.
Science

गोत्र आणि विवाह संबंध


नसते वाद विवाद उकरून काढण्यात भारतातील मंडळी जशी वाकबगार आहेत तशी बहुदा दुसर्‍या कोणत्याही देशातील नसतील. खाप पंचायत ह्या उत्तर भारतातल्या एका जुन्या समाज व्यवस्थेने आता सगोत्र विवाहाचा वाद असाच उपस्थित केला आहे. ही खाप पंचायत तशी अनेक वर्षे अस्तित्वात आहे आणि किरकोळ तंटे मिटवण्यासाठी उपयुक्त असल्याने ब्रिटिश व नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने तशीच चालू ठेवली आहे. दोन हजार किंवा तत्सम कालापूर्वी, प्रेषित म्हणून मानल्या गेलेल्या कोणा एका व्यक्तीने सांगितलेले नियम एकविसाव्या शतकातही आम्ही शिरोधार्य मानणार हे म्हणणे जसे सयुक्तिक आहे असे वाटत नाही त्याच प्रमाणे हजार वर्षापूर्वी कोण्या ऋषी मुनीने सांगितलेले सिद्धांत आजही ग्राह्य मानून त्याप्रमाणेच आम्ही वर्तन करणार हे म्हणणेही फारसे तर्कशास्त्रदृष्ट्या सुसंगत व सयुक्तिक आहे असे म्हणता येणार नाही.

ही गोत्र पद्धती आहे तरी काय? भारतात रहाणार्‍या ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य समाजातील लोकांचे या गोत्रात म्हणजे काही गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ब्राम्हण समाजातील लोकांचे, अंगिरस, अत्रि, कश्यप, भृगु, वशिष्ठ या सारख्या नऊ दहा गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. या गटांना काही ऋषिंची नावे दिली गेली आहेत. असे मानले जाते की हे ऋषि या गोत्राचे मूळ पुरुष होते.या शिवाय प्रवर, शाखा वगैरे आणखी वर्गीकरणे आहेतच. ही गोत्र व्यवस्था पूर्णपणे पितृसत्ताक असल्यामुळे लग्न होईपपर्यंत बापाचेच गोत्र मुलीचे असते व लग्न झाल्यावर ते नवर्‍याच्या गोत्राप्रमाणे बदलते. गोत्र म्हणजे कुल नव्हे. एकच कुल देवता असलेली कुटुंबे एका कुलातली मानली जातात. त्यांच्यातील परस्पर विवाह संबंध निषिद्ध मानले जात नाहीत. मात्र सगोत्र (म्हणजे ज्या ठिकाणी वर आणि वधु हे एकाच गोत्राचे असतात) विवाह संबंध निषिद्ध मानले जातात.

आता असल्या जुनाट  रुढी व समजुतींचे कोणाला पालन करावेसे वाटत असले तर त्यांनी करावे. इतर लोकांना त्यात पडण्याची काही जरूरी व गरज आहे असे मला तरी वाटत नाही. परंतु ही गोत्र व्यवस्था अतिशय शास्त्र शुद्ध असून आधुनिक जनुक शास्त्रातील तत्वांना धरून असल्यामुळे या गोत्र व्यवस्थेचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी आता ही खाप पंचायत करू लागली आहे. ही गोत्र व्यवस्था Genealogy किंवा Genetic studies मधली निरिक्षणे व अनुमाने यांना धरून आहे का नाही? हेच पडताळून बघण्याचा या लेखाचा उद्देश आहे. गोत्र व्यवस्था ही जनुक शास्त्रातील तत्वांना धरून आहे का? हे शास्त्रीय पद्धतीने शोधून काढावयाचे असले तर त्यासाठी शास्त्रीय बैठक असलेली शोधपद्धती आवश्यक आहे व तीच अनुसरली पाहिजे.


मानवी शरीर हे पेशींपासून बनलेले असते हे सर्वज्ञात आहे. या पेशीमधले दोन घटक या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात. प्रत्येक पेशीमधे एक केंद्रबिंदू असतो. या केंद्रबिंदूत 23 रंगसूत्रांच्या (Chromosomes) जोड्या असतात. प्रत्येक रंगसूत्रात, डी.एन..(D.N.A) या द्रव्याची सर्पिल आकाराची एक लांबलचक साखळी असते. एका रंगसूत्राच्या जोडीत एक रंगद्रव्य पित्याकडून आलेले व एक मातेकडून आलेले असते. प्रत्येक रंगसूत्राच्या साखळीत ऍडिनिन (), गुवानिन (जी), सायटोसिन (सी), थायमिन (टी) ही प्रमुख व महत्वपूर्ण रसायने असतात. ही सर्व रसायने वेगवेगळ्या अनुक्रमाने साखळीमधे गुंफलेली असतात. उदाहरणार्थ, सीजीएटीसीएजीटीटीसीएजीटीसीएएजीटी वगैरे. अशा अनुक्रमांच्या पद्धतीने या रसायनांच्या अनेक साखळ्या असतात. त्या काही वेळा मूळस्वरूपी पूर्ण शृंखला रूपात किंवा लघुस्वरूपी पुनरावृत्तीय शृंखला या स्वरूपात असतात.

डी.एन.ए. साखळी

रंगसूत्राची शेवटची म्हणजे 23वी जोडी त्या शरीराचे लिंग ठरवते. स्त्रीच्या शरीरात या 23व्या जोडीत दोन्ही समान रंगसूत्रे असतात व त्यांना एक्स(X) रंगसूत्र म्हणतात. पुरुषाच्या शरीरात, या जोडीतील एक रंगसूत्र एक्स प्रकारचे व दुसरे त्याहून भिन्न म्हणजे वाय(Y) प्रकारचे असते. बापाकडून आपल्या पुरुष वारसाला मिळालेला हा वाय क्रोमोसोम, हुबेहुब त्याच्या स्वत:च्या वाय क्रोमोसोमसारखा असतो. म्हणजेच आजोबा, बाप, मुलगा, काका, चुलत भाऊ या सगळ्यांच्या शरीरातील पेशीत बरोबर हुबेहुब असा तोच वाय क्रोमोसोम असतो. यालाच पुरुष वारसासाखळी (Male Lineage) म्हटले जाते.

शरीरातील प्रत्येक पेशीमधे केंद्रबिंदूच्या बाहेर जी द्रव्ये असतात त्यात काही घन पदार्थही असतात. त्यांना मायटोकॉन्ड्रिया (Mitochondria) असे म्हणतात. या मायटोकॉन्ड्रिया मधे सुद्धा डी.एन..च्या साखळ्या असतात. आईकडून आपल्या मुलांना हा मायटोकॉन्ड्रियल डी.एन.. मिळतो व तो हुबेहुब आईच्या स्वत:च्या मायटोकॉन्ड्रियल डी.एन.. सारखाच असतो. या आईच्या फक्त मुलीच हा मायटोकॉंड्रिअल डी. एन.., आपल्या मुलांच्याकडे जसा का तसा पुढे पाठवू शकतात. म्हणजेच आजी, आई, मुलगी, मावशी, मावसबहिणी या सर्वांत हा मायटोकॉन्ड्रियल डी.एन.,. हुबेहुब सारखाच असतो. यालाच स्त्री वारसासाखळी (Female Lineage) असे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर वाय रंगद्रव्य, पुरुष वारसासाखळी ठरवण्यास व मायटोकॉन्ड्रियल डी.एन.. स्त्री वारसासाखळी ठरवण्यास अत्यंत महत्वाचे ठरतात. मायटो कॉंन्ड्रिअल डी.एन.. मधे रसायनांचे अनुक्रम कमी असल्याने त्यांचा अभ्यास करणे वाय क्रोमोसोम मधील डी.एन. ए पेक्षा सोपे जाते व त्यामुळे याचा जास्त सखोल अभ्यास झाला आहे. परंतु दोन्ही वारसा साखळीत तसा मूलभूत फरक काहीही नाही.

अनेक पिढ्यांच्या या वारसा साखळीचा अभ्यास संगणकाच्या सहाय्याने केल्यावर शास्त्रज्ञांना एक अतिशय अजब गोष्ट आढळून आली. आधुनिक मानवाचा इतिहास सुमारे 150000 वर्षांपूर्वी आफ्रिकेत वास्तव्य असणार्‍या एका मानवी गटापासून सुरू झाला आहे. या मानवी गटात हजारावर तरी स्त्रिया असाव्यात असा अंदाज करता येतो. असे असले तरी आज पृथ्वीवर असलेली प्रत्येक स्त्री या हजार स्त्रियांपैकी फक्त एकाच स्त्रीची वंशज आहे. म्हणजे या मूळ गटातील इतर सर्व स्त्री वंशजांना कोणत्या ना कोणत्या पिढीत फक्त पुरुष वंशजच उरले व त्यामुळे त्यांच्या वारसा साखळ्या नष्ट (Extinct) झाल्या.या स्त्रीला आधुनिक मानवी ईव्ह असे म्हणले जाते. कोणत्याही एका मोठा गटातील स्त्रियांच्या वारसा साखळ्या या पद्धतीने अभ्यासल्या तर असेच आढळून येते की फक्त एक आणि एकच वारसा साखळी चालू रहाते व बाकी सर्व वारसा साखळ्या, मुलगे झाल्याने नष्ट होतात.बरोबर याच पद्धतीने 60000 वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या फक्त एका पुरुषाचे, आज पृथ्वीवर हयात असलेले सर्व पुरुष हे वंशज आहेत. म्हणजेच त्या पुरुषाच्या कालात त्याच्या बरोबर जे इतर पुरुष होते त्या सर्वांच्या वंशजांना कोणत्या ना कोणत्या पिढीत फक्त मुलीच झाल्या व त्यांची पुरुष वारसा साखळी नष्ट (Extinct)झाली. या पुरुषाला आधुनिक ऍडम असे म्हणले जाते. आता आधुनिक ईव्ह व आधुनिक ऍडम यांच्यात ऐंशी नव्वद हजार वर्षांचे अंतर आहे ही मोठी गंमतीची गोष्ट आहे इतकेच. बाकी त्याला तसे महत्व फारसे नाही. फक्त एकच पुरुष किंवा स्त्री यांच्याच वारसा साखळ्या चालू राहून त्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या समकालीन इतर स्त्री पुरुषांच्या वारसा साखळ्या ,काही कालाने नष्ट होण्याच्या तत्वाला Extinction Principle असे नाव आहे.


या सगळ्या पृथ:करणाचा गोत्र व्यवस्थेशी कसा संबंध जोडता येतो ते पाहू. भारतातील मानवी वास्तव्य सुमारे 74000 वर्षांपूर्वी संपूर्णपणे नष्ट झाले होते. ( टोबा ज्वालामुखी) या नंतर फक्त 10,000 वर्षांपूर्वी आधुनिक मानव परत भारतीय उपखंडात आले. आर्य संस्कृती तर इ..पूर्व 1500 नंतरच भारतात आली. त्यामुळे इ..पूर्व 1000 हा कालखंड आपल्याला या गोत्र व्यवस्थेसाठी अगदी पूर्वीचा म्हणून मानता येईल. आता असे धरून चालू की या कालखंडातील गोत्रपुरुष असलेल्या या नऊ किंवा दहा ऋषिंपासून भारतातील सध्याची उत्तर भारतीय ब्राम्हण पुरुष लोकसंख्या निर्माण झाली आहे. 3000 वर्षात फक्त 75 च्या आसपास पिढ्या होतात. भारताची एकूण लोक संख्या 120 कोटी. उत्तरेकडच्या राज्यातील जनसंख्या अंदाजे 80 कोटी. त्यापैकी निम्मे पुरुष म्हणजे 40 कोटी. त्यापैकी 5% ब्राम्हण समाजाचे असावेत असे धरून ब्राम्हण पुरुष, 2 कोटी. गणिती व संख्याशास्त्रीय शक्यतेप्रमाणे 9 पुरुष 75 पिढ्यांमधे या पेक्षा कितीतरी जास्त पटीने वंशज निर्माण करू शकतात. परंतु तसे न घडण्याची दोन कारणे वाटतात.

1. मागच्या 3000 वर्षातील व्यक्तींची आणि विशेषत: स्त्रियांची, आयुष्य मर्यादा, बाल मृत्युंचे प्रमाण हे सर्व लक्षात घेतले तर एवढे वंशज निर्माण होणे कठिण वाटते.

2. या पेक्षा सर्वात महत्वाचे कारण म्हणजे 9 पुरुषांपासून सुरू झालेल्या वारसा साखळ्या, 75 पिढ्यांनंतर टिकून रहाण्य़ाची शक्यता (Extinction Principle) मुळे जवळ जवळ नाहीच. या पैकी एक किंवा फार तर दोन पुरुष वारसा साखळ्या टिकून राहिल्या असाव्यात. यामधेही आणखी काही कालानंतर फक्त एक आणि एकच वारसा साखळी टिकून राहील. ती कोणत्याही ऋषिची असू शकते. याचा अर्थ असा की अस्तित्वात असलेला सर्व ब्राम्हण समाज एक किंवा फार तर दोन ऋषिचे वंशज असणार आहेत. यामुळेच गोत्र पद्धतीला व सगोत्र विवाहाला विरोध या सगळ्या गोष्टींना काही शास्त्रीय बैठक आहे असे म्हणणे धाडसाचे ठरावे.

तरीही क्षणभर आपण असे मानू की इ..पूर्व 1000 मधे अस्तित्वात असलेले हे नऊ किंवा दहा ऋषिच सर्व उत्तर भारतीय ब्राम्हण समाजाचे पूर्वज आहेत. परंतु हे नऊ किंवा दहा ऋषी काही आकाशातून पडलेले नाहीत. ते ही कोणाचे तरी वंशजच आहेत. व त्या सर्वांचा मूळ पुरुष वर निर्देश केलेल्या तत्वाप्रमाणे एकच असला पाहिजे. एकच पूर्वज असलेले हे ऋषी मग निरनिराळ्या गोत्रांचे कसे असणार? ते तर सर्व एकमेकांचे भाऊबंदच असणार. त्यामुळेच गोत्र व्यवस्थेच्या संकल्पनेला शास्त्रीय आधार किंवा बैठक आहे असे मी तरी म्हणणार नाही.

खाप पंचायतीच्या मागणीला कोणतीही शास्त्रीय बैठक आहे असे मला तरी वाटत नाही. त्याला राजकीय डावपेच समजून तसेच उत्तर देणे आवश्यक आहे.

13 जुलै 2010

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

42 thoughts on “गोत्र आणि विवाह संबंध

 1. अमुक गोष्ट मान्य नाही. किंवा विश्वास नाही. हे मान्य असू शकते. परंतु आपण ‘खुळचट’ म्हणालात ते बाकी पटले नाही. कदाचित तुमचे म्हणणे योग्यही असेल, परंतु ‘इ.स.पूर्व 1000 मधे अस्तित्वात असलेले हे नऊ किंवा दहा ऋषिच सर्व उत्तर भारतीय ब्राम्हण समाजाचे पूर्वज आहेत’ हे चुकीचे आहे. ‘इ.स.पूर्व ५०००’ मध्ये महाभारत घडले होते. आता त्यावेळचे ऋषी जर नऊ दहा असते. तर अर्जुनाची आणि दुर्योधनाची सेना आली कुठून?? हा पण एक प्रश्न आहे. आपला इतिहास हा आपल्यालाच माहित नाही. मग काय बरोबर आणि काय चुकीचे हे म्हणणे कितपत योग्य आहे? ज्यांची इच्छा असेल त्यांनी माना. ज्यांची इच्छा नसेल त्यांनी मानू नका. पण आपलंच मत योग्य आहे. असा अट्टाहास का?

  Posted by हेमंत आठल्ये | जुलै 13, 2010, 4:49 pm
  • कार्बन डेटिंगच्या पद्धतीने हे सिद्ध केले गेले आहे की मोहेंजोदाडो संस्कृती इ.स.पूर्व 1300 मधे लयास गेली. त्यानंतरच आर्य टोळ्या भारतात आल्या. तेंव्हा हे गोत्र पुरुष त्याच्या आधी भारतात कसे असतील? महाभारत इ.स.पूर्व 5000 मधे कसे घडेल? बाकी खुळचट हा शब्द UnParliamentary धरून मी काढून टाकला आहे.

   Posted by chandrashekhara | जुलै 13, 2010, 4:55 pm
 2. मागे एका देवळातला एक अनुभव आहे. अभिषेकासाठी एक बाई पैसे देत होत्या त्यांना गोत्र माहित नव्हते. त्यावर तिथे बसलेल्या गुरुजींनी कश्यप असे लिहिले. आणि वर स्पष्टिकरण हि दिले. जर कोणाचे गोत्र माहित नसेल तर कश्यप लिहितात. त्यामुळे महाराष्ट्रात कश्यप गोत्र खुप कॉमन आहे. असे असताना या गोत्राला किती महत्त्व द्यायचे ते ज्याचे त्यानी ठरवावे.
  दक्षिण भारतात मामा भाची किन्वा आते मामे भावंडांमधे सुद्धा लग्ने होतात. गुजरातेत पटेल फक्त पटेल यांच्याशीच लग्न करतात. उत्तर भारतात अगरवाल फक्त अगरवाल यांच्याशीच लग्न करतात. एका गोत्रात लग्नाला जे विरोध करतात ते कायम पारशी समाजाचे उदाहरण देतात. या बाकी लोकांवर कोणीतरी संशोधन करावे.

  Posted by लीना पटवर्धन | जुलै 13, 2010, 5:35 pm
  • देशा चा कायदा काय म्हनतो ते बघा . कायदा म्हनतो काय तुम्हाला गोत्र बघुन लग्न करा? नाही ना ? मग कोन काय करतो ते कशाला बघता ? तुम्हाला काय करायचे ते बघा . अहो तुम्ही आधी लग्नच कशाला करता ते बोला ? लग्नाचीच गरज नाही म्हननारे आहेत . आणि कायदा पन म्हनतो की लग्न करने काही सक्‍तीचे नाही. मग आता गोत्र आले कुठुन ? कशा साठी? जर माझे गोत्र ‘विश्वामीत्र ‘ असेल तर असेल . नसले तरी मी काही करु शकत नाही. असले तरी माझ्या कडे पुरावा नाही. मला त्याची गरज नाही. माझ्या देशाचा कायदा मला ईथे करत असलेल्या कोनत्याच कामासाठी माझे गोत्र विचारत नाही. गोत्रा वाचुन मला नाही वाटत की कुनाचे काही आडत असेल . मंदीरात गेली गोत्र विचारलं. माहीत नव्हतं. कश्यप झाली. मंदीरात गेलीच कशाला?गेली तरी सोयीने तीला तीचे गोत्र सांगीतलेच ना . अहो ज्याला आपले गोत्रच माहीत नाही त्याचे काय गोत्र असनार ? तुम्हाला भारताची राजधानी काय आहे विचारले तुम्ही म्हनता माहीत नाही. तर तुम्हाला सांगन्यात आले की तुम्ही अडाणी आहात . आता ह्यात काय चुकले ? ५०% लोक भारतात अडाणी गोत्राचे आहेत ना ? गोत्र म्हनजे तशी विचारसरनी चालवनारा मानुस असेल . लग्ना नन्तर मुलीचे गोत्र काय सगळेच बदलते . म्हनजे ती तीथुन पुढे ज्या घरात गेली त्या घराची विचारसरनी पुढे मनापासून चालवनार.

   Posted by प्रभाकर | जुलै 16, 2010, 6:10 pm
 3. जनुकांच्या वारशाबद्दल तुम्ही अतिशय सोप्या शब्दांत माहिती दिली आहे. पण आर्य टोळ्या भारतात आल्या हा आर्य-द्रविड सिद्धांत नुकत्याच झालेल्या जनुक संशोधनानंतर खोटा ठरला आहे. यासाठी भारतातल्या विविध प्रांतातल्या विविध जातीच्या लोकांचे नमुने घेऊन त्याची जनुकीय तपासणी करण्यात आली होती. या संशोधनात असे सिद्ध झाले की भारतात आर्य द्रविड असे दोन वेगळे गट नसून सर्व भारतीय लोक एकाच वंशाचे आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता इत्यादी वर्तमानपत्रांमध्येही ही बातमी छापून आली होती.
  आणि गोत्र आणि जनुकीय वारसा याबद्दल संशोधन केले, तर कदाचित त्यातून काही वेगळे आश्चर्यजनक निष्कर्षही निघू शकतील. पण याबाबत नीट संशोधन होणे आवश्यक आहे. शिवाय दत्तक पद्धतीमुळेही जनुकीय वारशात जो फरक पडतो, त्याचा उल्लेख इथे झाला नाहीये, पण हा छोटासा घटकही फार महत्त्वाचा ठरू शकेल.

  Posted by D D | जुलै 13, 2010, 6:02 pm
 4. Fantastic…
  आर्य टोळ्या भारतात बाहेरून आल्या हे वाक्य पूर्वीपासून विवादास्पद होते आणि आता ते ताज्या संशोधानांनुसार ते खोटे ठरत आहे. मंगोलिया-इराण-सिंधुपूर्व संस्कृती असा क्रम तर सिद्ध झालाच आहे. आणि उत्तर-सिंधू, आयर्न एज आणि आर्यांचा उदय यामध्ये आता बरेच संशोधक आर्य बाहेरून आले नाहीत याला मान्यता देऊ लागले आहेत. असो. बाकी लेख अतिशय उत्तम.

  Posted by Nikhil Sheth | जुलै 13, 2010, 7:11 pm
  • आर्य टोळ्या हा शब्दप्रयोग मी आर्यांच्या सेना किंवा मोठे गट या अर्थाने वापरलेला नाही. 25,50 लोकांच्या छोट्या छोट्या गटाने इराण, अफगाणिस्तान मधून लोक, जास्त चांगली चराऊ कुरणे सापडतील म्हणून सप्तसिंधू प्रदेशात येत राहिले. आर्य हे परकीय आक्रमक वगैरे कधीच नव्हते हे आता सर्वसाधारणपणे मानले जाते. त्यांनी फक्त येताना आपली संस्कृती आणली व तिला भारतात राजाश्रय मिळाल्यामुळे ती सर्वमान्य झाली

   Posted by chandrashekhara | जुलै 13, 2010, 8:01 pm
 5. uttam lekh..

  21 vya shatakat suddha lok ase khulachat vichar mantat. hech motha aashcharya aahe

  lokanche vichar badalnyachi avashyakta aahe…

  ya lekhane nakkich kahi pramanat badalel ashi apeksha ahe

  Posted by Pradnya Deshpande | जुलै 14, 2010, 5:43 सकाळी
 6. अतिशय अभ्यासपूर्ण लेख. आपलं विवेचन अतिशय आवडलं !!

  Posted by हेरंब | जुलै 14, 2010, 6:22 सकाळी
 7. १५०० हजार वर्षापुर्वी आर्य नावाचे काही मानसं भारतात आले होते असं तुम्ही लिहिलं आहे तुमच्या लेखात. तुमच्या कडे कोनता पुरावा आहे काय? जरा देताल काय? भारताच्या ईतीहासात कोन आलं कोनी काय काय केलं ह्याचे सगळे पुरावे आहेत. आर्य नावाचे नालायक लोक कोनी नव्हतेच असे जगात तर येतीलच कुठुन. भारतातच राहाणार्‍या लोकांना आर्य म्हणत असत. नालायक ईंग्रजांनी ईथल्या अतीशय सुसंकृत पध्दतीने रहात असलेल्या लोकांना बेवखुप बनवुन त्यांच्यावर राज्य करुन त्यांची संसकृती नष्ट करुन त्यांचा देश गुलाम सहज बनवता यावा म्हणुन तसं म्हनलं आहे. त्यालाच प्रमान मानुन तेच ईतीहासात शिकवल्या जात आहे. रडने तर हेच आहे ना.
  बाकी तुमचा लेख बरोबर असेल. आर्य भारतात आले होते ह्याचा पुरावा नाही. म्हनुन ते आले बिले नव्हते. ईथले लोकच आर्य होते द्रवीड होते. जे काही होते ते त्यावेळच्या जागात सगळ्यात पुढारलेले होते.
  तुम्हाला एक विचारायचे आहे . तुम्ही सावरकरलिखित ‘भारतीय ईतीहासातील सहा सोनेरी पाने ‘ पुस्तक वाचलं आहे काय? ह्याचं उत्तर ईथे द्या मग पुढे बोलु.

  Posted by प्रभाकर | जुलै 16, 2010, 3:33 pm
  • प्रभाकर

   आर्य नावाची कोणी अग्नीपूजक जमात अस्तित्वात होती याचा पुरावा इराणमधील ‘अव्हेस्टा’ या धर्मग्रंथात मिळतो. वेद आणि अव्हेस्टा यात अकल्पनीय साम्य आहे. अव्हेस्टामधे आर्यांना Airyanəm असे नाव आहे. सप्तसिंधू मधील आर्य जमात देवांना चांगली मानत असे तर अव्हेस्टा मधले आर्य असुरांना चांगले मानत असत. इंद्र व वरूण हे त्यांचे खलनायक होते. मोहेंजोदाडो व हडप्पा संस्कृती ही आर्य संस्कृतीपेक्षा निराळी होती याचा उत्तम पुरावा म्हणजे तेथील उत्खननात आर्य संस्कृतीच्या दोन मुख्य खुणा असलेल्या यज्ञ वेदी आणि घोडा किंवा अश्व यापैकी एकाच्याही काहीही खुणा सापडत नाहीत.

   बाकी भारतातलेच लोक आर्य होते हे आपले म्हणणे एकदम बरोबर आहे. मी फक्त होते पेक्षा झाले असे म्हणेन. गौतम बुद्धाच्या मूठभर अनुयायांनी जसा सबंध चीन व जपान बौद्ध केला तसेच बहुदा इराण, अफगाणिस्तानातून आलेल्या थोड्याशा आर्यांनी केले असावे. त्यांच्या संस्कृतीला राजाश्रय मिळाला असणार. त्यामुळे लोकाश्रयही मिळाला. मला सावरकरांविषयी नितांत आदर आहे परंतु ही सहा सोनेरी पाने मी वाचलेली नाहीत. जालावर उपलब्ध असल्यास मला दुवा पाठवावा. मी अवश्य वाचीन.
   आणि अहो आपण इ.स.पूर्व 1300 या कालाबद्दल बोलत असताना इ.स. 1400 मधे आलेले इंग्रज कुठे उपटले मधून? ते काही कळले नाही बुवा!

   Posted by chandrashekhara | जुलै 16, 2010, 3:49 pm
 8. The Indus Valley Civilization existed in between 3000-1500 BC while the earlier Kot Diji cultures, of the pre-Indus period, existed in the period of approximately 3300-2800 BC. Harappa and the city of Mohenjo-Daro were the greatest achievements of the Indus valley civilization. These cities are well known for their impressive, organized and regular layout.

  Then came Aryans who composed these evocative hymns to nature and celebrated life exuberantly referred to themselves as Aryas usually anglicised as Aryan meaning ‘noble’. The 6th Century B.C. was the period of Magadh Kingdom. Chandragupta Maurya ousted the oppressive ruler of Magadh to find his own dynasty that existed from 322 – 298 B.C.
  हे पहा ३००० बी सी मधे भारतीय संस्कृती ही जगात सगळ्यात पुढारलेली होती हे पुराव्या सहीत आहे . मान्य? जर कुनी कुठे जावुन कुनाला काही शिकवलंच असेल तर त्या काळच्या भारतीयांनीच. दुसर्‍या नालायकांना तेव्हा संडास धुवायचे पन माहीत नव्हते. मान्य? मग असे असंसकृत लोक येतीलच कसे आणि कुन्या रस्त्यानी? ईथलेच लोक आर्य, ईथलेच लोक द्रविड ईथलेच लोक हिन्दू. Then came Aryans म्हनजे त्या वेळापासुन बाहेरचे नालायक लोक ईथल्या लोकांना आर्य म्हणु लागले. अरब लोक सिन्धु नदिच्या पलिकडे रहानार्‍याना सिन्धु म्हनायचे . त्याचे हिन्दू झाले. मग ते म्हनायला सुरुवात झाले तेव्हा पासुन हिन्दू का त्या आधी पासुन हिन्दू?
  अमेरीका आता सगळ्यात पुढारलेला देश आहे. तीथे वेडे आताच्या अफ़गाणिस्तानातील लोक जावून त्यांना अफ़गाणी नाव देवु शकतील काय? हे हसन्यासारखे आहे. आर्य हे कुठुन आले नाहीत. ह्याला पुरावाच नाही.

  Posted by प्रभाकर | जुलै 16, 2010, 4:43 pm
 9. सहा सोनेरी पाने जाळ्यावर नाही आहे . ठाण्याला नौपाड्याला मराठी पुस्तकाच्या दुकानात मिळु शकेल. हे पुस्तक ज्याने वाचले नाही त्याने काहीच वाचले नाही शिकले नाही. हे पुस्तक कुनीही वाचुन खरा ईतीहास माहीत करुन घेवुन उगीचच देश प्रेमी होवुन पुन्हा त्या चंद्रगुप्त मौर्य सारखं करेल म्हनुन मुद्दाम कोन्यातरी राजकीय पक्षाच्या लोकांनी जास्त प्रकाशात येवु दिले नाही. कार्ल मार्क्स ने जर्मनी त लिहिलेले पुस्तक लेनीन ने रशियात वाचले आणि रशिया चीन मधे क्रांती घडवुन आनली. अशी पुस्तके बिस्तके पाचुन आपल्या ईतीहासात सहा सोनेरी पाने होती आनी त्यात आजुन एक ७ वे सोनेरी पान जोडावे वाटत नाही असे ईथल्या लोकांना अजुन माहीत नाही.
  ईराण मधे किंवा कुठेही जर भारतीय संस्कृती बद्दल काही उल्लेख मिळत असेल तर थेरि अशी लागु होते कि ईथले शिकले सवरले लोक तीथे गेले तेव्हा त्यांना थोडं शिकवुन आले. ईथुन १००० वर्षा नन्तर अफ़गास्तान च्या डोन्गरावर ईलेक्ट्रीक मोटार पडलेली सापडली तर ती अती प्रगत चंद्रावर जावुन आलेल्या अमेरीकेतुन तीथे गेली असेल की तीथल्या आताच्या जागतीक विद्वान शुर धडाडी नालायक रानटी लोकांनी मागे पुढे काही नसतांना शोध लावली असनार?

  Posted by प्रभाकर | जुलै 16, 2010, 5:08 pm
 10. ईसवी सन १४०० मधे आलेल्या ईंग्रजांनी अशी मुद्दाम थेरी काढली आहे की आर्य युरोपीयन होते . म्हनुन त्यांचे नाव घेतले मी. युरोपीयन हे जे आताही शौच्च झाल्यावर कागदाने पुसतात ते तेव्हा ३००० बी सी मधे कसे किती शहाने असतील बरं? जे कि पाण्यानी धुने तर लांबच राहिले कागदाने पन पुसत नसतील. ईंग्राजांचे म्हनने होते की भारत जर गुलाम बनवायचा असेल तर ईथली भाषा, संसकृती नष्ट केली पाहिजे . ते त्यांनी केली. नंतर त्यांनी विचार केला की अशी बोम्बाबोम्ब केलेली सुध्धा बरे राहील की जी आर्य संसकृती तुम्ही तुमची म्हनता ती पन आमचीच.
  आम्हीच तेव्हाचे आर्य होतो किन्वा त्या प्रदेशातले होतो आणि आता आलो आहोत तुमचावर राज्य करायला. जर आम्ही तुमचे वेद लिहिले आहेत तर आम्ही आपोआपच सुपीरीयर ना ? जर सुपीरीयर आहोत तर स्वतःला गुलाम , परक्याचे राज्य वगैरे वाटुन घेवु नये असे म्हनुन. बाकी काही नाही.
  असो , आपन विद्वान आहात ह्यात काही दुमत नाही.
  आपन ते सावरकरांचे पुस्तक वाचा. संग्रही ठेवा. पैसे असतील तर चांगल्या लोकांना हजारोनी गिफ़्ट द्या. आनी तुमचा ब्लॉग वाचनार्‍यांना ते पुस्तक वाचायला सांगा.
  आरे बाबांनो !! जग गेलं खड्ड्यात . तुमचा खरा ईतीहास तरी तुम्ही माहीत करुन घेनार की नाही? एक लहान लेकरु आई वडिलाचे लग्ना चे फोटो पहात होते . त्याने विचारले आई फोटो मधे मी दिसत नाही. आई म्हने तु फोटो काढताना आजीच्या कडेवर होतास. नंतर त्याला आपोआपच मोठा झाल्यावर कळते कि तो फोटोत का दिसला नाही.
  ईथं तुमचा अल्बमच गायब करन्यात आला आहे . चुकुन कुठे एखादा तुम्हाला फोटो तुमच्या संदर्भातल्या सारखा वाटत असला तर तुम्हाला सांगन्यात येत आहे की बाबा ! तुला वेड बिड लागले आहे काय? तुमच्या पुर्वाजांचे फोटो ईथे कशे येतील.
  कोलंबस आणि वास्को द गामा हे दोन त्या काळच्या खायला मौताज असलेल्या युरोप मधले डाकु होते . त्यांना हुकुम सोडन्यात आला की त्यांनी देश सोडुन जाने. कुठे जावे मरायला म्हनुन ते जहाजात बसुन जगलो तर जगलो नाही तर मेलो तर मेलो म्हनुन एक जन एका दिशेला दुसरा दुसर्‍या दिशेला गेला. त्यांना कोनी आडवनार नाही अशी जमीन पाय ठेवायला मिळाली तर आता म्हने कोलंबस डिसकवरड अमेरीका. वास्को द गामा हा काही आमचा मामा नव्हता . त्यांनी धर्मांतरा साठी किती लोकांचे काय हाल केले होते ते जर खरा “ईतीहास” वाचला तरच कळेल.

  Posted by प्रभाकर | जुलै 16, 2010, 5:44 pm
 11. गोत्र म्हणजे काय, त्याच्या तुम्ही केलेल्या व्याख्येशी मी सहमत नाही. गोत्र म्हणजे एका कोणा रुषी-मुनिंचे वंश ही संकल्पना चुकीची आहे. पूर्वीच्या काळी जी गुरुकुल पद्धत होती, त्यामध्ये एका आश्रमामध्ये (one school of education; not necessarily just one institution) एकत्र शिकणारी मुले-मुली एका गोत्राची मानण्याची चाल होती, जी त्या कालासाठी योग्य होती. उद्देश हा की त्यानी एकमेकास भाऊ-बहिण मानून विद्यार्जनाकडे लक्ष द्यावे.
  अर्थातच आजच्या कालातही गोत्र मानणे हा वेडेपणा आहे.

  Posted by Amit | जुलै 17, 2010, 8:55 pm
  • अमित

   तुमची गोत्राची आधुनिक व्याख्या रोचक आहे. परंतु खाप पंचायतीला ती मान्य होईल असे मात्र वाटत नाही.

   Posted by chandrashekhara | जुलै 18, 2010, 9:10 सकाळी
 12. @chandrashekhara
  “सहा सोनेरी पाने” ह्या सावरकरांच्या पुस्तकाची सॉफ्ट-कॉपी हवी असल्यास आपला मेल आयडी सांगणे.

  Posted by अजित | सप्टेंबर 24, 2010, 3:59 pm
 13. Lagnasathi muli pahayala gelyas kay obervation karave..

  pls sugest..

  Posted by dnyanesh | डिसेंबर 30, 2010, 5:24 pm
 14. mala सहा सोनेरी पाने” ह्या सावरकरांच्या पुस्तकाची सॉफ्ट-कॉपी हवी mail id is d.shinde@rediffmail.com

  Posted by dnyanesh | डिसेंबर 30, 2010, 5:40 pm
 15. Mazhye lagn fakt gotra ek aahe mhanun modle…Mazhe tya mulivar 3 varshapasun prem hote..Tichya vadilani tila gotrache vait parinam sangitle ani ti sudha ghabrun lagnas virodh karat aahe..Please suggest or give me some proof regarding gotra?

  Posted by sandeep Nanekar | मार्च 28, 2011, 8:16 pm
  • संदीप

   गोत्रासारख्या भाकड समजुतीमुळे आपल्या वैयक्तिक व खाजगी जीवनावर आलेल्या आपतीबद्दल वाचून दु:ख झाले. माझ्या लेखात, गोत्र या कल्पनेला कोणताही शास्त्रीय आधार नाही व ही एक भाकड कल्पना का आहे, हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझा लेख आपण इतर व्यक्तींना वाचायला जरूर द्या . कदाचित त्याचा चांगला परिणाम होईलही!

   Posted by chandrashekhara | मार्च 29, 2011, 9:14 सकाळी
 16. I tried to write in Marathi but it’s taking a hell lot of time and not giving me all the words I need.

  It’s proven that in consanguineous marriage, there is a chance that offspring may have some genetic disease or they may be genetically inferior. But using this point to justify unacceptability of same gotra marriage is incorrect for following reasons. a) Gotra system is paternal; whereas genetic makeup of a person is inherited from both parents. This means gotra system accepts your marriage with your maternal cousin who obviously has a different gotra. But technically it’s a marriage in close blood relation. b) The logic of gotra system takes back to originator of that gotra which is not necessary. One doesn’t need to check blood consanguinity that deep. 4 generations is fine.

  Unfortunately, I am an offspring of a close blood-relation-marriage and hence a victim of a deadly genetic disease called as Muscular Dystrophy.

  I think following are the points one should consider while choosing a marital partner, especially when you want to have children.
  a) Check if you don’t have any blood relationship to your wanna-be-marital-partner in last 4 generations.
  b) Check if there is any genetic disease in your wanna-be-marital-partner’s blood family in last 4 generations.

  Apart from that, it’s always good to marry someone whom you love and who loves you. Long live Supreme Mother Nature. Amen. 🙂

  Posted by Vega | एप्रिल 28, 2011, 11:52 pm
  • Vega-
   Thanks for your reply. I was saddened to learn that you are a victim of a deadly genetic disease caused by close blood relationship marriage. The Gotra system was essentially devised to avoid such progeny. Unfortunately, lack of knowledge about genetics during those ancient times, resulted into an imperfect system.
   My article essentially tries to highlight this fact. Your observations, even though very true, are bit on the ideal side. According to me not having common ancestor for two generations, may be enough of a safeguard.

   Posted by chandrashekhara | एप्रिल 29, 2011, 9:05 सकाळी
 17. भन्नाट , फार सुरेख लिहिले आहे. चांगली माहिती मिळाली.

  Posted by ninad kulkarni | नोव्हेंबर 20, 2012, 4:22 सकाळी
 18. वेदिक संस्कृती चा कालखंड पटणारा नाही.भाषिक , खगोलशास्त्रीय परिमाणानुसार ऋगवेदाचा कालखंड ख्रिस्तपूर्व ५००० पर्यंत जातो.मग आपण क्रीस्तापुर्व १५०० कोणत्या आधारे म्हणता.तसेच ऋगावेदामध्ये असलेल्या विविध ऋषकुलं आणि वंशावळी बद्दल आपले काय मत आहे?

  Posted by nitin bhagawat | ऑगस्ट 9, 2013, 8:33 pm
  • भारतात इ.स.पूर्व 1500 मध्ये वैदिक संस्कृती प्रचलित झाली याचे स्पष्ट पुरावे सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यात झालेल्या उत्खननावरून मिळाले आहेत. त्याच प्रमाणे ऋग्वेदाचा कालखंड इ.स.पूर्व 4000ते5000 आहे याबद्दलहीदुमत असण्याचे काहीच कारण नाही. यावरूनच ऋग्वेदातील जुन्या ऋचा याभाअरतीय उपखंडाबाहेर किंवा मध्य एशिया मधे रचल्या गेल्या असाव्यात असे अनुमान काढता येते. आपल्याला रस असल्यास या विषयावरील माझे विचार माझ्या शंका-कुशंका या पुस्तकातील, ‘आपले धर्मग्रंथ कधी रचले गेले’ यालेखात वाचतायेतील. हे पुस्तक या दुव्यावर वाचता येईल. http://www.scribd.com/doc/60183105/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-Shanka-Kushanka

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 10, 2013, 4:00 pm
 19. आपण आपल्या लेखामध्ये म्हणता की “आर्य संस्कृती तर इ.स.पूर्व 1500 नंतरच भारतात आली. त्यामुळे इ.स.पूर्व 1000 हा कालखंड आपल्याला या गोत्र व्यवस्थेसाठी अगदी पूर्वीचा म्हणून मानता येईल.” परंतु मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपण म्हणता की “भारतात इ.स.पूर्व 1500 मध्ये वैदिक संस्कृती प्रचलित झाली याचे स्पष्ट पुरावे सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यात झालेल्या उत्खननावरून मिळाले आहेत. त्याच प्रमाणे ऋग्वेदाचा कालखंड इ.स.पूर्व 4000ते5000 आहे याबद्दलहीदुमत असण्याचे काहीच कारण नाही”.हि दोन्ही विधाने परस्पर विरोधी नाहीत काय? aryan Invasion theory हि इंग्रजांनी त्याच्या वसाहतवाद आणि वंश श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी म्हणून जाणून बुजून आपल्या गळी उतरवली हे आता सर्वमान्य झाले आहे.
  आर्य मध्य आशियातून 1500 BC नंतर आले ह्या अनुमानाला कोणताही शास्त्रीय आधार नाही ऋग्वेदाची रचना साप्तसिंधुंच्या खोर्यात किंवा सरस्वती नदीच्या किनारी झाली असेही कित्येक जाणकारांचे म्हणणे आहे .त्या अनुसार प्राचीन भारताचा वेदिक कालखंड सुमारे 4000-3000 BC मागे जातो.त्यामुळे आपल्या लेखातील गोत्राच्या प्राचीनते संबधी काढलेले निष्कर्ष कच्च्या पायांवर उभे आहेत.

  परंतु आपण खाप पंचायती द्वारे केलेल्या सगोत्र विवाहाला केलेला विरोध कसा अशास्त्रीय आहे ह्या आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.माझ्या मते आता या २१व्या शतकात विवाहापूर्वी मुला मुलीनी आपली ग्रह कुंडली जुळवण्या ऐवजी आपली “Genetic”कुंडली जुळते की नाही ते बघावे.

  माझे स्वतःचे मत असे आहे की गोत्र जात पंचायत या गोष्टी पुराणमतवादी, बुरसटलेल्या विचारसरणीच्या ठरवून पूर्णतः झटकून टाकू नयेत. जात पंचायातीद्वारे आजही अनेक समाजामध्ये कौटुंबिक किवा तत्सम अनेक छोटे मोठे तंटे निकालात निघतात आणि ते जात पंचायतीने दिलेले असल्या मुळे त्या समाजात स्वीकारले जातात.तसेच ते आपल्या प्रचलित न्याय व्यवस्थे पेक्षा सुलभ आणि कमी खर्चिक असतात.

  अर्थात खाप पंचायत आणि त्यांच्या निवाड्यातून जे अमानवीय आणि विकृत प्रकार घडत आहेत त्यांची मी घोर निंदाच करतो.खाप पंचायती कडून जी गुन्हेगारी स्वरुपाची कृत्ये घडत आहेत त्यासाठी त्यांना योग्य शासन झालेच पाहिजे व अशा गोष्टी घडू नयेत म्हणून वेळीच प्रतिबंध घातले पाहिजेत.त्याच बरोबर या खाप पंचायातीना मानणारा जो मोठा वर्ग आपल्या देशात आहे त्या वर्गाला शिक्षण आणि प्रबोधान करून कालबाह्य झालेल्या कल्पना आणि विचार यांना तिलांजली देण्यास उद्युक्त करावे लागेल.
  आपण लिहिलेली ई बुक”शंका कुशंका ” मी अवश्य वाचणार आहे.धन्यवाद!!!!!

  Posted by nitin bhagawat | ऑगस्ट 10, 2013, 8:27 pm
  • नितिन

   थोड्या सविस्तरपणे आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

   1. भारतात आर्य संस्कृती प्रचलित होण्याचा काळ व ऋग्वेदातील सर्वात जुन्या ऋचा रचल्या जाण्याचा काळ हे भिन्न असण्याचे कारण हे आहे की या ऋचा भारताबाहेर बहुधा मध्य एशिया मधे रचल्या गेल्या असाव्यात.
   2. आर्य आक्रमण सिद्धांत आता कालबाह्य झाला आहे हे आपले म्हणणे पूर्णपणे योग्य आहे. (संदर्भ माझा हा लेख बघावा ) त्याचप्रमाणे आर्य मध्य एशिया मधून भारतात आले यालाही काही पुरावा नाही हे ही आपले म्हणणे योग्यच आहे.परंतु आर्य जरी भारतात आले नसले तरी मूळ वैदिक धर्म भारतात बाहेरून आला असावा असे मला वाटते. सम्राट अशोकाने पाठवलेल्या काही बौद्ध भिक्कूंनी चीन पासून,इंडोचायना.कोरिया,जपान येथे बौद्ध धर्म जसा पसरवला किंवा काही इस्लामी मौलवींनी ज्या प्रकारे मलेशिया, इंडोनेशिया मध्ये इस्लाम पसरवला त्याच पद्धतीने वैदिक धर्म भारतात पसरला असावा असे माझे मत आहे.एखाद्या राज्यामधील राजाने नवा धर्म स्वीकारला की आपोआपच प्रजा तो स्वीकारते हे सगळीकडे दिसून आले आहे. त्याचा पद्धतीने वैदिक धर्माचे बीज भारतात रुजले असावे. त्यानंतर त्याचा मोठा प्रसार झाला, बाकीचे वेद, उपनिषदे, ब्राम्हणे वगैरे सारखे अनेक ग्रंथ वगैरे भारतातच लिहिले गेले.
   3. सिंधू सरस्वती संस्कृतीतील लोक मूर्तीपूजक होते.लिंगपूजा व स्त्री फलोधारणा पूजा ते करत. वैदिक धर्मात प्रथम मूर्ती पूजा नव्हती. कालांतराने सिंधू संस्कृतीतील लिंगपूजा ही वेदांमधील रुद्र या देवाशी जोडली गेली आणि स्त्री फलोधारणेची पूजा देवी,अंबा,दुर्गा वगैरे पूजनाशी जोडली गेली. सिंधू सरस्वती संस्कृतीतील मूर्तीपूजा नंतर हिंदू धर्मात आली असे मला वाटते.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 11, 2013, 9:15 सकाळी
 20. Nice one

  Posted by Akshay Chaudhari | फेब्रुवारी 8, 2017, 8:12 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention गोत्र आणि विवाह संबंध « अक्षरधूळ -- Topsy.com - जुलै 13, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

वाचकांचा प्रतिसाद

 पुणे 1790-95 — अक्ष… च्यावर  पुणे 1790-95
aroundindiaghansham च्यावर  पुणे 1790-95
chandrashekhara च्यावर  पुणे 1790-95
मिलींद कोलटकर च्यावर  पुणे 1790-95

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 392 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

%d bloggers like this: