.
Musings-विचार

सिंधू नदी काठची नगरी


माझ्याजवळ रिकामा वेळ असला की मी पुष्कळ वेळा माझ्या संगणकावर गूगल अर्थ हा प्रोग्रॅम चालू करतो. आपण गत आयुष्यात अनेक ठिकाणी प्रवास केलेला असतो. ती गावे किंवा ठिकाणे गुगल अर्थ वर शोधून काढण्यात खूप मजा येते. वेळ कसा उडून जातो ते कळतही नाही. या शिवाय ज्या भू भागांसंबंधी आपल्याला काहीच माहिती नसते अशा ठिकाणी कोणती गावे आहेत, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे हे बघायला सुद्धा मला खूप आवडते.

गेले दोन दिवस मी माझ्या एका ब्लॉगपोस्टसाठी गुगल अर्थवरून काही माहिती संकलन करण्याचा प्रयत्न करत होतो. ऍलिस अल्बिनिया या एका ब्रिटिश लेखिकेने नुकतेच एम्पायर्स ऑफ द इंडस या नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात इंडस किंवा सिंधु नदीचे खरे उगम स्थान तिने कसे शोधून काढले याचे वर्णन केले आहे. हे वर्णन मला फार रोचक वाटले व गुगल अर्थ वर मी या स्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या लेखिकेच्या निरिक्षणांप्रमाणे, सिंधु नदीच्या पाण्याचा मोठा हिस्सा पंजाब मधील नद्यांच्या पाण्यातून न येता, त्या नदीच्या उगमस्थानाजवळील तिबेट, लडाख व बाल्टीस्तान या भागातील विशाल पर्वतराजींवरून खाली वहात येणार्‍या पाण्याचा आहे.

लडाखच्या पूर्वेला असलेल्या तिबेटच्या, Ngari या जिल्ह्यातून वहात येऊन, सिंधू नदी लडाखमधे शिरते. आपण असे सर्वसाधारणपणे मानतो की सिंधू नदी कैलाश पर्वताजवळच्या एका हिमनदातून उगम पावते. हा हिमनद, कैलाश पर्वत व मानसरोवर हे सर्व या Ngari जिल्ह्यामधेच आहेत. या वहात येणार्‍या नदीला आलि (Ali) किंवा गर या गावाजवळ एक उपनदी येऊन मिळते. या नदीचे नाव सेंग्ये झांगपो ( Sengye Tsangpo) किंवा शिचुआन्हे (Shiquanhe) नदी असे आहे. ऍलिसबाईंच्या निरिक्षणामधे त्यांना असे आढळून आले की शिचुआन्हे नदी ही कोणत्याही हिमनदापासून उगम पावत नसून पर्वतराजींच्या वरून वहात येणार्‍या असंख्य ओहोळांमुळे ती बनलेली आहे व तिला सतत पाणी असते. या उलट कैलाश पर्वताजवळच्या हिमनदातून वहात येणारी नदी ही त्या हिमनदाचे बर्फ वितळून वहाणार्‍या पाण्याची आहे. या कारणामुळे सेंग्ये झांगपो नदीलाच ऍलिसबाई खरी सिंधू नदी मानतात व कैलाश पर्वताकडून येणारी नदी ही या नदीला मिळणारी उपनदी आहे असे त्यांना वाटते.

सेंग्ये झांगपो नदी आणि सिंधु नद्यांचा संगम

चिनी सरकारने या सेंग्ये नदीवर एक मोठे धरण बांधले आहे. चिनी सरकारने भारत किंवा पाकिस्तानला न कळवताच सिंधू नदीवर हे धरण बांधले आहे असे ऍलिसबाईंचे म्हणणे आहे. हे सगळे वाचल्यावर, मी गूगल अर्थवर, लेह पासून पूर्वेला, नदीच्या प्रवाहाबरोबर शोध घेत गेलो. मला नेहमीच असे वाटायचे की लडाखच्या पूर्वेला असलेला हा तिबेटचा भाग म्हणजे हिमाच्छादित पर्वतराजींचा टापू असावा. परंतू हा सर्व भाग लडाख सारखाच हरितहीन आहे. या भागात मी सिंधू नदीबरोबर मागे जात सेंग्ये नदी व कैलाश पर्वताकडून येणारी नदी यांच्या संगमावर पोचलो. तेथून सेंग्ये नदीबरोबर मी आलि किंवा तिबेटी भाषेमधल्या गर या गावाजवळ पोचलो.

आलि किंवा गर शहर आणि सेंग्ये झांगपो (सिंधु? ) नदीवरचे धरण

या वैराण प्रदेशात इतके सुंदर गाव असेल अशी मला कधी कल्पनाही नव्हती. 1960 च्या दशकात चिनी सरकारने पश्चिमेला असलेला शिंजियांग प्रांत तिबेट बरोबर एका राजरस्त्याने जोडला. हा रस्ता चीनने भारतापासून बळकावून घेतलेल्या अक्शाई चीन या भागातून जातो. या रस्त्याच्या जवळच हे गाव चिनी सरकारने वसवले. गाव नवीन वसवले असल्याने अतिशय आधुनिक पद्धतीने व चिनी वाटते. अर्थात स्थानिक तिबेटी लोकांना या गावाबद्दल कितपत आत्मियता वाटते ते देव जाणे?

आलि किंवा गर हे शहर

या गावाची वस्ती सध्या 20000च्या आसपास आहे. पर्यटकांना या भागात आकर्षून घेण्यासाठी येथे एक आधुनिक विमानतळही बांधला जातो आहे. कैलाश आणि मानसरोवर येथून बर्‍यापैकी जवळ असल्याने, कदाचित पुढे तिथे जाणार्‍या यात्रेकरूंना या गावात मुक्काम करूनच पुढे जाता येईल.

लोकांच्या मनात असो वा नसो. एखाद्या जागेवर शहर वसवायचे असे सरकारने ठरवले की तिथे ताबडतोब एक मोठा राजरस्ता, भव्य इमारती बांधून टाकल्या जातात. या गावाचे तसेच झाले आहे. भारताकडून बळकावलेल्या अक्क्षाई चीन भागात, मोठ्या संख्येने चिनी सैनिक तैनात केलेले असतात असे तिथून जाणार्‍या पर्यटकांचे म्हणणे आहे. या सैनिक तुकड्यांच्या सपोर्टसाठीच बहुदा हे गाव वसवले असावे. गावाला पाणी पुरवठा हवा म्हणून धरण बांधले असावे. त्या धरणाने सिंधु नदीच्या पाण्यावर परिणाम होईल की नाही याची काळजी चिनी सरकार कशाला करेल? ती पाकिस्तानने करावी.

सेंग्ये झांगपो नदीजवळच्या धरणाचा अलीकडच्या काळातला उपग्रहावरून घेतलेला फोटो. जलाशयात केवढे पाणी आता साठले आहे ते पहाण्यासारखे आहे. पाकिस्तानमधे वहात जाणार्‍या सिंधु नदीच्या पाण्याचा हा एवढा मोठा हिस्सा चीनने गिळंकृत केला आहे.

12 एप्रिल 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “सिंधू नदी काठची नगरी

 1. Great Information!!

  Keep on posting such posts…

  मी गेले काही दिवस ब्रम्हपुत्रेवरचे चीनमधील “थे ग्रेट बेन्ड” यावर सर्च करतो आहे…त्यावर काही माहिती असल्यास जरुर पोस्ट करावी.

  बाकी सध्या दक्षीण-पूर्व अशियाई देश आणि चीन मध्ये “मेकोंग” नदीवरुन चांगलेच वादळ उठले आहे!

  Posted by krishnakath | एप्रिल 12, 2010, 7:56 pm
  • कृष्णाकाठ

   आपण माझ्या Sandprints या ब्लॉगवरचे The Strongest Takes all हे पोस्ट जरूर वाचावे. आपल्याला हवी असलेली बरीच माहिती तिथे मिळेल. या पोस्टचा दुवा माख्या लेखातच आहे. तो बघावा

   Posted by chandrashekhara | एप्रिल 12, 2010, 8:10 pm
 2. वा! पर्यटकांसोबतच लष्कराची व्यवस्था करण्याचा दूरदर्शीपणा चिनी सरकारने दाखवला आहे म्हणायचा. पण काही म्हणा! गाव सुंदर वाटतो आहे. अगदी तिथे जाऊन रहाण्याइतपत इच्छा व्हावी इतका छान फोटो आहे.

  Posted by कांचन कराई | एप्रिल 12, 2010, 10:46 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: