.
ताज्या घडामोडी Current Affairs

ऍपलचे वेठबिगारी


विसाव्या शतकातले पहिले दशक कोणाचे? असा प्रश्न विचारला तर ज्या थोड्या गोष्टींची नावे डोळ्यासमोर येतात त्यात ऍपल कंपनीचे नाव प्रामुख्याने दिसते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात स्थित असलेल्या या कंपनीने, या दशकात, आयपॅड, आय फोन आणि आता टॅबलेट संगणक यांच्या सारखी वैशिष्ट्यपूर्ण व चोखंदळ ग्राहकांना आवडतील अशा उत्पादनांची मालिका सादर करून अतिशय उत्तम नाव कमावले आहे. या उत्पादनांमुळे कंपनीचे भाग धारक व संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची चांगलीच भरभराट झाली आहे. या वर्षी स्टीव्ह जॉब्स याने मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स याला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे या मागे ऍपल कंपनीची उत्पादने हेच प्रमुख कारण आहे यात शंकाच नाही.

ऍपलचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सर्व उत्पादनांचे बाह्य स्वरूप पांढरे शुभ्र असते. भारतासारख्या देशात हे कितपत योग्य आहे हा वादाचा मुद्दा आहे परंतु ते असे असते ही सत्य परिस्थिती आहे. कदाचित स्टीव्ह जॉब्सला आपल्या कंपनीची प्रतिमा किती स्वच्छ आहे हे याद्वारे दाखवून द्यायचे असावे. मात्र मागच्या आठवड्यात काही अशा खळबळजनक बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत की ऍपलची ही शुभ्रता बेगडी व केवळ देखाव्यापुरतीच आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. इंग्रजीमधे एक वाक्प्रचार आहे An Idol with feet of clay म्हणून. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे की आपल्याला आदर्श व असामान्य वाटणारा एखादा पुरुष फक्त बाह्य देखावा करत असतो. प्रत्यक्षात तो अगदी सामान्यच असतो. ऍपलचे तसेच काहीसे होणार की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

ऍपलचे हे मातीचे पाय उघडकीला आले आहेत हॉन्गकॉन्गच्या अगदी जवळ असलेल्या चीन मधल्या शेन्झेन या मुक्त व्यापारी भागामधे. या भागात अनेक परकीय कंपन्यांनी उत्पादन करणारे आपले कारखाने उभारलेले आहेत. Hon Hai Precision Industry ही तैवानी कंपनी या भागात आपला इलेक्टॉनिक उत्पादनांचा एक प्रचंड मोठा कारखाना फॉक्सकॅन (Foxconn) या नावाने चालवते. आता ऍपलचा या फॉक्सकॉनशी कुठे संबंध आला असा प्रश्न कोणालाही पडेल. त्याचे उत्तर सोपे आहे. ऍपलची सर्वात लोकप्रिय आणि प्रचंड खप असलेली उत्पादने म्हणजे आय फोन आणि आय पॅड ही प्रत्यक्षात फॉक्सकॉनच बनवते. या कंपनीकडून ही उत्पादने ऍपलला अतिशय कमी किंमतीत मिळतात व ती आंतर्राष्ट्रीय बाजारात चढ्या किंमतीना विकून ऍपल भरघोस नफा कमावते आहे.

या अशा प्रकारचा व्यवहार तर जगामधल्या बहुतेक कंपन्या करतातच मग असे वाटणे स्वाभाविक आहे की यात गैर ते काय? या व्यवहारात गैर काहीच नाही. फक्त प्रश्न आहे तो एवढाच की फॉक्सकॉन या इतक्या कमी किंमतीला ही उत्पादने कशी काय बनवते?

मागच्या काही महिन्यापासून या फॉक्सकॉनमधे, चीनच्या दुसर्‍या प्रांतांतून स्थलांतर करून आलेल्या व तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या आत्महत्येचे एक चक्रच चालू झाले आहे. या आत्महत्यांचा आकडा आता दुहेरी आकड्यात गेल्याने तो माध्यमांच्या लक्षात येण्याइतका वाढला आहे. या कारखान्याला भेट दिलेल्यांचे असे म्हणणे आहे की या कारखान्यातले वातावरण इतके तणावपूर्ण आहे की त्यामुळे हे स्थलांतरित तरुण कर्मचारी आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहेत.

या फॉक्सकॉनच्या फॅक्टरी मधले एकूण वातावरण आहे तरी कसे? सुरवात होते ती आत जातानाच. तुम्हाला तुमचे पारपत्र किंवा ओळखपत्र काढून द्यावे लागते. परत बाहेर आल्यावरच ते मिळू शकते. त्यानंतर तुम्हाला एक बिल्ला छातीवर लावूनच फिरावे लागते. आत दुसर्‍या विभागात जायचे असले तर निराळे पास घ्यावे लागतात. सार्वजनिक विभागात तुम्ही धूम्रपान करू शकत नाही. काही ठरलेल्या ठिकाणीच तुम्ही चालत फेरफटका मारू शकता. शिफ्ट सुरू होताना व संपल्यावर कर्मचार्‍यांना एखाद्या लष्करी तुकडी सारखे आत किंवा बाहेर नेले जाते. आतमधे एक मनोरंजन केंद्र आहे पण त्यातला टीव्ही चालू कधीच नसतो. या केंद्रात अनेक मोठ्या जपानी पद्धतीच्या बाहुल्या टांगून ठेवलेल्या असतात. तुमच्या मनावर अतिशय तणाव आला की या बाहुल्यांना काठीने बडवून तो घालवावा अशी कंपनीची अपेक्षा असते. फॉक्सकॉन मधील एकूण वातावरणच लष्करी शिस्तीत चालते.

स्थलांतरिताना सुरवातीला पगार फारच कमी मिळतो. या पगारात शेन्झेनमधे राहणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे रोज ओव्हरटाईम हा करावाच लागतो. कारखान्याच्या शिफ्ट ची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5.30 एवढी असते पण बहुतेक कामगार रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत काम करतातच. CCTV या चिनी टीव्हीवर एका कर्मचार्‍याची मुलाखत घेतली गेली. त्याने सांगितले की ते महिन्याला 100 तास तरी ओव्हरटाईम करतातच. त्यांना काम करण्याशिवाय आयुष्यात दुसरे काहीच करता येत नाही, अगदी शेजारी काम करणार्‍या कर्मचार्‍याशी सुद्धा चार शब्द बोलणे शक्य नसते.

एक पूर्वीचा कर्मचारी म्हणतो की थोडक्यात सांगायचे तर फॅक्सकॉन म्हणजे एक मोठा तुरुंगच आहे. सरासरीने कर्मचार्‍यांना 2000 युआन एवढा पगार मिळतो. (नवीन कामावर लागलेल्याना 900 युआन पगार मिळतो.) कामावर असताना मृत्यु आला तर त्या कर्मचार्‍याच्या पालकांना किंवा बायकोला एक लाख युआन देण्यात येतात. पुष्कळ स्थलांतरितांना असे वाटू लागते की आपल्या पगारातून आपण स्वत:चा खर्चही भागवू शकत नाही तर कुटुंबियांना काही रक्कम पाठवणे दूरच राहिले. त्यापेक्षा एवढी मोठी रक्कम एक हाती मिळाली तर आपल्या कुटुंबियांना जास्त आरामात राहता येईल. कर्मचार्‍यांच्या आत्महत्यांमुळे फॉक्सकॉन कंपनीला नुकसान होते आहे असे वाटल्याबरोबर कंपनीने सर्व कर्मचार्‍यांना कळवून टाकले की कर्मचार्‍याचा कामावर असताना जरी मृत्यू झाला तरी त्याची कोणतीही जबाबदारी कंपनीवर येणार नाही. या निर्णयाविरूद्ध सर्व माध्यमांनी एवढी आरडा ओरड केली की शेवटी कंपनीला आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला.

थोडक्यात म्हणजे सावकाराचे कर्ज फेडता येत नाही म्हणून पूर्वी काम करणारे जसे वेठबिगार असत तसेच हे फॉक्सकॉनचे वेठबिगार आहेत. कर्ज काढून हे कामगार चीनच्या दुसर्‍या प्रांतांच्यातून शेन्झेनला आलेले असतात. त्यांचा स्वत:चा खर्चच पगारात भागत नाही. त्यामुळे ओव्हरटाईम करावा लागतो. घेतलेले कर्जच फेडता येत नसल्याने त्यांना नोकरी सोडताही येत नाही. प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असते. तसेच या कामगारांचेही असते. त्या सगळ्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला पाहणे कमकुवत मनाच्या लोकांना सहन होत नाही व ते शेवटी आत्महत्येला प्रवृत्त होताना दिसत आहेत.

आंतर्राष्ट्रीय माध्यमांतून फॉक्सकॉन आणि पर्यायाने ऍपल यांचे हे मातीचे पाय उघडकीस आल्यावर एकदम फॉक्सकॉन व ऍपल यांना उपरती प्राप्त झाल्यासारखे दिसते आहे. कर्मचार्‍यांचे पगार 20 % वाढवले जातील अशी घोषणा त्यांनी केली आहे. या बरोबर फॅक्सकॉनचे शेअर 2 % नी खाली पडले आहेत. ऍपल चा मुख्य कार्याधिकारी स्टीव्ह जॉब्स याने नक्राश्रू ढाळत आपल्याला या प्रकाराबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. तो म्हणतो की परिस्थिती कठिण आहे परंतु आम्हा काहीतरी मार्ग यातून काढूच.

5 जून 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “ऍपलचे वेठबिगारी

  1. अगदी ताज्या बातमीनुसार फॉक्सकॉनने नवीन लागलेल्या कामगारांचा पगार सध्याच्या 900 युआन वरून 1300 युआन व आता 2000 युआन पर्यंत वाढवला आहे. माध्यमांचा दणका हा असा असतो.

    Posted by chandrashekhara | जून 7, 2010, 9:20 सकाळी
  2. Very TRUE picture of big Corporates.
    So very true is Balzac’s Statement “Behind every great fortune there is CRIME”.

    Posted by Yogesh Bang | जून 25, 2010, 5:04 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention ऍपलचे वेठबिगारी « अक्षरधूळ -- Topsy.com - जून 5, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: