.
Travel-पर्यटन

कूर्ग डायरी- 2


बुधवार

नेहमीप्रमाणेच पहाटे 5 च्या सुमारास जाग आली. कूर्गची हवा मोठी छान आहे. दुपारी 30 ते 31 सेल्सस च्या पुढे कमाल तपमान जात नाही. रात्री सुद्धा फार गार होत नाही. त्यामुळेच सर्वच वेळ हवामान मोठे सुखद भासते. रात्री झोपताना अंगावर पांघरूण ओढून झोपावे असे वाटले होते. त्यामुळे पहाटे एवढ्या लवकरच जाग येईल असे काही वाटले नव्हते पण जाग आली हे मात्र खरे. बाहेर काहीतरी मोठा कोलाहल चालू आहे असे वाटले. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर खात्रीच पटली की बाहेर कसली तरी प्रचंड गडबड, गोंधळ चालू आहे. निरनिराळे चित्र विचित्र व पूर्वी मी कधीच न ऐकलेले आवाज ऐकू येत आहेत. काय भानगड आहे म्हणून फ्रेंच विंडोवरचा पडदा बाजूला सारला. बाहेर तर काहीच गडबड दिसेना. सगळे कसे शांत व नीरव भासत होते. पण कानावर प्रचंड कोलाहल तर पडतच होता. शेवटी राहवेना. उठलो व बाल्कनीचे दार उघडले. सोसाट्याचा वारा एकदम आत घुसावा तसा आवाजाचा एक प्रचंड कोलाहल खोलीत घुसला. इंग्रजीमधे एक शब्द आहे Cacophony म्हणून. या शब्दाचा अर्थ मला कधीच नीट समजला नव्हता. आता या क्षणाला कानावर पडणारे ते आवाज ऐकून या शब्दाचा खरा अर्थ मला उमजतो आहे असे वाटले. बाहेर सगळे स्तब्ध होते. मग हा कोलाहल कसला असावा बरे? पण लगेचच डोक्यात प्रकाश पडला. हा सगळा कोलाहल आजूबाजूच्या गर्द झाडीत लपलेल्या पक्षीगणांचा होता. पक्षी एवढ्या विविध प्रकारचे व एवढे मोठे आवाज काढू शकतात हे मला आतापर्यंत ज्ञातच नव्हते.

आम्ही मुक्काम ठोकला आहे त्या रिसॉर्टची रचना मोठी छान आहे. खरे म्हणजे एका दरीतच हा रिसॉर्ट आहे. दरीच्या वरच्या टोकाला, परिमितीवर, निवासी संकुले आहेत. थोड्या खालच्या पातळीवर निरनिराळी रेस्टॉरंट्स, बच्चे मंडळींसाठी Fun Zone यांची व्यवस्था आहे. त्याच्या खालच्या पातळीवर ऍडव्हेंचर झोन, Gym आणि मसाज पार्लर आहे. या सर्वांच्या मधे व आजूबाजूला गर्द झाडी, इतकी गर्द की या इमारती काही वेळा दिसतही नाहीत. थोडक्यात म्हणजे भेट देणार्‍या पाहुण्यांना, सतत गुंतवून कसे ठेवता येईल हे बघितले आहे. या निवासी संकुलांना, निरनिराळ्या पण अनकॉमन वृक्षांची नावे दिली आहेत. त्यामुळे आम्ही जोजुबा किंवा लोकूचा मधे राहतो आहे हे सांगायला मलाही जरा गंमत वाटली.

या जिल्ह्याचे कूर्ग हे नाव जास्त प्रचलित असले तरी ते आंग्लाळलेले नाव आहे. कन्नड भाषेत या जिल्ह्याचे नाव आहे कोडागु. या कोडागु लोकांची निराळी संस्कृती आहे. ती कन्नड लोकांच्या पेक्षा केरळी लोकांना जास्त जवळची आहे असे माझे तरी मत झाले आहे. या कोडागु जिल्ह्यातले सर्वात महत्वाचे ठिकाण कोणते असे जर स्थानिकांना विचारले तर एक मुखाने उत्तर येते, तालकावेरी. उत्तर हिंदुस्थानात गंगा नदीला जे महत्व आहे ते इथे दक्षिणेत कावेरी नदीला आहे. गंगेला गंगामैय्या म्हणून संबोधण्यात येते. त्याच धर्तीवर कावेरीला कावेरी ताई म्हणतात. खरे तर कन्नड मधे आईला अम्मा असा शब्द आहे. पण कावेरी अम्मा म्हणत नाहीत. मी आमच्या इनोव्हाच्या चालकाला हा प्रश्न विचारायला विसरलो नाही. पण त्याचे म्हणणे पडले की कन्नड मधे ताई म्हणजे सुद्धा आईच. खरे खोटे ते कन्नड भाषीय सांगू शकतील. ही कावेरी ताई उगम पावते कोडागु जिल्ह्यातल्या तालकावेरी या स्थानामधे व म्हणूनच दक्षिण भारतामधे, उत्तरेच्या गंगोत्री सारखेच, तालकावेरी या स्थानाला महत्व आहे. तालकावेरीला उगम पावल्यावर या कावेरी ताई प्रथम श्रीरंगपट्टण जवळून वहातात. या ठिकाणी कृष्णराज सागर हे धरण या नदीवर बांधलेले आहे. प्रसिद्ध वृंदावन बाग याच ठिकाणी आहे. कावेरी नदीवर दुसरे महत्वाचे धरण मेट्टूर येथे तामिळनाडू मधे आहे. शेवटी ही नदी बंगालच्या उपसागराला तंजौरच्या जवळ जाऊन मिळते.

लवकर निघायचे असे म्हणत म्हणत शेवटी सकाळी 11 च्या सुमारास आम्ही तालकावेरीला जायला निघालो आहोत. मडिकेरीच्या साधारण नैऋत्येला जाणारा हा रस्ता अतिशय वळणावळणाचा आणि अरूंद आहे. परंतु आमच्या इनोव्हाच्या चालकाची तो मारुती 800 चालवतो आहे अशी प्रामाणिक समजूत दिसते आहे. साधारण 40 किलोमीटर अंतरावर आमची गाडी थांबते. कावेरी नदीला या ठिकाणी आणखी दोन नद्या येऊन मिळतात असे आमच्या चालकाचे म्हणणे आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर हा संगम लागतो.

खरे म्हणजे या संगमात पाहण्यासारखे काहीच नाही. अलाहाबादचा संगम तर दूरच राहिला पण आपल्या पुण्याचा मुळा मुठा संगमही या संगमाच्या मानाने भव्य दिव्य म्हणता येईल. मुठा उजवा कालवा जर यदाकदाचित मुठा डाव्या कालव्याला मिळाला असता तर जसे दिसले असते तसाच काहीसा हा संगम दिसतो. कावेरी आणि कणिका या नद्यांची पात्रे मला दिसली पण तिसरी सुज्योती नदी काही मला दिसली नाही. जवळच्या एका भाविकाला विचारल्यावर तो ती नदी गुप्त आहे असे म्हणला. म्हणजे पुढे बोलणेच खुंटले. या संगमाच्या जवळ एक केरळी पद्धतीचे मंदिर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार मात्र अतिशय भव्य आणि सुरेख वाटले. आत बरीच छोटी छोटी देवळे दिसली. त्यामुळे हे मंदिर नकी कोणाचे हे लक्षात येईना. एक दोन लोकांकडे चौकशी केल्यावर इश्वर, भंगडेश्वर पासून अनेक नावे समजली. शेवटी पलीकडच्या बाजूस एक इंग्रजी पाटी सापडली व या देवळाला भागमंडलेश्वर म्हणतात असा उलगडा झाला.

संगमावरून आता आमच्या गाडीने कावेरीच्या उगमाकडे जाणारा रस्ता चढायला सुरवात केली आहे. आजूबाजूला परत कूर्ग़सारखीच गर्द झाडी दिसू लागली आहे. 4 किलोमीटर गेल्यावर एका मोकळ्या पटांगणावर गाडी थांबली. समोर छान बांधून काढलेल्या पायर्‍या व एक विस्तीर्ण प्रवेशद्वार दिसते आहे.

शेजारच्या टपर्‍यांच्यातून कावेरीताईंची स्तुतीपर गीते ऐकत आम्ही त्या पायर्‍या चढून वर गेलो. समोर एक पाण्याचे कुंड आहे. या कुंडातच, समुद्रसपाटीपासून 3700 फूट उंचीवर, कावेरी नदीचा उगम झालेला आहे. तिथेच कावेरीचे एक देऊळही आहे. या देवळाचे फोटो काढायला मनाई का आहे याचे उत्तर माझ्या आवाक्याच्या बाहेरचे आहे त्यामुळे मी त्यावर विचार करण्याच्या फंदात सुद्धा पडत नाही. या कुंडातले पाणी खालच्या बाजूला असलेल्या एका गोमुखातून बाहेर येऊन मग लुप्तच होते आहे. अनेक भाविक कावेरीची मनोभावे पूजा करताना दिसत आहेत. कुंडाच्या वरच्या बाजूस अनेक छोटी देवळे आहेत. त्यात बहुतेक देवांनी हजेरी लावलेली दिसली. तालकावेरीचा एकूण परिसर मात्र अतिशय स्वच्छ, नीटनीटका आणि निसर्गरम्य दिसतो आहे. मुद्दाम लक्षात ठेवून पहायला यावे असेच हे स्थळ आहे यात शंकाच नाही.

ताल कावेरीच्या या कुंडामधून लुप्त झालेली कावेरी एकदम भागमंडलेश्वराजवळच प्रगट होते असे भाविकांचे म्हणणे. माझ्या शंकेखोर मनाला हे काही फारसे पटलेले नाही. तालकावेरीलाच कावेरीचा उगम होतो असे कशा वरून म्हणतात कोण जाणे? आपल्या क्षेत्र महाबळेश्वरला 5 नद्या उगम पावतात. या सर्व नद्यांची पात्रे 5 दिशांना गेलेल्या पाहता येतात. येथे तसे काहीच बघता येत नाही.

तालकावेरीच्या कुंडाजवळ उभे राहून सहज उजवीकडे बघितले की चांगल्या बांधून काढलेल्या दोन चारशे पायर्‍या एका टेकडीवर जाताना दिसतात. या टेकडीचे नाव आहे ब्रम्हगिरी टेकडी. या पायर्‍या चढून जायचेच असे मी ठरवतो. नंतर पाय दुखतील वगैरे विचार बाजूला टाकून मधून मधून थोडे थांबत का होईना मी माथ्यावर पोचण्यात यशस्वी होतो. वर गेल्यावर आजूबाजूला नजर टाकल्यावर आत्यंतिक आनंदाने माझे मन भरून गेले. तालकावेरीपासून 300 फूट उंच असलेल्या या टेकडीचा माथा काही फारसा मोठा नाही. 25 फूट व्यासाच्या वर्तुळा एवढाच असावा. पण चारी दिशांना दिसणारे हिरवेगार निळसर डोंगर व दर्‍यांचे विहंगम दृष्य एक विमान प्रवास सोडला तर इतक्या सहजपणे दुसर्‍या कोठे बघणे आपल्याला अशक्यच हे लक्षात आले. ताल कावेरीची ट्रिप नक्कीच सार्थकी लागली होती. मन कोणत्या तरी अनामिक आनंदाने भरून गेले होते. कदाचित एवढ्या भव्य दिव्य निसर्गाशी येथे जी जवळीक साधता आली त्यामुळेही असावे.

परत जाताना मडिकेरीमधे भोजन करण्याचा आमचा बेत चालक महाशय उधळून लावतात. मडिकेरीमधे चांगली रेस्टॉरंट्स नाहीत हे त्याचे मत आम्हाला जरा आश्चर्यजनक वाटले खरे पण ते बहुतेक बरोबर असावे. आम्ही रिसॉर्टला परत येतो. 3.30 ला स्वैपाकघरे बंद होण्याच्या आधी 1 मिनिट आमची ऑर्डर देतो. ब्रम्हगिरीच्या भेटीने पाय चांगलेच बोलू लागले आहेत हे लक्षात आल्याने आता भोजन व नंतर ब्रम्हानंदी टाळी हा बेत ठरल्यासारखाच आहे.

11 जून 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक कूर्ग डायरी- 2 | indiarrs.net Featured blogs from INDIA. - जून 12, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: