.
अनुभव Experiences

आव्हान- 5


1977 -78 या वर्षांमधे माझ्या कारखान्याचे काम बर्‍याच सुरळितपणे चालू झाले होते. काही नवीन उत्पादने विकसित केली होती व त्यांच्यासाठी थोड्याफार ऑर्डर्स मिळत होत्या. स्वत:चे असे भांडवल नसल्यामुळे भांडवलाची चणचण आम्हाला नेहमीच भासत असे. युनायटेड वेस्टर्न बॅन्केने आम्हाला 5000 रुपयाचा ओव्हरड्राफ्ट दिला होता परंतु तो फारच अपुरा वाटत होता. माझ्या वडिलांच्या कारखान्याला वित्तपुरवठा बॅन्क ऑफ महाराष्ट्र कडून होत असे. माझी आई या बॅन्केचे व्यवहार पहिल्यापासून बघत असल्याने, एका भेटीत तिने बॅन्केच्या अधिकार्‍यांजवळ माझ्या धंद्याचा विषय काढला. बॅन्केच्या अधिकार्‍यांनी मला भेटायला बोलावले. मी व माझी आई त्या अधिकार्‍यांना भेटलो. आम्ही काय करतो आहोत? ऑर्डर्स किती आहेत? पुढचे प्रॉस्पेक्ट्स काय? वगैरे सर्व माहिती त्यांनी विचारली. काही वेळा चर्चा झाल्यावर मी बॅन्केकडे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला. साधारण महिन्याभराने, बॅन्केचे 25000 रुपयाचे कर्ज मंजूर झाल्याचे कळले. त्याच वेळी बॅन्क अधिकार्‍यांचे असे म्हणणे पडले की उत्पादन करणार्‍या धंद्यांना कर्ज पुरवठा करण्याबाबतीतले सरकारी धोरण आता जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे बदलले आहे व या नवीन धोरणाप्रमाणे मला वाहन हवे असल्यास ते 75% कर्ज देऊ शकतील. मी बराच विचार केला. त्या वेळी दोनच प्रकारच्या गाड्या मिळत असत. फियाट किंवा प्रिमियर पद्मिनी व ऍम्बॅसॅडर. या गाड्यांच्यावरचा टॅक्सही या सरकारने कमी केला होता व नवीन फियाट 32000 रुपयाला आणि लगेच मिळत होती. ही गाडी आम्ही घ्यायची ठरवली. बॅन्केने कर्ज मंजूर केले व कोरी फियाट दोन तीन आठवड्यात घरी आली.

एकंदरीत रित्या, धंदा प्रगतीपथावर होता आणि भरपूर काम केले तर आणखी प्रगती होण्यासारखी होती. परंतु याच वेळी अशी एक घटना घडली की एक मोठेच आव्हान माझ्यापुढे येऊन उभे राहिले. या प्रसंगातून बरेच नवे धडेही मिळाले.

चिंचवडच्या डिझेल इंजिने करणार्‍या एका कंपनीसाठी काही पार्ट आम्ही विकसित करण्यासाठी घेतले होते. त्यांची चाचणी करण्यासाठी आम्ही चिंचवडला त्या कंपनीत त्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी पुण्यात जनता सरकारचे पंतप्रधान भेटीसाठी आले होते व विरुद्ध पक्षाचे म्हणजे कॉन्ग्रेसचे लोक त्यांच्या विरुद्ध निदर्शने करणार होते असे मी वर्तमानपत्रात सकाळी वाचले होते. आपला राजकारणाशी काय संबंध म्हणून मी त्या बातमीकडे अर्थातच दुर्लक्ष केले होते. त्या कंपनीच्या बाहेर रस्त्यावर अनेक लोकांनी आपली वाहने लावली होती तिथे मी माझे वाहन ठेवले व कंपनीत गेलो. कंपनीत पुष्कळ आतल्या भागात माझ्या पार्टसच्या चाचण्या चालू होत्या तिथे मी गेलो व आमचे काम चालू केले.

जरा वेळाने मला निरोप आला की मला परचेस विभागात त्वरेने बोलावले आहे. हा परचेस विभाग अगदी सुरवातीला म्हणजे रस्त्याच्या कडेला व पहिल्या मजल्यावर होता. तिथे गेल्यावर मी जे दृष्य बघितले ते मी या जन्मात विसरणे शक्य नाही. काळजाचे पाणी पाणी करणारेच ते दृष्य होते. रस्त्यावर एक मोठा जमाव जमला होता व माझी 5 आठवडे सुद्धा पूर्ण न झालेली व नवी कोरी गाडी त्यांनी रस्त्याच्या मध्यभागी उलटी केली होती व त्याला आग लावली होती. गाडीतून धूर आणि ज्वाला निघालेल्या दिसत होत्या. माझे पाय अक्षरश: लटलट कापू लागले. मी कसाबसा एका खुर्चीचा आधार घेऊन उभा राहिलो. कोणीतरी पाणी आणून दिले ते प्यायलो. अतिशय उद्विग्न अशा माझ्या मनात पहिला कोणता विचार आला असला तर कॉलेजमधे माझ्या बरोबर असलेला एक मित्र स्वानंद याचा. या स्वानंदचे शनिवार पेठेतले राहते घर 1961 साली पुरात गेले होते. स्वानंद व त्याचे आईवडील यांच्याकडे, अंगावरच्या वस्त्रांखेरीज, कोणतीच चीजवस्तू उरली नव्हती. हा माझा मित्र जर त्याच्यावर कोसळलेल्या या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो तर मी का पडणार नाही? हा विचार मनात आल्यावर मी बराच सावरलो. एक तासाभराने तो जमाव गेला. पोलिस आलेच होते. त्यांनी पंचनामा केला. मी सही केली व रिक्षा करून घरी आलो.

पुढचे काही दिवस घरातले कोणी जावे तसे घरी वातावरण होते. नातलग मंडळी भेटून गेली. गांधीवधानंतर गावोगावी लोकांना नेसत्या वस्त्रांनिशी बाहेर काढून घरे पेटवण्यात आली होती त्याची आठवण काही जणांनी करून दिली. एक दोन मित्र काही मोठ्या कंपन्यांच्यात उच्च पदावर होते त्यांनी मला भेटायला बोलावून नवीन उत्पादनांच्या ऑर्डर्स दिल्या. सर्व मित्र व नातलग यांनी खूप मदत केली.

बॅन्क ऑफ महाराष्ट्रच्या अधिकार्‍यांनी मात्र खूपच सहानुभूतिपूर्ण दृष्टीकोन दाखवला. जो पर्यंत मी कर्जाचा हप्ता वेळेवर देऊ शकत होतो तो पर्यंत त्यांना काहीच अडचण नव्हती. गाडीची विम्याची पॉलिसी माझ्या हातात आलेलीच नव्हती. ती गाडीच्या विक्रेत्याकडून घेऊन आलो. ती बघितल्यावर मला दुसरा एक मोठा धक्का बसला. तोपर्यंत विमा या प्रकाराशी एक आयुर्विमा सोडला तर माझा काहीच संबंध आलेला नव्हता. गाडीच्या विक्रेत्याने आपण विम्याची सर्व काळजी घेऊ असे सांगितलेले असल्याने मी निष्काळजी होतो. परंतु हातात आलेल्या या विमा पॉलिसीप्रमाणे, माझ्या गाडीला जर सार्वजनिक दंग्याधोप्यात काही डॅमेजेस झालेले असले तर त्याची भरपाई देण्यास विमा कंपनी जबाबदार नव्हती. त्या वेळच्या माझ्या धंद्याच्या परिस्थितीत हा 32000 रुपयाचा फटका मात्र सहन करण्यासारखा नव्हता.माझे अज्ञान व गाडी विक्रेत्याचा निष्काळजीपणा मला चांगलाच भोवला होता.

माझा एक मित्र याच विमा कंपनीत कामाला होता. त्याने मला बरीच मदत केली. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटून या प्रकरणात माझी काहीच चूक नाही हे आम्ही या विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना पटवण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रयत्नांना 4 महिन्यात थोडे यश आले व अतिशय स्पेशल केस म्हणून त्यांनी 21000 रुपयाचा धनादेश मला दिला. प्रथम मी काय केले असले तर बॅन्केचे कर्ज फेडून टाकले. ज्या कंपनीसमोर माझी गाडी जळली त्या कंपनीच्या अधिकार्‍यांनी तेंव्हा जरी प्रत्यक्ष मदत मला केली नसली तरी माझे नाव कंपनीचे मान्य सप्लायर म्हणून दाखल करून घेतले. पुढच्या काही वर्षांत मला या कंपनीचा लाखो रुपयांचा धंदा मिळाला हे मात्र खरे.

हे सगळे झाले तरी आपल्याजवळ गाडी नाही ही रुखरुख मनात राहिलीच होती. त्यामुळे परत जरा हातात पैसे जमल्यावर कोल्हापूरच्या घाटगे पाटील कंपनीकडून 41800 रुपयाला आम्ही नवी कोरी ऍम्बॅसॅडर गाडी खरेदी केली. या गाडीची डिलिव्हरी घेताना मी विम्याचे पूर्ण फॉरवर्ड कव्हर घेऊनच कोल्हापूरला गेलो. ती गाडी पुढे जवळ जवळ 14 वर्षे माझ्याकडे होती.

गाडी घेऊन कोठेही निघताना त्या भागात काही अशांतता नाही ना हे तपासूनच गाडी बाहेर काढण्याची सवय मग मला लागली. तसेच विम्याला किती महत्व आहे ते कळल्यामुळे पुढे खरेदी केलेल्या प्रत्येक वाहनाबरोबर विमा पॉलिसी आहे की नाही हे तपासल्याशिवाय कोणत्याही वाहनाची डिलिव्हरी मी कधीच घेतली नाही.

हे आव्हान तर मी मित्र व नातलग यांच्या पाठिंब्यामुळे, समर्थपणे पेलू शकलो. बाकी कोणाविषयी काही आकस मनात उरला नाही. पण गाडी विक्रेत्याबद्दल मी असे कधीच म्हणू शकत नाही. एकतर त्याने निष्काळजीपणा केला आणि नंतर माझ्या जळलेल्या गाडीतून स्टार्टर व डायनॅमो सारखे काही भाग काढून परस्पर विकल्याचेही माझ्या गॅरेजमधून मला समजले. मनुष्यस्वभावाला औषध नाही म्हणतात हेच खरे.

9 मे 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention आव्हान- 5 « अक्षरधूळ -- Topsy.com - मे 9, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: