.
Travel-पर्यटन

कूर्ग डायरी- 3


गुरुवार

आश्चर्यकारक रित्या, आज आम्ही सर्व जण, न्याहरीसह सगळे आटोपून, सकाळी 7-30 वाजताच तयार आहेत. पावणेआठ पर्यंत, आम्ही परत एकदा कूर्गच्या फेरफ़टक्याला निघालो सुद्धा आहोत. बच्चे मंडळींचा उत्साह समजण्यासारखा आहे कारण आमचा पहिला हॉल्ट आहे एलिफन्ट कॅम्पला.

मडिकेरी गाव सोडून कोठेही जायचे असले तरी जनरल करीअप्पा चौक ओलांडल्या शिवाय कोठेच जाता येत नाही. या चौकात जनरलसाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे. जनरल करिअप्पा हे भारतीय सैन्याचे पहिले भारतीय प्रमुख होते व त्यांनी आपला कार्यभार 1949 मधे स्वीकारला होता. या जनरल करिअप्पा चोकाच्या जरा अलीकडेच, मडिकेरी गावातला आणखी एक मोठा चौक लागतो. या चौकात सुद्धा एक पूर्णाकृती पुतळा बसवलेला दिसला. परंतु तो पूर्णपणे अच्छादित असल्याने कोणाचा आहे हे कळू शकले नाही. परंतु तो पुतळा जनरल थिमय्या यांचा असावा असे मला वाटते. थिमय्या हे करिअप्पा यांच्यासारखेच भारतीय सैन्याचे प्रमुख होते. त्यांनी 1957 मधे कार्यभार स्वीकारला होता. त्या वेळचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांच्याशी न पटल्याने त्यांनी 1959 मधे राजिनामा दिला होता परंतु तो स्वीकारला गेला नव्हता. 1961 मधे भारत चीन युद्धाच्या तब्बल 15 महिने आधी ते निवृत्त झाले होते. मडिकेरी सारख्या छोट्याशा गावाने भारतीय सैन्यदलाला दोन भारतीय सेनादल प्रमुख दिले याचा साहजिकच मडिकेरीवासियांना सार्थ गर्व व अभिमान आहे.पण यात फार नवलाचे काही नाही असे मला वाटते. कोडागु लोक हे लढ्वय्ये म्हणून प्रथम पासूनच प्रसिद्ध आहेत आणि सैन्यदलात जाऊन आपले कर्तुत्व दाखवयाला आजही कोडागु तरूण प्राधान्य देतात.

परत एकदा आम्ही कूर्गच्या दर्‍याखोर्‍या पार करून कुशलनगर जवळच्या सपाटीवर आलो आहोत. येथे मुख्य रस्ता सोडून एका छोट्या रस्त्याला आम्ही लागलो आहोत. हा रस्ता इतका छोटा आहे की समोरून वाहन आल्यास कोणत्या तरी एका वाहनाला मागे जाऊन बाजूला थांबण्यासाठी कोठेतरी जागा शोधावी लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कॉफीचे हिरवेगार मळे आहेत. या मळ्यांच्यात लावलेली सिल्व्हर ओकची झाडे व त्यांना वेष्टून टाकणारे काळ्या मिर्‍याचे वेल आम्हाला सतत सोबत करत आहेत. या छोट्या रस्त्याने 8 कि.मी. अंतर गेल्यावर एका मोकळ्या जागेवर चालक गाडी थांबवतो. समोर परत एकदा कावेरी ताईंचे दर्शन होते आहे.


दुबारे या गावाजवळ कावेरी नदीचे पात्र भागमंडलेश्वरमधल्या संगमाच्या मानाने बरेच मोठे आहे. सध्या म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस पात्रात असलेल्या खडकांच्या वरून उड्या मारत नदी पार करणे सहज शक्य आहे. आम्ही त्यापेक्षाही सोपा मार्ग म्हणजे लॉन्चने नदी पार करावयाचे ठरवतो. पैलतीरावरच कर्नाटक सरकारचा हत्तींना शिक्षण देण्याचा कॅम्प आहे. समोर दहा पंधरा तरी हत्ती झुलताना दिसत आहेत. जरा वेळाने एक एक एक करून त्यांना कावेरी नदीच्या पात्रात डुंबण्यासाठी आणण्यात येते.

दोन छोट्या हत्तींनी तर पात्रात मस्त लोळणच घेतल्याने तिथे जमलेल्या सगळ्या बालचमूला त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे आंग ब्रशने घासणे त्यावर पाणी टाकणे सहजपणे करता येते आहे. हे हत्तीही बेटे हा सोहळा अगदी आनंदाने उपभोगताना दिसत आहेत. मधूनच एखादा हत्ती सोंडेत पाणी घेऊन जमलेल्या प्रेक्षकांच्यावर फवारून वा काय मजा आलीअसे मनात पुटपुटत असावा असे त्याच्या मिस्किल डोळ्यावरून तरी मला वाटते. यानंतर या सगळ्या गजराजांना, सातू व नाचणीचे भले थोरले रोट, खाऊ घालण्यात आले. बर्‍याच बालमंडळींनी मम म्हणून त्या खाऊ घालणार्‍यांच्या हाताला हात लावून आपली हौस भागवून घेतली.

हे सगळे सोपस्कार पार पडल्यावर एक एक करून गजराज त्यांच्या शिक्षणावर निघून गेले व उन्हाचे काय चटके बसत आहेत? हे सगळ्यांच्याच लक्षात आले. जवळच असलेल्या एका स्टॉलवर थंडगार नारळाचे पाणी व खोबरे याचा समाचार घेऊन आम्ही परत कावेरी पार केली व गाडीत जाऊन बसलो.

1959 मधे तिबेटी लोकांचे धर्मगुरू दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला. या नंतर हजारोंच्या संख्येने तिबेटी निर्वासित भारतात आले. हे तिबेटी निर्वासित भारतात निरनिराळ्या ठिकाणी स्थायिक झाले. दक्षिण भारतात स्थायिक झालेल्या तिबेटी लोकांची सर्वात मोठी वसाहत कूर्ग जिल्ह्यातल्या कुशल नगर जवळ आहे. बायलाकुप्पे या गावाजवळ या तिबेटी लोकांनी एक मोठा मठ स्थापन केला आहे. Great Gompa of Sera Je आणि Sera Mey या नावाने हा मठ ओळखला जातो. या मठावर एक विशाल सुवर्ण कलश उभारण्यात आलेला आहे. तो लांबूनही दिसतो. हा मठ आणि त्याच्या जवळच असलेल्या Mahayana Buddhist University चे प्रार्थना गृह या दोन्ही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. दोन चारशे विद्यार्थ्यांना बसता येईल एवढे हे प्रशस्त सभागृह आहे. एका बाजूला भगवान बुद्ध आणि त्यांचे बुद्धपदाला पोचलेले दोन अनुयायी यांच्या सुवर्ण कांती असलेल्या मोठ्या मूर्ती आहेत. या विद्यापीठाच्या आजूबाजूला असणार्‍या वसाहतीत या तिबेटी लोकांनी आपले सुगंधी द्रव्ये, गालिचे आणि कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे उद्योग चालू केले आहेत. मठाच्या समोरच्या बाजूला या वस्तू विक्री करण्याचे स्टॉल्स मी बघितले. आपला देश सोडून आलेल्या या लोकांनी ज्या चिकाटीने आपले जग पुन्हा उभे केले आहे ते बघून मला कमालीचे आश्चर्य वाटले. बायलाकुप्पे येथील हे तिबेटी मंदीर पहाण्यासारखे आहे यात शंकाच नाही.


आम्ही रिसॉर्टवर परत पोचलो आहोत तेंव्हा दीडच वाजला आहे. भोजन करून मडिकेरी गावात चक्कर मारायचे आम्ही ठरवतो. या गावातली चक्कर मात्र निराशाजनकच वाटली. गावात पहाण्यासारखे किंवा चांगले दुकान असे जवळपास नाहीच. आमचा चालकाने दाखवलेल्या एका दुकानातून मी कूर्गची खास उत्पादने म्हणजे कॉफी पावडर, काळी मिरी आणि इतर काही गोष्टी खरेदी करतो व रिसॉर्टवर परत येतो. बच्चे मंडळी फन झोनमधे व्हिडियो गेम्स वगैरे खेळण्यात गुंग आहेत. मी एका आरामखुर्चीवर टेकतो. डोळे कधी मिटले हे कळतच नाही.

14 जून 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: