.
Environment-पर्यावरण, Uncategorized

गंध विश्व


मागच्या वर्षी ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या स्लमडॉग मिलिओनर या सिनेमामधे एक दृष्य आहे. या सिनेमाचा नायक असलेला मुलगा, एका खणलेल्या चराच्या वर असलेल्या झोपडपटीतल्या स्वच्छतागृहात गेलेला असताना, त्याचा मित्र बाहेरून कडी लावून घेतो. त्याच वेळेस एक प्रसिद्ध सिनेमा नट हेलिकॉप्टरमधून आपल्या वस्तीत येत असल्याचे या मुलाच्या लक्षात येते. त्या स्वच्छतागृहातून बाहेर पडून हेलिकॉप्टर उतरत असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला फक्त एकच मार्ग शक्य असतो, तो म्हणजे खालच्या घाणीने भरलेल्या चरात उडी मारणे. तो मागे पुढे न बघता त्या चरामधे उडी मारतो. हे दृष्य पहाताना प्रेक्षागृहातल्या प्रत्येकाच्या अंगावर, आत्यंतिक किळस वाटल्यामुळे म्हणा! पण शहारा आल्याशिवाय रहात नाही. या दृष्याबद्दल माझ्या एका मित्राने केलेली कॉमेंट मोठी मजेदार आहे. तो म्हणतो की सिनेमात हे दृष्य आपण अंगावर शहारा आला तरी सुद्धा बघू शकतो. पण प्रत्यक्षात असले काही दृष्य आपण बघूच शकणार नाही, कारण या चराच्या स्वच्छतागृहाजवळ एवढी दुर्गंधी असेल की त्याच्या जवळपास जाण्यासही कोणी धजावणार नाही. “

माझ्या मित्राचे म्हणणे एकदम योग्य आहे असे मला वाटते कारण गंधाचा, मग तो सुगंध असेल किंवा दुर्गंध, महिमा आहेच असा अफाट. मी सकाळी एका बागेत फिरायला जातो. या बागेत एका ठिकाणी कोणत्या तरी सुवासिक फुलाचा सुगंध दरवळत असतो. त्या ठिकाणी मी पोचलो की पाय आपोआप थबकतातच. पण त्या नंतर दिसणार्‍या एका कचरा पेटीपासून मात्र जितक्या जलद रित्या लांब जाणे शक्य आहे तितक्या जलद रित्या जाण्याचा प्रयत्न माझे पाय करतातच. माझ्या परिचितांपैकी एका ताईंना पेरू या फळाचा वास अजिबात सहन होत नाही. पेरूचा वास आला की त्या अगदी घाबर्‍याघुबर्‍या होतात. पेरूच्या वासाबद्दलचा हा तिटकारा त्यांच्या मुलांच्यात पण तंतोतंत उतरला आहे. त्यामुळे त्यांच्या घरी पेरू हे फळ पूर्णपणे वर्ज आहे. आता मला पेरूचा वास आला की डोळ्यासमोर रसरशीत पेरू दिसू लागतात व तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. रंगाचा वास मला अजिबात सहन होत नाही. तो वास 5 मिनिटे जरी मी सहन केला तरी घशाला खवखव सुटते, सर्दी झाल्यासारखे वाटू लागते. काही जणांना कांद्याचा वास सहन होत नाही तर काहींना हिरव्या मिरचीचा वास जरी आला तरी डोळ्यातून पाणी गळू लागते.

हे असे सगळे का होते? गंध म्हणजे तरी काय? हेच आपल्याला मुळी माहिती नसते. बर्लिन या शहरात स्थायिक असलेल्या पण नॉर्वे या देशामधे जन्मलेल्या, सिसेल टोलास (Sissel Tolaas) या शास्त्रज्ञ महिलेच्या संशोधनाबद्दल मी नुकतीच काही माहिती वाचली. गेली 20 वर्षे ही महिला या गंध विश्वात रममाण आहे. तिने शोधून काढलेल्या बर्‍याचशा गोष्टी मला तर अगदी विचार करण्यासारख्या वाटल्या. आपले नाक हा अवयव, सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या आपल्या अवयवांच्यापैकी एक आहे. नाकाचे सर्वात प्रमुख कार्य अर्थातच श्वासोच्छ्वास करणे आहे. तो थांबला तर आपण या जगातच नसू. परंतु टोलास बाईंचे असे म्हणणे आहे की नाक हे आपले एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे हे आपण आता विसरलेलोच आहोत. नाकामुळेच आपल्याला गंधांचे ज्ञान होते. पण या ज्ञानाचा उपयोग मानव इतका कमी प्रमाणात करतो आहे की या ज्ञानेंद्रियाची शक्ती केवळ वाया जाते आहे.

या टोलास बाईंनी रसायनशास्त्र व कला या विभागाच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत व त्यांचे अनेक भाषांच्यावर प्रभुत्व आहे. त्या MONO.KULTUR या बर्लिनमधे प्रसिद्ध होणार्‍या मासिकाच्या संपादिका आहेत. या मासिकाच्या मुखपृष्ठावर या बाईंनी तयार केलेले 12 गंध दिलेले आहेत. मुखपृष्ठ खरवडून ते समजू शकतात. MIT व हार्वर्ड युनिव्हर्सिटी यांच्याबरोबरच्या प्रकल्पांत त्यांनी काम केलेले आहे. आपले घ्राणेंद्रिय व गंधांची दुनिया यातच कार्य करण्याचे त्यांनी आता ठरवले आहे. या बाईंचे या विषयाबद्दलचे विचार मला फारच रोचक वाटले.

आपल्याला जर आयुष्य आपल्या पूर्ण कुवतीप्रमाणे जगायचे असले तर आपण आपल्या गंधांच्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग करून घेणे जरूरीचे असते. जेंव्हा आपण श्वासोच्छवास करतो तेंव्हा प्रत्येक श्वासागणिक हजारो सेंद्रिय मोलेक्यूल्स आपल्या नाकात घेत असतो. यापैकी अनेक मोलेक्यूल्स आपल्या नाकाला त्या मोलेक्यूलची सहीच म्हणता येईल अशा एका विशिष्ट गंधाची जाणीव करून देत असतात. या गंधांच्या जाणीवेनेच आपण आपल्या भोवतीच्या वातावरणाला कसा प्रतिसाद द्यायचा ते ठरवतो. आजबाजूच्या सर्व गोष्टी आणि इतर मानव हे आपण मुख्यत्वे गंधानेच ओळखतो. परंतु हे आपल्या लक्षातच येत नाही. समोरची कोणतीही गोष्ट किंवा माणूस यांना आपल्या वैयक्तिक विश्वात सामावून घ्यायचे किंवा नाही हे आपण त्या माणसाचा रंग, जात किंवा धर्मावरून ठरवत नाही तर गंधाने ठरवत असतो.

कोणत्याही गंधाचे मूलत: सुगंध किंवा दुर्गंध असे वर्गीकरण करता येत नाही. अगदी लहान बालक जेंव्हा शक्य असेल तेंव्हा स्वत:च्याच शी शू मधे थापट्या मारत मजेत खेळत राहते. त्याला शी किंवा शूला दुर्गंधी येते आहे अशी काहीही जाणीव नसते. ते बालक जसजसे मोठे होते तसतसे त्याला कोणते गंध सुगंध समजायचे व कोणते नाही हे भावनिक अनुभवातून समजते. या अनुभवांतून आपण गंधाचे वर्गीकरण करायला शिकत जातो. त्यामुळे दुधाचा वास चांगला व शू चा वाईट हे मुलाच्या डोक्यात ठसत जाते. पुष्कळ वेळा घरातील जीवन पद्धतीमुळे काही गंध दुर्गंध वाटू लागतात. पूर्णपणे शाकाहारी कुटुंबाला मटण किंवा चिकन शिजवताना येणारा वास हा अक्षरश: गुदमरून टाकणारा वाटतो. तर सामिष आहार करणार्‍यांना हाच वास सुगंध वाटून त्यांची भूक प्रज्वलित होते. उदबत्तीचा नुसता वास आला तरी मला लग्नसमारंभातल्या सुग्रास जेवणाची आठवण होते.

आपल्या संशोधनात टोलास बाईंना काही गंमतीदार अनुभव आले. ड्रेसडेन च्या युद्ध इतिहासाबद्दलच्या संग्रहालयात एक युद्धाचे दालन आहे. या दालनात रणांगणावर येणारा रक्त, मांस व एकूणच घाणेरडा असा वास सतत सोडत रहावा या कल्पनेने त्यांनी असा वास तयार करावा असे टोलास बाईंना सांगितले. हा वास तयार झाल्यावर हा जर आपण या दालनात ठेवला तर येथे एकही माणूस फिरकणार नाही हे लक्षात आल्यावर संग्रहालयाने आपला बेत रद्द केला. MIT बरोबरच्या प्रकल्पात टोलास बाईंनी भितीचा वास तयार केला तर हार्वर्ड बरोबर मेक्सिको मधल्या प्रदुषणाचा. बर्लिन मधल्या गल्ल्यांच्यात येणारे विशिष्ट वास त्यांनी तयार केले आहेत. टोलास बाई म्हणतात की कोणत्याही वयाच्या प्रत्येक मानवाला न आवडणारा वास म्हणजे मृत्युचा. मृत्युला एक विशिष्ट गंध असतो व तो टाळच्या प्रयत्न करणे हे आपल्या जीन्समधेच असते.

आधुनिक जगात प्रदुषण झपाट्याने वाढते आहे. शहरांच्यात असलेल्या प्रदुषणाची जाणीवच तिथल्या रहिवाश्यांना होत नसते. यामुळे ते कसे टाळता येईल हे त्यांच्या शरीराला समजत नाही व ते या प्रदुषणामुळे होणार्‍या आजारांना पुढे बळी पडतात. या साठी निरनिराळ्या प्रदुषणांच्या गंधांची जाणीव जर लोकांना करून दिली तर ती प्रदुषणे असलेल्या ठिकाणापासून, लोक दूर तरी जातील किंवा मास्क सारख्या गोष्टी वापरू शकतील.

आपल्या कार्याचे वर्णन टोलास बाई मोठ्या छान शब्दात करतात. त्या म्हणतात की मी परफ्यूम्स तयार करत नाही. जगातील मानवजातीला, परत बालकांच्या, सुगंध, दुर्गंध असे वर्गीकरण नसलेल्या दुनियेत नेण्याचा मी प्रयत्न करते आहे. आपण सर्व जण या बाबतीत खरे म्हणजे बालकेच आहोत. भ्रामक समजुती आणि गैरसमज यांच्या आधारावर असलेले सुगंध, दुर्गंधांचे वर्गीकरण आपल्या नाकांनी सोडून द्यावे व आरोग्यास हितकारक व अहितकारक असे वर्गीकरण करावे यासाठी माझा प्रयत्न आहे.”

18 मे 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “गंध विश्व

 1. लेख आवडला. गंधविश्वाची ही माहिती मला नवीनच आहे.

  Posted by D D | मे 18, 2010, 4:55 pm
 2. this is a very besht article with lots of besht info. I loved it!!!

  Posted by निखिल बेल्लारीकर | मे 18, 2010, 11:30 pm
 3. > समोरची कोणतीही गोष्ट किंवा माणूस यांना आपल्या वैयक्तिक विश्वात सामावून घ्यायचे किंवा नाही हे आपण त्या माणसाचा रंग, जात किंवा धर्मावरून ठरवत नाही तर गंधाने ठरवत असतो.
  >—–

  वरील विधान निराधार आहे म्हणायला हरकत वाटत नाही. गंधामुळे ज़ाणता-अज़ाणता फरक पडू शकतो. पण तो किती लोकांबाबत पडतो याबद्‌दल मला शंका आहे. अनेक व्यक्तींना प्रत्यक्ष भेटण्याआधी आपण पत्राद्‌वारे वा लेख वाचून वा माहिती वाचून वा पडद्‌यावर पाहून आपली मते बनवतो. ती मते गंधामुळे बदलल्याची किती उदाहरणे आहेत? पूर्वग्रह जास्त अनुकुल होण्याच्या द्‌ऋष्टीने तर मला एकही असे उदाहरण आठवत नाही. एखाद्‌या व्यक्तीला तीव्र दर्प असेल (तोंड, कपडे, घाम यांचा वास) तर मत प्रतिकूल होऊ शकते, हे मान्य. पण सुदैवानी असे लोक फार भेटत नाहीत. टॉपलेस बारमधे बीअर वगैरे देणार्‍या बायका ज़बरदस्त सुगंध अंगाला चोपडतात. पहिले १०-१५ सेकंद छान वाटतं. नंतर त्याचा कंटाळा येतो.

  माझा एक मित्र काही दिवस लंडनला कामाला गेला. त्याची कायम तक्रार म्हणजे इंग्लिश लोक अमेरिकनांसारखे सेण्ट, पर्फ़्युम (मला ती भाषा नीट येत नाही, पण ज़ो कोणता शब्द असेल तो) लावत नाहीत आणि त्याला त्रास होतो. मी त्याला विचारलं : ‘नागपूरला तुझे मायबाप घरी कुठला गंध लावतात? त्यांना कुठे दर्प असतो?’ त्यावर तो उत्तर देऊ शकला नाही.

  बाकी प्रतिक्रिया सावकाश घरी परतल्यावर.

  – नानिवडेकर

  Posted by Naniwadekar | मे 19, 2010, 6:07 सकाळी
  • नानिवडेकर

   टोलास बाईंच्या संशोधनाबद्दल वाचून मला जे काही वाटते ते असे. गंध ज्ञान वहुदा दोन पातळीवर होत असावे. मनाला जाणीव होऊन झालेले गंधज्ञान व मनाला अजाणता झालेले गंधज्ञान. पर्फ्यूम्स लावणार्‍या लोकांबद्दलचे गंधज्ञान हे मनाला जाणीव होत असताना झालेले असते. त्यामुळे आपण म्हणता तशी रिऍक्शन होत असावी. परंतु एखादा माणूस आपल्या जवळपास आला की त्याच्या गंधामुळे (मनाला अजाणता) आपण त्याच्या विषयी अनुकुल किंवा प्रतिकुल मत ठरवतो. हे अनुकुल किंवा प्रतिकुल मत आपल्या पूर्वीच्या भावनिक अनुभवावर आधारित असल्याने पूर्णपणे चुकीचेही असू शकते.

   मृत्युचा किंवा भितीचा गंध हा आपण प्रत्येकाने अनुभवलेला आहे. तो कसा किंवा कोण निर्माण करतो ते अजून तरी ज्ञात नाही. कदाचित आपली शरीरे तशा परिस्थितीत तो गंध बाहेर टाकत असावीत. त्यामुळे मास पॅनिक निर्माण होत असावे.

   Posted by chandrashekhara | मे 19, 2010, 9:05 सकाळी
 4. एखादा शिवशक्त ज़सा प्रत्येक गोष्टच ‘शंकराची लीला, बरे का’ म्हणून सांगतो, तशी ही गंधाचा मागोवा घेणारी टोलास बाई वाटते. ‘माणसाची आवडनिवड ही सगळी गंधाची किमया, बरे’ या तिच्या एकाच कथनावर माझा आक्षेप आहे. क्रिकेट, साईबाबा या धाग्यांनी बांधल्या गेलेल्या मित्रांना अज़ाणतेपणीही एकमेकांचे गंध आवडत असतील, हे पटत नाही. बाईंची बाकी माहिती वाचनीय तर आहेच.

  माझं नाक श्वसनक्रिया करतं ही कृपाच आहे, कारण बाकी ते काहीच करत नाही. सिकॅमोरच्या झाडाखाली त्या गंधापायी आनन्दून गेलेला मित्र मी पाहिला आहे. मी त्या झाडाचं पान नाकाला लावलं, तरी माझ्या नाकाला गंध वगैरेचा पत्ता नाही.

  मृत्युचा गंध असतो तसा सेमिस्टर संपल्या दिवसाचा होस्टेलचा गंध असतो. ८-१० दिवस दौरा करून आल्यावर घराच्या भिंतींना गंधसद्‌ऋष प्रकार असतो, आणि त्यांचा रंगही वेगळा वाटतो. माझा एक मद्रासी मित्र ‘इंडियन लोकांच्या घरांच्या भिंतींना हळदीचा वास येतो’ म्हणून ती घरं टाळतो. देशस्थ स्वैपाकाला ज़ो वास येतो तो मला उग्र वाटतो, म्हणून मी देशस्थांकडे जेवणं टाळतो. आणि तेलुगु जेवण तर नैव च, नैव च. काही तेलुगु लोकही त्यांच्या स्वैपाकाच्या वासाबद्‌दल तक्रार करतात, आणि तरी तेच झोडतात. भारतीय ‘हॉटेल’ मालकांना म्हणूनच वासापायी परदेशात परवाना मिळायला त्रास होतो, कारण बाज़ूचे दुकानदार लोक बोम्ब मारतात.

  इन्दिरा गांधींचा दावा होता की समोरचा माणूस आपला मित्र की शत्रू याचा त्यांना वास येत असे. आपण ‘I smelled trouble’ शब्द वापरतो, पण इन्दिराजींना नाकाद्‌वारे निर्णय घ्यायला मदत होई, असा माझा ग्रह आहे. याबद्‌दलचा मूळ मज़कूर : Guess who is coming to dinner, असल्या नांवाच्या शास्त्रीय संगीतावरच्या अत्यंत वाचनीय पुस्तकात पी एन धर यांच्या पत्नी कै शीला धर यांनी दिलेला आहे.

  मॅथ्यू पॅरिस हा माझा आवडता पत्रकार लेखक. थॅचर काकू विरोधी पक्षनेत्या होत्या तेव्हा तो त्यांच्या कार्यालयात पगारी नोकर होता, मग खासदार झाला, सध्या लंडन टाइम्सचा थोर लेखक आहे. श्री पॅरिस म्हणतात की अनेक वर्ष माणसाला मुद्रणकला माहीत नव्हती. चित्रकला माहीत असली तरी ज़साच्या तसा फोटो काढता येत नसे. ती नज़र वा वृत्तीच एके काळी नव्हती. म्हणून आपण पागनीसांच्या रुपात तुकारामाला पाहतो. (मागली दोन वाक्य माझी. पॅरिस कितीही थोर असला तरी त्याला तुकारामाची माहिती नसणारच.) पॅरिसचं निरिक्षण आहे की आवाज़ही साठवता येत नसे, पण गेल्या ५०-१०० वर्षांत ते शक्य झालं आहे. आणि खास पॅरिस स्पर्श-टच : गंध मात्र अज़ूनही साठवता येत नाही.

  दक्षिण गोलार्धातल्या एका दुर्गम बेटावर पॅरिस १०-१२ वर्षांपूर्वी काही महिने राहिला होता. तिथे लोकसंख्या मोज़की, बहुतेक लोक फ़्रान्सच्या सरकारचे. त्यांच्याबरोबर पॅरिस राहिला. त्याच्या मते वीज़ेचा अभाव असला की माणसाची इतर ज्ञानेन्द्रिये जास्त वापरली ज़ातात, आणि ज़ास्त तीक्ष्ण होतात. त्याच्या मते तंबूत बाज़ूला कोण झोपलं आहे हे त्याला काही आठवड्यांनी वासावरून ओळखता येऊ लागलं होतं. माझा स्वभाव अत्यन्त संशयी असल्यामुळे माझा अशा विधानांवर एकदम विश्वास बसत नाही. पण निदान हे सर्व कथन फार वाचनीय आहे.

  Posted by Naniwadekar | मे 19, 2010, 11:12 सकाळी
 5. आपण जसे ऎकताना अनावश्यक आवाजांकडे दुर्लक्ष करू शकतो वा पाहताना अनावश्यक तपशील गाळतो त्याचप्रकारे गंधाचेही तपशील इतर जाणिवांशी विसंवादी ठरल्याने गाळत असतो असे माझे अनुमान आहे. स्लमडाग मिलियनायर मधला आपण वर्णन केलेला प्रसंग अशक्य वाटत नाही.

  Posted by मनोहर | मे 19, 2010, 8:24 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: