.
Musings-विचार

कानाखाली एक


माझ्या अमेरिकेमधल्या वास्तव्यात, विचार करायला लावणार्‍या एका प्रसंगाबद्दल माहिती एका मित्राने मला सांगितली होती. हा प्रसंग घडला होता भारतातून अमेरिकेत गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या आयुष्यात. हे गृहस्थ व त्यांच्या पत्नी आपल्या मुलगा व नातवंडे यांच्याबरोबर काही महिने मजेने घालवावे या हेतूने अमेरिकेला गेले होते.या गृहस्थांची नातवंडे होती अर्धवट वयाची म्हणजे धड लहान नाही व धड मोठीही नाहीत. आपले आईवडील घरात आहेत तेंव्हा मुलांची आता काही काळजी नाही या रास्त कल्पनेने मुलांचे आईवडील कुठेतरी दिवसभरासाठी बाहेर गेले होते. भारतात तसे दोघेच रहात असल्याने, मुलांच्या दंग्याची या आजी आजोबांना फारशी सवय नसावी. आईवडील घरात नसल्याने मुलांचे चांगलेच फावले होते. त्यांनी प्रचंड दंगा सुरू केला. आजोबांनी बराच काल हा दंगा सहन केला परंतु शेवटी जेंव्हा ही नातवंडे त्यांना फारच त्रास देऊ लागली, अंगचटीस येऊ लागली, तेंव्हा राग अनावर होऊन त्यांनी एका नातवाला जोरात एक फटका ठेवून दिला.

अमेरिकेत वाढलेल्या या नातवंडांना, आपल्याला या परदेशातून आलेल्या व फारशा परिचित नसलेल्या माणसाने, मारहाण (Physical Assault) करावी हे सहन करण्याच्या पलीकडचे होते. त्यांना जे शिक्षण मिळाले होते त्याबरहुकूम त्यांनी पोलिसांना लगेच फोन लावला. 5 मिनिटात पोलिस हजर झाले. काय घडले ते कळल्यावर त्यांनी आजोबांना हातकड्या घातल्या व ते त्यांना चौकीत घेऊन गेले. रात्री मुलगा घरी आल्यावर त्याला काय घडले ते कळले. परंतु रात्री काहीच करणे शक्य नव्हते. दुसर्‍या दिवशी सगळे कायदेशीर सोपस्कार पार पडल्यावर आजोबांची सुटका झाली. परंतु आयुष्यभर एखादा साधा अगदी वाहतुकीसंबंधीचा सुद्धा गुन्हा न केलेल्या या मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिक भारतीयाला, पोलिस कोठडीत एक रात्र काढावी लागणे हे सहनच झाले नाही. त्यांनी आजींना फोनवरूनच कपडे व पासपोर्ट घेऊन येण्यास सांगितले. पोलिस चौकीतून ते विमानतळावर गेले. मिळेल त्या पहिल्या विमानाने ते दोघे सरळ भारतात परतले.

आता या गोष्टीतील खरोखर सत्य काय? व मीठमसाला किती? हे सांगणे मला शक्य नाही. परंतु माझ्या अमेरिकेतील अनुभवांवरून, हा प्रसंग घडला असण्याची पूर्ण शक्यता वाटते हे मात्र खरे.

अमेरिकेतील पालक आपल्या मुलांना जेंव्हा रागावण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा माझ्यासारख्या भारतात आयुष्य घालवलेल्या माणसाला या अमेरिकन भारतीय पालकांची खूप वेळा अक्षरश: कीव येते. मुलगा वेड्यासारखा वागत असला, ऐकत नसला, दंगा करत असला तरी “We are not going to do that. O.K.” किंवा “This is not proper, behave, O.K.” या पलीकडे या पालकांना जाताच येत नाही. आणि शिक्षा देऊन देऊन काय द्यायची तर Time Out ची. म्हणजे दारापलीकडच्या गराजमधे मुलाला थोडा वेळ एकट्याने उभे करायचे. या “O.K.” मधे तर संताप, वैताग, वैफल्य सारख्या इतक्या भावना दडलेल्या असतात की विचारू नका. अमेरिकन पालकांचा त्यांच्या मुलांना उद्देशून उच्चारलेला हा शब्द मात्र ऐकण्यासारखा असतो हे मात्र नक्की.

अमेरिकन पालकांचा हा वैताग अप्रिय वाटतो म्हणून मुलांना दोन चांगल्या थपडा द्याव्यात किंवा कानाखाली एक वाजवावी या मताचा मी आहे असे कोणाला वाटले असेल तर ते मात्र साफ चुकीचे आहे. मी लहान असताना आईवडील, मास्तर यांच्याकडून दोन चार वेळा मार खाल्लेला आहे. परंतु मुलांना शिस्त लावण्याची ही पद्धत मला काही फारशी योग्य वाटत नाही हे मात्र खरे. प्रसिद्ध मराठी लेखक द.मा. मिरासदार किंवा शंकर पाटील यांच्या ग्रामीण कथांच्यातले बाप बिनदिक्कत मास्तरांना सांगताना दिसतात की प्वोराला चांगलं बदडून काढा!” म्हणून. हा असला जीवघेणा अनुभव मला कधी आलेला नाही मात्र मराठी चौथीत असताना चटावरआलेल्या एका मास्तरांनी काहीही कारण नसताना मला एक कानशिलात ठेवून दिलेली आज साठ वर्षांनीही मला अजून तितकाच कळवळा आणते. त्या वेळी वर्गात झालेला माझा अपमान मला अजूनही तितकाच संताप आणतो.

आपल्या मुलाला शिस्त लावण्यासाठी दिलेला एखादा फटका हा खरे तर हिमनगाचे एक टोक आहे. लहान मुलांच्यावर होणारे अत्याचार किंवा हिंसा हा खरा प्रश्न आहे. अमेरिकेत केलेले नियम हे खरे म्हणजे हे अत्याचार थांबवण्यासाठीचे आहेत. जाता जाता त्यांची झळ पालकांना लागते हे अप्रिय असले तरी सत्य आहे. पण ही सगळी चर्पटपंजरी मी आजच कशाकरता लावली आहे असा विचार बर्‍याच वाचकांच्या मनात येणे साहजिकच आहे. याला कारण आहे सध्या भारत सरकारच्या विचाराधीन असलेला एक ठराव. या ठरावाचे जर कायद्यात रूपांतर झाले तर अमेरिकेसारखीच परिस्थिती भारतात येण्याची पूर्ण शक्यता आहे.

इंग्रजीत एक म्हण आहे. ‘spare the rod and spoil the child’ म्हणून. या शिस्तीच्या वरवंट्याखाली भरडून निघालेल्या मुलांचे वर्णन Charles Dickens या सुप्रसिद्ध लेखकाने आपल्या ‘Oliver Twist’ ‘David Copperfield’ या सारख्या पुस्तकांच्यात अतिशय प्रभावीपणे केलेले आहे. ते बहुतेक वाचकांनी वाचलेले असेलच. ही वर्णने वाचून एलिझाबेथ राणीच्या कालातल्या इंग्लंडमधे या बाबतीत सुधारणा झाल्या होत्या असा म्हणतात. आपल्याकडच्या शाळा इतक्या वाईट सुदैवाने कधीच नव्हत्या हे आपले नशिबच म्हणायचे.

भारत सरकारच्या या प्रस्तावित कायद्याप्रमाणे मुलांना अशा प्रकारच्या अघोरी शिक्षा देणे हा शाळा , बालशाळा, अंगणवाड्या यांच्यासाठीच फक्त नाही तर त्या मुलांचे पालक, नातेवाईक किंवा शेजारी व मित्र यांसाठीही एक दखलपात्र गुन्हा होणार आहे. म्हणजेच अमेरिकेसारखीच भारतातली मुलेही त्यांच्या पालकांना किंवा नातेवाईकांना दुष्टपणा किंवा क्रौर्य दाखवल्याबद्दल कोर्टात खेचू शकणार आहेत. या प्रस्तावित कायद्याप्रमाणे पहिल्या गुन्ह्याला 5000 रुपये दंड किंवा एक वर्षाचा तुरुंगवास अशी शिक्षा असणार आहे तर दुसर्‍या वेळी हाच गुन्हा केला तर हीच शिक्षा 25000 रुपये दंड किंवा 3 वर्षाचा तुरुंगवास अशी असणार आहे.

सध्याच्या परिस्थितीप्रमाणे, National Commission for Protection of Child Rights (NCPCR) या कमिशनने सुचवलेली मार्गदर्शक तत्वे हीच फक्त मुलांना दाखवण्यात येणार्‍या क्रौर्याच्या विरूद्ध कायदेशीर उपाय म्हणून वापरली जातात. women and child development (WCD) मिनिस्ट्रीने या बाबतीतले

Prevention of Offences against Child Bill 2009 या कायद्याला आता जवळजवळ पूर्ण स्वरूप दिले असून तो केंव्हाही मंत्रीमंडळासमोर मंजूरीसाठी आणला जाईल. या कायद्याप्रमाणे मुलांना देण्यात येणारी अघोरी शिक्षा किंवा वागणूक याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुलांना दाखवण्यात आलेले क्रौर्य, हिंसा, अमानवी किंवा खालच्या दर्जाची वागणूक ह्या सर्व गोष्टी शिक्षेस पात्र ठरणार आहेत. मुलांचा लैंगिक, आर्थिक, शारिरिक व सामाजिक गैरफायदा घेणारा कोणताही प्रकार या कायद्याखाली येणार असून मुलांना भीक मागायला लावणे, त्यांना कामगार म्हणून कामाला लावणे, घरगुती किंवा धोकादायक काम त्यांच्याकडून करून घेणे या सर्व गोष्टींसाठी या कायद्यात विशिष्ट शिक्षा सांगितल्या आहेत. मुलांचा लैंगिक छळ व त्यांची विक्री करणे, मुलांना मादक पदार्थ देणे किंवा त्यांची विक्री करण्यास भाग पाडणे, त्यांना पॉर्नोग्राफिकल साहित्य दाखवणे हे गुन्हे तर जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र ठरतील. या कायद्याच्या कचाट्यात त्या मुलाचे पालक, घरातील इतर व्यक्ती, शाळा, नातेवाईक, शेजारी, मित्र, पाळणाघरे किंवा डे केअर केन्द्रे, तुरुंग व रिमांड होम्स हे सर्व येणार आहेत.

अजुनही पुण्यातल्या चौकामधे लहान मुले भीक मागताना किंवा काहीतरी विकताना दिसतात. क्वचित एखादे बालक काम करतानाही दिसते. पुण्यासारख्या प्रगत शहरात ही स्थिती आहे. उत्तर भारतात तर सर्रास, प्रदुषण असलेल्या ठिकाणी मुले काम करतात. भारतीय समाजात अजुनही मुलांना जी अतिशय नीच व अमानवी दर्जाची वर्तणूक दिली जाते त्यावर हा उपाय उत्तम आहे यात शंकाच नाही. आता कोरड्याबरोबर ओलेही जळते या न्यायाने काही पालकांना याची झळ सुरवातीला लागेल. परंतु या कायद्याने एकूण परिस्थिती सुधारण्यास मदत होईल यात मला तरी शंका वाटत नाही.

16 जुलै 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “कानाखाली एक

  1. असाच एक किस्सा माझ्या एका नातेवाईकांनी सांगितला. एकदा ते अमेरिकेहून परत आले. विमानतळावर सामानाची वाट बघत असताना, काहितरी क्षुल्लक कारणावरुन एका सरदारजीने आपल्या मुलाच्या कानफाटात लावली. न राहवून माझ्या नातेवाईकाने विचारले, त्यावर तो सरदारजी म्हणाला अमेरिकेत मुलं सारखी पोलिसान्ची भीती घालतात. त्यामुळे एतके वर्षांचा साठून राहिलेला राग निघाला. भारतात अजूनही आई- वडिल मुलांना पोलिसांची भीती घालतात. अमेरिकेत उलटंच चाललय. बर सगळीच मुल काही आज्ञाधारक नसतात. मार्क कमी मिळाले म्हणून बदडणे वेगळे आणि कोणाला त्रास देतायत म्हणून फटकारणे वेगळे. काही अती आगाऊ व्रात्य दांडगट मुले ही असतात, त्यांना कशी शिस्त लावायची

    Posted by लीना पटवर्धन | जुलै 16, 2010, 8:06 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक कानाखाली एक | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA. - जुलै 16, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: