.
ताज्या घडामोडी Current Affairs

क्विक मार्च टू आफ्रिका


काही दिवसांपूर्वी, भारतातल्याच, ‘भारती एंटरप्रायझेसया कंपनीचे 52 वर्षाचे संचालक व एक बडे उद्योजक श्री सुनील मित्तल यांनी कुवेत या देशात स्थित असलेल्या झैन‘ (Zain) या कंपनीचा आफ्रिकेमधला सर्व पसारा आपण विकत घेतल्याचे जाहीर केले व असे म्हणता येईल की भारतीय कंपन्यांना एक नवीन कार्यक्षेत्र दाखवून दिले. काही विश्लेषणकारांनी या घटनेचे वर्णन, आफ्रिका खंडात प्रवेश मिळवू पाहणार्‍या चिनी कंपन्यांच्या बरोबरीने, भारतीय कंपन्याही या स्पर्धेत उतरत आहेत याची ही नांदीच आहे असे केले आहे. दुसर्‍या देशांच्यावर आपला राजकीय प्रभाव पडावा किंवा तिथले नैसर्गिक स्त्रोतांचा (natural resources) आपल्याला फायदा मिळावा म्हणून आंतर्राष्ट्रीय व्ह्यूहात्मक खेळ्या अनेक देश शतकानुशतके करत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मध्यपूर्वेत, तेलासाठी प्रथम ब्रिटनने व नंतर अमेरिकेने केलेले उपद्व्याप हे नक्कीच देता येईल. परंतु श्री. मित्तल यांची ही उडी राजकीय खेळ्यांपेक्षा बरीच जास्त लांबवरची वाटते आहे.

श्री. हॅरी ब्रॉडमन या लेखकाने नुकतेच “Africa’s Silk Road: China and India’s New Economic Frontier.” या नावाचे एक पुस्तक लिहून प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात श्री. ब्रॉडमन म्हणतात की भारतीय लोक आफ्रिकेमधे आर्थिक, सामाजिक व राजकीय अशा सर्व दृष्टींनी तिथल्या समाजात आधीपासूनच सामावून गेलेले आहेत. आफ्रिकन समाजात मिसळून गेलेला भारतीय समाज, वर वर पाहणार्‍याला सहजतने दिसून येत नसला तरी त्याचा खूप अप्रत्यक्ष फायदा, आफ्रिकेत नवीन प्रवेश घेऊ पाहणार्‍या भारतीय कंपन्यांना, चिनी कंपन्यांच्या मानाने होणार आहे. अर्थात या साठी या भारतीय कंपन्यांना आफ्रिकेमधे बराच काल अस्तित्व ठेवणे गरजेचे आहे.

आर्थिक तज्ञांच्या मते सध्या या स्पर्धेत, भारत चीनच्या खूपच पिछाडीवर आहे. चिनी कंपन्या सरकारी असल्याने त्यांचे खिसे अर्थातच भरगच्च भरलेले आहेत. त्यामुळे घर किंवा इतर बांधकाम उद्योग, तेल आणि खाणकाम या सर्व क्षेत्रात चिनी अग्रेसर आहेत असेच चित्र दिसते आहे. चिनी सरकारने आफ्रिकेत 8 बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे तर भारतीय सरकारने फक्त 2 बिलियन डॉलर्सची. आफ्रिका व भारत यांच्यामधल्या व्यापाराच्या तिप्पट व्यापार, चीन व आफ्रिका यांच्यामधे होतो आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीने केलेली 10.7 बिलियन डॉलर्सची ही गुंतवणूक ही फार रोचक गोष्ट आहे असे वाटते. या गुंतवणूकीनंतर, मोबाईलधारकांची संख्या विचारात घेतली तर भारती ही जगातली पाचव्या क्रमांकाची मोबाईल कंपनी बनली आहे. त्यांची ग्राहक संख्या आता 4.2 कोटी एवढी झाली असून अफ्रिका खंडातील 15 देशांच्यात त्यांचे अस्तित्व प्रस्थापित झाले आहे. भारतामधे भारतीची मोबाईल सेवा एअरटेल या नावाने दिली जाते व भारतामधे असलेले जगातील सर्वात कमी कॉलचे दर आणण्यात या एअरटेल कंपनीचा महत्वाचा वाटा आहे. श्री.मित्तल यांच्या म्हणण्याप्रमाणे आफ्रिकेमधले कॉलचे दर भारताच्या दहा पट तरी असल्याने त्यांचे पहिले कार्य, हे दर खाली आणणे हे असणार आहे.

आर्थिक विश्लेषणकारांनी मात्र भारतीच्या या गुंतवणूकीला लाल सिग्नल दाखवला आहे. त्यांच्या मते आफ्रिकेमधल्या या 15 देशात आपली सेवा प्रस्थापित करताना, या देशांतील बहुविध संस्कृती, कायदेकानू

व भाषा यामुळे भारतीला खूप अडचणी येणे अपेक्षित आहे. त्यामुळे भारतीचे क्रेडिट रेटिंग आंतर्राष्ट्रीय बाजारात कमी करण्यात आले आहे. श्री. मित्तल यांनी या आधी भारतीने बांगलादेश मधली वरीद टेलेकॉम ही कंपनी ताब्यात घेऊन अशीच स्पर्धा त्या देशात सुरू केली होती.

श्री. मित्तल मात्र आपल्या गुंतवणूकीबाबत आशादायक आहेत. त्यांच्या मते देशाच्या सरकारने दुसर्‍या देशात गुंतवणूक करण्याचे दिवस आता सरले आहेत. भारतीय कंपन्यांना सरकारी आर्थिक मदतीची अजिबात गरज नाही. सरकारने आफ्रिका व भारत यांच्यातील दळणवळण सेवा सुधारल्या तरी पुरेल. भारताची राष्ट्रीय विमान वाहतुक सेवा किंवा एअर इंडियाला सरकारने आर्थिक मदत करावी असे श्री. मिट्टल यांना वाटते. एवढे केले तरी भारतीय उद्योग आफ्रिकेमधे मोठ्या संख्येने येतीलअसे ते म्हणतात.

श्री. मित्तल यांच्या म्हणण्याला, श्री ब्रॉडमनही आपल्या पुस्तकात दुजोरा देताना दिसतात. त्यांच्या मते गेल्या काही वर्षात आफ्रिकेमधे जी आर्थिक प्रगती होते आहे ती नायजेरिया सारख्या ज्या देशात नैसर्गिक स्त्रोत अधिक आहेत त्यांच्यापेक्षा असे स्त्रोत नसलेल्या देशांच्यात होते आहे. या देशांच्यातील आर्थिक प्रगतीचा वेग 5.6 % पर्यंत पोचला आहे. या बदलाची दखल पाश्चात्य देशांपेक्षा चीन व भारत यांनी जास्त प्रमाणात घेतलेली दिसते आहे. हे दोन्ही देश करत असलेल्या गुंतवणूकीच्या पॅटर्नवरून हे दिसते आहे की हे देश विविध क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. ग्राहकोपयोगी वस्तू, पर्यावरण स्वच्छता व खाद्य प्रकल्प सारख्या पूर्णपणे भिन्न भिन्न क्षेत्रात ही गुंतवणूक होताना दिसते आहे. गुंतवणूकीचा हा पॅटर्न भारताला जास्त लाभदायक ठरणार असे दिसते आहे.

भारताचे आफ्रिकेतल्या राष्ट्रांबरोबर ऐतिहासिक संबंध राहिलेले आहेत. तसेच भारतीय व आफ्रिकेतील देश यांच्यात सांस्कृतिक देवाण घेवाण नेहमीच होत राहिलेली आहे. भारतीय गुंतवणूक ही मुख्यत्वे उद्योजक व्यक्ती या नात्याने करत असल्याने, भारतीय प्रकल्प, स्थानिक आर्थिक व्यवस्थेबरोबर मिसळून गेलेले दिसतात. या उलट चिनी प्रकल्प स्थानिक आफ्रिकन लोकांपासून तुटलेले वाटतात. या प्रकल्प उभारणीसाठी चिनी मजूर व लागणार्‍या सर्व वस्तू चीनहून आयात केल्या जातात. भारतीय प्रकल्पांसाठी स्थानिक पुरवठादारांच्या साखळ्या आयोजित केल्या जातात व ते स्थानिक लोकांच्यात मिसळून गेल्यासारखे वाटतात. नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणाप्रमाणे आफ्रिकेत स्थायिक झालेल्या भारतीय उद्योजकांच्यापैकी निम्याहून जास्त उद्योजकांनी त्या देशाचे नागरिकत्व पत्करले आहे तर अशा चिनी उद्योजकांपैकी 96 % अजून चिनी नागरिकच आहेत.

कदाचित तेल किंवा खनिज प्रक्रियेसारख्या उद्योगात हे स्थानिकीकरण महत्वाचे नसावे पण ज्या ठिकाणी सेवा द्यावयाची आहे अशा विक्री किंवा दळणवळण या सारख्या क्षेत्रात हे स्थानिकीकरण अतिशय महत्वाचे ठरेल.

भारती एन्टरप्रायझेसची झैनमधली गुंतवणूक या दृष्टीने फारच महत्वाची आहे. सध्या भारत व चीन यामधली स्पर्धा जरी ससा आणि कासव यासारखी वाटली तरी शेवटी गोष्टीतल्या कासवाप्रमाणे मागे असलेला भारतच ही स्पर्धा जिंकण्याची अधिक शक्यता वाटते.

11 जुलै 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “क्विक मार्च टू आफ्रिका

 1. जरा विषयांतर करतो. तुम्ही जी भाषा वापरता ती मला पूर्वीपासूनच आवडते कारण तुमचा शुद्धतेबाबतचा आग्रह. हिंदी/उर्दू माध्यमांच्या प्रभावाखाली येऊन मराठीच्या वाक्यरचनेमध्ये आणि शब्दांच्या वापरामध्ये झालेले बदल सारखे टिपत राहणे हा माझा चाळा. मग ते फारसीचा जमाना असतानाच्या काळात झालेले असोत की सध्या होत असलेले. ज्ञानेश्वरांपासून ते साम्प्रताचा प्रवास खूपच रोचक आहे. उत्क्रांती होत राहते. पण एक प्रश्न. एक वाक्यरचना आजकाल नेहमी आढळते. ती या पोस्ट मध्येही दिसली म्हणून ही कॉमेंट. ‘भारताचे आफ्रिकेतल्या राष्ट्रांबरोबर ऐतिहासिक संबंध राहिलेले आहे.’ हे वाक्य ‘रह चुके है’ या वाक्याचे मराठीकरण वाटते. पण मराठीमध्ये अशी वाक्यरचना खरंच आहे का? जोड क्रियापद मराठी मध्ये असतात पण ‘राहिलेले आहेत’ का जाणे जरा खटकते. बरेच लोक/वृत्तपत्र याचा वापर करताना दिसतात.

  Posted by Nikhil Sheth | जुलै 11, 2010, 8:35 pm
  • निखिल

   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. शाळा संपल्यानंतर (इयत्ता 11वी) मी मराठी भाषेचा परत अभ्यास कधी करू शकलो नाही व पुढचे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्याने मराठी लेखन वाचनाचा, वर्तमानपत्रे सोडली, तर परत कधी योगही आला नाही. गेले वर्षभर म्हणजे हा ब्लॉग सुरू केल्यापासूनच मी मराठीमधे लेखन करतो आहे. या पार्श्वभूमीवर आपण म्हणता तसा मराठीच्या प्रगतीचा माझा अभ्यास अजिबातच नाही. शाळेत जी भाषा शिकलो त्याचबरोबर माझ्या आईने जी मराठी मला शिकवली(ती मराठीची अभ्यासक होती. कविताही करत असे.) तीच मी वापरतो.
   ऐतिहासिक संबंध राहिलेले आहेत हे वाक्य मला तरी योग्यच वाटते. माझा हिंदीचा अभ्यास फारच मर्यादित आहे. परंतु भाषांतरच करायचे तर हेच वाक्य मी “संबंध रहे है.” असे करीन. कदाचित अशा प्रकारची वाक्यरचना वैदर्भिय असावी अशी शक्यता आहे. दुसरे म्हणजे माझ्या मताने भाषा ही प्रवाही असावी लागते. त्यात सतत नवे शब्द येण्याची गरज असते. त्यामुळे मी माझ्या लेखांच्यात बिनदिक्कत लोकांना माहिती असलेल्या इंग्रजी Phrases वापरतो. या लेखाचे शीर्षक तसेच आहे. भाषा शुद्धीची चळवळ चालवणार्‍यांना कदाचित हा भाषेवरील अत्याचार वाटण्याची शक्यता आहे.

   Posted by chandrashekhara | जुलै 12, 2010, 9:04 सकाळी
 2. हे संबंध प्रस्थपित करण्याचा प्रयत्न 80 सालापासून चालू होता. त्याला आता फळे येऊ लागली आहेत.

  Posted by मनोहर | जुलै 13, 2010, 10:06 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention क्विक मार्च टू आफ्रिका « अक्षरधूळ -- Topsy.com - जुलै 11, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: