.
अनुभव Experiences

आव्हान-4


1977 च्या सुमारास माझ्या वडीलांनी धंद्यातून निवृत्त होण्याचे ठरवले. त्यांनी हा धंदा त्यांच्या आणखी दोन मित्रांच्या भागीदारीत सुरू करून चालवला होता. त्यांची भागीदारी मी घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. मला ती कल्पना तितकीशी पसंत पडली नाही. एकतर माझ्या वडीलांचे इतर भागीदार त्यांच्याप्रमाणेच आता ज्येष्ठ नागरिकत्वाकडे झुकलेले होते. त्यांच्या कल्पना, धोका पत्करण्याची क्षमता आणि माझ्या कल्पना व धंद्यात पुढे काय करावयाचे या बद्दलच्या माझ्या योजना यांच्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे हे मला दिसत होते. तसेच हे भागीदार निवृत्त झाल्यावर त्यांची मुले जर धंद्यात आली तर आमचे एकमेकांशी कितपत पटेल याबाबतही मी साशंक होतो. या कारणांमुळे मी वडीलांना असे सुचवले की मी स्वतंत्रपणे धंदा चालू करतो. त्यांनी त्यांच्या भागीदारांबरोबर काय ते ऍग्रीमेंट करून निवृत्त व्हावे. यावर बरीच चर्चा झाली व शेवटी आमचे एक कौटुंबिक मित्र व सल्लागार यांच्या मदतीने असे ठरले की वडीलांनी धंद्यातून निवृत्त व्हावे. यासाठी इतर भागीदारांनी त्यांना काही रक्कम द्यावी व कारखान्याची एक शेड मोकळी करून वडीलांच्या ताब्यात द्यावी.

ही शेड ताब्यात मिळण्यास काही महिन्यांचा अवधी होता. इतके दिवस तर स्वस्थ बसून रहाणे मला परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे मी आमच्या घराजवळचे मोटर गॅरेज व घरातील एक खोली यात माझा कारखाना चालू केला. आतापर्यंतच्या माझ्या अनुभवापेक्षा ही जबाबदारी मोठी कठिण होती. माझे स्वत:चे 5000 रुपये व इतर नातेवाईकांनी दिलेले 3000 रुपये या भांडवलावर मी धंदा चालू केला. त्या वेळेस घरातले फ्रीझ व टीव्ही हे विजेच्या दाबात होणार्‍या मोठ्या बदलामुळे खराब होण्याचे प्रकार बरेच वाढत चालले होते व यासाठी ऍटोमॅटिक विद्युत दाब नियंत्रक नुकतेच बाजारात येऊ लागले होते. या संबंधी थोडे फार प्रयोग करून मी माझा स्वत:चा या प्रकारचा नियंत्रक तयार केला. सुदैवाने पुण्यातील एक दोन मोठ्या डीलर्सनी हा नियंत्रक विकण्याचे मान्य केले व काहीतरी व्यापारी उलाढाल चालू झाली. अर्थात या नियंत्रकांच्या विक्रीमधे जो फायदा सुटत होता त्यात माझा स्वत:चा कौटुंबिक खर्चही भागणे शक्य नव्हते.

एक दिवस संध्याकाळी मी स्कूटरमधे पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेलो होतो. या पंपावर शेजारीच एक छोटे दुकान असे. त्यात छोट्यामोठ्या गोष्टी, सिगरेट्स मिळत असत. त्यामुळे तिथे कोणी ना कोणी ओळखीचे भेटे. त्या दिवशी मला कॉलेजामधला एक जुना मित्र भेटला त्याच्या बरोबर एक दुसरे गृहस्थ होते. मित्राने या गृहस्थांची माझ्याशी ओळख करून दिली. हे गृहस्थ पॉलिटेक्निकमध्ये शिकवत होते व डॉक्टरेट साठी संशोधन करत होते असे मला समजले. मी काय करतो असे विचारल्यावर मी माझ्या सध्याच्या उत्पादनाबद्दल माहिती दिली व इतरही थोडी फार माहिती दिली. त्या गृहस्थांना माझ्या कामात बरीच रुची आहे असे दिसले. कारण मी दुसर्‍या दिवशी पॉलिटेक्निकमधे त्यांना भेटू शकेन काय अशी पृच्छा त्यांनी केली.

दुसर्‍या दिवशी त्यांना भेटायला मी गेलो. हे गृहस्थ त्यांच्या प्रयोगशाळेत मला घेऊन गेले व संशोधनासाठी तयार केलेले एक यंत्र त्यांनी मला दाखवले. हे यंत्र केमिकल मिलींग किंवा एका विशिष्ट रसायनाचा झोत धातूच्या एखाद्या तुकड्यावर टाकून त्या तुकड्याची लांबी रुंदी ही परिणामे पाहिजे त्या आकाराची करणे (मशिनिंग किंवा मिलींग) या साठी बनवले होते. या रसायनाच्या झोतामधून अतिशय उच्च प्रमाणाचा पण अतिशय कमी विद्युत दाबाचा विद्युत प्रवाह त्यांना सोडावयाचा होता. त्यांना अपेक्षित असलेला प्रवाह 500 ते 1000 ऍम्पियर एवढा असणे आवश्यक होते व तो एकदा नियंत्रित करून ठेवला की धातूचा तुकडा पुढे मागे किंवा वर खाली हलवला तरी हा विद्युत प्रवाह तेवढाच राहणे गरजेचे होते. ( कॉन्स्टन्ट करंट ) असा स्थिर राखता येणारा विद्युत प्रवाह देऊ शकेल असा पॉवर पॅक मी करून देऊ शकेन का? असे त्यांनी मला विचारले. मी उद्या फोन करतो असे सांगून काढता पाय घेतला.

रात्रभर विचार केला. तांत्रिक दृष्ट्या ही गोष्ट शक्य आहे असे मला वाटले. आता धंद्यातली रिस्क़ घ्यायची किंवा नाही हे मला समजेना. हा पॉवर पॅक जर यशस्वी पण मी करू शकलो तर धंद्यातील भांडवलाची माझी निकड भागणार होती. कारण या पॉवर पॅकची किंमत कोणतीही घासाघीस न करता हे गृहस्थ देण्यास तयार होते. शेवटी सकाळी मी आपण हा धोका पत्करावा असे मी ठरवले व तसा त्या गृहस्थांना फोन केला. त्यांच्या ग्रॅन्टमधून हे पैसे मिळणार असल्याने आगाऊ रक्कम देणे त्याना शक्य नव्हते पण पॉवर पॅक तयार झाल्यावर 1 आठवड्यात पैसे मिळू शकतील असे ते म्हणाले. मी नाईलाजाने या अटी मान्य केल्या व ऑर्डर घेऊन कामास लागलो.

पुढचे दोन महिने बरेच बिझी गेले. हा पॉवर पॅक भला थोरल्या आकाराचा होणार होता. अंदाजे 5फूट लांब, 4 फूट रूंद व 4 फूट उंच एवढी मोठी त्याची फ्रेम झाली होती. ती फ्रेम आल्यावर आमच्या गॅरेजमधे जागाच उरली नाही व बाकीचे काम करायला खूप अडचण होऊ लागली. हळू हळू या पॉवर पॅकसाठी आवश्यक साहित्य जमू लागले व त्याची जुळणी करण्याचे काम मी सुरू केले. दीड एक महिन्याने जुळणी तर पूर्ण झाली व छान पैकी रंग दिला असल्याने हा पॉवर पॅक एकदम प्रोफेशनल दिसू लागला.

आता या पॉवर पॅकची चाचणी कशी करायची हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. एवढा जास्त प्रवाह सतत वाहता ठेवता येईल असे कोणतेच लोड मला मिळेना. हा पॉवर पॅक ज्यांच्यासाठी बनवला होता त्यांच्याही जवळ काही लोड नव्हते. व पूर्ण चाचणी घेतल्याशिवाय हे उपकरण कोणीच ऍक्सेप्ट केले नसते. दोन दिवस असेच विचारात गेले. व त्या नंतर एकदम मला मी इंजिनीयरिंग कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना विद्युत उपकरण प्रयोगशालेत वापरलेल्या पाण्याच्या लोडची आठवण झाली. या लोडमधे एका लाकडी पिंपात पाणी घालून त्यातून विद्युत प्रवाह जावा म्हणून खडे मीठ टाकत असत व विजेच्या तारा त्या पाण्यात बुचकळून प्रवाह चालू ठेवत असत.

मी असेच एक वॉटर लोड करायचे ठरवले. मी प्लॅस्टिकचे एक पिंप आणले व त्याला लाकडी झाकण करून तांब्याच्या दोन वीजवाहक पट्ट्या त्यात बुचकळवण्याची व पट्ट्यांतील अंतर कमी जास्त करण्याची सोय केली. पाण्यातील मिठाचे प्रमाण कमी जास्त करून, पाहिजे तेवढे लोड घेता येईल असा माझा अंदाज होता. दुसर्‍या दिवशी चाचणी चालू केली. हळू हळू सुरवात करून 500 ऍम्पियर पर्यंत तर मी पोचलो. मग असे लक्षात आले की यापेक्षा मिठाचे प्रमाण वाढवून पाणी अक्षरश: उकळते आहे व त्यातून साबणाचा फेस आल्यासारखा प्रचंड फेस येऊन पसरतो आहे. त्या फेसाने गॅरेजजवळचे आवार भरून गेले. त्यामुळे चाचणी थांबवावी लागली.

काय करावे अशा विचारात असताना माझ्या एका मित्राची आठवण झाली. हा मित्र रासायनिक पदार्थ आपल्या कारखान्यात बनवत असे. त्याला फोन केला व मोठ्या आकाराचा प्लॅस्टिकची टाकी मिळेल का म्हणून विचारणा केली. माझ्या नशिबाने या मित्राकडे मला हवा असलेली टाकी होती. ती टाकी मी आणली. त्यावर तांब्याच्या पट्ट्या अडकवण्याची सोय केली व परत त्यात पाणी व मीठ टाकून चाचणी सुरू केली. या टाकीचा वापर करून मी 1000 ऍम्पियरपर्यंत पोचू शकलो. परंतु फेस एवढा निर्माण होऊ लागला की रस्त्यावरून जाणारे येणारे काय प्रकार चालला आहे हे कुतुहलाने बघू लागले.

नंतर माझे ग्राहक असलेले गृहस्थ आले. त्यांनी स्वत: चाचणी घेतली व ते बेहद्द खुश झाले. त्यांना माझे वॉटर लोड तर इतके आवडले की ते पण विकत घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली. प्लॅस्टिकची टाकीच मुळात माझी नसल्याने मी त्यांना ते देणे शक्यच नव्हते. दुसर्‍या दिवशी ट्रक बोलावून पॉवर पॅकचे ते धूड मी पाठवून दिले. ठरल्याप्रमाणे त्याच्या किंमतीचा चेक मला दोन तीन दिवसातच मिळाला. ही रक्कम बरीच मोठी असल्याने धंद्यातील भांडवलाची माझी निकड भागली आणि मुख्य म्हणजे एक प्रचंड आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांनाच आला. अशा प्रकारचे कोणतेही काम जे तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे ते आपल्याला करता येईल याची खात्री वाटू लागली. पुढच्या व्यावसायिक आयुष्यात अनेक मोठी आव्हाने मी पेलू शकलो याचे बरेचसे श्रेय या पॉवर पॅकला नकीच द्यावे लागेल.

19 एप्रिल 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “आव्हान-4

  1. Hi Chandrashekhar saheb,
    Pardon my writing in English as I donot have the ability to spell marathi letters on the computor.I am a regular reader of your blogs for the last few months .Your writing is precise , and at the same time very informative on a wide range of subjects.They are also motivational pieces for .the young and the ambitious.It is indeed a treat to go through your writings.
    My good wishes and warm regards
    JKBhagwat

    Posted by jkbhagwat | एप्रिल 19, 2010, 8:43 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: