.
Musings-विचार

य़ोग्य दिशेने टाकलेले एक पाऊल


काल महाराष्ट्रातील माध्यमिक शालान्त परिक्षेचा किंवा दहावीच्या परिक्षेचा निकाल माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. या वर्षी प्रथमच आंतरजाल किंवा मोबाईल फोन्स वरून संदेश, या सारख्या आधुनिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. त्यामुळे परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना फारशी अडचण व कष्ट न होता निकाल समजला. मला माझ्या 11वी च्या निकालाची आठवण झाली. त्या वेळेस निकालाची प्रत फक्त एक किंवा दोन वर्तमानपत्रांच्या कचेरीत येत असे. त्यांना फोन करून आपला निकाल माहिती करून घेण्यासाठी खूप इच्छूक असत. त्यामुळे फोन लागतच नसे. त्यामुळे निकाल जाहीर होऊनसुद्धा दुसर्‍या दिवशी शाळेत यादी लागेपर्यंत बहुतेकांना आपला निकाल समजतच नसे.

आजच्या वर्तमानपत्रात या निकालाची बातमी साहजिकपणे प्रथम पृष्ठावर छापलेली आहे. काल टीव्हीवरही ही बातमी सांगितली गेली. परंतु या वर्षी या बातम्यांत मला जाणवलेला मुख्य बदल म्हणजे या परिक्षेत एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले यालाच महत्व देण्यात आले आहे. कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले 0.01 टक्क्यांनी कोणता विद्यार्थी पहिला आला? पहिले 30 विद्यार्थी कोणते वगैरे माहिती मंडळानेच जाहीर केली नाही व त्यामुळे माध्यमांनी ती छापली नाही.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या एका स्नेह्यांची मुलगी दहावीच्या परिक्षेला बसली होती. ही मुलगी प्रथम पासूनच अतिशय हुषार म्हणून गणली जात होती. त्यामुळे तिला उत्तम गुण मिळतील या बद्दल आम्हा सर्वांची खात्रीच होती. निकालाच्या दिवशी माझ्या स्नेह्यांच्या घरी मी या मुलीचे अभिनंदन करण्यासाठी गेलो. घरात पाऊल टाकले तर सगळीकडे सुतकी वातावरण. मुलगी सारखी रडत होती. तिची आई तर कोणाशी काही बोलण्याच्या परिस्थितीतच नव्हती. शेवटी माझ्या स्नेह्यांकडून मला समजले की या मुलीला मेरीट यादीत जो शेवटच्या क्रमांकाचा मुलगा आला होता त्याच्यापेक्षा 1 गुण कमी मिळाला असल्याने ती मेरीटमधे आली नव्हती. म्हणजे एवढा उत्तम निकाल लागूनही त्याचा जराही आनंद या कुटुंबाला झाला नव्हता. आकाश कोसळल्यासारखी ही मंडळी बसली होती. आज हीच मुलगी उत्तम रित्या पदवीधर झाली आहे आणि आपण निवडलेल्या व्यवसायात उत्तम कार्य करते आहे.

या परिक्षांच्यातील प्रथम क्रमांक, मेरीट यादी वगैरे अतिशय फसवे असतात. 0.1% गुणांनी मागे पुढे होणार्‍या मुलांच्यात कसली आहे मेरीट यादी. ही सर्व मुले सारखीच हुषार असतात. माझा एक मित्र मेरीट यादीत आला होता. परंतु पुढच्या शिक्षणात त्याला असे यश परत कधीच प्राप्त करता आले नाही. या उलट कधीही मेरीट यादीत न आलेल्या माझ्या अनेक मित्रांना पुढच्या अभ्यासक्रमांच्यात उत्तम यश् प्राप्त झालेले आहे. मुलांच्या मानसिकतेबरोबर खेळ करणार्‍या या मेरीट यादीला, मंडळ मूठमाती देण्यात यशस्वी झाले आहे ही मला तरी अतिशय आनंदाची गोष्ट वाटते.

आता या पुढचे पाऊल मंडळाने लवकर उचलणे गरजेचे आहे असे मला वाटते. ते म्हणजे विद्यार्थ्यांचे परिक्षेतील गुण जाहीर न करता फक्त ग्रेड किंवा पातळी जाहीर करणे. साधारणपणे A+, A, A- ते C+, C, C- अशा ग्रेड्स प्रत्येक विषयात जाहीर कराव्यात. मध्यवर्ती शिक्षण मंडळाने (CBSE ) हे पाऊल या आधीच उचललेले आहे. यामुळे A+ ग्रेड मिळालेले सर्व विद्यार्थी एकाच पातळीचे समजले जातात व ते अतिशय योग्य आहे. अशा ग्रेड्स दिल्या तर 11वी च्या प्रवेशाचे काय? असा प्रश्न काही लोकांना पडणे शक्य आहे. परंतु या साठी त्या विद्यार्थ्याच्या ग्रेड बरोबरच त्या विद्यार्थ्याचे राहण्याचे स्थान कोठे आहे याचाही विचार होणे जरूरीचे आहे. घराच्या जवळच्या संस्थेत शक्यतो विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला पाहिजे. समजा एखाद्या संस्थेत 100 जागा आहेत त्यांच्याकडे A+ ग्रेडचे व जवळपास रहाणारे यापेक्षा जास्त अर्ज आले तर लॉटरी पद्धतीने या 100 जागा ती संस्था भरू शकते. त्यामुळे 11वी चा प्रवेश ही ग्रेड पद्धतीसमोर अडचण आहे असे मानण्याचे मला तरी काही कारण दिसत नाही.

शालान्त परिक्षेसाठी आदर्श प्रमाणपत्र कोणते असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर ज्या प्रमाणपत्रात एखाद्या विद्यार्थ्याने, त्याच्या घेतलेल्या परिक्षेनुसार, या प्रमाणपत्रासाठी आवश्यक तेवढे सर्व ज्ञान प्राप्त केले आहे, एवढाच उल्लेख असेल व कोणतेही गुण किंवा ग्रेड त्याला दिलेली नसेल तेच प्रमाणपत्र मला तरी आदर्श वाटते. सध्याच्या शिक्षणाचा परिक्षार्थीपणा, शिकवण्या व क्लासेस यांच्यावर दिला जाणारा भर फक्त यामुळेच बदलता येणे शक्य होईल. परंतु एवढा मोठा बदल इतक्या जलद रितीने करणे कठिण आहे हे मला जाणवते. त्यामुळे मंडळाने उचललेले हे पहिले पाऊल मला तरी अतिशय स्वागतार्ह वाटते आणि गुण पत्रिका देण्याची पद्धत पुढच्या दोन तीन वर्षात बंद होऊन ग्रेड पद्धत सुरू होईल अशी मला तरी आशा वाटते.

18 जून 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “य़ोग्य दिशेने टाकलेले एक पाऊल

  1. tumhi agadi yogya abhipray dilay.

    Posted by kishor | जून 18, 2010, 5:04 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: