.
अनुभव Experiences

ऑक्टोपसचा कौल


आपल्या रोजच्या जीवनात संभ्रम निर्माण करणारे प्रसंग क्षणोक्षणी येत असतात. अगदी हास्यास्पद वाटणार्‍या गोष्टीत सुद्धा संभ्रम हा निर्माण होतच असतो. हॉटेलात जेवायला गेल्यावर काय मागवू या? किंवा एखादी स्त्री साडी खरेदीसाठी गेल्यावर सिल्क का कॉटन? येथपासून ते कांचीपुरम का पोचमपल्ली? या सारखे प्रश्न येतच असतात. मुलांना शाळेत कोणत्या घालायचे? सुट्टीला कोठे जायचे? प्रश्नच प्रश्न. काही वेळा असे संभ्रम मनात निर्माण होतात की ज्यांचे उत्तर कोणालाच माहीत नसते. उदाहरणार्थ या वर्षी पाऊस कसा पडेल? खरे म्हणजे हवामानखात्यालाही फारसे काही माहीत नसते. पण ते आपले अंदाज वर्तवतात व आपण एखाद वेळेस ते चुकून बरोबर आले तर अरे वा! म्हणून आश्चर्यही व्यक्त करतो. भारताची क्रिकेट टीम खेळत असली तर ती जिंकेल का? आजच्या रेसमधे कोणता घोडा जिंकेल? असे संभ्रमही सट्टेबाजांना येत असतात.

आपल्याकडे पूर्वी कोणत्याही संभ्रमावर उत्तर मिळवण्याचा एक सोपा मार्ग असे. त्याला देवाचा कौल म्हणत. समजा एखाद्या तरूणाने जातीबाहेर लग्न करण्याचे ठरवले. त्याला मान्यता द्यायची की नाही? अशा प्रश्न साहजिकच उपस्थित होत असे. मग सगळी मंडळी गावाबाहेरच्या देवळात जात. देवाच्या मूर्तीच्या डोक्यावर एक मोठे फूल ठेवले जात असे. मग सगळी मंडळी भरपूर वेळ असल्याने तिथे बसून राहत. आधीपासून हे ठरलेले असे की फूल उजवीकडे पडले तर लग्नाला मान्यता व डावीकडे पडले तर मनाई. आता जुगारी किंवा सट्टेबाज, रेसच्या घोड्याबाबत असा देवाचा कौल घेत असतात की नाही हे मला तरी माहिती नाही पण या सट्टेबाजांचे जर्मनीमधले आधुनिक वंशज मात्र आता असाच एक कौल घेण्याच्या मागे लागले आहेत. आणि गंमतीची गोष्ट म्हणजे आतापर्यंतच्या चारी वेळा हा कौल बरोबर मिळाला आहे.


सध्या जगभरच्या क्रीडा रसिकांना फुटबॉलचा वर्ल्ड कप म्हणजे एक मेजवानीच आहे. जर्मनीचा संघ या स्पर्धेतील एक प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो. हा संघ सामने जिंकणार की नाही याबाबत जर्मनीमधे साहजिकच प्रचंड उत्सुकता आहे. अनेक सट्टेबाज या सामन्याच्या निकालाबाबत सट्टे खेळत आहेत. प्रत्येक सामन्याच्यावेळी निकाल कोणाच्या बाजूने लागणार याचे हजारो अंदाज वर्तवले जात असतात. आता मात्र या सगळ्या अंदाजांपेक्षा एक नवाच कौल सर्व जर्मन मागत आहेत आणि हा कौल कोणता देव देत नसून एक ऑक्टोपस हा जलचर देतो आहे.


जर्मनीमधल्या ओबेरहाउसेन (Oberhausen)या गावात एक मत्स्यालय आहे. या मत्स्यालयाचे नाव आहे Sea Life public aquarium. या मत्स्यालयात एक ऑक्टोपस ठेवलेला आहे. या मत्स्यालयाच्या व्यवस्थापकाने या ऑक्टोपसला पॉल असे नाव दिले आहे. हा पॉल ऑक्टोपस, जर्मनीच्या सामन्यांचे निकाल अचूक वर्तवतो आहे असे सगळ्यांचेच म्हणणे आहे. पॉलने प्रथम जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याचा निकाल अचूक वर्तवला. त्यानंतर सर्बिया कडून जर्मनीने खाल्लेल्या माराचा अंदाज बिनचूक सांगितला. या पाठोपाठ घाना व शेवटी इंग्लंड या विरुद्धच्या सामन्याचे निकालही त्याने अचूक सांगितले. पॉल हे निकाल सांगतो तरी कसे?

या पॉलला ज्या काचेच्या पेटीत ठेवले आहे त्यात हे मत्स्यालय दोन काचेच्या उघड्या पेट्या ठेवते. या पेट्यांना दोन्ही देशांची निशाणे चिकटवलेली असतात. प्रत्येक पेटीत एक शिंपला (mussel)ठेवला जातो. ज्या पेटीतला शिंपला पॉल उचलेल तो देश नक्की जिंकणार अशी पक्की समजूत आता जर्मनीतल्या लोकांची झाली आहे.

आता जर्मनीचा अत्यंत महत्वाचा सामना एक बलाढ्य संघ अर्जेंटिना बरोबर होणार आहे. अर्जेंटिना संघाकडे Lionel Messi सारखा जगातील श्रेष्ठ खेळाडू आहे. जगातल्या इतर फुटबॉल रसिकांना जरी अर्जेंटिना जिंकण्याची शक्यता बरीच वाटत असली तरी जर्मन लोकांना मात्र पॉलच्या दैवी शक्तीच्या पुढे अर्जेंटिनाचा टिकाव लागणे शक्य नाही असेच वाटते आहे.


काल पॉलच्या टाकीत दोन पेट्या ठेवलेल्या होत्या यावर अर्जेंटिना व जर्मनी यांची निशाणे चिकटवलेली होती. या दोन्ही पेट्यात एक एक शिंपला टाकण्यात आला. प्रथम पॉल एकदम जर्मनीच्या पेटीकडे गेला पण नंतर त्याच्याही मनात बहुदा संभ्रम निर्माण झाला. कारण जवळपास एक तास तो पेट्यांच्या बाहेरच घुटमळत राहिला. त्याला कोणत्या पेटीतला शिंपला उचलायचा हे बहुदा ठ्रवता येत नसावे. शेवटी मनाचा हिय्या करून त्याने आपले आठी पाय जर्मन पेटीभोवती गुंडाळले व नंतर त्यातला शिंपला उचलला.


जर्मनीचा या आधीचा सामना इंग्लंड विरुद्ध झाला. त्या वेळी बहुतेक क्रीडा रसिकांना जर्मनी मार खाणार असेच वाटत होते. परंतु पॉलने निकाल वर्तवला व त्या प्रमाणे जर्मनी जिंकली. यामुळे पॉलच्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे अशीच जर्मन लोकांची समजूत झालेली दिसते.

आपल्याकडची देवाचा कौल मागणारी भोळी भाबडी जनता काय? किंवा आधुनिक जर्मन काय? मनुष्य स्वभाव सगळीकडे तोच व तसाच आहे यात शंकाच नाही.

30 जून 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “ऑक्टोपसचा कौल

  1. अर्जेंटिना No dought!!!

    Posted by Sak | जून 30, 2010, 9:17 pm
  2. बघा.. जर्मनीच जिंकली 🙂

    Posted by अनिकेत | जुलै 4, 2010, 3:37 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention ऑक्टोपसचा कौल « अक्षरधूळ -- Topsy.com - जून 30, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: