.
अनुभव Experiences

व्हुव्हुझेला- एक तुतारी द्या मज आणुनि !


मागच्या आठवड्यात, दक्षिण आफ्रिकेमधे, जगातला सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉलच्या, जागतिक अजिंक्यपदाच्या किंवा वर्ल्ड कपच्या स्पर्धा सुरू झाल्या. मी मोठ्या उत्साहाने, निदान दिवसा उजेडी तरी खेळल्या जाणार्‍या सर्व मॅचेस तरी बघायच्याच असे ठ्ररवले. उदघाटनाच्या दिवशी मॅच बघण्यासाठी मी 5 मिनिटे आधीच टीव्ही चालू केला. खेळ अतिशय चुरशीचा होत असल्याने मॅच बघायला मजा येत होती यात शंकाच नाही. तरीसुद्धा दहा पंधरा मिनिटानी आपल्याला कसलातरी त्रास होतो आहे हे लक्षात आले. एवढा चुरशीचा खेळ चालू असूनही, एवढे इरिटेट झाल्यासारखे का वाटते आहे ते कळेना. मग लक्षात आले की टीव्ही वरून अनेक भुंगे भुणभुणावे तसा आवाज येतो आहे. आवाज बारीक करून बघितला पण हा हमिंग आवाज काही जाईना. खेळात काही मजाच वाटेना. मग आवाज बंदच करून टाकला. आता मॅच बघता तर येत होती पण मॅचच्या वेळी जे एक तापलेले वातावरण असते त्याची प्रचिती येत नव्हती. त्याशिवाय कॉमेंट्री ऐकता येत नव्हती. मग परत आवाज चालू केला. परत हजारो भुंग्यांचे गुणगुणणे ऐकू येऊ लागले. खेळाचा अगदी रसभंग झाला.


परंतु हा काही माझा एकट्याचाच वैयक्तिक अनुभव नाही. जगातल्या लाखो फुटबॉल रसिकांना आणि शौकिनांना हाच अनुभव आला आहे आणि प्रत्येक मॅचला हाच त्रास अनुभवायला लागतो आहे. या हजारो भुंग्यांच्या गुणगुणण्याला कारणीभूत आहे एक प्लॅस्टिकची तुतारी किंवा पिपाणी. ही तुतारी अंदाजे 1 मीटर किंवा 3 फूट लांबीची आहे व ती 20 दक्षिण आफ्रिकी रॅन्ड किंवा अडीच अमेरिकन डॉलर्सना विकते मिळते. ही तुतारी फुंकली की काही लोकांच्या मते मधमाशांच्या एक मोठा थवा घोंगावत जावा तसा आवाज येतो तर काही लोकांच्या मते संकटात सापडलेल्या हत्तीच्या चित्कारासारखा आवाज या तुतारीमधून येतो. या तुतारीचे नाव आहे व्हुव्हुझेला(Vuvuzela) व सध्या ती दक्षिण आफ्रिकेमधल्या तरूणाई मधे प्रचंड लोकप्रिय आहे. Masincedane Sport नावाची केप टाऊन मधली एक कंपनी या तुतार्‍या बनवते. व्हुव्हुझेला हा ब्रॅन्ड आता दक्षिण आफ्रिकेत सर्वमान्य झाला आहे.


दक्षिण आफ्रिकेमधे फुटबॉल खेळण्यासाठी आलेले आंतर्राष्ट्रीय खेळाडू, स्पर्धा चालू होऊन फक्त तीन,चार दिवस झाले असतानाच, वैतागलेले आहेत. फ्रेन्च खेळाडू म्हणतात की या तुतार्‍यांचे आवाज पहाटेपासूनच सुरू होतात त्यामुळे त्यांना पुरेशी झोप पण घेता येत नाही व मैदानात या आवाजामुळे एकमेकाशी बोलताही येत नाही. Javier Mascherano या अर्जेन्टिनाच्या खेळाडूने तर आपली तक्रार पत्रकार परिषदेच्या वेळीच नोंदवली. Cristiano Ronaldo हा पोर्तुगालचा सुपर स्टार म्हणतो की मैदानावर या आवाजामुळे कॉन्सेट्रेशन करणे जवळपास अशक्यच आहे. जपानी फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षांनी हा आवाज सहन करणे आपल्या सहनशक्तीच्या पलीकडचे आहे असे सांगितले आहे.


फुटबॉल आणि संगीत यांचे नाते तसे जुनेच आहे. फुटबॉल आणि खेळाडू यांच्या संबंधात गाणारे गानसमूह (Choirs) आहेत. खेळाडूंच्यावर रचलेली अनेक कवने प्रसिद्ध आहेत. परंतु सध्या दक्षिण आफ्रिकेत हे सर्व संगीत व्हुव्हुझेला च्या आवाजात पूर्णपणे डुबले आहे. जगभर व्हुव्हुझेला ही तुतारी, एक मूड बिघडवणारे, नष्ट करणारे संगीत उपकरण म्हणून प्रसिद्ध होते आहे. 90 मिनिटे व्हुव्हुझेलाचा आवाज सहन करणे म्हणजे एक पराक्रमच आहे असे काही लोकांना वाटते.

जगभरच्या टेलिव्हिजन चॅनेल्स Host Broadcast Services (HBS) या दक्षिण आफ्रिका स्थित कंपनीकडून या फुटबॉल कपचे प्रक्षेपण रिले करत असतात. या टेलिव्हिजन चॅनेल्सना प्रथम असे वाटले की हा आवाज म्हणजे काहीतरी तांत्रिक बिघाडच आहे. परंतु हा आवाज सत्तर ऐंशी हजार तुतार्‍यांचा येतो आहे हे कळल्यावर त्यांनी हा आवाज गाळणे आपल्याला तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्याचे मान्य केले. काही लोकांनी अशी सूचना केली की कॉमेंटेटर्सना एका बंद खोलीत बसवावे परंतु असे केल्यास मॅच जेथे खेळली जात असते त्या स्टेडियममधले तापलेले वातावरण आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकणार नाही त्यामुळे हा पर्याय आम्हाला मान्य नाही असे टेलिव्हिजन चॅनेल्स म्हणतात.


खरे म्हणजे व्हुव्हुझेला बद्दलचा वाद मागच्या वर्षीच सुरू झाला होता. मागच्या वर्षीच दक्षिण आफ्रिकेमधे FIFA Confederation Cup च्या मॅचेस झाल्या होत्या. त्या वेळी व्हुव्हुझेला वर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु FIFA चा मुख्य Sepp Blatter याने असा निर्णय दिला होता की आफ्रिकेतील पारंपारिक वाद्ये वाजवण्यास परवानगी असेल. प्लॅस्टिकच्या तुतार्‍या पारंपारिक वाद्य कशा असू शकतील? असा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला होता परंतु दक्षिण आफ्रिकेच्या दडपणामुळे FIFA ने ते मान्य केले असावे. हा निर्णय त्यांनी जाणून बुजून व डोळे उघडे ठेवून घेतला होता. या निर्णयामागचे प्रमुख कारण काही निराळेच होते. दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला त्या देशात फुटबॉल बद्दल असलेला उत्साह व चैतन्य हे पुरेपूर जाणवते. हा उत्साह व चैतन्य अनुभवताना त्या उत्साहाच्या परिणामांना सुद्धा प्रेक्षकांनी तोंड देणे आवश्यक आहे असे FIFA ला वाटते कारण तो दक्षिण आफ्रिकेच्या संस्कृतीचाच भाग आहे. जर व्हुव्हुझेला वर बंदी आणली तर युरोपियन आवडी निवडी प्रमाणे या स्पर्धा भरवण्यात येतात असा त्याचा अर्थ निघेल व स्पर्धांच्या आंतर्राष्ट्रीय स्वरूपालाच धक्का बसेल. उद्या ही स्पर्धा जर्मनीत भरली तर तिथे अशा मॅचेसच्या वेळी युद्धभूमीवरची गाणी म्हणण्याची प्रथा आहे त्यावर ही बंदी आणावी लागेल.

FIFA ने आता स्पष्टपणे सांगून टाकले आहे की टीकाकार या आवाजाला प्रमाणाबाहेर महत्व उगीचच देत आहेत. सत्तर किंवा ऐंशी हजार प्रेक्षक काहीतरी आवाज करत आहेत म्हणून कोणताही संघ हार पत्करणार नाही. टीव्हीवरच्या प्रेक्षकाना त्रास होत असला तर त्यांनी व्हॉल्यूम कमी ठेवावा.

स्पर्धा चालू आहे तो पर्यंत व्हुव्हुझेला चा आवाज चालूच रहाणार आहे. ज्यांना याचा फारच त्रास होतो आहे त्यांनी दक्षिण आफ्रिकेत आता बाजारात आलेले नवीन उत्पादन व्हुव्हुप्लगवापरावे हे बरे.

16 जून 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “व्हुव्हुझेला- एक तुतारी द्या मज आणुनि !

  1. हे लोकच मला भयानक वाटतात!

    Posted by यशवंत कुलकर्णी | जून 16, 2010, 4:30 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention व्हुव्हुझेला- एक तुतारी द्या मज आणुनि ! « अक्षरधूळ -- Topsy.com - जून 16, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: