.
अनुभव Experiences

आव्हान-3


पुण्यातील एका मोठ्या वाहन उद्योगातली माझी नोकरी, मी 1974 मधे सोडून दिली व माझ्या वडीलांच्या धंद्यातच त्यांना मी मदत करू लागलो. 1976-77च्या सुमारास आम्हाला दिल्लीहून एक पत्र आले. गृह खात्याच्या अंतर्गत असलेल्या व संवेदनाशील व गुप्त माहिती जमा करणार्‍या एका विभागाकडून ते पत्र आले होते. या विभागातील अधिकारी, आपापसातील संदेशांची देवाण घेवाण, एका विशिष्ट रेडियो सेटवरून करत असत. हे रेडियो सेट खूप जुने म्हणजे दुसर्‍या महायुद्ध काळातील होते. परंतु डोंगराळ भागात या रेडियो सेटचे काम इतके उत्तम चालत असे की उपलब्ध असलेल्या दुसर्‍या नव्या प्रकारच्या कोणत्याही रेडियोना या विभागातील कोणी हातही लावण्यासही तयार नसे. या रेडियो सेटमधे व्हॉल्व्ह वापरलेले असल्याने त्यांना एक पॉवर पॅक लागत असे. या पॉवर पॅकमधून या सेट्सना लागणारी तीन किंवा चार निरनिराळी व्होल्टेजेस पुरवली जात. या रेडियो सेट्स बरोबर जे मूळ पॉवर पॅक्स आलेले होते ते सायकलवर बसवून त्याचे पेडल मारून वापरण्याची सोय होती. ही पद्धत खूपच त्रासदायक होती. त्यामुळे या विभागाला कार बॅटरीवर चालणारे असे शंभर सव्वाशे पॉवर पॅक्स करून हवे होते.

मी वडीलांना आपण ही ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करूया असे सुचवले. दिल्लीची ऑर्डर पुण्याला मिळेल का? तिथे अधिकार्‍यांना काही खाऊ वगैरे द्यायला लागला तर? तो आपण कसा देणार? वगैरे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु शेवटी आपण प्रयत्न करावा असे आम्ही ठरवले. या कामात एक मुख्य अट होती. या पॉवर पॅकचे सॅम्पल तयार करून ते या विभागाकडून मान्य करून घेतल्यानंतरच हा विभाग पुढील निर्णय घेण्यास तयार होता. मी ताबडतोब कामाला लागलो व दोन तीन आठवड्यात एक सॅम्पल तयार करून घेऊन ते स्वत: दिल्लीला घेऊन गेलो. माझी अशी अपेक्षा होती की हा विभाग माझा पॉवर पॅक त्यांच्या रेडियो सेटला माझ्या समोर जोडून चाचणी घेईल. पण तसे करण्यास त्यांनी पूर्ण नकार दिला. त्यांनी तो रेडियो सेट मला दाखवण्यास सुद्धा नकार दिला व माझा पॉवर पॅक तेथेच मी सोडून द्यावा व पंधरा दिवसांनी परत यावे असे त्यांनी सुचवले. मला ते मान्य होण्यासारखे नव्हते कारण या पंधरा दिवसात माझ्या डिझाईनची कॉपी दिल्लीच्या कोणाकडून तरी करून घेऊन मला त्यांनी हात चोळत बसवले असते. शेवटी असे ठरले की 2 दिवसात त्यांनी मला प्राथमिक चाचणी अहवाल द्यायचा. जर माझा पॉवर पॅक योग्य काम करत असला तर पुढे चर्चा करायची.

दोन दिवसांनी मी त्या विभागात परत गेलो. तेंव्हाचे तिथले वातावरण मला खूपच निराळे भासले. माझ्याशी त्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वत: बोलणी करण्यास आले. माझा पॉवर पॅक उत्तम काम करतो आहे. व आतापर्यंत त्यांनी इतर उत्पादकांची दहा बारा सॅम्पल्स तपासली होती पण बाकी कोणतेच सॅम्पल इतके चांगले काम करत नाही असे प्रशस्तिपत्रक त्यांनी मला दिले. नंतर तो रेडियो सेटही त्यांनी मला दाखवला. आमची बोलणी होऊन त्यात असे ठरले की त्यांनी माझा सेट ठीक कार्य करत असल्याचे व जास्त चाचण्यांसाठी तो भारताच्या सीमाविभागात पाठवण्यात येणार आहे असे पत्र मला द्यायचे. तसेच नंतर ठरवली जाणारी किंमत दोन्ही पक्षांना मान्य असल्यास ही ऑर्डर आम्हालाच दिली जाईल हे ही त्या पत्रात लिहायचे असे ठरले. तसे पत्र घेऊन मी पुण्यास परत आलो.

सुमारे दोन महिन्यांनी त्या विभागाचे पत्र आले की तो पॉवर पॅक उत्तम चालत असल्याने किंमत ठरवण्यासाठी दिल्लीस यावे. तसा मी दिल्लीला गेलो. किंमत ठरवली व पुरवठा कसा करावयाचा याचे शेड्य़ूल ठरवून मी परत आलो. पुण्याला आल्यावर आम्ही या पॉवर पॅकचे उत्पादन करण्यास घेतले. सर्व चाचण्या वगैरे करून आम्ही हे पॉवर पॅक दिल्लीला पाठवून दिले. संरक्षण विभागाला असे सामान दिले तर रेल्वे पावतीच्यावर 75% बिलाची रक्कम मिळू शकते. ही ऑर्डर गृह मंत्रालयाची असल्याने त्यांना अशी सुविधा नव्हती. त्यामुळे या उत्पादनावर झालेला खर्चाचा बोजा आमच्याच डोक्यावर होता

माल पाठवल्यावर 2 महिन्यांनी एक अतिशय धक्कादायक असे पत्र आले. हे पॉवर पॅक योग्य रितीने कार्य करत नसल्याने ते ताबडतोब दुरुस्त करून द्यावे अन्यथा ते पॉवर पॅक परत पाठवले जातील व पाठवण्याचा खर्चही आमच्याकडूनच वसूल करण्यात येईल या अर्थाचे ते पत्र होते. मिळेल त्या गाडीने मी परत दिल्लीला जाण्यास निघालो.

या रेडियो सेट्समधे व्हॉल्व्ह वापरलेले होते. व्हॉल्व्हना आपल्या दिव्याचे किंवा टीव्ही ट्यूबचे फिलॅमेंट असते तसे एक फिलॅमेंट असते. या फिलॅमेंटला अगदी कमी दाबाचे व्होल्टेज असलेला सप्लाय द्यावा लागतो. या सप्लायमधे काहीतरी अडचण येत होती. आता या स्तराला गोष्टी आल्यावर परत संशोधन सुरू करून ही अडचण सोडवायची हे मोठे कर्म कठिण काम होते. पण या विभागाच्या लोकांनी विशेषत: लॅब असिस्टंट्सनी मला बसायला, विचार करायला जागा दिली. प्रश्नाचा अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की या रेडियो सेटमधून, अतिशय शक्तीशाली असे रेडियो सिग्नल्स पाठवले जात. त्या सिग्नल्सचा शतांशाहूनही कमी हिस्सा या फिलॅमेंटच्या सप्लायमधे शिरतो आहे व त्यामुळे तिथली सर्किट्स निकामी होत आहेत. अडचण काय आहे माझ्या लक्षात आल्यावर त्यावर काय उपाय योजना करता येईल याचा मी विचार केला. नंतर दिल्लीच्या चांदणी चौक मार्केटमधे जाऊन मला हवे असलेले नवीन भाग खरेदी केले. दुसर्‍या दिवशी ते भाग बसवून मी चाचणी घेतली. आता तो पॉवर पॅक व्यवस्थित कार्य करतो आहे असे लक्षात आले. त्या विभागाने पुढच्या चाचण्या एक आठवड्यात करून अहवाल देतो असे सांगितले. मला दिलीला दुसरे काहीच करता येण्यासारखे नसल्याने मी पुण्याला परत आलो.

आठ दिवसात चाचणी यशस्वी झाल्याची तार मला दिल्लीहून आली. मी तसाच मुंबईला निघालो. मुंबईला लॅमिंग्टन रोड वरील मार्केटमधून हवे असलेले भाग खरेदी केले व रात्रीच्या गाडीने दिल्लीला रवाना झालो. पुढचे आठ दिवस रोज दहा बारा तास परिश्रम करून मी ते सव्वाशे पॉवर पॅक स्वत: दुरुस्त केले. सगळ्यांच्या चाचण्या घेतल्या व काम पूर्ण केले. या विभागाचा वरिष्ठ अधिकारी माझ्या कामामुळे इतका खुश झाला होता की तो मला त्याच्या घरी भोजनास घेऊन गेला. त्याच्या पत्नीने मला एक गंमतीदार गोष्ट सांगितली. तिच्या म्हणण्याप्रमाणे माझे पॉवर पॅक चालत नसल्याचा ताण माझ्यासारखाच त्या विभागातील लोकांना आला होता कारण सीमाभागातून त्या पॉवर पॅक्ससाठी सतत विचारणा होत होती.

महिन्याभराने मला परत एक दिल्लीची ट्रिप करावीच लागली. बाबू लोकांच्या अडचणी सोडवल्या व भल्या थोरल्या रकमेचा चेक खिशात घालून शांत डोक्याने पुण्याला परतलो. या प्रकरणातून मी बरेच काही शिकलो. मुख्य डोके शांत ठेवून काम करणे कसे आवश्यक असते हे लक्षात आले. पुढच्या व्यावसायिक आयुष्यांत अशी अनेक आव्हाने मग सहज पेलता आली.

6 एप्रिल 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “आव्हान-3

  1. Gr8
    Very very inspirational.
    Thanks for sharing your story.

    Posted by Salil Chaudhary | एप्रिल 16, 2010, 11:29 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: