.
History इतिहास

बोलन पास


भारतीय उपखंडाच्या उत्तरेस असलेली हिमालयाची पर्वतराजी, वायव्य दिशेस असलेल्या हिंदुकुश पर्वताच्या रांगा व पश्चिमेस असलेल्या सुलेमान व तोबा ककर (Toba Kakar) किंवा ब्राहुइ (Brāhui )पर्वतांच्या रांगा या नैसर्गिक अडथळ्यांनी, परकीय आक्रमकांना, भारतीय उपखंडावर आक्रमण करण्यापासून नेहमी बर्‍याच प्रमाणात परावृत्त केलेले आहे. परंतु शक, कुशाण, अलेक्झांडरची सेना, यांपासून ते अठराव्या शतकामधल्या अहमद शहा अबदाली पर्यंतच्या असंख्य आक्रमकांनी हे नैसर्गिक अडथळे ओलांडून, भारतावर आक्रमण करण्यात यश मिळवले. यातल्या काही आक्रमकांनी येथे स्वत:ची राज्ये, थोडा फार काल का होईना, स्थापन करण्यातही यश मिळवले. हे आक्रमक आपल्या सेना घेऊन भारतात आले तरी कसे? असे कुतुहल माझ्या मनात नेहमीच होते. गुगल अर्थ सारखा दिव्य चक्षू माझ्या हातात असल्याने या प्रश्नाचे उत्तर शोधणे अगदी सुलभ झाले आहे.


या आक्रमकांना भारतीय उपखंडात येण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध होते. यापैकी पहिला मार्ग म्हणजे खैबर खिंडीचा मार्ग. हा मार्ग बहुतेक सगळ्यांना माहिती असतो. पण या शिवाय आणखी एक मार्ग भारतीय उपखंडात येण्यासाठी उपलब्ध होता. मला तरी हा मार्ग माहितीच नव्हता. या मार्गाने इ..पूर्व 7500 पासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंत, आक्रमकांच्या सेनांपासून ते वस्ती करण्यासाठी जागा शोधत असलेल्या मानवी टोळ्यांपर्यंत अगणित मानव या मार्गाने भारतात आले. या कारणामुळे हा मार्ग व त्याचे महत्व मला खूपच रोचक वाटले. अफगाणिस्तानमधल्या कंदहार या प्रमुख शहरापासून पाकिस्तानमधल्या क़्वेट्टा या शहरापर्यंतचे अंतर फक्त 200 किलोमीटर आहे. या दोन शहरांच्यामधला भू प्रदेश अगदी सपाट आहे. त्यामुळे क्वेट्टा शहराला कंदहारपासून पोचणे अगदी सोपे आहे. परंतु या शहराच्या साधारण पूर्वेला व 70 किलोमीटर अंतरावर तोबा ककर पर्वताच्या रांगा दिसतात. हे पर्वत ओलांडल्याशिवाय भारतीय उपखंडात प्रवेश मिळवणे अशक्यप्राय आहे. या पर्वत रांगांमधून वहात येणारी बोलन नदी एका खिंडीमधे ही पर्वत रांग ओलांडते. या खिंडीचे नाव या नदीच्या नावामुळे बोलन खिंड असे पडले आहे. भारतीय उपखंडात प्रवेश करण्याचा हा सर्वात सुलभ मार्ग आहे. अकराव्या शतकातील गझनीचा मोहंमद, सोमनाथचे देऊळ लुटल्यावर ती लूट अफगाणिस्तानला याच मार्गाने घेऊन गेला. 1540 मधे मुघल सम्राट हुमायुन याचा बंगालमधला मुघल सुभेदार शेरखान याने कनोज येथे झालेल्या लढाईत मोठा पराभव करून दिल्लीच्या तख्तावर ताबा मिळवला होता. पराभूत हुमायुनने पलायन करून सिंध मधे आश्रय घेतला होता. हुमायुन 1543 मधे इराणी शहाची मदत मागण्यासाठी बोलन खिंडीमार्गेच इराणला गेला होता. 1759 मधे अहमदशाह अबदाली, 40000च्या वर संख्या असलेली आपली सेना व जड तोफा घेऊन या मार्गानेच मराठ्यांचा पाडाव करण्यासाठी भारतीय उपखंडात उतरला. पंजाबचा महाराजा रणजित सिंह याने पंजाब मधून प्रवेश नाकारल्याने, 1838-39 मधे 21000 या संख्येची ब्रिटिश फौज अफगाणिस्तानवर आक्रमण करण्यासाठी बोलन खिंडीतूनच कंदहारकडे रवाना झाली होती. 1876 ते 1898 या प्रदीर्घ कालावधीमधे केलेल्या अनेक प्रयत्नांनंतर, बोलन खिंडीतून जाणारा रेल्वे मार्ग, खुला करण्यात ब्रिटिश सरकार यशस्वी झाले. पाकिस्तानमधील सिबी या गावापासून क्वेट्यापर्यंत हा रेल्वे मार्ग जात असे. या मार्गावर धावण्यासाठी वापरली जाणारी इंजिने हत्तींच्या सहाय्याने खेचून नेण्यात आली होती.


हा बोलन खिंडीचा प्रवेश मार्ग आहे तरी कसा? एका पाठीमागे एक असलेल्या लांब, लांब व अतिशय अरूंद अशा दर्‍या किंवा घळींचा मिळून तो बनलेला आहे. बोलन खिंड प्रवेश मार्ग सुरू होतो दक्षिणेला असलेल्या रिंडलि (Rindli) या गावापासून व संपतो तो कोलपूर या गावाजवळ असलेल्या दरवाझा(Darwāza) या ठिकाणी. या दोन ठिकाणांमधले अंतर तब्बल 89 किलोमीटर आहे. माच या गावाच्या दक्षिणेला असलेल्या लालेजी प्लेन(Laleji Plain) या ठिकाणी ही दरी 26 किलोमीटर रूंद आहे.


बोलन खिंडीमधल्या भारताच्या या प्रवेश मार्गाला दुसर्‍याच एका कारणासाठी अनन्यसाधारण महत्व आहे. इंडोनेशिया मधील टोबा या ज्वालामुखीच्या झालेल्या स्फोटामुळे भारतीय उपखंडातील मानवी वास्तव्य 74000 वर्षांपूर्वी पूर्णपणे नष्ट झाले होते. यानंतर, दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी मानव परत भारतीय उपखंडात वास्तव्यासाठी येऊ लागले. मलेशिया, मियानमार कडून एक मानवी ओघ भारतात आला तर इराण कडून दुसरा मानवी ओघ अफगाणिस्तान मार्गे भारतीय उपखंडात आला. बोलन खिंड मार्ग हा या मानवी ओघाचा भारतात येण्याचा मुख्य मार्ग होता. ..पूर्व 7500च्या या कालखंडाच्या आधी या मार्गाने भारतीय उपखंडात आलेले मानव भटके व शिकारीवर जगणारे असल्याने काही दगडी हत्यारे सोडली तर त्यांच्या कोणत्याही खुणा सापडत नाहीत. मात्र इ..पूर्व 7500 च्या नंतर, बोलन खिंडीमार्गे भारतात आलेले मानव, वस्ती करून राहणारे होते. ते शेती करत असत व त्यांना मातीची भाजलेली भांडी बनवण्याची कला अवगत होती. त्यांनी शेळ्या,मेंढ्या या सारखे प्राणीही पाळले होते. प्रजननक्षमतेची ते पूजा करत असत.

प्रजननक्षमतेची देवता

भाजलेल्या मातीचे भांडे

बोलन खिंडीमधून वहात आलेली बोलन नदी काचीच्या पठारावरून पूर्वेकडे वहात जाते व पुढे सिंधु नदीला जाऊन मिळते. बोलन खिंडीपासून सुमारे 85 किलोमीटर अंतरावर (29°25′ N, 67°35′ E) बोलन नदीच्या काठावरच्या 495 एकर जागेवर, मानवी वस्त्यांचे सर्वात जुने अवशेष मिळाले आहेत. या अवशेषांच्या जवळ मेहरगढ हे गाव असल्याने या अवशेषांना हेच नाव मिळाले आहेत. मानवी वस्तीचे भारतीय उपखंडातील हे सर्वात जुने अवशेष असल्याने त्यांना अतिशय महत्व आहे. ..पूर्व 7500 ते 4000 या सुमारे 3500 वर्षाच्या कालखंडात मेहरगढला मानवी वस्ती होती. या वस्त्यांचे अवशेष गुगल अर्थ वरून उत्तम रित्या दिसू शकतात.

प्रत्यक्ष जागेवर काढलेले छायाचित्र

पंचम जॉर्ज़ बादशहाच्या भारत भेटीच्या वेळी मुंबईला एक वास्तू ब्रिटिशांनी उभारली होती. त्याला गेटवे ऑफ इंडिया असे नाव त्यांनी दिले होते. परंतु बोलन खिंड मार्गाचे महत्व लक्षात घेतले तर बोलन खिंड मार्ग हा खरा व मूळ गेटवे ऑफ इंडिया आहे असेच मला वाटते.

14 मे 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

7 thoughts on “बोलन पास

 1. फारच छान .

  Posted by Asha Joglekar | मे 14, 2010, 9:46 pm
 2. अठराव्या शतकात म्हणजे पानिपतच्या तिसर्या युद्धानंतर हा आक्रमकांचा ओघ थांबला.

  Posted by मनोहर | मे 14, 2010, 10:51 pm
 3. फारच महत्वाची माहिती.

  Posted by chaitany kulkarni | मे 14, 2010, 11:04 pm
 4. I must say, this is one of the most informative posts I have ever read in quite a long while. A real nugget of information. Kudos!!!!!!

  Posted by निखिल बेल्लारीकर | मे 15, 2010, 10:24 pm
 5. salute for the pains taken. grt and wow, i am lucky to read this article. thnx.

  Posted by shashee | मे 16, 2010, 11:48 pm
 6. सुंदर. माहित्पूर्ण लेख झाला आहे.

  Posted by ravindra | मे 16, 2010, 11:55 pm
 7. Atishaya Uttam ani upayukta mahiti…

  Posted by Smit Gade | मे 19, 2010, 12:22 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: