.
Health- आरोग्य

एक नवीन संकल्पना- आरोग्यसंपत्ती


एका वर्षापूर्वी, साधारण याच दिवसात माझ्या डाव्या मनगटाचे एक हाड मोडले. आता ते मोडले कसे? हे मलाही सांगणे कठिण आहे. कारण एका उतारावर माझा बूट घसरण्याचे निमित्त झाले व मी खाली पडलो. खाली पडलेल्या स्थितीत असतानाच जेंव्हा माझ्या मनगटातून असह्य अशा वेदना सुरू झाल्या तेंव्हाच काहीतरी मोडले असावे हे माझ्या लक्षात आले. वैद्यकीय चिकित्सा झाली, उपचारही झाले. पंधरा दिवसांनंतरच्या डॉक्टरांच्या भेटीत, माझ्या शरीरातील अस्थींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण योग्य आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे म्हणून मला सांगण्यात आले, ती चाचणी केली. एशियन वंशाच्या व माझ्या वयाच्या व्यक्तींच्या अस्थींमध्ये साधारणपणे जेवढे कॅल्शियमचे प्रमाण असते तेवढेच माझ्याही अस्थींमध्ये असल्याचे निदान झाले. आता उपचार करण्यासारखे असे काहीच नव्हते. शरीर त्याची देखभाल स्वत:च करत असल्याने प्लॅस्टरमधे हात ठेवून शांत बसणे एवढेच माझ्या हातात होते. माझे वय जास्त असल्याने तरुण व्यक्तीला हाड परत जुळून येण्यासाठी जो वेळ लागला असता त्याच्या दुप्पट वेळ मला लागला. या कालात पहिले पंधरा दिवस वेदनाशामक गोळ्यांचा भडिमार करून घ्यावा लागला. आयुष्यात प्रथमच इतके दिवस आणि इतके स्ट्रॉंग वेदनाशामक मला घ्यावे लागले. पण इलाजच नव्हता. या जवळ जवळ दोन महिन्याच्या कालखंडात, प्रकर्षाने माझ्या मनात जर कसला विचार येत असला तर तो स्वत:चे शरीर निरोगी असणे ही कोणत्याही एखाद्या व्यक्ती जवळची किती सर्वात मोठी धनदौलत असते याचा.

आपण बहुतेक वेळा स्वत:च्या शरीराचा निरोगीपणा हा गृहितच धरतो. आता समाजात काही व्यक्ती अशा जरूर असतात ज्यांना हा निरोगीपणा देवदत्त असतो. त्यांनी आपल्या शरीराचा कितीही गैरवापर केला, तंबाखू, मद्यार्कासारख्या विषांचा त्याच्यावर वर्षाव केला तरी त्यांचे शरीर बेटे निरोगीच राहते. माझे एक आजोबा 89 वर्षाचे होऊन गेले. त्यांचे अग्निहोत्र व संध्यापाणी शेवटपर्यंत चालू होते. त्यांच्या डोळ्यावर 84व्या वर्षी शल्यक्रिया झाली. या शल्यक्रियेच्या आदल्या दिवशी सुद्धा व दुसर्‍या दिवसापासून परत, त्यांचा दिनक्रम चालूच राहिला. डॉक्टर एवढेच म्हणाले की 84 वर्षाच्या या माणसाला मी काय पथ्य पाणी सांगणार! त्यांना काय हवे ते करूदे. तेंव्हा माझ्या या आजोबांसारख्या व्यक्ती अपवाद म्हणूनच सोडून द्यायला पाहिजेत. बाकी आपल्या सर्वांची शरीरे मात्र अशी नसतात. त्यांचे निरोगीपण हे राखावेच लागते.

सध्याच्या युगात हे निरोगीपण गृहित धरता येत नाही. सध्याच्या कालात, जसे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला अथक प्रयत्न करावे लागतात तसेच प्रयत्न, निरोगी राहण्यासाठीही करावे लागतात. त्यामुळेच, एखाद्या व्यक्तीची जशी वैयक्तिक धनसंपत्ती असते तशीच त्याची वैयक्तिक आरोग्यसंपत्तीही असते ही संकल्पना रूढ होऊ लागली आहे. आता ही आरोग्यसंपत्ती कशा कशाला म्हणायचे याबाबत व्यक्ती व्यक्तीत मतभेद असू शकतो. काही व्यक्ती आपल्याला कोणताही आजार नाही ना यालाच आरोग्यसंपत्ती मानतात, तर काही व्यक्ती कमावलेले व पिळदार शरीर व प्रमाणबद्ध बांधा, याला आरोग्यसंपत्ती मानतात. काही स्त्रिया 34-24-36 सारख्या आकड्यांना सर्वात महत्व देतात तर काही व्यक्तींना भावनात्मक आनंद हेच आरोग्यसंपत्तीचे लक्षण वाटते.

आरोग्यसंपत्ती प्राप्त करण्याचे त्यामुळे अर्थातच भिन्न भिन्न मार्ग आहेत. व्यायामशाळेत जाऊन घाम गाळण्याचा मार्ग काही लोकांना सर्वोत्तम वाटतो तर योगासारख्या अध्यात्माच्या वाटेकडे झुकणार्‍या मार्गावरच काहींचा विश्वास असतो. काही लोकांच्या मते खेळाच्या मैदानातूनच हा मार्ग जातो. मार्ग कोणताही असला तरी शरीराचे निरोगीपण व त्या निरोगीपणातून मिळणारा आनंद व आतून बरे वाटत रहाणे हेच या सर्व मार्गांचे अंतिम ध्येय असते हे मान्य करावेच लागेल.

निरोगीपणा ही एक प्रकारची संपत्ती असल्यामुळेच त्याचा विमा उतरवता येतो. धनसंपत्तीचा विमा उतरवतात तेंव्हा ज्या ठिकाणी चोराचिलटांचे भय, पूर, आग या संकटांची जास्त शक्यता वाटते अशा ठिकाणच्या संपत्तीचा विमा उतरवताना जास्त हप्ता भरावा लागतो. त्याचप्रमाणे उच्च रक्त दाब, मधुमेह अशी संकटे जेंव्हा या आरोग्य संपत्तीला भेडसावत असतात तेंव्हा हेल्थ इश्युअरन्सचा हप्ता जास्त असणे साहजिकच आहे.

सध्याचे युग अतिशय स्पर्धात्मक झाले आहे. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी अलीकडे टार्गेट्स ठरवली जातात. यासाठी अपयशे लपवून जाऊन फक्त मिळालेले यश जगासमोर ठेवले जाते. निरोगीपणा प्राप्त करण्याच्या टार्गेटमधे मात्र ही पद्धत अवलंबिता येत नाही. तसे बघायला गेले तर निरोगीपणा हा उत्तम आहार, योग्य व्ययाम व भावनात्मक खालीखुशाली या त्रिसूत्रीमुळे गाठता येतो पण याच्यात जवळचे रस्ते म्हणून काही मंडळी त्यांच्या मताने असलेला परफेक्ट आहार, बड्या नटनट्यांनी सांगितलेला व्यायाम व कृत्रिम साधनांनी मिळवलेला आनंद याच्या द्वारे निरोगीपणा गाठण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात अडचणी काही निराळ्याच असतात. आपल्या आवडत्या नटीने जो आहार घेऊन तिचा साईझ झीरो गाठलेला असतो तो आपल्याला चालत नाही. व्यायामाची आखणी फिसकटून जाते व रोजच्या जीवनात येणार्‍या व मनोदौर्बल्य निर्माण करणार्‍या प्रसंगांच्यामुळे कृत्रिम उपायांनी जीवनातला भावनात्मक आनंद मिळतच नाही.

अशा वेळी निरोगीपणाचे ध्येय गाठताना अपयश येऊ शकते. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की धनसंपत्तीसारखे हे अपयश लपवता येत नाही. बेसुमार वजन वाढणे, शारिरिक हालचाली न करता येणे किंवा चिडचिड होणे ही सगळी या अनोराग्याचीच लक्षणे असतात. सध्याच्या सतत बदल होत असलेल्या पर्यावरणात स्वत:चे आरोग्य सांभाळणे ही मोठी कठिण कला आहे.सहाव्या शतकातल्या चीनमधे, टाओ धर्म उदयास आला होता. या धर्माचा प्रणेता लाओ त्झू याने आपल्या टाओ टे चिंग (Tao Te Ching) या ग्रंथात निरोगीपणाबद्दल मोठे सुंदर विवेचन केले आहे. तो म्हणतो की

जी व्यक्ती दुसर्‍याला समजते तिला ज्ञान प्राप्त होते. परंतु जी व्यक्ती स्वत:लाच समजू शकते त्या व्यक्तीलाच शहाणी किंवा सूज्ञ म्हणता येते. दुसर्‍यांना समजण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी शक्ती लागते. परंतु स्वत:ला समजण्यासाठी धैर्य, आत्मशक्ती आवश्यक असते. उत्तम व योग्य आहाराने शरीराला उर्जा मिळते. प्रभावी व्यायामाने शारिरीक शक्ती मिळते व मन:शक्तीमुळे मन व शरीर या दोन्हीला उर्जा मिळते व समतोल राखला जातो. मानसिक चिकाटीमुळे आपल्या मनाला व शरीराला एक लवचिकता व ताकद प्राप्त होते ज्यामुळे आपण संपूर्ण आरोग्य मिळवण्याच्या मार्गावरून वाटचाल करून आपले ध्येय गाठू शकतो.”

one who understands others has knowledge, one who understands himself has wisdom, mastering others requires force, mastering self requires courage (strength of the spirit) good nutrition feeds the body, effective exercise gives strength to the body and mental strength gives energy and synergy to the mind and body, while emotional resilience gives the flexibility and dexterity to navigate the path towards complete health. “

सहाव्या शतकात लिहिलेले हे शब्द, आजच्या जीवनालाही कसे चपखल लागू पडतात हे पाहण्यासारखे आहे.

ही आरोग्यसंपत्तीची संकल्पना मला तर अतिशय आवडली आहे. रोज सकाळी फिरायला जाताना मी अनेक वयाच्या, शरीर प्रकृतीच्या व्यक्ती बघतो. स्थूलपणासारख्या काहीतरी व्याधीने ग्रासले आहे म्हणून फिरायला येणार्‍या लोकांची संख्या सर्वात जास्त असते. या परिस्थितीपेक्षा निरोगी असणारी मंडळी तो निरोगीपणा टिकवण्याच्या उद्देशाने फिरताना दिसू लागली तर समाजाच्या आरोग्यसंपत्तीत वृद्धी होते आहे असे म्हणता येईल. एकदा तुमच्याजवळ ही संपत्ती भरपूर प्रमाणात असली की व्याधींचे भय उरणारच नाही.

5 मे 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “एक नवीन संकल्पना- आरोग्यसंपत्ती

  1. अशाच जातीची पण वेगळ्या अर्थाची कबिराची उक्ति आहे – दुःखमें सिमरन सब करे, सुख में करे न कोय, जो सुख में सिमरन करे, तो दुःख काहेको होय?

    Posted by Nikhil Sheth | मे 5, 2010, 5:19 pm
  2. very nice health topic

    Posted by kishor | मे 11, 2010, 11:02 pm
  3. your article on helath is very nice keep it up

    Posted by kalpana dangat | मे 18, 2010, 4:20 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention एक नवीन संकल्पना- आरोग्यसंपत्ती « अक्षरधूळ -- Topsy.com - मे 5, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: