.
Musings-विचार, Uncategorized

अथातो ज्ञानजिज्ञासा


महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील छोट्या वयाच्या विद्यार्थीचमूसाठी एक (त्यांच्या मताने एक मोठी भेट) घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, सहा ते चौदा या वयोगटातील कोणत्याही विद्यार्थ्याला (अर्थातच विद्यार्थिनीलाही) परिक्षेत कमी गुण मिळाले किंवा अपयश आले म्हणून आहे त्याच इयत्तेत ठेवण्यात येणार नाही. याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना परिक्षाच द्यावी लागणार नाही.त्यांना पूर्वी प्रमाणेच सर्व परिक्षा द्याव्या लागतील. मात्र जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत असे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांना विशेष शिकवणी देण्यात येईल व त्यांचा अभ्यास तयार करून घेण्यात येईल. सध्याच्या शालेय शिक्षणाबद्दल एक मोठा आक्षेप घेतला जातो की हे शिक्षण फक्त परीक्षार्थी बनले आहे व मला वाटते की हा आक्षेप बहुतांशी सत्यही आहे. शालेय शिक्षणातून परीक्षांना आलेले अवाजवी महत्व कमी होऊन ते जास्त प्रमाणात ज्ञानार्थी व्हावे या उद्देशासाठी म्हणून जर हे पाऊल उचलले गेले असले तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे असे मला वाटते.

मागच्या वर्षी, शालान्त परीक्षांच्या मध्यवर्ती मंडळाने (CBSE), हे मंडळ घेत असलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेमधे, गुण न दाखवता फक्त ग्रेड्स दर्शविल्या जातील अशी घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या एकूण गुणांमध्ये, एक, दोन किंवा अगदी पाच, दहा गुणांचा फरक असतो अशा सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमधे, तसे बघायला गेले तर काहीच फरक नसतो. परंतु आपल्याला दोन गुण कमी मिळाले या कल्पनेने या मुलांना अतिशय ताण तणावातून जावे लागते. शालेय शिक्षण हे त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून द्यायचे असते. तसे न होता, सध्या दिले जाणारे शालेय शिक्षण म्हणजे त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण मिळवून देणारे कारखाने बनले आहेत ही वस्तुस्थिती आहे यात शंकाच नाही. त्या दृष्टीने CBSE ने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे असेच मला म्हणावेसे वाटते.

परंतु वर निर्देश केलेले दोन्ही शासकीय निर्णय, प्रत्यक्षातील मूळ प्रश्नाला लावलेल्या तात्पुरत्या मलमपट्या आहेत असेच म्हणावेसे वाटते. हा मूळ प्रश्न काय आहे हे शोधण्यासाठी जरा खोलात जाऊन, शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. नव्या पिढीला जे ज्ञान आपण शिक्षण म्हणून देऊ इच्छितो ते ज्ञान आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी स्वानुभवांतून आणि विचारातून संग्रहित व संकलित केलेले आहे. पुढच्या पिढ्यांना चाकाचा शोध पुन्हा पुन्हा लावावा लागू नये यासाठी मागच्या पिढ्यांनी संग्रहित व संकलित केलेले हे ज्ञान, शिक्षण म्हणून पुढच्या पिढीला दिले जाते. संत रामदासांनी शिक्षणाचा हा मूल उद्देश जे जे आपणांस ठावे। ते ते इतरां सांगावे! शहाणे करून सोडावेसकल जन या शब्दात मोठ्या समर्थपणे सांगितला आहे.

नव्या पिढीला शहाणे करून सोडावे हा जर शिक्षणाचा उद्देश असला तर मग सध्याच्या शिक्षणाची ही परिक्षार्थी वृत्ती उपटली तरी कोठून? असा प्रश्न साहजिकच मनासमोर येतो. प्राचीन भारतात, गुरुगृही राहून ज्ञान संपादन करण्याची प्रथा होती. असे गुरु विद्यार्थ्याची परिक्षा नक्कीच घेत असले पाहिजेत. पण एखादा विद्यार्थी ज्ञानी बनून गुरूगृहावरून जेंव्हा परत येत असे तेंव्हा जे काय ज्ञान प्राप्त करायचे ते त्याने प्राप्त केल्यामुळे तो स्वगृही परत येत असे. परिक्षा उत्तीर्ण झाला म्हणून नव्हे. नालंदा, तक्षशीला सारख्या विद्यापीठात एखादा विद्यार्थी जेंव्हा ज्ञानप्राप्तीसाठी जात असे तेंव्हा त्याने ज्ञान प्राप्त केले की नाही हे बघण्यासाठी त्याची परिक्षा इतर पंडित जरूर घेत. परंतु त्या विद्यापीठामधे दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा उद्देश, त्या विद्यार्थ्याने ज्ञानप्राप्ती करावी हा असे, त्याने कोणत्या तरी मार्गाने व कशीतरी परिक्षा उत्तीर्ण व्हावे हा नसे.

प्राचीन भारतामधल्या या शिक्षण पद्धतीमधे, आमुलाग्र बदल घडवून आणला एका इंग्रज अधिकार्‍याने. थॉमस बॅबिन्ग्टन मॅकले (1800-1859) हा एक कवी, इतिहासतज्ञ व राजकारणी असलेला ब्रिटिश अधिकारी . 1833 साली, जेंव्हा ब्रिटिश संसदेने भारतीय शासन विधेयक 1833′ मंजूर केले तेंव्हा तो लॉर्ड ग्रे याच्या अध्यक्षपदाखाली असलेल्या नियामक मंडळाचा सचीव होता. या मॅकलेने दोन वेळा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेली वक्तव्ये ब्रिटिश संसदेसमोर केली. यापैकी पहिले वक्तव्य त्याने 1833 मधे केले होते. ब्रिटिश राजवटीच्या भारतातील प्राधान्यांपैकी भारतीयांना शिक्षण देणे हे एक महत्वाचे प्राधान्य असल्याचे मॅकलेने या वक्तव्यात सांगितले होते. मेकॅलेच्या विचारांप्रमाणे, भारतीयांना अडाणी व इंग्लंडवर कायम परावलंबी ठेवणे हे ब्रिटिश साम्राज्याच्या दृष्टीने पुढे अत्यंत अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे युरोपियन संस्कृतीची जी मूल्ये आहेत ती भारतातील समाजात रुजवणे अतिशय आवश्यक आहे व यासाठी त्यांना योग्य शिक्षण देऊन स्वावलंबी करणे महत्वाचे आहे.

मॅकलेच्या या विचारांत काही फारसे आक्षेपार्ह आहे असे मला तरी वाटत नाही. त्याने या बाबतीत इंग्लंडचेच दिलेले उदाहरण अगदी योग्य वाटते. पंधराव्या किंवा सोळाव्या शतकामधे, जेंव्हा इंग्लंडमधे सॅक्सन व नॉर्मन यांच्यातील लढाया चालू होत्या त्या कालात, ग्रीक व रोमन तत्ववेत्यांच्या विचाराचा अभ्यास इंग्लंडमधे चालू झाला. मॅकलेच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटिश पंडितांनी इंग्लंडमधल्या जुन्या ग्रंथावरच फक्त लक्ष केंद्रित केले असते व ग्रीक किंवा रोमन तत्ववेत्यांचे विचार त्याज्य समजले असते तर इंग्लंडला सध्याच्या वैभवशाली परिस्थितीत येणे शक्यच झाले नसते. याच पद्धतीने भारताला पुढे समर्थ बनवायचे असले तर भारतीयांना सर्व आधुनिक शास्त्रे, तर्कशास्त्र, तत्वज्ञान यांचे ज्ञान प्राप्त करून दिले पाहिजे.

1835 मधे मॅकलेने ब्रिटिश संसदेसमोर एक छोटे वक्तव्य केले. या वक्तव्यात भारतावर अतिशय दूरगामी परिणाम होतील असे दोन महत्वाचे मुद्दे होते. त्यापैकी पहिला मुद्दा भारतात दिलेल्या शिक्षणाचे माध्यम कोणते असावे यासंबंधी आहे. हे माध्यम इंग्रजी भाषाच असले पाहिजे याबाबत मॅकले अतिशय आग्रही होता व त्याची कारणमीमांसा त्याने आपल्या भाषणात केली आहे. या भाषणातला दुसरा मुद्दा आपल्या प्रस्तुत लेखासाठी अतिशय महत्वाचा आहे. मेकॅले म्हणतो की आपल्या मर्यादित साधन संपत्तीत, इतक्या मोठ्या लोकसंख्येला शिकवणे आपल्याला अशक्य आहे. या कारणामुळेच आपण समाजामधे एक असा सुशिक्षित वर्ग तयार करण्याची गरज आहे की जो वर्ग आपण आणि आपण राज्य करीत असलेले कोट्यावधी लोक यांच्यामधे परस्पर संवाद साधू शकेल. समाजातील हा वर्ग पूर्णपणे भारतीय रक्ताचा व वर्णाचा असेल. परंतु त्याच्या आवडीनिवडी, मते, मॉरल्स, व बुद्धीमत्ता ही पूर्णपणे ब्रिटिश असतील. आपण नंतर या वर्गाकडे भारतातील भाषांमधे सुधारणा करणे, पाश्चिमात्य जगतातील शास्त्रीय कल्पनांनी त्या भाषा समृद्ध करणे व हळू हळू एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ज्ञान देऊ शकतील असा बदल त्यांच्यात घडवून आणणे ही कामे सोपवू शकतो. “

“ It is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.”

मेकॅलेच्या या भाषणावरून हे स्पष्ट होते की ब्रिटिश नोकरशाहीला मदत करतील असे लाचार व हांजीहांजी करणारे बाबू लोक फक्त तयार करेल अशी शिक्षण पद्धती निर्माण करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात कधीच नव्हती. परंतु सिंहाचा पुतळा करायला जावे व मांजर बनावे तसे इंग्रजांनी भारतात रूढ केलेल्या शिक्षण प्रणालीचे बहुदा शेवटी झाले असावे. मेकॅलेला अपेक्षित असा ब्राऊन साहेबांचा वर्ग समाजात निर्माण झाला खरा पण या वर्गाने समाजाचे अपेक्षित प्रबोधन न करता तो आत्मकेंद्री बनत गेला. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती नष्ट होऊन, मेकॅलेची ब्राऊन साहेब निर्माण करणारी शिक्षण पद्धती रूढ झाली. पण या पद्धतीचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांचे, मेकॅलेला अपेक्षित होते तसे, समाजातील इतर घटकाशी नाते असे काही राहिलेच नाही व समाजाभिमुख न होता हे शिक्षण घेतलेले तरूण फक्त नोकरशाहीतील बाबू बनू लागले. या शिक्षण पद्धतीत ज्ञानप्राप्ती हा उद्देश न राहता सरकारी नोकरीची पात्रता त्या विद्यार्थ्याला मिळवून देणे हाच त्या शिक्षण पद्धतीचा एकमेव उद्देश बनला. ही सरकारी नोकरीची पात्रता या विद्यार्थ्याला आली आहे किंवा नाही हे त्याची एक परिक्षा घेतली की समजत असल्याने शालान्त परिक्षेची कल्पना निघाली व संपूर्ण शिक्षण पद्धतीचे ध्येय ज्ञानप्राप्ती हे न राहता शालान्त परिक्षेचे प्रशस्तिपत्रक प्राप्त करून देणे हे झाले.

लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर वगैरे सारख्या राष्ट्रप्रेमी तरूणांना, मेकॅलेच्या सरकारी शाळांच्या शिक्षण पद्धती मधील ही तृटी लक्षात आल्यावर न्यू इंग्लिश स्कूल सारख्या शाळा निघाल्या. या शाळांच्यातून बाहेर पडणार्‍या तरूण वर्गाच्या कल्पना जरी थोड्याफार भिन्न असल्या तरी शालान्त परिक्षेचे जू या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर तसेच राहिले. मी प्राथमिक शाळेत व माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले तो काळ पन्नासच्या दशकातला होता. स्वातंत्र्य मिळून थोडीच वर्षे झाली होती. त्यामुळे एकूण शिक्षण पद्धती बहुतेक इंग्रजांच्या कालातीलच होती. फार थोडे बदल झाले होते. तरीही सध्याच्या शिक्षण पद्धती बरोबर तुलना केली तर मला हे जाणवते की 11वीच्या वर्षात जाईपर्यंत परिक्षेचे ओझे आमच्या खांद्यावर कधीच नव्हते. शालेय वर्षात 4 परिक्षा होत असत. परीक्षेच्या आधी आठवडाभर आणि वार्षिक परीक्षेच्या आधी पंधरा दिवस जादा अभ्यास केला की पुरत असे. प्रत्येक परिक्षेत खूप यश मिळवलेच पाहिजे अशी बहुदा कोणत्याच पालकाची अपेक्षा नसल्याने, बर्‍यापैकी गुण मिळाले की भागत असे. त्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा, शाळेमधली वर्षे परीक्षेच्या ताणतणावांपासून मुक्त अशीच गेली. आमचे शास्त्र विषयाचे एक शिक्षक अतिशय रस घेऊन शिकवत. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे ते संपूर्ण निरसन करत. माझ्या आठवणीप्रमाणे या शिक्षकाच्या तासाची, शास्त्रासारखा नीरस विषय असूनही, आम्ही आतुरतेने वाट बघत असू. 11वीच्या वर्षात ज्या वेळेस, शास्त्रीय, भौगोलिक किंवा ऐतिहासिक कारणे द्या हे परिक्षेतले प्रश्न आमचा पीछा करू लागले त्या क्षणी या विषयांमधले आमचे कुतुहल संपल्यासारखे झाले.

कोणत्याही अर्भकाला आसमंतातील प्रत्येक गोष्टीबद्दल अपार कुतुहल किंवा जिज्ञासा असते. प्रथमत: ती गोष्ट हाताळून, त्याची चव घेऊन ते बालक त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या कल्पना ठरवते. याच पद्धतीचे कुतुहल शाळेत जाणार्‍या बालकालाही वाटत रहाते. या त्याच्या जिज्ञासेतूनच प्रत्यक्षात हे बालक ज्ञान प्राप्ती करत असते. त्या बालकाच्या नशीबाने त्याला एखादी चांगली शिक्षिका मिळाली तर अल्पावधीत ते बालक एवढे विपुल ज्ञान प्राप्त करू शकते की मन चकित होते. प्ले ग्रुप मधे शिकणार्‍या माझ्या नातीला मिस जून नावाची अशी एक शिक्षिका मागच्या वर्षी लाभली होती. त्या वर्षात तिचे सर्वसामान्य ज्ञान अक्षरश: मन स्तिमित करणार्‍या गतीने वाढलेले मला स्मरते.

शाळेत जाणार्‍या बालकांना परिक्षेचा गती रोधक एकदा लागला की त्यांची जिज्ञासा शिक्षक, पालक यांच्याकडून पद्धतशीर दाबली जाते. परिक्षेत विचारण्याची शक्यता आहे तेवढेच शिकणे. बाकीच्या गोष्टी बिनमहत्त्वाच्या! हे तत्वज्ञान मुलाच्या डोक्यावर बसलेच की प्रथम त्याची जिज्ञासा व त्या नंतर त्यातून होणारी ज्ञानप्राप्ती याला काही महत्त्वच उरत नाही. पुण्यात शिकत असलेल्या माझ्या नातवंडांच्या सुदैवाने, इयत्ता 5वी पर्यंत त्यांना परिक्षा द्यावीच लागणार नाहीये. परंतु परिक्षेचे ओझे या छोट्या मुलांच्या खांद्यावरून उतरवून टाकणार्‍या अशा शाळा विरळाच आहेत. इतिहास किंवा भूगोल हे शाळेत बहुतेकांना अत्यंत अप्रिय वाटणारे विषय, प्रत्यक्षात किती रोचक आहेत हे जिज्ञासा दाबली गेलेल्या या मुलांना दुर्दैवाने कधी कळतच नाही.

मेकॅलेच्या बाबू तयार करणार्‍या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गेल्या पन्नास साठ वर्षात अनेक प्रयत्न करण्यात आले व चालू आहेत. परंतु प्रत्यक्षात असे दिसते की मुलांच्या डोक्यावरचे परिक्षांचे ओझे वाढतच चालले आहे. आमच्या वेळच्या चार परिक्षा सध्या आहेतच पण त्यात आता युनिट टेस्ट्स अधिक आल्या. प्रत्येक मुलाने परिक्षेत टोकाचे सुयश मिळवलेच पाहिजे या पालकांच्या दुराग्रहामुळे शाळेबरोबर शिकवण्या, क्लासेस सुरू झाले. या क्लासेसच्या परिक्षा सुरू झाल्या. त्या शिवाय शिष्यवृत्ती परिक्षा, जैन गणिताच्या परिक्षा, मुलांच्या डोक्यावरचे ओझे वाढतेच आहे.

शालान्त परिक्षेत गुण न देता फक्त ग्रेड देणे किंवा प्राथमिक शाळेतील मुलाला ते उत्तीर्ण कसे होईल हे बघणे या सारख्या सुधारणा नक्कीच स्वागतार्ह आहेत. परंतु या परिक्षांमुळे मुलांच्या ज्ञानजिज्ञासेचे जे खच्चीकरण होते आहे त्यात काहीतरी सुधारणा झाल्याशिवाय शालेय शिक्षणाचा मुलाच्या मनात ज्ञानाची एक बैठक निर्माण करण्याचा जो मूळ हेतू आहे तो कधीच साध्य होणार नाही असे मला वाटते. ही मूळ बैठकच जर मनात तयार नसली तर त्या बैठकीवरून आपली सृजनशीलता वापरून तो विद्यार्थी पुढचे उड्डाण करणार तरी कसा? आणि कधी?

2 मे 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “अथातो ज्ञानजिज्ञासा

 1. सध्याची शिक्षणपद्धती अनुभवसिद्ध ज्ञानाला म्हणजे विज्ञानाला महत्त्व देते. हे अयोग्य आहे असे म्हणता येत नाही. पण या शिक्षण पद्धतीने तर्कसिद्ध ज्ञान हे त्याज्य आहे ही समजूत रुजविण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्यामुळे या शिक्षणपद्धतीत दोष निर्माण झाले आहेत. हे दोष दूर करण्यासाठी विज्ञानाला तर्कसिद्ध ज्ञानाची जोड आवश्यक आहे ही भूमिका स्वीकारणे जरूर आहे. या भूमिकेचा स्वीकार होण्यात बर्याच सामाजिक अडचणी आहेत.

  Posted by मनोहर | मे 2, 2010, 10:53 pm
 2. I am a regular reader of your blog. This post I liked very much. So, thought of making a request, that can I re-publish it with your name on my blog? Thank you

  Posted by Nikhil Sheth | मे 3, 2010, 6:11 सकाळी
 3. With all due credits.. Thank you very much.. actually I was about to start a series on the same topic which never happened.. here are first two articles in the series…

  Posted by Nikhil Sheth | मे 3, 2010, 9:22 सकाळी

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention अथातो ज्ञानजिज्ञासा « अक्षरधूळ -- Topsy.com - मे 2, 2010

 2. पिंगबॅक अथातो-ज्ञानजिज्ञासा « दिसामाजी काहीतरी… - मे 3, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: