.
Travel-पर्यटन

भारतीय रेल-गाडीची सुपर आयडिया


1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातल्या गरीबगुरीब जनतेला एक मोठी संपत्ती प्राप्त झाली. आता तुम्ही म्हणाल की हा शोध मी कोठून लावला? पण मी हा शोध वगैरे काही लावलेला नाही. अगदी लहानपणापासून ज्या ज्या वेळी मी रेलगाडीने प्रवास केला आहे त्या प्रत्येक वेळी मी रेल्वे डब्यात मोठ्या अक्षरात लिहिलेले वाचत आलो आहे की ये रेल गाडी भारतीय जनताकी संपत्ती है.” आता त्या वेळी ही संपत्ती जरा मोडकी तोडक्या अवस्थेत होती, पण म्हणून काय झाले! संपत्ती ती संपत्तीच. लाकडी फळकुटे लावलेल्या शिटा, येथे एके काळी पंखा होता अशा छतावर खुणा, अर्धीच किंवा अजिबातच बंद न होणारी खिडकी, वरून टपटप असा अभिषेक करणारी किंवा पाणीच नसलेली स्वच्छतागृहे या सगळ्या गोष्टी अगदी कॉमन असत. इतक्या कॉमन की कोणाला त्यात काही विशेष वाटतच नसे.

अशा या भारतीय रेल गाडीच्या काही काही खास गाड्या असत. पुणेमुंबई जाणारी डेक्कन क्वीन ही त्यापैकीच एक गाडी. मी लहान असताना त्या गाडीला फक्त प्रथम श्रेणीचे डबे असत व ते सुद्धा फक्त सहा का आठ असत. माझे वडील कंपनीच्या कामासाठी या गाडीने कधी कधी जात असत. त्यांना पोचवायला तरी जाण्याचा आम्ही हट्ट करून, टांग्यात बसून, स्टेशनवर जात असू. तिथे गाडी सुटेपर्यंत तरी वडिलांच्या जागेवर बसून आम्ही डेक्कन क्वीन प्रवासाचे सुख कल्पनेत घेत असू. रात्री वडील परत आले की ते आमच्या साठी गाडीच्या रेस्टॉरंट कारमधे मिळणारी बदाम पुरी आणत असत. त्या पुरीची चव अजून माझ्या जिभेवर आहे. पुढे स्वत: अर्थार्जन करायला सुरवात केल्यावर मुद्दाम डेक्कन क्वीनने प्रवासाचा योग घडवून आणायचा मी प्रयत्न करायचो. पण पुढे मध्य रेल्वेने डेक्कन क्वीनचे ते जुने ऐषारामी डबेच बदलले व चेअर कार नावाचे झीरो आरामदायी डबे आणले. या चेअर कारमधे बसले की प्रवास कधी संपतो याचीच वाट मी बघत असे.

पुण्याहून मुंबईला जाणार्‍या इतरही गाड्या होत्या. मेल, एक्स्प्रेस, ऍडिशनल एक्स्प्रेस वगैरे. पण या गाड्यांना डेक्कन क्वीनची सर येत नसे. पंधरा वीस वर्षांपूर्वी या सर्वच गाड्यांना डॆक्कन क्वीन सारखेच डबे लावण्यास सुरवात झाली. त्यानंतर या गाड्यांना सुपर फास्ट एक्स्प्रेस असा नवा किताब मिळाला. त्यांना पण खानपान सेवेचे डबे जोडले जाऊ लागले. डेक्कन क्वीनची मिरासदारी संपल्यातच जमा झाली. दोन वर्षापूर्वी या गाड्यांचे हे खानपान डबे, परवडत नाही म्हणून अचानक काढून घेण्यात आले व प्रवाशांना स्टेशनवर मिळणार्‍या थंडगार व तेलकट पदार्थांवर समाधान मानण्याची परत वेळ आली. आता या गाड्यांबद्दलचा माझा नवीन अनुभव हा खरे म्हणजे तर ऐकीवच आहे. आता रेल्वेने प्रवास करायची वेळच येत नाही. पुणे मुंबई एक्सप्रेसवे झाल्यानंतर रेल्वेने प्रवास म्हणजे भूतकाळातली गोष्ट झाली आहे. आता कोठेतरी लांब रेल्वेने नक्की जायचे असा मनसुबा मी बरेच दिवस करतो आहे. बघू कधी जमेल ते.

मुंबईला जायला आता चार गाड्या आहेत. यापैकी डेक्कन क्वीन, इंटरसिटी व प्रगती या गाड्या सुपरफास्ट समजल्या जातात. इंटर सिटी मुंबईला 3 तास 5 मिनिटात जाते तर डेक्कन क्वीन 3 तास 10 मिनिटात. प्रगती एक्स्प्रेस हाच प्रवास करायला 3 तास 20 मिनिटे घेते. या सर्व सुपर फास्ट गाड्यांचे प्रवास भाडे पण जास्त आहे. या शिवाय आणखी एक गाडी पण मुंबईला जायला आहे. ती म्हणजे इंद्रायणी एक्सप्रेस. ही गाडी सुपर फास्ट नाही. स्लो आहे. पण या गाडीला मुंबईला जायला किती वेळ लागतो ते माहिती आहे का? या गाडीला पण 3 तास आणि 20 मिनिटेच लागतात. पण ती सुपर फास्ट नसल्यामुळे तिचे प्रवास भाडे अर्थातच कमी आहे. आता असा प्रश्न कोणीही विचारेल की जर स्लो गाडी 3 तास 20 मिनिटे घेत असली तर तेवढाच वेळ घेणारी प्रगती सुपर फास्ट कशी? व तिचे प्रवास भाडे जास्त का?

आनंदाची गोष्ट म्हणजे रेल्वे प्रशासनालाही हाच प्रश्न सतावत असला पाहिजे कारण त्यांनी या बाबत आता नवी कार्यवाही करण्याची घोषणा केली आहे.

आता कोणालाही असे वाटण्याची शक्यता आहे की म्हणजे आता इंद्रायणी तरी कमी वेळात मुंबईला जाणार किंवा प्रगतीचे प्रवास भाडे तरी कमी होणार? पण तसे काही झालेले नाही. उलट रेल्वेने एक भन्नाट आयडिया लढवली आहे. त्यांनी आता इंद्रायणीलाच सुपर फास्ट म्हणून घोषित करून तिचे भाडे वाढवून टाकले आहे. तिचा क्रमांकही 1021 वरून 2525 केला आहे. आता तिचा प्रवास वेळ पूर्वीएवढाच म्हणजे प्रगती एवढाच, 3 तास 20 मिनिटेच आहे पण त्याला इलाज नाही. म्हणजे आता कोणाची तक्रार नको. प्रगती आणि इंद्रायणी दोन्ही त्याचे वेळात जाणार तेंव्हा दोन्हीचे भाडे सारखेच. आता यातून रेल्वेला चार पैसे जास्त मिळतील पण ते सहजपणे घडले असे म्हणता येईल.

रेल्वेची ही भन्नाट आयडिया मला फारच आवडली. एअर इंडियाने इकॉनॉमी वर्गाच्या खुर्च्याना बिझिनेस वर्गाच्या खुर्च्या म्हणायला सुरवात करावी. भाडे अर्थातच बिझिनेस क्लासचे, त्यांच्या सर्व तोट्याचे क्षणात फायद्यात रूपांतर करता येईल. या धर्तीवर अनेक क्षेत्रात सुधारणा करता येतील. सिनेमा बघताना फॅमिली सर्कलला ड्रेस सर्कल म्हणायचे. लगेच प्रवेश दर जास्त. लोकवन गव्हाला सिहोर म्हणायचे. सुती कपड्यांना रेशमी म्हणायचे. केवढा स्कोप आहे बघा.

भारतीय रेल गाडीने उद्योग धंद्यांना एक नवीन दिशाच दाखवून दिली आहे. आता त्याचा कसा उपयोग करायचा ते आपण बघायचे.

8 जुलै 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “भारतीय रेल-गाडीची सुपर आयडिया

  1. You might be new about this funda. Lalu did same things for many trains on Central line like SEVAGRAM N other express. Now from Bhusawal to Mumbai sevagram express has many stops like Lasalgaon, Nifad etc which Kamayani n Pawan express have not but Sevagram is SUPERFAST N other trains are ordinary.

    Posted by classic_marathi | जुलै 8, 2010, 2:40 pm
  2. Don’t think what Indian Railways has done, is wrong as such. Comparison with Economy/Business class example is difficult to digest.

    But I am regular visitor to your blog. Your writings are really good. 🙂

    Posted by rohitmania | ऑक्टोबर 24, 2010, 1:32 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention भारतीय रेल-गाडीची सुपर आयडिया « अक्षरधूळ -- Topsy.com - जुलै 8, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: