.
Musings-विचार

स्मॉल इज ब्युटिफुल


मराठीमधे एक म्हण आहे. ‘ लुळ्या पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी केंव्हाही बरी! ‘ विख्यात लेखक कै. पु. . देशपांडे यांनी आपल्या एका लेखात या म्हणीबद्दल लिहिले आहे की जगात श्रीमंती एवढी दुसरी कोणतीही धट्टी कट्टी गोष्ट मी बघितलेली नाही.” त्यांचे हे म्हणणे किती खरे आहे? याची प्रचिती तर आपल्याला रोज सतत येतच असते. म्हणूनच, या असल्या फसव्या, भ्रामक आणि निखालस खोट्या म्हणी व तसलेच वाक्प्रचार, कोण व कशासाठी प्रचलित करतो याचे कोडे मला तर कधीच उलगडलेले नाही. कदाचित काही श्रीमंत लोकांनी ही म्हण प्रचलित केली असल्याची मला शक्यता वाटते. एकदा समाजातले गरीब लोक आपण श्रीमंतांच्या पेक्षा कसे जास्त धट्टे कट्टे आहोत! या भ्रमात गुंग झाले म्हणजे ते लोक श्रीमंत होण्याचा प्रयत्नच करणार नाहीत व उरलेल्या श्रीमंतांना प्रतिस्पर्धी तेवढेच कमी राहतील, असा एक हेतू कदाचित याच्या मागे असावा. या म्हणीच्या पठडीतलाच एक दुसरा इंग्रजी वाक्प्रचार आहे, Small is Beautifulम्हणून. हा वाक्प्रचारही असाच फसवा आणि भ्रामक वाटतो. सध्याच्या युगात हा तर हा वाक्प्रचार कचर्‍याच्या डब्यात फेकून द्यावा असे मला कित्येकदा वाटते.

पन्नास शंभर वर्षांपूर्वी, नववधू कशी असावी याचे वर्णन करताना, ती सुबक ठेंगणी असावी असे वर्णन निदान त्या कालातल्या वाङ्मयात तरी बघावयास मिळते. म्हणजे प्रत्यक्षात ते तसेच मानले जात असावे असे म्हणायला हरकत नाही. एखादी मुलगी उंच असलीच तर तिला डोलकाठी, टेंगाणी म्हणून संबोधण्यात येत असे. आज विश्वसुंदरीच्या कोणत्याही स्पर्धेत अशा सुबक ठेंगण्या वर्णनाची सुंदरी, पहिल्या तीन क्रमांकात सोडाच पण पहिल्या शंभर क्रमांकात आलेली मी कधी ऐकलेली नाही. आणि काही वर्षांनंतर ही सुबक ठेंगणी एकदा सुबक चौकोनी होऊन सुखाने कालक्रमणा करू लागली की या मनकर्णिकेला, सुंदर रुपाची असे म्हणणे, किमान पक्षी, धाडसाचे तरी म्हणावेच लागेल.

अमेरिकेमधल्या कॅलिफोर्निआ राज्यात रेडवूड नावाची झाडे विपुल प्रमाणात आहेत. या राज्यात दोन ठिकाणी या झाडांचे नीट संवर्धन करून त्यांची जंगले अजून टिकवून ठेवली आहेत. सॅन फ्रान्सिको शहराच्या उत्तरेस असलेले म्युइर वूड्स हे यापैकीच एक स्थळ. शंभर दीडशे फूट उंचीची, तीनशे किंवा चारशे वर्षांपूर्वीची रेडवूड झाडे येथे आपल्या पूर्ण दिमाखाने उभी आहेत. काही झाडांचा बुंधा तर एवढा जाड आहे की झाडाच्या पोकळ ढोलीतून एखादी मोटरकार पलीकडे जावी. म्युइर वूड्सला भेट देणार्‍याचे मन या झाडांच्या भव्यतेने अक्षरश: दिपून जाते व थक्क होते.

सिंगापूरमधे जॅपनीज गार्डन म्हणून नितांत सुंदर अशी एक बाग आहे. या बागेचा एक भाग म्हणून बोनसाय पद्धतीने वाढवलेल्या (खरे म्हणजे खुरटवलेल्या) झाडांचे एक बोनसाय गार्डन आहे. ते मी एकदा मुद्दाम बघायला गेलो. मला ही बाग मुळीच आवडली नाही. चेरी, पॉपलर, पाईन किंवा ऍपल सारख्या झाडांच्या सहा इंच किंवा एक फूट उंचीच्या या खुजा आवृत्ती, त्या झाडांना आलेली छोटी छोटी पाने, फळे हे सगळे मला तर केविलवाणेच वाटले. चेरी ब्लॉसमच्या कालात, फुलांनी फुललेले चेरीचे झाड बघितल्यावर त्याची ही खुजी आवृत्ती मला इतकी निराशाजनक वाटली की ज्या कोणी हा बोनसाय प्रकार शोधून काढला आहे त्याला जपान्यांनी डोक्यावर घेण्यापेक्षा, हद्दपार केले असते तर जास्त बरे झाले असते असे मनाला वाटून गेले. म्युइर वूड्सच्या झाडांचा दिमाख कुठे? आणि या बोनसाय झाडांचे खुजेपण कुठे? तुलना करणेही शक्य नाही. चीनमधे मुलींचे पाय लहान रहावे म्हणून त्यांना घट्ट बूट घालून ठेवत असे कोठेतरी वाचल्याचे स्मरले. त्यातलाच हा प्रकार आहे.

1960 च्या दशकात त्या वेळच्या मध्यवर्ती सरकारने, लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. या साठी या उद्योगांना करांच्यात अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या. याबाबत मोठ्या प्रमाणात सरकारी प्रचार करण्यात आला. या सगळ्याला भुलून अनेक तरुणांनी आपल्या नोकर्‍या सोडून छोटे छोटे उद्योग चालू केले. आयुष्यभर अथक परिश्रम करून सुद्धा आजमितीला यातले बहुसंख्य उद्योजक हातात काहीच गवसले नसल्याच्या परिस्थितीला पोचले आहेत. मोठ्या कंपन्यांना माल स्वस्तात मिळाला. बॅंकांनी भरमसाट व्याज दरांनी ( 18 ते 21 टक्के) या उद्योजकांना भांडवल पुरवले व चिक्कार नफा कमावला. सेल्स टॅक्स, प्रॉव्हिड न्ट फंड ई.एस.आय. व मिनिमम वेजेस ऍक्ट सारख्या कायद्यांमुळे या लघु उद्योगांत काम करणार्‍या कामगारांना रोजगार व निश्चिती मिळाली. पण आयुष्याच्या संध्याकाळी आज हे लघु उद्योजक मात्र आपण निष्कारण या भानगडीत पडलो. चार चौघांसारखी नोकरी केली असती तर निदान नीट संसार तरी करता आला असता या निदानाला आले आहेत. लघु उद्योग हा काही विशिष्ट उत्पादने आणि सेवा यांच्या साठीच व काही कालासाठीच फायदेशीर ठरतो. एक खांबी तंबू असलेला हा उपद्व्याप बहुतेकांसाठी बुडीत खातेच ठरला आहे. एका ठराविक कालावधीनंतर हा उद्योग मोठा झाला नाही व उद्योजकाला त्यातून आपला नफा काढून घेता आला नाही तर पुढे तो उद्योग बुडण्याचीच शक्यता जास्त, असे मला वाटते.

स्मॉल इज ब्युटिफुलया विचाराला पहिला धक्का जर कोणी दिला असला तर बहुदा अमेरिकन लोकांनी असावा. अमेरिकेत सगळेच मोठे, साधे चहाचे कप सुद्धा तिथे जायंट आकाराचे मगझाले आहेत. अमेरिकेत पदार्थ मोठ्या पॅकेजेस मधे विकण्यासाठी कॉस्टको किंवा सॅम्स क्लब सारखी दुकाने आहेत. तिथे साध्या टूथ पेस्टस सुद्धा सहाच्या पॅकिंग मधे मिळतात. ही दुकाने अर्थातच एवढ्या जायंट आकाराची असतात की फिरताना पायाचे तुकडेच पडावे. अगदी आपल्याकडे सुद्धा, सध्याचे युग मोठ्या गोष्टींचेच आहे. मोठ्या प्रमाणातल्या बिग बझारमधे, बिग गर्दी होते आहे. पूर्वी एका सिनेमा थिएटरमधे एक सिनेमा दाखवत, आता पाच सहा सिनेमे एकदम दाखवले जातात. विमान जेवढे मोठे तेवढे जास्त फायदेशीर. पाच दहा वर्षांपूर्वी छोटी मारुती मोटरकार आपल्याला छान वाटत होती, आज टाटांनी नॅनो काढली असली, तिचा खूप गवगवा झाला असला तरी रस्त्यावर जास्त जास्त दिसू लागल्या आहेत भल्या थोरल्या आकाराच्या मोटरकार्स. भारतीय ग्राहकाची आवड निसंशय छोट्या कडून मोठ्याकडे जाते आहे.

स्मॉल इज नॉट ब्य़ुटिफुल असेच म्हणायची आता वेळ आली आहे. लघु रूप आता छान तर नाहीच पण त्याज्य समजले जाऊ लागले आहे. नव्या युगाचा मंत्र आहे Big is Beautiful. चीअर्स!

22 मे 2010

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “स्मॉल इज ब्युटिफुल

 1. > म्युइर वूड्सच्या झाडांचा दिमाख कुठे? आणि या बोनसाय झाडांचे खुजेपण कुठे? तुलना करणेही शक्य नाही.
  > —

  हा युक्तिवाद फार एकतर्फी आहे. म्युइर वूड्‌सच्या वाहनतळाकडून उत्तरेकडे मैलभर रेडवूड्‌सकडे न ज़ाता आठ-दहा मैल दक्षिणेकडे रपेट मारली तर रोडिओ बीचच्या वाटेवर मार्च-एप्रिलमधे जंगली फुले (wildflowers) असतात, ती छोटी फुले पहायलाही आम्ही हौशी लोक अनेकदा ज़ातो.

  राज्यकर्तांनी दिलेले किंवा अनैतिक मार्गानी मिळू शकणारे पैसे ‘खूप पैसा कटकट निर्माण करू शकतो’ म्हणून नाकारणारेही लोक आहेत. ‘राजास जी महाली – सौख्ये कधी मिळाली — ती सर्व प्राप्त झाली – या झोपडीत माझ्या’ ही तुकडोजींची रचना काय सांगते? आता हेच एक सत्य आहे, असे मानणेही चुकीचे ठरेल.

  ठेंगण्या मुली असोत वा लंबूटांग्या, दोन्ही वर्गांत चांगल्या उज़व्याही मुली असतात आणि डाव्याही. तोच प्रकार बिग आणि स्मॉललाही लागू होतो. त्यातल्या एकालाच ‘सुन्दर’ हे लेबल चिटकवणं हे एकतर्फी आहे. रोगी पाहून उपाययोजना ठरवावी त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे स्वतंत्र मूल्यमापन करून चांगले-वाईट आणि त्यांच्यातल्या अनेक छटा ठरवाव्यात.

  Posted by Naniwadekar | मे 23, 2010, 12:16 सकाळी
  • त्यातल्या एकालाच ‘सुन्दर’ हे लेबल चिटकवणं हे एकतर्फी आहे.

   +1.

   ब-याचदा एकीकडची म्हणा सगळीकडे वापरली जाते. (अशा out of context म्हणींचा एक संचय केला की management ची “self help books” बनत असावीत 😉 ) .
   ह्याबद्दल आमच्या मास्तरांचे एक वाक्य आठवते. ओहमचा नियम नुस्ता येउन फायदा नाही तर कुठले वोल्टेज, कुठला रेझिसटंट आणी कोणता करंट वापरायचा हे समजले तर उपयोग! तसेच इथे.

   Nile

   Posted by nile | मे 23, 2010, 4:13 pm
 2. स्मॉल इज नॉट ब्यूटिफुल असे म्हणणे जरा धाडसाचे वाटते. बरेच लघुउद्योजक अयशस्वी ठरले आहेत पण ते नोकरदार मानसिकतेतून बाहेर न पडता आल्यामुळे. ब्यूटीचे निकष वॆयक्तिक आहेत असे मानले जाते याचे कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे.

  Posted by मनोहर | मे 23, 2010, 4:30 pm
 3. Everyting has its own charater and accordingly small or big becomes a virtue..
  In Mobile phones,laptops etc Small is delinitely Beautiful

  Posted by Smit Gade | मे 24, 2010, 3:36 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक स्मॉल इज ब्युटिफुल | indiarrs.net Featured blogs from INDIA. - मे 28, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: