ती काटकोनात वळून पूर्वे कडे ड्रास, कारगिल वरून जाऊन परत उत्तरेकडे वळते व NJ 9842 या ठिकाणी असलेल्या पर्वत शिखरावर समाप्त होते. 1949च्या कराची करारात या स्थानाबद्दल फक्त एवढेच मोघम लिहिलेले आहे की या नंतर पुढे ही रेषा, हिमनद्यांच्या मार्गाने उत्तरेकडे जाईल. ‘thence North to the glaciers’.


जम्मू आणि कश्मिर राज्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर या राज्याचे, हिमालयाचाच भाग असलेल्या चार पर्वतराजींनी, स्वाभाविक भाग केलेले आहेत. या सर्व पर्वतराजी, अग्नेय ते वायव्य अशा पसरलेल्या आहेत. पंजाबला संलग्न असलेला जम्मू भाग व कश्मिर खोरे हे पीर पंजाल पर्वतराजीने विभागलेले आहे. कश्मिर खोर्‍याच्या पूर्वेला असलेल्या नुनकुन पर्वतराजी व झान्स्कर पर्वतराजी यात झान्स्कर नदीच्या खोर्‍याचा भाग येतो तर लडाखचा पठारी प्रदेश हा झान्स्कर पर्वतराजी व लडाख पर्वत राजी यांच्यामधे येतो. लडाख पर्वतराजीच्या पूर्व दिशेला अत्यंत दुर्गम व डोंगराळ अशा प्रदेशात शोयोक(SHOYOK) व नुब्रा (NUBRA) या नद्यांची खोरी लागतात व त्यांच्या पूर्वेस काराकोरम पर्वतांची रांग सुरू होते. ही काराकोरम पर्वतराजी, भारतीय उपखंड व एशिया खंड यांच्यातील स्वाभाविक सीमा असल्याने या पर्वतराजीच्या पूर्वेला तिबेटचा भूभाग सुरू होतो. या काराकोरम पर्वतराजींच्या अगदी दक्षिणेच्या बाजूस व लेह शहराच्या पूर्वेला प्रसिद्ध काराकोरम खिंड आहे. या काराकोरम खिंडीमधूनच प्राचीन काळात तिबेट व भारत यांच्यातला व्यापार चालत असे.

भारत व पाकिस्तान मधली प्रत्यक्ष ताबा रेषा या सर्व पर्वतराजींना छेदत, लेह शहराच्या वायव्येस समाप्त होते व NJ 9842 हा बिंदू त्यामुळे लेहच्या साधारण वायव्येस पण काराकोरम पर्वतराजीच्या पश्चिमेला आहे. शिमला कराराच्या प्रमाणे, या बिंदूच्या पूर्वेकडे असलेला काराकोरम प्रदेश तिबेटच्या सीमेपर्यंत अत्यंत दुर्गम, उंच हिम शिखरे व हिमनद्या यांनी भरलेला असल्याने, दोन्ही देशांनी तिथे न जाण्याचा किंवा No Man’s Land म्हणून त्या वेळी ठरवला असावा असे वाटते. भारताने याचा अर्थ असा घेतला होता की ही प्रत्यक्ष ताबा रेषा, या बिंदूच्या इशान्येस असलेला व ज्याचे नंतर नुब्रा नदीत रुपांतर होते तो सियाचिन हिमनद, शोयोक नदीला पाणी देणारा रिमो हिमनद व उत्तरेला असलेला बाल्टोरो हिमनद यांच्या कडेने चीनच्या सीमेला जाऊन मिळेल. मात्र पाकिस्तानने आपल्या सोईप्रमाणे याचा अर्थ असा घेतला की ही रेषा NJ 9842 पासून सरळ पूर्वेकडे जाऊन काराकोरम खिंडीला मिळेल. म्हणजे काराकोरम खिंडीच्या उत्तरेचा सर्व भाग पाकिस्तानी ताब्यात असल्यामुळे त्या देशाच्या ताब्यात असलेला कश्मिरचा भूभाग सरळ चीनला जोडला येईल.


आपण करून घेतलेल्या सोईस्कर अर्थाप्रमाणे, पाकिस्तानने परदेशी गिर्यारोहकांच्या तुकड्यांना सियाचिन भागात गिर्यारोहण करण्यास परवानगी देण्याचे ठरवले व पहिली जपानी गिर्यारोहक तुकडी 1978 मधे या भागात मोहीम करून परतली. पाकिस्तानचा या मागचा उद्देश असा होता की एकदा जगभरच्या गिर्यारोहकांच्या हे मनात ठसले की सियाचिनला जाण्यासाठी पाकिस्तानची परवानगी घेणे आवश्यक आहे की हा भूभाग पाकिस्तानीच आहे असेच मत जगात प्रसृत होईल. भारतीय सैनिक मुख्यालयाला या गिर्यारोहक तुकडीची बातमी कळल्यावर त्यांनी या भागात प्रत्येक उन्हाळ्यात टेहेळणी तुकड्या पाठवण्यास सुरवात केली. या तुकड्या पाठवण्यामागचा उद्देश असा होता की या तुकड्यांना कोणी परदेशी गिर्यारोहक भेटले तर त्यांना तुम्ही भारतीय प्रदेशात परवानगी न घेता आला आहेत हे सांगून परत पाठवून दिले जाईल.

नुब्रा नदीचे खोरे

21 ऑगस्ट 1983 या दिवशी कारगिल भागातल्या पाकिस्तानी सेना अधिकार्‍याने, भारतीय सेना अधिकार्‍याकडे तक्रार केली की प्रत्यक्ष ताबा रेषा NJ 9842 पासून काराकोरम खिंडीपर्यंत जात असताना भारतीय सेनेच्या तुकड्या या रेषेचे उल्लंघन करून उत्तरेला सियाचिन हिमनदावर जात आहेत. ही तक्रार खरे तर एक अतिशय काळजीपूर्वक आखलेल्या मनसुब्याचे पहिले पाऊल होते. भारतीय सेना मुख्यालयाला या तक्रारीमागचा खरा हेतू ध्यानात आल्याबरोबर, ते खडबडून जागे झाले व त्यांच्या असे लक्षात आले की या सियाचिन हिमनदात प्रवेश करण्यासाठी ज्या 4 खिंडी उपलब्ध आहेत त्यापैकी बिलाफॉण्ड या खिंडीवर(Bilafond La) पाकिस्तानी सैनिकांनी ताबा मिळवला आहे. मुख्यालयाने ताबडतोब सैनिकांची एक तुकडी 1983 मधेच सियाचिनला पाठवली. परंतु पाकिस्तानी सैनिक जास्त संख्येने या भागात आलेले आहेत हे लक्षात आल्यावर या सैनिकांनी तेथून काढता पाय घेतला. परिस्थितीचा अभ्यास केल्यावर, सैनिकी मुख्यालयाने 1984 च्या उन्हाळ्यापूर्वी या प्रदेशात सैन्य पाठवायचे ठरवले व तयारी सुरू केली.

NJ9842 या बिंदूच्या पूर्वेकडचा भाग

सियाचिन हिमनद असलेला हा प्रदेश आहे तरी कसा? काही लेखक याला जगाचे छत म्हणतात तर काही तिसरा धृव मानतात. समुद्रसपाटीपासून 15000 फूट उंचीवर व 72 कि.मी लांबवर पसरलेल्या या हिमनदाच्या दोन्ही बाजूंना हिमालयाची 23000 फूट उंचीपर्यंत असणारी अत्युच्च शिखरे आहेत. पूर्वेला काराकोरम तर पश्चिमेला सॉल्टोरो पर्वतराजीची (Saltoro) शिखरे दिसतात. अतिशय झोंबरे वारे या भागात वहात असतात. तपमान -40 डिग्री सेल्सस पर्यंत खाली जाते. या अशा भागाचा सैनिकी ताबा घ्यायचा म्हणजे फक्त हिमनदाचा ताबा घ्यायचा नसून बाजूच्या हिमशिखरांचा ताबा घेतला पाहिजे तरच त्याचा उपयोग होईल अथवा हिमनदावरचे आपले सैनिक शत्रूसाठी फक्त Practice Targets होतील हे नक्की. या इतक्या उंचीवरच्या शिखरांच्यावर सैनिक चौक्या बसवणे हे फारसे सुलभ काम नाही हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. 1984च्या एप्रिल महिन्यात भारतीय सैनिकांनी सियाचिन हिमनदाच्या पूर्व बाजूला असलेल्या सॉल्टोरो शिखररांगेवर सैनिक चौक्या बसवण्यात यश मिळवले. पाकिस्तानी सैनिक या भागात मे महिन्यात आले व त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की संपूर्ण सॉल्टोरो शिखररांगेवर भारतीय सेनेने आपले सैनिक पाठवले आहेत. या सॉल्टोरो शिखर रांगेकडून सियाचिन हिमनदावर प्रवेश करण्यासाठी फक्त चार खिंडी उपलब्ध आहेत. Sia La, the Bilafond La, the Gyong La, and the Chulung La या नावानी या खिंडी ओळखल्या जातात. या चारी खिंडींकडे जाणार्‍या मार्गांवर भारताने आपला ताबा घेतला असल्याने पाकिस्तानी सैन्याला माघार घेऊन सॉल्टोरो पर्वत शिखररांगाच्या पश्चिमेस आपली ठाणी बसवावी लागली व साहजिकच युद्धाला तोंड फुटले.

नुब्रा नदीचे मुख

सियाचिन हिमनद

सियाचिनचा प्रत्यक्ष काढलेला फोटो

सॉल्टोरो पर्वतरांगेवरची ठाणी जिंकणे हे कोणत्याही सैनिक तुकडीसाठी एक अशक्यप्राय काम असल्याने, या युद्धाचा फारसा काही फायदा पाकिस्तानला झाला नाही. व आजची परिस्थिती तशीच म्हणजे 1984 सारखीच राहिलेली आहे. सियाचिन, सॉल्टोरो, सियाचिनकडे येणारे सर्व मार्ग आणि शोयोक, नुब्रा नद्यांची खोरी हा सर्व भूप्रदेश भारतीय सैन्याच्याच ताब्यात राहला आहे..

पाकिस्तानी सैनिकांना दिसणारी सॉल्टोरो रिज

या सियाचिन हिमनदाचा ताबा कशासाठी भारताने घेतला आहे असे काही जण विचारतात. लेह व त्याच्या उत्तरेस असणारी गावे यांना सैनिकी संरक्षण देण्यासाठी ही पावले आपण उचलली असल्याचे सैनिकी मुख्यालयाचे म्हणणे आहे. परंतु नकाशावर बघितल्यावर या भागाचे महत्व लक्षात येईल. सॉल्टोरो रिज वर असलेल्या ठाण्यांच्यामुळे पाकिस्तानी सैन्याने बळकावलेला कश्मिरमधला स्कार्डूचा भाग येथून फक्त चाळीस मैलावर आहे. पश्चिमेला असलेल्या व पाकिस्तानने बळकवलेल्या उत्तर विभागांना, सियाचिनवरचे भारताचे प्रभुत्व ही त्यामुळेच मोठी अडचण वाटते. हा सर्व भाग संरक्षित करण्यासाठी सॉल्टोरो रिज आणि सियाचिन हे भारताच्या ताब्यात असणे अत्यंत आवश्यक आहे याबद्दल दुमत नाही.

सियाचिन हिमनदावरच्या भारतीय उखळी तोफा

1997पासून भारत सरकारने सियाचिन जवळील भूभाग देशी व परदेशी गिर्यारोहकांसाठी खुला केली आहे.मुंबईचे श्री. हरिश कपाडिया व त्यांचे 5 सहकारी यांना 1998 मधे सियाचिनवर गिर्यारोहण करण्याची परवानगी मिळाली. संपूर्ण सियाचिन हिमनद, नुब्रा नदीच्या मुखापासून ते उत्तरेच्या इंदिरा कॉल पर्यंत ते बघू शकले त्यांच्या या प्रवासाचे सुंदर वर्णन मला या दुव्यावर वाचता आले. उत्तरेला हा हिमनद जिथे चीनच्या सीमेला मिळतो त्या ठिकाणी पर्वत शिखरांची एक रांगच या हिमनदाला आडवी येते. या शिखरांच्यामधे असलेल्या खोलगट भागाला इंदिरा कॉल असे नाव आहे. (हे नाव लक्ष्मीचे म्हणून बरेच आधीपासून(1912) दिलेले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा या नावाशी संबंध नाही.) परंतु भारताच्या ताब्यात असलेल्या सर्वात उत्तरेच्या टोकाचे नाव व सर्वात दक्षिणेला असलेल्या निकोबार बेटाच्या दक्षिण टोकाचे नाव इंदिरा हेच असावे हा एक गंमतीदार योगायोग आहे. इंदिरा कॉलच्या पूर्वेकडे असलेल्या एका खिंडीतून चीनच्या शिंजियांग प्रांतात सहजपणे उतरता येते. 1889 मधे Col. Younghusband. हा याच मार्गाने चीनमधे उतरला होता.


सियाचिनमधे एवढा खर्च करून सैन्य ठेवण्याची गरजच काय? असा प्रश्न अनेक लोक विचारतात. संरक्षण मंत्रालयाने या प्रश्नाचे दिलेले उत्तर वर दिलेलेच आहे. परंतु या पेक्षाही अतिशय जास्त महत्वाचे कारण मला लक्षात येते आहे. प्राचीन कालात भारत व तिबेट यांच्यातील व्यापार मुख्यत्वे कारकोरम खिंडीतूनच होत असे. 1962च्या चीनबरोबरच्या युद्धात गाजलेली नाथुला खिंड आता व्यापाराचे केंद्र म्हणून पुढे येते आहे. त्याच प्रमाणे कदाचित काराकोरम खिंड पुढे चीन किंवा मध्य एशिया यांच्याबरोबरच्या व्यापाराचे महाद्वार होण्याची पूर्ण शक्यता वाटते. रोहतांग बोगदा व त्याला जोडणारा रस्ता हे एकदा पूर्ण झाले की दिल्ली, लेहशी 12 महिने जोडली जाणार आहे. ते झाले की काराकोरम मार्गावरून व्यापार सुरू होणे काही अशक्य कोटीतील बाब वाटत नाही. या सर्व शक्यता सत्यात येण्यासाठी हा सर्व प्रदेश पूर्णपणे संरक्षित असण्याची गरज आहे. म्हणूनच सियाचिन व सॉल्टोरो मधे असलेली सैन्याची हजेरी कितीही खर्चिक असली तरी आवश्यकच वाटते.

18 जुलै 2010


Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “सियाचिन

  1. Excellent observations!

    Posted by sudeepmirza | जुलै 19, 2010, 9:37 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: