.
Musings-विचार

फॅब इंडिया स्टोरी


अतिशय सुंदर व आकर्षक रंगसंगती, मनोवेधक डिझाइन्स व टिकाऊपणा या सर्व गुणांमुळे, हातमागावर विणलेली वस्त्रे, सगळ्यांना व विशेषत: स्त्रियांना, नेहमीच हवीहवीशी वाटतात. परंतु ज्या दुकानांतून किंवा प्रदर्शनातून ही वस्त्रे विक्रीला ठेवलेली असतात त्या ठिकाणी असलेली एकूण स्वच्छता, धुळीने भरलेला माल व एकूणच विक्रेत्यांची अनास्था व हे इथे आहे ते हवे असले तर घ्या नाहीतर फुटा!“ अशी वृत्ती, यामुळे या दुकानांत जाऊन कोणतेही हॅन्डलूम उत्पादन खरेदी करावे, असे मला कधीच वाटले नाही. परंतु गेली एक दोन वर्षे मात्र पडदे, बेड कव्हर्स, टेबल क्लॉथ यासारखी कोणतीही खरेदी करण्याचा बूट घरात निघाला की हॅन्डलूम वर विणलेली वस्त्रे घेण्याचा माझा आग्रह असतो. अर्थात यात माझा थोडासा स्वार्थही असतो ही गोष्ट वेगळी. या इतर कापड खरेदीबरोबर, मला आवडलेला एखादा शर्टही मी खरेदी करावयाच्या वस्तूत हळूच सरकावून देऊ शकतो.

माझ्यात झालेल्या या बदलाचे एकमेव कारण आहे फॅब इंडिया या हॅन्डलूमची वस्त्रे विकणार्‍या दुकानाचा मला लागलेला शोध. एकतर ही दुकाने वातानुकूलित असतात त्यामुळे आरामात खरेदी करता येते. तुम्हाला निवडीसाठी भरपूर वाव असतो. किंमती मला तरी रिझनेबल वाटतात, या दुकानातल्या विक्रेत्यांना, तुलनात्मक दृष्टीने, माल दाखवण्यात व तो तुम्हाला विकण्यात थोडाफार तरी रस असतो आणि मुख्य म्हणजे कपड्यांची गुणवत्ता अतिशय छान असते. या कपड्यांचे रंग फेड होत नाहीत, कपडे आटत नाहीत किंवा त्या प्रमाणात ते मोठेच शिवलेले असतात. काहीही असो! खरेदी केल्यावर चार दिवसांनी त्या खरेदीचा पश्चाताप तर मुळीच होत नाही.


वरचे सगळे वर्णन वाचून मी या फॅब इंडिया कंपनीचे जाहिरात करण्याचे कंत्राट वगैरे मिळवले आहे की काय? अशी शंका कोणाही वाचकाला येणे अगदी रास्त वाटते. परंतु तसे काही नाहीये. या फॅब इंडिया कंपनीने त्यांना जे विणकर, हातमागाच्या मालाचा पुरवठा करतात त्यांचे भले व्हावे म्हणून जी काय नवी पावले उचलली आहेत ती मला फार भावली व म्हणून हा लेख प्रपंच.

ही फॅब इंडिया कंपनी, फोर्ड फाऊंडेशन या संस्थेचे एक माजी सल्लागार, जॉन बिसेल या अमेरिकन गृहस्थाने 1960 मधे भारतीय हॅन्डलूम उत्पादनांची निर्यात करण्यासाठी सुरू केली. भारतातल्या ग्रामीण भागात, छोट्या छोट्या खेडेगावांत असे लाखो कलाकार, विणकर आहेत जे, आपल्या पारंपारिक कौशल्याचा उपयोग करून, हातमागावर विणलेली अतिशय सुंदर वस्त्रे , कलाकुसरीच्या वस्तू, बनवत असतात. भारत सरकार आणि राज्य सरकारे यांनी या विणकरांना, कारागिरांना, रोजगार मिळावा म्हणून त्यांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. या सहकारी संस्थांमधून या कारागिरांचा माल विकला जातो व आज त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला आहे. परंतु या सहकारी संस्था याच्या पुढे जाऊन

या कलाकारांचे धंदे मोठे व्हावे, त्यांना धंद्यात त्यांना अधिक अधिक भांडवल घालता यावे यासाठी फारसे काहीच प्रयत्न करत असताना दिसत नाहीत. त्यामुळे हे लाखो विणकर, कलाकार, दारिद्र्यरेषेखाली जरी नसले तरी आहे त्याच अर्थप्रमाणात व लघु उद्योजकच राहिले आहेत.

1976 पर्यंत फॅब इंडिया कंपनीने, भारतातील पारंपारिक व वैविध्यपूर्ण अशा हॅन्डलूम वस्त्रांच्या निर्यातीत चांगलाच जम बसवला होता. याच वर्षी कंपनीने आपली देशामधील पहिली शो रूम, दिल्ली मधे उघडली व देशांतर्गत विक्रीकडेही लक्ष वळवले. 1998मधे जॉन बिसेलचा मुलगा विल्यम याच्या हातात कंपनीची सूत्रे आली व या नंतर ही कंपनी अतिशय जोराने व जोमाने वाढू लागली. आजमितीला या कंपनीच्या 112 शो रूम्स आहेत. रोम, दुबई आणि ग्वांगझू सारख्या शहरांच्यात फॅब इंडियाच्या शो रूम्स आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल आता 75 मिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोचली आहे. या दुकानातून, डिझायनर कपडे, दागिने, पडदे, चादरी यांसारखी होम फर्निशिंग्स, प्रसाधन उत्पादने व ऑर्गनिक अन्नपदार्थ यासारखे पदार्थ विकले जातात. असे असले तरी कंपनीने अत्यंत जाणीवपूर्वक आपले मूळ व सामाजिक दायित्व राखून ठेवलेले आहे. कंपनी विकत असलेली प्रत्येक गोष्ट ही ग्रामीण हॅन्डलूम विणकर व कारागीर व त्यांच्या सहकारी संस्था यांनीच बनवलेली असते. फॅब इंडियाची दुकाने अगदी सामान्य भारतीय, शहरी पॉश मंडळी व परदेशाहून येऊन भारतात स्थायिक झालेली मंडळी या सगळ्यांच्यातच अतिशय लोकप्रिय आहेत. परदेशातील अशा दुकानांशी तुलनाच करायची म्हटले तर ही दुकाने, पॉटरी बार्न, बॉडी शॉप आणि पिअर वन या तिन्ही दुकानांची मिळून बनलेली आहेत असे म्हटले तरी चालेल.


ग्रामीण विणकरांनी बनवलेली वस्त्रे निर्यात करणार्‍या एका कंपनीचे, एवढी मोठी उलाढाल करणार्‍या एका आंतर्राष्ट्रीय कंपनीत रुपांतर करणारा 41 वर्षाचा हा विल्यम बिसेल एखाद्या स्कॉलर विद्यार्थ्यासारख्या दिसतो. त्याच्या आतापर्यंतच्या कार्यामुळे तो भांडवलशाही अर्थकारणाचा पक्का समर्थक असला पाहिजे असे कोणासही वाटेल. परंतु 2007 मधे या माणसाने आपली ही यशस्वी कंपनी सामाजिकरणाची एक प्रयोगशाळा बनविण्याचे ठरवून टाकले व सर्वांना एक धक्का दिला. फॅब इंडियाच्या भाग भांडवलाचा एक मोठा हिस्सा बाजूला काढून, विल्यम बिसेल ने एक नवीन कंपनी सुरू केली. फॅब इंडिया ज्या उत्पादनांची विक्री करते ती प्रत्यक्षात 700च्या वर ग्रामीण विणकर व कलाकार बनवतात. या नवीन कंपनीचा उद्देश असा होता की या 700च्या पेक्षा जास्त संख्येने असलेल्या कारागिरांच्या, स्वत:च्या मालकीच्या काही कंपन्या स्थापन करण्यास मदत करून त्या कंपन्यांना भाग भांडवल पुरवणे. या कंपन्या स्थापन करण्याच्या मागची मूळ कल्पना अशी आहे की एकदा हे कारागीर या कंपन्यांचे भाग भांडवदार झाले की या कंपन्यांना जास्तीतजास्त फायदा कसा होईल याकडेच या कारागिरांचे लक्ष लागेल व अनुषंगाने या छोट्या कंपन्या भरभर वाढू लागतील व या ग्रामीण कारागिरांना पुष्कळच जास्ती उत्पन्न मिळू लागेल. सहकारी संस्थांमधे जे एक प्रकारचे औदासिन्य व मरगळ दिसते ती या भांडवलदार कंपनीच्या स्थापनेने कमी होईल.


विल्यम बिसेल स्वत:ला Communitarian म्हणतो. त्याच्याच शब्दात सांगायचे तर तो म्हणतो की मला भांडवल उभे करणे आणि मिळालेल्या संपत्तीचे वाटप करणे या बाबतीतल्या व सर्वमान्य झालेल्या भांडवलशाही कल्पना वापरून सामाजिक हित कसे साध्य करता येईल हे बघायचे आहे.” त्याला असे वाटते की असे केल्याने भांडवलदार अर्थकारणात जी अंगभूत प्रचंड उर्जा असते ती या सामाजिक कार्यात पण या अर्थकारणाचे वाईट परिणाम टाळून वापरणे शक्य होईल.

आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बिसेलने आपल्या 700च्या वर असलेल्या पुरवठादारांच्या 17 कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांना तो प्रादेशिक पुरवठादार कंपन्या म्हणतो. यातल्या बर्‍याचशा कंपन्या या फॅब इंडियाला गेली चाळीस पन्नास वर्षे मालाचा पुरवठा करणार्‍या मूळ सहकारी संस्थाच आहेत. या सहकारी संस्थाचे भागीदार असलेल्या कारागिरांनी या नवीन प्रादेशिक पुरवठादार कंपन्यांचे शेअर घेतले आहेत. उरलेले भांडवल, फॅब इंडियाने स्थापन केलेल्या नवीन कंपनीने घातले आहे.

यात फॅब इंडियाला ही एक मोठा फायदा झाला आहे. 700 पुरवठादारांच्या कडून माल घेण्यापेक्षा 17 कंपन्यांच्या कडून माल घेणे त्यांना सोपे जाऊ लागलेआहे. दोन वर्षातच या प्रादेशिक पुरवठादार कंपन्यांना उत्तम फायदा होऊ लागल्याने त्यांच्या शेअर्सच्या किंमती दीडपट झाल्या आहेत. या कंपन्यांनी आपला माल तर विकला जाणारच आहे म्हणून नवीन उत्पादने बाजारात आणण्याचा प्रयत्न करणे सोडून देऊ नये म्हणून फॅब इंडियाने या सगळ्या कंपन्यांना असे सांगितले आहे की जर त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत असे वाटले तर फॅब इंडिया बाहेरून दुसर्‍या पुरवठादारांकडूनही माल घेऊ शकते.

सध्या या प्रादेशिक कंपन्यांचे 50 % भाग भांडवल फॅब इंडियाचेच आहे. पुढच्या 5 ते 7 वर्षात ते 25 % होऊन बाकीचे कारागिरांच्या हातात जावे असा बिसेल यांचा प्रयत्न आहे. सहकारी संस्थांमधे सर्व शेअर होल्डरना समान हक्क असतात. या कंपन्यांच्यात, शेअर होल्डर कारागिराच्या हातात असलेल्या समभागाप्रमाणे, मतदान हक्क राहतील. त्यामुळे ज्यांनी जास्त पैसे गुंतवले आहेत त्यांना कंपनीची धोरणे ठरवण्याचा जास्त प्रमाणात अधिकार राहील.

फॅब इंडियाच्या या नव्या कल्पनेप्रमाणे जे कारागीर सुरुवातीपासून या कंपनीत भांडवल घालतील त्यांना शेअर्सच्या किंमती वर जातील तसतसा जास्त फायदा होणार आहे. धोका पत्करण्याची तयारी व कष्ट करण्याची क्षमता या दोन्ही गुणांना भांडवदार अर्थकारण नेहमीच प्रचंड परतावा देते. हा परतावा ग्रामीण भागातील कारागिरांना मिळावा हेच फॅब इंडियाच्या नव्या धोरणामागचे सूत्र आहे.

पुढील काही वर्षातच हे धोरण यशस्वी होते आहे किंवा नाही हे कळेलच, परंतु फॅब इंडियाने सुरुवात केलेला हा प्रयत्न मात्र प्रशंसनीय आहे यात शंकाच नाही.

30 एप्रिल 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “फॅब इंडिया स्टोरी

 1. पहिल्या पॅरॅग्राफ शी संपूर्ण सहमत! माझी कुर्ता-खरेदी ही फ़ॅब-इंडीया मध्येच असते.
  फ़ोटो मात्र भारी घेतलेत. तो अ‍ॅश कलर कुर्ता आवडला.
  ही मुंबईची आऊटलेट आहे का?

  Posted by Shraddha | एप्रिल 30, 2010, 11:53 pm
 2. किमतीची घासाघीस व अनावश्यक चोखंदळपणा न केल्यास विक्रेत्याचा वेगळा अनुभव येऊ शकतो.

  Posted by मनोहर | मे 1, 2010, 10:16 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention फॅब इंडिया स्टोरी « अक्षरधूळ -- Topsy.com - मे 1, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: