.
अनुभव Experiences

माझे पुणे, तुमचे पुणे!


मागच्या शुक्रवारी, एका छोट्याच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या पार्टीचे मला निमंत्रण आले होते. ही पार्टी होती पुण्याच्या औंध भागातल्या एका रेस्टॉरंटमधे. मी या ठिकाणी पूर्वी कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे तिथे गेल्यावर, तिथले एकूण वातावरण, झगमगाट व लोकांची गर्दी पाहून मला थोडेफार आश्चर्यच वाटले. आपण नक्की पुण्यातच आहोत का? अशी शंकाही क्षणभर मनाला चाटून गेली. हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या एका पोहण्याच्या तलावासदृष्य दिसणार्‍या एका तळ्याच्या आजूबाजूने टेबले लावलेली होती. तिथे ही पार्टी होती. एकूण ते रेस्टॉरंट बड्या लोकांसाठीच होते हे उघड दिसत होते. तिथला एकूण डेकोर, ऑर्डर घेणार्‍या स्टुअर्टसच्या हातातली वाय फाय यंत्रे आणि एकूण चकचकाट बघता या रेस्टॉरंटमधली खानपानाची सेवा माझ्या खिशाला फारशी परवडण्यासारखी नसावी हे माझ्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. हे रेस्टॉरंट उच्च स्तरातल्या ग्राहकांसाठीच होते हे कळत होते. तरीही तिथे गाड्या भरभरून ग्राहक येत होते. ऑर्डर्स देत होते. वाढदिवसाच्या केक्स कापल्या जात होत्या. मोठ्या प्रमाणात पुण्यामधे आलेल्या आय.टी. कंपन्या व आंतर्राष्ट्रीय वाहन उत्पादन कंपन्या यांच्यामुळे खिसे भरगच्च भरलेले नवे पुणेकर आता पुण्यात किती मोठ्या प्रमाणात आहेत याचीच जाणीव मला तिथे सतत होत होती.

या वाढदिवसाच्या पार्टीला, माझे समवयस्क असलेले एक नातलग उपस्थित होते. हे नातलग मूळचे पुण्याचे असले तरी आता गेली तीस चाळीस वर्षे तरी मुंबईला स्थायिक आहेत. ते आल्यावर आजूबाजूल बघत मला म्हणाले की पुण्याचे वैभव बघतो आहे.” पुण्याचे हे सगळे वैभव, मी पुण्यात रहात असलो तरी माझ्यासाठीही नवीनच होते त्यामुळे या माझ्या नातलगाने, माझ्या मनातली भावनाच व्यक्त केली आहे असे मला वाटल्यावाचून राहिले नाही. पण हे माझे नातलग पुढे म्हणाले की हे सर्व ठीक आहे पण हे माझे पुणे नव्हे.” त्यांचे हे वाक्य का कोण जाणे माझ्या मनात घोळतच राहिले. त्या जागेमधे असलेले वेटर्स व रेस्टॉरंटचे व्यवस्थापन मराठी नसल्यामुळे किंवा तिथला एकूण श्रीमंती भपका पाहून कदाचित माझ्या नातलगाना असे वाटले असावे असे मी माझ्या मनाचे त्यावेळी समाधान करून घेतले खरे. परंतु नंतर विचार करताना लक्षात आले की आपल्याला स्वत:ला सुद्धा अलीकडे बर्‍याच वेळा असे वाटते की! म्हणजे नक्कीच दोन पुणे आता असली पाहिजेत. एक अर्थातच माझे पुणे व दुसरे, तुमचे पुणे. कोणाला असे वाटण्याची शक्यता आहे की माझे पुणे गरिबांचे पुणे आहे व तुमचे श्रीमंतांचे! परंतु गरीबश्रीमंत अशी वर्गवारी मला अजिबातच अभिप्रेत नाही. मात्र माझ्या पुण्याच्या किंवा तिथल्या लोकांच्या खाणाखुणा मला अजिबातच आता दिसत नाहीत असे काही म्हणता येणार नाही. महिन्यादोन महिन्यांपूर्वी मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनात बघितलेला, हजारो सुसंस्कृत व पुस्तकवेड्या पुणेकरांचा समुदाय माझ्या पुण्यातल्या लोकांचाच वाटत होता. सहा महिन्यापूर्वी भारत इतिहास संशोधन मंडळाने भरवलेल्या एका प्रदर्शनाला मी गेलो होतो. शेकड्यांच्या संख्येने तिथे आलेले इतिहासप्रेमी तर माझ्या पुण्यातलेच होते. मे महिन्यातल्या वसंत व्याख्यान मालेला किंवा लिटल चॅम्प्सच्या कार्यक्रमाला गर्दी करणारे पुणेकर सुद्धा माझ्या पुण्यातलेच आहेत. माझ्या पुण्याच्या अस्तित्वाच्या खुणा जर अजून अशा वारंवार दिसत असल्या तर ते गेले आहे तरी कोठे?असे म्हणायचे.

आज सकाळी वर्तमानपत्रामधे, पुण्याच्या रस्त्यावर काल झालेल्या एका टोळीयुद्धाची बातमी आली आहे. या युद्धात, दोन गुंडांच्या टोळ्यांनी, एकमेकावर पिस्तूलांनी गोळीबार वगैरे केला होता. हा प्रकार कुठल्यातरी झोपडवस्तीत किंवा अवैध गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या कोण्या भागात झाला नव्हता तर अगदी मधमवर्गीय वस्ती असलेल्या पर्वतीच्या पायथ्याच्या भागात झाला होता. माझ्या लहानपणी सायकलला रात्री दिवा न लावता सायकल चालवली किंवा तीन सायकलस्वार एका ओळीत सायकल चालवत गेले म्हणून पकडून दंड करणारे पोलिस आता सिग्नल तोडून जाणार्‍या फटफटी स्वाराकडे हताशपणे बघत उभे राहतात. तडीपार केलेले गुंड आपली तडीपारी मुंबईला जाऊन रद्द करून घेतात व परत उजळ माथ्याने पुण्यात येतात. हे सगळे घडते आहे ते नेमके कोणत्या पुण्यात? माझ्या पुण्यात असे घडणे शक्यच नाही.

शहराच्या कोणत्याही दिशेला डोकावले तरी दिसतात भव्य मॉल, मल्टीप्लेक्स सिनेमे आणि मोठमोठी हॉटेले. जुने बंगले, चाळी, वाडे नष्ट होऊन तिथे उभी रहात आहेत खुराडेवजा सदनिका संकुले. रस्त्यांवर धावत आहेत आलीशान अत्याधुनिक गाड्या आणि वातानुकूलन यंत्रे ही चैन नसून गरज होऊ लागली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी हजारो रुपये शुल्क घेणार्‍या नव्या नव्या शाळा उभ्या राहत आहेत. पुण्यामधे होणारे बदल, चक्रावून सोडणारे आहेत यात शंकाच नाही. निदान चेहर्‍यावरून तरी माझे पुणे आता हरपलेच आहे परत न दिसण्यासाठी!

परंतु चेहर्‍याला रंगरंगोटी केली किंवा जरीचे वस्त्र परिधान केले की आतला माणूस थोडाच बदलतो. मग असल्या बाह्य खुणांनी किंवा बदलांनी पुणे बदलले आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे? ज्या तडफेने शंभर वर्षापूर्वी अण्णासाहेब कर्वे किंवा ज्योतिबा फुले यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले त्याच तडफेने व निस्वार्थीपणे कार्य करणार्‍या संस्था पुण्यात अजून चालूच आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा काढून त्यांना शिकवणारे आईबाप पुण्यात अजून तसेच आहेत. पुण्यातल्या शिक्षण संस्था वाढतच आहेत. लोकांच्या आयुष्यातल्या व्हॅल्यूज आहेत तशाच आहेत फक्त त्यांचे स्वरूप बदलले आहे. मॉल्स मधे खरेदी करणारा, मल्टीप्लेक्समधे सिनेमा बघणारा, पुणेकर तोच आहे, तसाच आहे. पूर्वी डेक्कन बूक स्टॉल किंवा इंटरनॅशनल मधे गर्दी करणारा पुणेकर आता क्रॉसवर्ड किंवा लॅन्डमार्क मधे गर्दी करतो आहे. त्याचे पुस्तकांचे वेड आहे तसेच आहे. किर्लोस्कर कंपनीत मुलाला नोकरी मिळाली म्हणून खुश होणारा पुणेकर आता बे एरियामधे मुलगा नोकरी करतो आहे हे कौतुकाने सांगतो आहे. मुलाला प्रमोशन मिळाले म्हणून पूनम किंवा पूना कॉफी हाऊसमधे पार्टी करणारा पुणेकर आता कॉरिऍन्थन क्लब मधे पार्टी करतो आहे.

माझे पुणे आणि तुमचे पुणे काही वेगळी नाहीतच. माझे पुणेच तुमचे पुणे आहे.

11 मे 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “माझे पुणे, तुमचे पुणे!

 1. Faar Sunder Lihilay tumhi…

  Posted by manish | मे 11, 2010, 7:37 pm
 2. पुणे आता हरपलेच आहे परत न दिसण्यासाठी

  Posted by Amolkumar | मे 11, 2010, 7:39 pm
 3. काका लेख अतिशय सुंदर झालाय. बाह्य वस्त्रांनी पुण्याचे अंत:रंग बदलू नये असा अगदी मनापासून मलाही वाटतं.

  Posted by शब्दांकित | मे 11, 2010, 10:04 pm
 4. मस्त लेख. गंमत म्हणजे तुम्ही वर्णिलेल्या हॉटेलमध्ये कालच गेलो होतो 🙂 माझ्या माहिती नुसार ते हॉटेल राजकीय वरदहस्त लाभलेल्या मराठी माणसाचे आहे.
  बाकी लेखातील सर्व गोष्टी पटल्या. पुणेकराने कात टाकली पण पिंड तोच आहे.

  Posted by निरंजन | मे 13, 2010, 4:20 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention माझे पुणे, तुमचे पुणे! « अक्षरधूळ -- Topsy.com - मे 11, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: