.
अनुभव Experiences

एक गलबलून टाकणारा अनुभव


काल रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही जेवायला बसलो होतो. अचानक अतिशय खोल व खर्जातून येणारा ठोक्याचा आवाज कानावर येऊ लागला. प्रथम वाटले की रस्त्यावर कोणीतरी गाडीतील स्टिरिओ प्रणाली मोठ्याने लावली असावी. अलीकडे बर्‍याच तरूण मंडळीना आपल्या गाडीतील संगीत सर्व जगाने ऐकावे अशी प्रामाणिक इच्छा असलेली दिसते. तशातलाच काहीतरी प्रकार असावा म्हणून दुर्लक्ष केले. परंतु 5 मिनिटे झाली तरी हे ठोके काही कमी होईनात. रस्त्यावरही काही दिसत नव्हते. आणखी पाच मिनिटे गेली. आता ठोक्याबरोबर अत्यंत बेसूर असे व कोणीतरी गायकाने रेकून गायलेले एक गाणे ऐकू लागले. घरातले सगळेच जण आम्ही अस्वस्थ झालो. आवाजाची पातळी मिनिटामिनिटाला वाढतच होती. थोड्याच वेळात ती कर्णकर्कश पातळीला पोचली. आता त्या ठोक्यंबरोबर सर्व घर हादरते आहे असे जाणवू लागले.

आवाजाची पातळी एवढी वाढली होती की काहीही सुचत नव्हते. एकूण प्रकार काय असावा हे तेंव्हा ध्यानात आले. एका मोठ्या गाडीमधे ध्वनीवर्धकांची रांग बसवून त्यांच्यामार्फत ही आवाजनिर्मिती करण्यात येत होती. आवाजाच्या पातळीवरून काही हजार वॉट्स शक्तीचे तरी ध्वनीवर्धक असावेत असा अंदाज बांधता येत होता. हळू हळू एका मोठ्या समुहाचे ओरडणे, शिट्या वगैरे ऐकू येऊ लागले. ही आवाजगाडी दुर्दैवाने माझ्या घराकडेच हळू हळू प्रवास करते आहे हे माझ्या लक्षात आले. आता आवाजाची पातळी एवढी वाढली की आपले कान आता फुटणार असे मला वाटू लागले. शेवटी मी फोन उचलला व 100 नंबरला फोन लावला.

फोनला कोणी उत्तर न देता, अमुक असले तर 1 दाबा, तमुक असले तर 2 दाबा, वगैरे ध्वनीमुद्रित भाषण कानावर पडले. हे नंबर दाबून अखेरीस एक पोलिस ऑपरेटर शेवटी माझ्याशी बोलू लागली. तिला माझ्या अडचणीची कल्पना दिल्यावर हे ध्वनीवर्धक ज्या कोणत्या गाडीवर बसवले आहेत त्या गाडीचा क्रमांक काय आहे? तसेच कसल्या आनंदोत्सवाबद्दल हे संगीत वाजत आहे? अशी पृच्छा त्या पोलिसबाईंनी केली. मला यातले काहीही सांगणे शक्य नाही व आवाज असाच चालू राहिला तर आमचे काही खरे नाही हे मी त्या बाईंना परत परत सांगून बघितले. शेवटी दया येऊन त्यांनी पोलिस पाठवते म्हणून वचन दिले.

पुढचा अर्धा तास आता आवाज बंद होईल, नंतर बंद होईल म्हणून अस्वस्थपणे घालवला. परंतु आवाज बंद होण्याच्या ऐवजी वाढतोच आहे हे ध्यानात आल्यावर पुन्हा एकदा 100 नंबर फिरवला. आता दुसर्‍याच पोलिस बाई लाईनवर भेटल्या. पुन्हा एकदा हरदासाची कथा ऐकवल्यावर ध्वनीवर्धक बंदी रात्री 10 नंतर सुरू होते अशी मौलिक माहीती आम्हाला मिळाली. आवाजाची पातळी कोणत्याही मान्य मर्यादेपेक्षा बरीच जास्त आहे व ती आमच्या सहनशक्तीच्या बाहेरची आहे हे सांगितल्यावर आणखी चार पाच तक्रारी आल्या आहेत, गाडी पाठवते असे वचन आम्हाला मिळाले. पुढचा एक तास आवाज कधी बंद होईल त्याची वाट बघण्यात व 100 नंबरला फोन लावण्यात गेला. अर्थातच आमच्या तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता मिळालेल्या दिसत होत्या, कारण आवाज चालूच राहिला.

साधारण रात्रीचे साडे दहा वाजता, म्हणजे दोन तास आमचा सतत छळ करून ती आवाज गाडी आमच्या घराजवळच्या चौकात आली. आता जनसमुहाचा जल्लोश काही कारणाने वृद्धिंगत होतो आहे असे लक्षात आले व नंतर फटाक्याच्या माळा फुटू लागल्या. हजार हजार फटाक्यांच्या दहा, वीस माळा तरी फोडण्यात आल्या असाव्यात.

एव्हाना माझी अवस्था दोन चार महिने अंथरूणात असलेल्या रुग्णासारखी झाली होती. डोके प्रचंड दुखू लागले होते व आपले संपूर्ण आंग आतून कापते आहे असे वाटू लागले होते. दोन तास झाले तरी पोलिस किंवा त्यांची गाडी यांचा कोठे मागमूसही दिसत नव्हता. शेवटी 10.40ला हा वडवानल शांत झाला. म्हणजे फक्त ध्वनीवर्धकांचा आवाज थांबला. बरोबर असलेल्या जनसमुहाचा जल्लोश, फटाके, किंचाळ्या चालूच होत्या. आवाज थांबल्यावर आपल्याला प्रचंड थकवा आला आहे हे जाणवू लागले. दुख:निवारक गोळ्या घेऊन मी अंथरूणावर पडलो.

सकाळी जाग आली तेंव्हा आपण एखाद्या मोठ्या आजारातून नुकतेच उठलो आहोत असेच मला वाटत राहिले. सकाळी फिरायला जाताना जरा आजूबाजूला, शेजार्‍यांच्याकडे चौकशी केली. प्रत्येकाचा अनुभव साधारण माझ्यासारखाच होता. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे कोणालाच ही गाडी कोणाची होती? त्यावर कशासाठी ध्वनीवर्धक लावले होते? बरोबरचा जनसमूह कोण होता? तो का नाचत होता? काहीही माहिती नव्हते. त्यातले काही जण आपण पण 100 नंबरवर फोन केल्याचे म्हणाले. कालच पुण्यातून ज्ञानेश्वर माउलीची पालखी गेली. त्याची ही आधुनिक दिंडी होती की काय? पण दिंडीमधे भजने म्हणतात. ‘कोंबडी पळालीयासारखी निरर्थक गीते म्हणत नाहीत आणि वारकरी मंडळी रात्री विसावा घेतात. ध्वनीवर्धक बसवलेल्या गाडीसमोर बीभत्स नाचत नाहीत.

पुण्यात नागरिक शास्त्र जाणणारे, शिकलेले लोक रहातात असा माझा कालपर्यंत भ्रम होता. काल रात्रीच्या दोन तासात तो दूर झाला. पुणे ही अनेक जंगली टोळीवाल्यांची मिळून बनलेली वस्ती आहे हे लक्षात आले. यापैकी प्रत्येक टोळीची स्वत:ची वागण्याची तर्‍हा आहे. यामुळे इतर लोकांना कितीही त्रास झाला तरी या जंगली टोळीला त्याची पर्वा असण्याचे काहीच कारण नाही. त्या लोकांनी स्वत:चे बघून घ्यावे.

पुण्यातले पोलिस वर्तमानपत्रात जाहिराती देतात. ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास झाला तर 100 नंबरवर फोन करा म्हणून सांगतात. काल रात्रीच्या अनुभवावरून हे सगळे फोल आहे हे चांगलेच लक्षात आले. पोलिसांना असल्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला बहुदा वेळ होत नसावा. रस्त्यावरची वाहने थांबून त्यांच्या चालकांच्याबरोबर कोणत्यातरी गहन विषयावर चर्चा करताना नेहमीच मला पोलिस दिसतात. या सारखी कामे त्यांना असल्याने बहुदा, कोणीतरी म्हातारा काहीतरी आवाज येतो म्हणून तक्रार करतो आहे, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचे असे त्यांना वाटत असावे.

आता मी इअर प्लग्स किंवा तत्सम कोणत्या तरी उपायाच्या शोधात आहे. जे वापरले की मी तात्पुरता ठार बहिरा होईन. सकाळीच कॅलेंडर बघताना पुढच्या महिन्यात गोकुळाष्टमी आहे हे लक्षात आले आहे. त्याच्या आत काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. नाहीतर माझे काही खरे नाही.

7 जुलै 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “एक गलबलून टाकणारा अनुभव

 1. Barobar ahe tumhi lihilele…. Jyaweles khari garja asre tyaweles policanchi madat khup kami hote ani zalich tari vel nighun geleli aste…

  Ani punyat ha anubhav mala pan ala…kuthlahi san aso kinva lagna aso khup mothmothyane band, dhawanivardhak ase mothya avajat suru astat… dusryala ya gostincha kitti tras hoto hey janvatch nahi tyana…

  Posted by bhagyasharee | जुलै 7, 2010, 3:09 pm
 2. १०० नंबरवर तक्रार केल्यावर कंट्रोल रूम संबंधित पोलिस स्टेशनला तक्रार फक्त पाठविते. तिचा फॉलोअप करीत नाही. तक्रारीला अग्रक्रम देणे संबंधित पोलिस ठाण्यावर अवलंबून आहे. आपण संबंधित पोलिस ठाण्याकडे तक्रार करावयास हवा होती.

  Posted by मनोहर | जुलै 8, 2010, 9:54 pm
 3. tumhi kayam ashaya vegavegalya sanaanaa,jayantya mayantyanaa kaanat khuntya kinvha bole ghalun tyavar ushi dabun basalat tar tumachi sutalka aahe anyataha naahi he dhyanaat ghyave. 2-4 tas kiva divasabhar ase karayachi savay kara ,tase tumhala yagasanat ras aselach.tenvha kuthalehi asan na karata he kaanabandhasan shikun ghyave chanagala upyog hoto. ughich bicharya polisana tras deun papaache dhani hou nakaa.
  USA-NY

  Posted by savadhan | ऑगस्ट 13, 2010, 2:49 सकाळी

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention एक गलबलून टाकणारा अनुभव « अक्षरधूळ -- Topsy.com - जुलै 7, 2010

 2. पिंगबॅक एक गलबलून टाकणारा अनुभव | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA. - जुलै 8, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: